वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

दहा-पंधरा गुंडांना लीलया लोळवणारा, दिसायला किडकिडीत पण डोळ्यातून आणि आवाजातून अंगार ओकणारा, ‘हम जहाँ पे खडम्े होते है, लाइन वही से शुरू होती है’ असं टेचात सांगणारा अमिताभ बच्चन यांचा अँग्री यंग मॅन सेव्हंटी एम.एम.च्या पडद्यावर धुमाकूळ घालत होता. राजकीय-सामाजिक पातळीवर अपेक्षाभंग झालेलं, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार याला कंटाळलेलं पब्लिक या अँग्री यंग मॅनवर फिदा होत होतं तेव्हाच, त्याच सेव्हंटी एम.एम.च्या पडद्यावर फुलाफुलांचा शर्ट घालणारा, आपलं प्रेम व्यक्तकरायलादेखील घाबरणारा, काहीसा बावळट म्हणता येईल असा, तद्दन फिल्मी गोष्टींच्या एकदम विरुद्ध असा नायकही भाव खाऊन जात होता. अमिताभच्या एन्ट्रीला टाळ्या आणि शिट्टय़ांचा गजर करणारे प्रेक्षक या तत्कालीन मध्यमवर्गीय भाबडय़ा नायकाच्या रूपात स्वत:ला पाहात होते. अँग्री यंग मॅनच्या रूपात आपण कसं असायला हवं याचं स्वप्न रुपेरी पडद्यावर बघता बघता आपण कसे आहोत ते स्वीकारून स्वत:वरच हसत होते. ही किमया होती बासू चटर्जीची.

ते तेव्हाच्या दिग्दर्शकांसारखे मोठय़ा पडद्यावरच्या स्वप्नांचे सौदागर नव्हते की शोमॅन नव्हते. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे गरिबी, दु:ख, दैन्य यांचं मोठय़ा पडद्यावर दर्शन घडवून समांतर मार्ग आपलासा करणाऱ्यांपैकीही नव्हते. मोठय़ा पडद्यावरची चमकधमक, अतक्र्य-अचाट हिरोवर्शिपही त्यांनी केली नाही की प्रेक्षकाला डोळे ताणून ताणून सिनेमा बघावा लागेल अशा अंधारात जगण्यातल्या समस्यांचं वास्तववादी चित्रण करण्याचा अट्टहास केला नाही.

तर त्यांनी काढले ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘बातो बातो में’, ‘प्रियतमा’, ‘मनपसंद’, ‘हमारी बहु अलका’, ‘शौकीन’, ‘खट्टा मिठा’, ‘चमेली की शादी’सारखे निखळ सिनेमे. रोजच्या जगण्यात कमालीचा संघर्ष करणाऱ्या मध्यमवर्गीय, कुटुंबवत्सल माणसाला आपल्या कुटुंबकबिल्याबरोबर उठून सिनेमागृहात जाऊन, वेफर्स आणि बटाटेवडे खात, खळखळून हसत बघावेसे वाटतील असे सिनेमे. त्यांचा नायक कधीच लार्जर दॅन लाइफ नव्हता. त्याच्यासमोर तेच जगण्यातले पेच असले तरी तो दहा-बारा गुंडांना लोळवून आपले प्रश्न सोडवत नाही, तर तो प्रत्यक्षातल्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे बिचकतो, घाबरतो, पळवाटा शोधतो. आपलं भाबडेपण लपवता येईल इतका स्मार्टनेस त्याच्याकडे कधीच नसतो. तर आरके लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनसारखाच तोही आतून जसा असतो तसा सामोरा येतो. तेव्हाच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला पडद्यावरच्या आरशात त्याचंच रूपडं दाखवून चिमटे काढण्याची आणि आपल्याच काहीशा भाबडेपणावर खळखळून हसायला लावायची किमया बासुदांना साधली होती. तेव्हाचे सिनेमे आज बघताना तेव्हाच्या मध्यमवर्गाची साधीसुधी स्वप्नं, तशाच भावभावना बघून हसायला येतं. बासुदांना या सगळ्यातला भाबडेपणा तेव्हाच जाणवला होता. या भाबडेपणाची टोपी उडवण्याचा प्रयत्न त्यांनी रुपेरी पडद्यावरून केला. त्या अर्थाने ते तत्कालीन मध्यमवर्गाचे भाष्यकार होते.

सामान्य माणसाचं साधंसुधं जग, त्यातल्या भावभावनांचे चढउतार, त्यातून निर्माण होणारं नाटय़ हेसुद्धा मोठय़ा पडद्यावर किती प्रत्ययकारी होऊ शकतं हे त्यांनी जितक्या सहजपणे दाखवलं तितक्याच सहजपणे ‘शौकीन’सारख्या सिनेमातून म्हाताऱ्यांचा रंगेलपणा खटय़ाळपणे दाखवला. त्यांनी अमोल पालेकर यांच्यामधून जसा मध्यमवर्गीय भाबडा तरुण बाहेर काढत जशी काहीशी तरल प्रेमकथा पडद्यावर मांडली तशीच पुढच्या पिढीतल्या अमृता सिंग आणि अनिल कपूर यांच्यामधून ‘चमेली की शादी’सारखी काहीशी लाऊड पण भाबडी प्रेमकथा पडद्यावर उभी केली. ‘शोले’मधून धडकी भरवणारा अमजद खानचा खलनायक विनोदी भूमिकेत किती चपखल बसू शकतो हे दाखवणं हे त्यांच्यामधल्या दिग्दर्शकाचं कसब. काळ बदलला, पण आपण कालबाह्य़ झालो नाहीत, हे यापेक्षा आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीने सांगणार? ‘एक रुका हुआ फैसला’, ‘कमला की मौत’ हे त्यांच्या पठडीपेक्षा वेगळे पण संवेदनशील सिनेमे. सुरुवातीच्या काळात राज कपूर यांना घेऊन काढलेला ‘तीसरी कसम’ बॉक्स ऑफिसवर आपटला असला त्यातली अवीट गोडीची गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. ‘रजनी’ आणि ‘ब्योमकेश बक्षी’ या टीव्ही मालिकांनी त्यांनी पडदा छोटा असो की मोठा आपल्याला त्याने फरक पडत नाही हेच दाखवून दिलं.

आज सिनेमाचं तंत्र, आशय, विषय हे सगळं कमालीचं बदललं आहे. बासुदा ज्याला डोळ्यासमोर ठेवून सिनेमा काढायचे तो मध्यमवर्गही कमालीचा बदलला आहे. पण त्यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या योगदानामुळे सिनेमा नावाचं रजनीगंधाचं फूल कायमच टवटवीत राहिलं आहे.