कुणालाच न चुकलेला मृत्यू हे मानवी जीवनाचं मूलभूत सत्य! पण काही माणसांचे मृत्यू मनाला चटका लावून जाणारे ठरतात. आपल्या अभिनय सामर्थ्यांने रुपेरी पडदा गाजवणारी बेबी नंदा अशांपैकीच. तिच्या आठवणींचा धांडोळा-

खेडय़ातल्या रस्त्यांतून जाणारी घोडागाडी. त्यांत मागे बसलेली, घर-गांव सोडून जाताना, जुने स्नेहपाश तोडून जाताना हळवी झालेली, मुसमुसणारी.. नंदा. नंतर स्टेशनवरून तिला दूर घेऊ न जाणारी, धूर सोडत जाणारी आगगाडी. सुरुवातीला सतत तिच्यावरच असणारा, अधनंमधनं घोडागाडीमागे भराभर चालणाऱ्या जगदीपवर लाँगशॉटमध्ये असणारा कॅमेरा, आगगाडी दूर गेल्यावर मात्र, दगडासारखा निश्चल होऊन उभ्या राहिलेल्या जगदीपवर क्लोज-अप घेऊ न कॅमेरा स्थिर होतो.. त्याच्या चेहऱ्यावर काही तरी जिवाभावाचं, कायमचं हरविल्याचे हताश भाव.. अन् या संपूर्ण सीनच्या पाश्र्वभूमीवर महम्मद रफीचे, हृदयाला हात घालणारे सूर.. ‘चल उड जा रे पंछी, के अब ये देस हुआ बेगाना!’ ए.व्ही.एम.च्या १९५७ च्या ‘भाभी’ या चित्रपटाचा हा क्लायमॅक्स. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमधील अप्रतिम चित्रीकरण.
‘नंदा गेल्या’ची बातमी अनपेक्षितपणे कळल्यावर हा क्लायमॅक्सच डोळ्यांसमोर तरळून गेला.. चल उड जा रे पंछी..! त्याला कारणही तसंच. कुणाच्याही वयाची पहिली दहा र्वष ‘संस्कारक्षम’ असतात असं म्हटलं जातं. केवळ कौटुंबिक चित्रपट पाहिले जाण्याच्या त्या काळात, आमच्यावर जे ‘चित्रपट संस्कार’ झाले, ते या ‘भाभी’सारख्या चित्रपटापासूनच! छोटय़ा पडद्यावरच्या ‘कृष्ण-धवल’ काळात, ‘भाभी’ पुन्हा पाहिला तेंव्हा, पुन्हा जुन्या आठवणी, त्या सिनेमातील अप्रतिम गाणी.. पुन्हा त्या काळात घेऊन गेल्या. त्यातून रफीच्या या गाण्याचं नंदाशी असलेलं नातं, मनांत कायम ठसलं, ते आजतागायत!
नंदा तशी आजारीबिजारी असल्याची बातमी नव्हती.. मुळांत ती बातम्यांतच कधी नव्हती. असलाच तर ‘अज्ञातवास’ हाच आजार असावा. बातमीत म्हटल्याप्रमाणे ‘वृद्धापकाळाने’ वगैरे म्हणण्याएवढी ती वयोवृद्ध निश्चितच नव्हती. ‘हृदयविकाराचा झटका’ ही अज्ञातवासाची शोकांतिका असेलही कदाचित. पण हा सारा तपशिलाचा भाग. ‘बेबी नंदा गेली’ हे सत्य. एका अर्थाने अखेपर्यंत ‘बेबी नंदा’च राहिली. तिची समकालीन ‘बेबी तबस्सुम’, मैत्रिणीच्या या बातमीनं शोक अनावर होत म्हणाली, ‘हाथों में मेहेंदी लगे बिना वैसेही चली गयी नंदा!’ ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ (१९६२) या सिनेमातील ‘टायटल-साँग’ गाताना, लग्न होण्याच्या कल्पनेनं मोहरून, स्वत:ला विसरून गेलेली नंदा! पण प्रत्यक्षांत नियतीच्या ते मनांतच नव्हतं. ‘मेहेंदी’ न लागताच, अशीच दोनेक वर्षांपूर्वी गेलेली दुसरी.. सुरैया. देव आनंदशी असफल प्रेमकहाणी तरी त्यामागे होती. नंदाच्या बाबतीत तसंही नव्हतं. तिच्या उमेदीच्या काळांत कुणा लेफ्टनंटला तिच्यात इंटरेस्ट असल्याच्या वावडय़ा उठणं, हा या चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग. तशी ‘नंदा-शशी कपूर’ ही गाजलेली जोडीदेखील पडद्यापुरतीच मर्यादित होती. ‘केमिस्ट्री’ हा शब्ददेखील तेंव्हा या मीडियांत नव्हता. वीसेक वर्षांपूर्वी, उतारवयांत पन्नाशी उलटल्यानंतर, ‘द ग्रेट एन्टरटेनर’ निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याबरोबर तिचा विवाह जमल्याच्या बातम्या आल्या, तेंव्हा बऱ्याच काळानं तिचं नाव पुन्हा प्रकाशात आलं. मनमोहनजींचा मुलगा व सूनदेखील वडिलांच्या या पुनर्विवाहास अनुकूल होते.. कदाचित नंदानेच पाऊल मागं घेतलं असेल.. काहीही असो. पण नंतर मनमोहनजींच्या मृत्यूमुळे, तसंदेखील होणार नव्हतं. इथे, अनहोनी को होनी करणारे, ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थोनी’ हे मनमोहनजींचे मानसपुत्र, पडद्यापुरतेच एन्टरटेनर ठरले! मेहंदी लागलेली नंदा पडद्यावरच राहिली. एकूणच नियतीचं ‘एन्टरटेनमेंट स्क्रिप्ट’ अनाकलनीय! आपल्या बुद्धीपलीकडचं..! तिच्या समकालीन वहिदा, माला सिन्हा, साधना, आशा पारेख, या मैत्रिणी, या ना त्या कारणानं प्रकाशात, बातम्यांत येत असतात. पण ‘नंदा इज नो मोअर’ ही बातमीच, ‘ती होती’ याची जाणीव करून देणारी ठरली!
मा. विनायकांच्या, तिच्या वडिलांच्या- अकाली निधनानंतर बालवयांत जबाबदारी अंगावर पडलेली नंदा, ‘बेबी नंदा’ म्हणून १९४८च्या ‘मंदिर’ मध्ये प्रथम पडद्यावर आली, बालकलाकार म्हणून. विनायकांचे मावसभाऊ व्ही. शांताराम यांनी तिला ‘तूफान और दिया’त (१९५६) प्रमुख भूमिका दिली. त्यांत राजेंद्रकुमार तिचा भाऊ होता. नंतरच्या ‘भाभी’मध्ये ती थेट ‘बालविधवा’ होती! जगदीपशी असलेल्या तिच्या नात्याला नांव नव्हतं. (हा जगदीप म्हणजे १९७५च्या ‘शोले’ मधला ‘सुरमा भोपाली’.. हा उल्लेख नंतरच्या पिढय़ांसाठी! ) त्या सिनेमातील त्याच्याबरोबरची तिची गाणी त्या काळी भरपूर गाजली. ‘टाई लगा के माना बन गये जनाब हीरो’, ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’, ‘जा रे का रे बादरा’, अन् अखेरचं ‘चल उड जा रे पंछी’ हे रफीचं अजरामर गाणं! त्यानंतरच्या १९५९च्या ‘बरखा’ मध्ये तिचा नायक होता.. अनंत मराठे! (संगीत रंगभूमीवरच्या राम मराठेंचा धाकटा भाऊ ). ‘एक रात में दो दो चांद खिले’, ‘वो दूर जो नदीयाँ बहेती है,’ ‘ तडपाओगे, तडपा लो, हम तडप तडप कर भी’, ही गाणी घराघरांत सातत्यानं रेडिओवर वाजत. हे दोन्ही चित्रपट चित्रगुप्तचे. त्याच वर्षी आलेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहेन’ हा, बलराज सहानी, रेहमान, मेहमूद, शुभा खोटे, श्यामा असूनही सर्वस्वी तिचाच चित्रपट होता. त्यातील शंकर-जयकिशनची सगळीच गाणी गाजली. ‘भैया मेरे, राखी के बंधन को निभाना, छोटी बहेन को ना भुलाना’ या गाण्याशिवाय गेल्या ५०-५५ वर्षांत रक्षाबंधन कुठे पार पडलं नसेल, इतकं हे गाणं ट्रेण्ड-सेटर ठरलं, यात नंदाचा सोज्वळ-हसरा चेहरा, टपोरे भावस्पर्शी डोळे, खेळकर अभिनय, सारंच जमून आलं होतं. बहीण असावी तर अशीच. बहिणीचं ‘अल्टिमेट’ रूप म्हणजे नंदा ! ‘बागों में बहारों मे, इठ्लाता गाता आया कोई,’ या गाण्यांअखेरीस नंदा अंध होते. त्यानंतरचं तिचं गाणं, ‘ये कैसा न्याय तेरा, दीपक तले अंधेरा..’ आणि अशा बहिणीवर बायकोच्या नादी लागून अन्याय केल्याची जाणीव झाल्यावर, पश्चात्तापदग्ध रेहमानचं (मुकेशचं) गाणं, ‘जाऊं कहां बता ऐ दिल, दुनिया बडी है संगदिल’.. ही सारी गाणी आजही ऐकताना, या गाण्यांचं नंदाशी असलेलं असोसिएशन विसरता येईल? त्या सिनेमांत म्हटलं तर तिचा नायक होता, सुदेशकुमार! नायक कोण, भूमिकेची लांबी, यापेक्षा अभिनयावर ती बाजी मारून जायची. अन् म्हणूनच या दरम्यान तिची तुलना मीनाकुमारीशी होऊ लागली! पण मुख्य तारकांच्या पंक्तीत तिला कुणी कधी गणलं नाही. त्याविषयी तिची कधी तक्रारदेखील नव्हती.

दरम्यान, देव आनंदच्या ‘काला बाझार’मध्ये ती देव आनंदची बहीण झाली. नायिका वहिदा रेहमान. नंदाच्या वाटय़ाला एक महत्त्वाचं भजन होतं त्यांत, लीला चिटणीसबरोबर, ‘ना मैं धन चाहूं, ना रतन चाहूं’ (आशा आणि गीता) त्यांत तिच्या चेहऱ्यावरचे, डोळ्यांतले भाव पाहूनच त्या भजनातलं सत्य पटतं! देव आनंदच्याच ‘हम दोनों’ (१९६१) मध्ये, ‘दुसऱ्या’ देव आनंदची, मेजर वर्माची पत्नी होती नंदा. तर पहिल्या देव आनंदची, कॅप्टन आनंदची नायिका साधना. इंटरव्हलपर्यंत केवळ मेजर वर्माजवळच्या फोटोत नंदा दिसली होती! नंतरच्या ‘तीन देवीयां’ (१९६५) मध्ये दोन सोज्वळ ग्लॅमरस देवीयां- कल्पना अन् सिमी. तिसरी साधी-सोज्वळ देवी.. अर्थातच नंदा! (कहीं बेखयाल होकर, लिखा है तेरी आंखो में) नंदासाठी ‘फुटेज’ हा मुद्दा कधीच नव्हता.
चोप्राजींच्या ‘धूल का फुल’ (१९५८) मध्ये, सहनायिका म्हणून राजेंद्रकुमारच्या पत्नीच्या (झुकती घटा, गाती हवा सपने दिखायें.. आशा-महेंद्र कपूर) भूमिकेत दिसली. नायिका माला सिन्हा. त्यांच्याच कानून (१९६०) मध्ये ती नंतर राजेन्द्रकुमारची नायिका झाली. चोप्रांचा हा चित्रपट गाण्यांशिवाय होता.
हृषीकेश मुखर्जीच्या ‘आशिक’ (१९६०) मध्ये, राजकपूरच्या पत्नीच्या भूमिकेत ती होती. नायिका होती पद्मिनी. पुढे १९८३ मध्ये राज कपूरच्या दिग्दर्शनात ‘प्रेमरोग’मध्ये आईच्या चरित्र भूमिकेत दिसली. नायिका पद्मिनी कोल्हापुरे. त्या आधीच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ (१९८२) मध्ये ती तिची आई होतीच. दिलीपकुमारची नायिका ती कधीच झाली नाही, पण चोप्राजींच्याच ‘मजदूर’ (१९८३) मध्ये दिलीपकुमारची पत्नी म्हणून चरित्र भूमिकेत दिसली.. अन त्यानंतर तिने चित्रपट संन्यासच घेतला!
पस्तिसेक वर्षांच्या या कालखंडात तिने जवळपास सर्वच महत्त्वाच्या नायकांबरोबर काम केलं. शशी कपूर जेव्हा कुणीच नव्हता, तेव्हा तिने त्याच्याबरोबर आठ सिनेमे केले. ‘चार दीवारे’, ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ चालले नाहीत. ‘मुहब्बत इस को कहेते है’ थोडाफार गाण्यांवर चालला (‘ठहेरीये होश में आ लूं’ हे रफी-सुमनचं द्वंद्वगीत आणि ‘जो हम पे गुजरती हैं’ हे सुमनचं सोलोगीत आजदेखील ऐका-पाहा). पण सूरज प्रकाश यांचा ‘जब जब फुल खिले’(१९६५) भन्नाट चालला.. (‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे..’, ‘ये समा, समा है ये प्यार का..’ ही नंदाच्या इमेजपेक्षा वेगळीच गाणी) या चित्रपटामुळे शशी कपूर स्थिरावला, नंदा मीनाकुमारीच्या सावलीतून मग बाहेर पडली! दरम्यान ‘कैसे कहुं’ (१९६४) विश्वजीत बरोबर (या चित्रपटातील लताचं सुरेख टायटल साँग ‘कैसे कहूं, कैसे कहूं..’ आज क्वचितच ऐकू येतं.), तर ‘नर्तकी’ सुनील दत्तबरोबर येऊ न गेले. ‘आज और कल’ (१९६३) हा सुनील दत्तबरोबरचा चित्रपट, (‘मुझे गलेसे लागलो, बहुत उदास हुं मैं..’ आशा-रफी) वसंतराव जोगळेकर यांचा पु.लं.च्या ‘सुंदर मी होणार’वर बेतलेला होता. ‘मेरा कसूर क्या है?’ (१९६४) अन फनी मुझुमदार यांचा ‘आकाशदीप’ (१९६५) हे धर्मेद्रबरोबरचे. (त्यातलं ‘दिल का दिया जला के गया..’ हे लताचं गाणं आठवतंय?) ‘पती-पत्नी’मध्ये तिचा नायक संजीवकुमार होता. यातल्या बऱ्याचशा चित्रपटांत अशोककुमार होताच! खुद्द मीनाकुमारीबरोबर ‘अभिलाषा’ (१९६८) तिनं केला, त्यात तिचे नायक होते, मीनाकुमारीची मुलं झालेले संजय खान आणि काशिनाथ घाणेकर! जितेंद्रबरोबर, ‘जे हम तुम चोरीसे, बंधे इक डोरीसे’ (धरती कहे पुकार के), राजेश खन्नाबरोबर, ‘गुलाबी आंखे, जो तेरी देखी’ (द ट्रेन) मध्ये ती मुक्त बागडली. त्याही पलीकडे तिने चोप्रांच्या ‘इत्तेफाक’ (१९६९) मध्ये राजेश खन्नाची ‘बदफैली नायिका’देखील साकारली. तर १९७३च्या ‘नया नशा’मध्ये ‘ड्रग-अ‍ॅडिक्ट’ नायिका रंगविण्याचं धाडसदेखील केलं! नवख्या मनोजकुमारबरोबर तिनं ‘बेदाग’ केला, तो चालला नाही. नंतरचा ‘गुमनाम’ भरपूर चालला. पुढे ‘शोर’ (१९७२) या त्याच्या स्वत:च्या चित्रपटात नंदा ‘पाहुणी’ कलाकार म्हणून दिसली, मनोजकुमारच्या मृत पत्नीच्या भूमिकेत. जया भादुरी त्यात नायिका होती. ‘एक प्यार का नगमा है..’ या लता-मुकेशच्या अर्थगर्भ द्वंद्वगीताअखेरीस नंदाचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह दिसतो, तेव्हादेखील आत कुठे तरी तुटतंच! पडद्यावरचा तिचा असा कदाचित एकमेव शॉट असावा ..हे पडद्यावरचं खोटं सत्य. असो.
यात मिसिंग जर कुणी असलाच तर तिच्या उतरत्या काळात, सत्तरच्या दशकात सुपरस्टार झालेला अमिताभ बच्चन. तिच्या समकालीन माला सिन्हा (संजोग), वहिदा रेहेमान (कभी कभी) देखील अमिताभच्या नायिका झाल्या. वहिदा तर यश चोप्रांच्या ‘त्रिशूल’मध्ये आईदेखील झाली अमिताभची. तसा अमिताभ तर मनमोहन देसाईंचा हुकमी एक्का, तरीही नंदाच्या बाबतीत तो योग नसावा, एवढंच.
इतक्या विविध भूमिका करूनदेखील आज तिची ती सात्विक-सोज्वळ ‘इमेज’ विसरणं कठीण. त्यात मीनाकुमारीशी तिची तुलना अभिनयापुरतीच न राहता, कदाचित एकूणच आयुष्यातील एकटेपणाशी व्हावी अशी परिस्थिती.. फक्त मीनाकुमारी विवाहित असून एकटी राहिली, तरी तिच्या एकटेपणाला प्रसिद्धी-माध्यमांची रुपेरी किनार लाभली. नंदा नेहमी अंधारातच राहिली! अ‍ॅवॉर्ड्स, पुरस्कार, पारितोषिकं, सन्मान यासाठीदेखील तिचा कुठलाच अट्टहास नव्हता.
तीनेक वर्षांपूर्वी देव आनंदचा रंगीत ‘हम दोनो’ पुन्हा पडद्यावर झळकला. मल्टीप्लेक्समधल्या पहिल्या आठवडय़ांतच जेमतेम २५ डोकी होती प्रेक्षकांची. पन्नास वर्षांपूर्वीच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ काळात रमलेली. ‘हम दोनो’तील जयदेव यांची सगळीच गाणी चिरतरुण. त्यातून नंदावर चित्रित लताची दोन्ही भक्तिगीतं अप्रतिम. ‘प्रभू तेरो नाम, जो ध्यायें सुख पायें, तेरो नाम’ ही वैयक्तिक भावना, तर ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ ही वैश्विक प्रार्थना. जणूं साहीरचं ‘पसायदानच’! ‘मांगों का सिंदूर ना छूटे, मां-बहेनों की आस ना टूटे, देह बिना दाता.. देह बिना भटके ना प्राण.’ किंवा, ‘ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले, बलवानो को.. दे दे ग्यान’ ही भावना तर वैश्विक कल्याणाची. या साऱ्याच भावनांशी एकरूप झालेला नंदाचा भावूक चेहेरा, अन डोळ्यांतील आश्वासक भाव! ही दोन्हीही गाणी पुन्हा इतक्या कालांतराने मोठय़ा पडद्यावर रंगीत स्वरूपात पाहताना मात्र जाणवलं की, ही अजरामर गाणी भविष्यातदेखील नंदाशी चिरंतन जोडलेली राहतील, एवढं नक्की! शिवाय लताचं ‘ट्रेंड-सेटर’ गाणं ‘भैय्या मेरे, राखी के बंधन को निभाना,’ अन ‘भाभी’मधलं रफीचं, ‘चल उड जा रे पंछी, के अब ये देस हुवा बेगाना..’