सुंदर दिसण्याच्या स्त्रीच्या अट्टाहासावरच तर सौंदर्यप्रसाधनांची प्रचंड बाजारपेठ उभी राहिली आहे. तरीही सुंदर दिसण्याचा हव्यास कमी होत नाही की संपत नाही. खरं तर सौंदर्य हे सगळ्या निकषांच्या पलीकडचं असतं.

‘कशी दिसतेय मी’ समस्त पुरुषवर्गाला ज्याचं समाधानकारक उत्तर कधीही देता आलं नाही असा हा प्रश्न. बरं.. याचं चांगलं-वाईट काहीही उत्तर दिलं तरी फसणार मात्र तोच बापुडा. मात्र आजकाल जरा सोशल नेटवìकग साइट्सनी पुरुषांवरचा हा भार काहीसा कमी केलाय. कारण आपला फोटो या साइट्सवर टाकला की मुलींना अगदी त्वरित (आणि हव्या तशा) प्रतिक्रिया मिळतात.
सौंदर्य ही मुलींसाठी कायमच एक महत्त्वाची बाब ठरली आहे. कालानुरूप सौंदर्याची व्याख्या बदलली मात्र त्याचं महत्त्व तितकंच राहिलंय किंबहुना वाढलंय. त्यामुळे मनात आपोआप सौंदर्याचा एक गंड तयार होतो. न्यूनगंड किंवा अहंगड अशा कोणत्याही प्रकारचा. मी अजिबात सुंदर नाही (बहुतेक आपण सगळ्याच जणी याच गंडाने पछाडलेल्या असतो. किंवा मग मीच सुंदर आहे.. आणि आजकालच्या दुनियेत ‘ब्युटी कॉन्शस’ होण्याचं प्रमाण वाढलंय.
‘कॅन यू इमॅजिन तीन महिन्यांपूर्वी घेतलेली जीन्स मला आज होत नाहीये. ओह गॉड.. किती जाड झालेय मी अगं. मला डाएट सुरू करावंच लागणार..’ किंवा मग ‘ए नको हा.. हा सेल्फी नको अपलोड करूस.. लुक अ‍ॅट मी.. कित्ती चब्बी दिसतेय मी यात.. आणि माझा चेहरा.. कित्ती ऑइली आलाय.. अ बिग नो..’
या सौंदर्यगंडाची सुरुवात होते ती कॉलेजपासून.. हल्ली खरंतर शाळेपासूनच होते म्हणा.. पाचवी-सहावीतल्या मुली हातातल्या स्मार्टफोनने सेल्फी काढताना पाहिल्या की कीव येते.. आमची का त्यांची ते मात्र कळत नाही. असो. तर.. नवीन नवीन मत्रिणी भेटतात.. आणि मग नकळत तुलना सुरू होते. मी थोडी जाड आहे या सगळ्यांपेक्षा किंवा मग यांचे कपडे फारच ट्रेंडी असतात.. आणि त्यानंतर सुरू होते ती धडपड.. ‘त्यांच्यासारखं’ सुंदर बनण्याची.. मग आपला जाडपणा कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहायचा.. रात्री नुसती एक चपाती चिवडायची. ‘फॅशनेबली सुंदर’ दिसण्यासाठी आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत असलेले कपडेसुद्धा वापरायचे. याने होत काही नाही पण प्रत्येक प्रयत्नागणिक आत्मविश्वास मात्र चांगलाच ढेपाळला जातो.
मला मी कशी आवडते यापेक्षा जास्त माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी कशी आवडते यावर आपण जास्त भर देतो. सिनेमामधील हिरोइन्स तर आमच्या दैवतच.. आज हिने या फिल्ममध्ये ट्राय केलेल्या पँट्स मला चांगल्या का नाही दिसत यावर डोकेफोड करत राहतो. तिने त्या अवॉर्ड शोला घातलेल्या ड्रेसटाइप ड्रेसमध्ये मी इतकी विचित्र का दिसते याच्या चिंतनात वेळ घालवतो.
सोशल नेटवìकग साइट्सनी तर या ‘सौंदर्यस्पध्रेला’ मदानच खुलं करून दिलंय. ‘ओएमजी.. माझ्या या सेल्फीला फक्त ११० लाइक्स.. ओह राइट.. यात माझं काजळ पसरलंय थोडं.. आणि गालपण कसे जाड आलेत..’ एअरपोर्टवर जितका सिक्युरिटी चेक नसेल तितकं या बिचाऱ्या फोटोज आणि सेल्फीजवर करडी नजर असते.
त्यादिवशी अचानक मला एक जुना फोटो अल्बम सापडला. जुन्याचा थर चढलेले ते फोटो नव्या जमान्यात कुठेही फिट होणारे नव्हते. हल्लीसारखं कॅमेरासमोर आल्यावर ओठांवर आपसूक येणारं ते खोटं हास्य तर कुठेच दिसत नव्हते. उलट आडवेतिडवे काढलेले भांबावलेल्या चेहऱ्यांचे ते फोटोज होते. वेगवेगळे ‘रेट्रिकामय’ इफेक्ट्स तर नावालाही नव्हते. नाही म्हणायला फोटो काढणाऱ्याचा हात चुकून फ्लॅशवर आल्यामुळे येणाराच काय तो इफेक्ट होता. तर असे हे फोटो आठवणींचा खजिना तर होतेच पण कसलीतरी तीक्ष्ण जाणीव करवून देणारेसुद्धा होते. एका फोटोत मी काहीसा बेंगळूर स्कर्ट आणि टॉप घालून उभी होते. आणि भांबावलेल्या चेहऱ्याने कॅमेऱ्याकडे पाहत होते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी तर सरळसरळ रिजेक्ट करण्यालायकीच्या त्या फोटोवरून माझं लक्ष मात्र हटत नव्हतं. कारण त्यात खरी मी मला सापडत होते. जशी मी आहे.. कोणताही आवेश चेहऱ्यावर न आणलेली.. खरा ‘कँडिड’ फोटो. आजचे कँडिडसुद्धा वेलप्लान्डच असतात म्हणा. ‘किती गोड छान दिसायचीस बघ..’ आई माझ्याही नकळत माझ्या पाठी येऊन ते फोटोज पाहत होती. तिच्या त्या बोलण्याने भानावर आले आणि माझे लक्ष बाजूच्या फोटोकडे गेले. आईचा तरुणपणीचा फोटो होता तो.. साधीशी वेणी घातलेला.. नेहमीचीच साडी नेसलेला.. आणि तरीही खूप सुंदर.. आई काही चवळीची शेंग नव्हती की अगदी गोरीगोरीपान नव्हती.. पण तिचं सौंदर्य या सगळ्याच्या पलीकडचे होते.
तुमच्या जाडीवर तुमच्या उंचीवर किंवा तुमच्या रंगावर तुमचं सौंदर्य कधीच ठरत नाही. आपण आपल्या आसपास बरीच विजोड जोडपी पाहतो. ‘काय पाहिलं ग तिने याच्यात..?’ किंवा ‘कसं बरं निवडलं याने तिला.. अजिबातच शोभून दिसत नाहीत हे एकमेकांना..’ असे शेरे मारून मोकळे होतो. पण त्या दोघांनी शारीरिक सौंदर्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळेच सौंदर्य एकमेकांत पाहिलेले असते. आणि तेच सौंदर्य त्यांना अधिक भावलेले असते. बाह्यसौंदर्यामुळे त्यांच्या प्रेमावर काहीच परिणाम होणार नसतो. शारीरिक सौंदर्याची ओढ ही तरुणपणात जास्त जाणवते. पण त्यानंतर सौंदर्याचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यानंतर माणूस त्याच्या परीने त्याला हव्या असणाऱ्या सौंदर्याची व्याख्या निश्चत करतो आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीत ‘त्याचं’ सौंदर्य शोधतो. अशा टप्प्यावर शारीरिक सौंदर्य हे दुय्यम पातळीवर जातं आणि त्या व्यक्तीला अभिप्रेत असलेल्या सौंदर्याला प्राधान्य मिळतं.. मग ते मानसिक सौंदर्य असो अथवा वैचारिक..
नटणंसजणं, मेकअप करणं ह्या अजिबात वाईट गोष्टी नाहीयेत, पण त्यांचा वापर करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की या गोष्टी आपलं सौंदर्य ठळक करण्यासाठी असतात.. कुरूपता लपवण्यासाठी नव्हे. ‘स्त्रियांना आपलं शरीर आवडायला लागलं तर जगातले कितीतरी उद्योगधंदे बंद पडतील’ असं नुकतंच वाचनात आलं. हे कितीही हसण्यावारी नेलं तरी वास्तवाची किनार याला आहेच.
त्यामुळे आजपासून आपण सर्वच जणींनी मिळून ठरवूया माझं सौंदर्य मीच हुडकणार आणि ते मीच ठरवणार.. कारण सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या डोळ्यांपेक्षाही जास्त मानणाऱ्यांच्या मनात असते.
प्राची साटम