आपण समाजात कसं वागायचं याचं एक तारतम्य असतं. पण आजकाल समाजात हे तारतम्यच हरवत चाललं आहे. लोकांचं एकमेकांबरोबरचं वागणं असो की सेलिब्रिटींबरोबरचं वागणं असो, पदोपदी या गोष्टीचा प्रत्यय येतो.

मी राहात असलेल्या सोसायटीत अचानक पोलीस आले. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या कोणत्याही सोसायटीत अचानक पोलीस आले की, स्वाभाविकपणे सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. रस्त्यावरून जाणारे येणारेही.. ज्यांचा काहीही संबंध नसतो, असे लोकही अत्यंत कुतूहलाने, नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी, आपापली कामं थांबवून पाहात राहातात; तिथं सोसायटीतल्या रहिवाशांची काय बात? माझ्या शेजारच्याच वयस्क गृहस्थांना काहीजणांनी घेरलं होतं; म्हणून मी थांबलो. काही १८-२० वर्षांचे तरुण हुज्जत घालत होते. त्या वयस्क गृहस्थांनी मला मदत मागितली म्हणून मी मध्ये पडलो आणि मला थोडक्यात काय झालं ते कळलं. नेहमीप्रमाणं मुलं क्रिकेट खेळत होती आणि त्यांनी या आजोबांच्या घराच्या खूप काचा फोडल्या होत्या. यामध्ये या मुलांचा तसा उद्देश दिसतही होता. या आजोबांनी मुलांना समजावलंही; पण मुलांना चेव आला होता. एका क्षणी त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी एका मुलाला पकडला. त्या १८ वर्षांच्या मुलाने त्या आजोबांना आई-बहिणीवरून अत्यंत घाणेरडय़ा शिव्या दिल्या, असभ्य भाषेत हीन पद्धतीने निर्भर्त्सना केली. शारीरिक कमजोरीचा फायदा घेऊन तो मुलगा आजोबांच्या अंगावरही धावून गेला. आजोबांचा प्रचंड अपमान झाला होता. त्यांनी रीतसर पोलीस कम्प्लेंट केली. म्हणून पोलीस आले होते. पोलीस आले म्हणून हायसं वाटण्याऐवजी, आजोबांना त्यापुढचं पोलिसांचं वक्तव्य ऐकून पोटात धस्स झालं होतं. पोलीस म्हणाले की, ‘‘रक्त आलं नसेल, मुका मार बसला नसेल तर, फक्त शिव्या दिल्या, असभ्य वर्तन केलं म्हणून फार फार तर समज देता येते. गुन्हा नोंदवता येत नाही’’. म्हणून पोलिसांनीच उलट आजोबांना ‘‘सोडून द्या, या वयात कशाला नादाला लागता’’, असा सबुरीचा सल्ला दिला आणि पोलीस निघून गेले. साधा वयाचाही मुलाहिजा न बाळगता ज्येष्ठांबरोबर वागण्याच्या या सर्रास तऱ्हेकडे मनोरंजन म्हणून पाहात असलेले बघे आल्या वाटेने चालते झाले. आजोबांच्या डोळ्यातली असहायता, मनातला प्रचंड संताप, झालेली अवहेलना याची पुरेशी टर उडवून मुलं नव्या उमेदीने खेळायला गेली होती.
आपल्याकडे एकूणच सामाजिक वर्तन हा विषय चिंतेचा बनत चालला आहे. लोक नेत्यांना बेधडक रस्त्यात थोबडवतात; सभेत, समारंभात चपला, बूट फेकतात; शाई ही लिखाणापेक्षा तोंडावर फेकण्यासाठीच बनवली जाते असं त्यांना वाटतं; या वर्तनामागे त्या लोकांचा त्या त्या क्षणी तात्कालिक उद्रेक बाहेर पडत असतो. व्यवस्थेवरचा राग, चीड, संताप व्यक्त करण्यासाठी यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा सोपा मार्ग नसतो. असे वर्तन करणाऱ्यांचा, त्यांच्या शिक्षणाशी, आíथकतेशी काही संबंध असतोच असं नाही. संबंध असतो तो मानसिक संतुलनाचा. पण हे मानसिक संतुलन केवळ चिडल्यावर, राग आल्यावरंच बिघडते असंही नाही. अत्यानंदाच्या क्षणी तर त्याची जरा जास्तच कसोटी लागते असं मला प्रकर्षांनं अनुभवास आलेलं आहे.
पण सामाजिक वर्तनाचं हेच मानसिक संतुलन एखाद्या सेलिब्रिटीचं बिघडलेलं दिसलं तर मात्र आपल्याकडे देशभर अवाढव्य असा गहजब होतो. मग ती गोिवदाने दर्शकाला मारलेली थप्पड असेल; सफ अली खानचं हॉटेलमधलं भांडण असेल वा कुणी नेत्यानं पत्रकाराला बकोटीला धरून बाजूला केलेलं प्रकरण असेल. सेलिब्रिटीजसाठी सामाजिक वर्तनाचे निकष जरा खासंच असतात. आणि ते स्वाभाविकपण आहे. ज्यांना सामान्य लोक डोक्यावर घेतात; त्यांनीच मूर्खासारखं वर्तन केलं; तर त्यांना काय म्हणून आपण डोक्यावर घ्यायचं असा प्रश्न लोकांना पडतो. पण सगळ्याच वेळेला खरी परिस्थिती तशी असतेच असं नाही. केवळ बातमी एन्कॅश करायची म्हणून खूपदा माध्यमं त्यांना हवी तशी बातमी रंगवतात, ही पण तेवढीच वस्तुस्थिती आहे. कारण समोरची मान्यवर व्यक्ती बातमी होण्यासारखी वागल्यावरच त्याची बातमी होते. पण त्या क्षणाला तो प्रसंग येईपर्यंत आधी काय झालेलं असतं यात कुणालाच स्वारस्य नसतं.
हा सामाजिक वर्तनाचा बडगा कलाकारांवर जरा जास्तच उगारला जातो. मी याच कला क्षेत्रात काम करत असल्याने, या क्षेत्रात तर पदोपदी, क्षणोक्षणी या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी प्रत्यक्ष स्वत:ला आलेले अनुभव, तर कधी समोर घडणाऱ्या गोष्टी. आपल्याकडे, म्हणजे खरतर आपल्या पूर्ण देशातच; सामान्य लोकांसाठी कलाकारांची क्रेझ ही इतर देशातल्या कलाकारांपेक्षा जरा जास्तच आहे. त्यानंतर खेळाडूंची; आणि तेही फक्त क्रिकेटर्सची. या सेलिब्रिटीची झलक बघण्यासाठी आपल्याकडे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, कितीही वेळ ताटकळत उभे राहू शकतात, कोणताही त्याग करू शकतात. अमिताभ बच्चन यांचे केवळ दर्शन घ्यायला हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून, काहीही माहिती नसताना मुंबईत येत असतात, रात्रंदिवस प्रतीक्षा बंगल्यासमोर बंगल्याच्या नावाच्या लौकिकाला साजेसा वेळ घालवत असतात. मी मुंबईत स्ट्रगल करायला आल्यानंतर, माझ्या गावाकडच्या कित्येकांनी, जवळपास प्रत्येकानेच हा प्रश्न विचारलेला आठवतो, ‘‘कुणा कुणाला पाहिलंस? कोण कोण दिसलं?’’ नुसतं कुणी दिसलं तरी पुरेसं असतं. मग जर प्रत्यक्ष कुणी असं समोर आलंच, तर या लोकांची काय अवस्था होत असेल!
आत्ता माझा ‘यलो’ हा सिनेमा पहायला सलमान खान येऊन गेला. सलमान सिनेमा पहायला आला त्यावेळी बाहेर शेकडो चॅनल्सच्या कॅमेरांनी मरणाची गर्दी केली होती. अशा नटांबरोबर बॉडीगार्ड्स का असतात हे, त्यांच्याबरोबर सामान्य लोक कसे वागतात हे अनुभवल्याशिवाय लक्षात येणार नाही. सलमान हा काही माझा आदर्श नट नव्हे. किंबहुना मीही इतके दिवस, हा नट इतकी वेडय़ासारखी उत्तरे कॅमेरासमोर का देत असेल याचा विचार करत होतो. पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तेव्हा मला सलमानची बाजू जास्त पटली. सिनेमा पाहिल्यावर शंभर पत्रकारांपकी एकानेही सलमानला सिनेमाबद्दल एकही प्रश्न विचारला नाही. येणारे पत्रकार त्यांचे अनेक साठलेले प्रश्न डोक्यात घेऊन आले होते. आणि तेही बव्हंशी बकवास. काही प्रश्न तर एवढे दिव्य होते की, मला पत्रकारांची लाज वाटू लागली. तोच तोच लग्नाचा प्रश्न, पत्रकार तरुणींचे प्रश्न तर, ‘‘आज तुमच्या हातातल्या ब्रेसलेटचा रंग निळा आहे, म्हणजे हा कोणत्या नटीचा आवडीचा रंग आहे? यातून कुणाला काही संदेश आहे का’’ असे अभ्यासपूर्ण प्रश्न. एकाने तर विचारले, ‘‘तुझ्या मíझडीजला िलबू आणि मिरच्या लटकवलेल्या आहेत. तर नक्की कुणाची दृष्ट लागेल म्हणून ते लावलेत?’’ कोणत्या ठिकाणी कोणता प्रश्न आपण का विचारत आहोत, याचे कसलेच भान नसावे का? त्याच्या मूर्खपणापेक्षा मला सलमान आता काय उत्तर देतोय यात इंटरेस्ट होता. सलमान म्हणाला, ‘‘मला सेटवर िलबू पाणी प्यायचं असतं, आणि नाष्टय़ात मिरचा कमी पडतात म्हणून मी माझ्या गाडीला बांधून आणतो’’. दुसऱ्या दिवशी याची बातमी काय होते! सलमानला सेटवर मिरच्या मिळत नाहीत. म्हणजे सलमानचं उत्तर तेवढं पेपरमध्ये छापलं. आणि निष्कर्ष तर भलताच. पण प्रश्नकर्त्यांचा मूर्खपणा कधीच छापला जात नाही. मलाही वाटलं, त्याक्षणी एखाद्यानं काय उत्तर देणं अपेक्षित आहे? साधारण ५० ते ६० प्रश्नांनंतर सिनेमाबद्दल एखादा प्रश्न आला आणि तेही सलमाननं आठवण करून दिल्यावर.
‘कमीने’ सिनेमाच्या वेळी मी शाहिद कपूरबरोबर काम केलं. आम्ही एफ.टी.आय.आय.मध्ये पूर्ण रात्रभर शूट करत होतो. शाहिद हा तरुणींच्या गळ्यातला ताईत; म्हणजे नक्की काय, हे मी माझ्या डोळ्यासामोर तीन रात्री पाहिलं. पुण्यातल्या कित्येक सदाशिव, नारायणातल्या सोज्वळ मुली रात्र रात्रभर गेटसमोर थांबलेल्या होत्या. हे एक समजू शकतो आपण. तासंतास थांबल्यावर त्यांनी दोन मिनिटं भेटायची सक्ती केली. फार ताणून धरल्यासारखं बरं दिसणार नाही, म्हणून गेट उघडल्यावर, जो घोळका शाहिदवर कोसळला, त्याला सुमार नाही. फोटो काढून घेण्याची चढाओढ स्वाभाविक होती. मुलींच्या आयाच मुलींपेक्षा उतावीळ झाल्या होत्या. त्यात तर एका कुमारीने शाहिदला चक्क घट्ट मिठी मारली आणि त्या अवस्थेतच तिला फोटो काढायचा होता. त्याने सभ्यपणे सांगितले, पण ती ऐकेचना. शेवटी बॉडीगार्डने तिला खेचून बाहेर नेलं. या प्रसंगात, बातमी फक्त बॉडीगार्डच्या वागण्याची होते.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे कोल्हापूरला शूटिंगच्या निमित्ताने गेले असताना, ब्रेकमध्ये झाडाखाली पत्ते खेळत बसले होते. एक आगंतुक आला आणि अशोक सराफांना म्हणाला, ‘‘मामा ओळखलं का? ’’ (अशोक सराफांना क्षेत्रात सर्व मामा म्हणतात.) कुठं संभाषण वाढवा? म्हणून मामा उगाच सौजन्याने म्हणाले, ‘‘हो ओळखलं’’, पण त्यांना काय माहीत हा गडी काय चीज आहे ते? त्यानं विचारलं, ‘‘मं, सांगा बगू? सांगा की मी कोण ते? कुठं भेटलोय सांगा बगू.. आयला एवडं आठवना होय’’ मामा बुचकळ्यात पडले. हा माणूस काय दाद देत नाही हे पाहून मामा वैतागून म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचं नाव मला माहीत नाही’’. मामांचा आविर्भाव बघून तो माणूस निमूटपणे निघून जाईल असं वाटलं, पण तो महावस्ताद निघाला. तो म्हणाला, ‘‘मला म्हाईतीच हाय, तुमी मला ओळकत न्हाई ते’’. मामांनी हतबलपणे विचारलं, ‘‘मग कशाला लांबड लावलीस एवढी?’’ तो म्हणाला, ‘‘पिक्चरमध्ये पब्लिकच्या एवडय़ा फिरक्या घेताय, म्हटलं आज आपण तुमची फिरकी घ्यावी’’.. असं म्हणून तो माणूस त्याचं रबरी स्लीपर, फटाक फटाक वाजवत, पिशवी खांद्यावर टाकून निवांतपणे निघून गेला. मामा फक्त पाहात राहिले.
मागे मुंबई थिएटर फेस्टिव्हलला परेश रावलना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. उद्घाटनाचा समारंभ झाल्यावर रवींद्र नाटय़ मंदिराच्या मुख्य प्रेक्षागृहातून, वरच्या मजल्यावरच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी लिफ्टकडे जाण्याचा रस्ता दाखवण्यासाठी मी परेश रावल यांच्याबरोबर चालत होतो. अचानक एक अत्यंत नामांकित चॅनेलची एक चटपटीत पत्रकार तरुणी आली. तिला परेश रावल यांचा एक्स्ल्यूसिव्ह बाइट घ्यायचा होता. मासकॉमची टॉपर वगरे असल्याने, एक वेगळाच म्हणून, खूप अभ्यासपूर्ण प्रश्न तिने परेश रावल यांना विचारला. ‘‘सर, आप िहदी फिल्म इंडस्ट्री के बडे स्टार हो। आप को नहीं लगता की, कभी थिएटर करें?’’
ज्या माणसाची हयात गुजराती रंगभूमीवर गेली, जो केवळ नाटक करून बॉलीवूडचा मोठा नट बनला, सिनेमांबरोबर जो नट अजूनही नाटकांत काम करतो, अशा नटाला हा प्रश्न जर चारचौघांत विचारला जात असेल तर, आणि तेही पत्रकाराने, तर परेश रावल यांनी कसं उत्तर देणं अपेक्षित आहे? थोडय़ाच वेळापूर्वी त्यांनी काय म्हणून नाटय़महोत्सवाचं उद्घाटन केलं होतं? त्यावेळी परेश रावल यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. रागाच्या भरात त्यांनी समजा शिवी दिली असती, थप्पड मारली असती तरी त्या मुलीला ती शिक्षा कमीच होती. पण तिच्या हातात कॅमेरा असल्याने, आणि सुसंस्कृतता नटानंच पाळायची असल्याने त्यांनी झाला अपमान शिताफीने सहन केला आणि त्या मुलीकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते निघून गेले.
मला महेश एलकुंचवारांनी स्वत: हा किस्सा सांगितला आहे. त्यांच्याकडे काही नटमंडळी सहज भेटायला म्हणून गेली होती. नाटकाच्या दौऱ्यावर असल्याने, एका ज्येष्ठ अभिनेत्रीने काही तरुण नटय़ांनाही बरोबर नेले होते. त्यानिमित्ताने ओळख होईल, असा हेतू होता. एलकुंचवारांच्या घरी गेल्यावर महेशदा पाणी आणायला आत गेले. तोपर्यंत सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण नटीने महेशदांचे पुस्तकांचे रॅक निरखायला सुरुवात केली. कदाचित एवढी पुस्तके एकाच घरात पहिल्यांदाच पाहिली असावीत. नेमकं महेश एलकुंचवारांच्याच नाटकाचं पुस्तक त्या तरुणीच्या हातात पडले. एवढय़ात पाणी घेऊन महेशदा बाहेर आले. या नटीने त्यांना अत्यंत कुतूहलाने, लाडिकपणे विचारले, ‘‘अय्या, तुम्ही लिहिता पण?’’ महेशदा म्हणाले, ‘‘मी माझ्याच घरात असल्याने मला निघूनही जाता येईना.’’ एखाद्या हातगाडी चालवणाऱ्या मजुराने हा प्रश्न विचारला तर समजण्यासारखे आहे. पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो, निदान ज्यांच्या घरी पहिल्यांदा चाललो आहोत, त्याची जाण्याआधी माहिती घ्यावीशी त्या नटीला का वाटली नसेल?
एक दिवसाच्या फरकाने मोहन गोखले आणि दादामुनी अशोक कुमार यांचं निधन झालं. राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री उभे राहिले. अशोक कुमार यांना श्रद्धांजली वाहून ते जागेवर बसायला निघाले, तेव्हा प्रेक्षकांमधून मोहन गोखले.. मोहन गोखले.. म्हणून गलका झाला.. तो मंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी होता.. पण भांबावलेले सांस्कृतिक मंत्री परत व्यासपीठावर आले आणि त्यांनी सूचना केली की, ‘‘मोहन गोखले असतील तर त्यांनी मंचावर यावे’’.. एका सांस्कृतिक मंत्र्याला आपण काय जाहीर करतोय याचा पत्ता नव्हता.
आम्ही देऊळ सिनेमाच्या मुहूर्तावेळी काही नटांसमवेत नाना पाटेकरांशी गप्पा मारत होतो. अचानक एक गृहस्थ आले आणि त्यांच्या हातातला मोबाइल नानांच्या हातात देऊन म्हणाले, ‘‘माझा भाऊ तुमचा ल फॅन आहे.. लाइनवर हाय.. जरा गप्पा मारा नं त्यांच्याशी’’? अशा वेळी नाना पाटेकरसारख्या विक्षिप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नटाने कसा निभवायचा असतो हा प्रसंग?
असे असंख्य प्रसंग आता नित्याचेच झालेत.
आम्ही प्रयोगाला, शूटिंगला जातो तेव्हा सर्व फॅन्सना सतत फोटो काढून घ्यायचे असतात. आया त्यांच्या लहान, अगदी तान्ह्य़ा मुलांनाही नटांच्या, नटय़ांच्या हातात जबरदस्तीने थोपवून फोटो काढून घेण्यात गुंग असतात. प्रसंगी ज्येष्ठ नटांच्या खांद्यावरही बिनदिक्कतपणे हात टाकून उभे राहायला ते कमी करत नाहीत; आवडणारा डायलॉग रस्त्यात, कार्यालयात, प्रवासात, हॉटेलात, कुठेही म्हणायला लावतात.
एकूणच सामाजिक वर्तनाचं तारतम्य हा मनोरंजनाचाच विषय बनून राहिला आहे.