उदयराज साने – response.lokprabha@expressindia.com

करोना विषाणूचा संसर्ग २०१९ च्या डिसेंबरमध्ये सुरू झाला. त्याची निर्मिती चीनमध्ये झाली, असे चीनच्या कुंडलीतून दिसते. त्याचा ऊहापोह आपण करूच. गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०१९ ला सूर्यग्रहण झाले त्या वेळी आपल्याकडे ग्रहण अमावास्या होती. या वेळी गोचर ‘शनी-प्लुटो’ युतीयोग होता. हा युतीयोग चीनच्या १-१०-१९४९ च्या कुंडलीत राहू आणि नेपच्यूनच्या कुंडलीत केंद्रात होता. चीनच्या मूळ कुंडलीत बुध-नेपच्यून-केतूच्या युतीत असल्याने हे भाकिताला पक्के ठरते. पाहता पाहता संपूर्ण जगाला या आजाराची लागण झाली. भारतात त्याची सुरुवात चीनमधून केरळमध्ये आलेल्या एका महिलेपासून झाली. या विषाणूची लागण सुरू होऊन आता एक वर्ष झाले आहे. त्याची सुरुवात जशी या ग्रहयोगांबरोबरच मूळ नक्षत्रात केतू आल्यावर झाली तसेच आता ‘ज्येष्ठा’ नक्षत्रातून केतू जात असल्याने त्यावरील औषध शोधण्यात यश आले. यापूर्वी पोलिओचा डोससुद्धा ‘ज्येष्ठा’ नक्षत्रात केतू आल्यावरच सापडला होता, कारण ज्येष्ठा नक्षत्राचा संबंध औषधशास्त्राशी आहे. आपली परीक्षा आता सुरू होत आहे, कारण भारतासारख्या मोठय़ा देशात प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचविणे एक मोठे आव्हान असेल. आपण केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर २०२१ मध्ये महाराष्ट्राला अनेक पातळ्यांवर लढावे लागणार आहे. कारण नव्या वर्षांची ग्रहस्थिती! यामध्ये प्रामुख्याने गोचर राहूचे भ्रमण वृषभ राशीतून सुरू असून महाराष्ट्राच्या कुंडलीतील शनीच्या षडाष्टकातून हे भ्रमण सुरू आहे. गोचर नेपच्यून हा महाराष्ट्राच्या कुंडलीतील मंगळावरून जात असून लस मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या कुंडलीतील पंचम स्थानामधून गोचर हर्षलचे भ्रमण सुरू आहे. हे भ्रमण गोचर मकर शनीच्या केंद्रातून जानेवारी ते ऑगस्ट असे आठ महिने सुरू राहणार आहे. ते गोचर मकर राशीतील शनी आणि महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील पंचमातील रवीच्या केंद्रातून होत असल्याने या ग्रहयोगांच्या कात्रीत लस वितरण यंत्रणा सापडण्याची आणि त्यामुळे वितरणात घोळ होण्याची भीती आहे. या मुख्य योगाला बाळसे देत गोचर प्लुटो ८ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील ‘बुध-शुक्र’ यांच्या केंद्रात हा प्लुटो लगेचच येणार असल्याने या मोठय़ा कुयोगांची शक्ती आणखी वाढणार आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कोरोना लस वितरणात घोळ होऊ शकतात. गोचर गुरूचे भ्रमण मकर राशीतूनच होत असल्याने आणि या ‘गुरूचा आणि प्लुटो’ युतीयोग महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील ‘बुध-शुक्र’ केंद्रात राहणार असल्याने सरकारला लस वितरणाचे गाडे सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. या कुयोगांची शक्ती आणखी वाढविण्यासाठी गोचर मंगळ २४ डिसेंबरला मेष राशीत प्रवेश करेल आणि लगेच ५ जानेवारीपासून गोचर शनी व मंगळ यांचा केंद्रयोग सुरू होईल. या केंद्रयोगामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. ५ ते २५ जानेवारीपर्यंत मंगळाचा हा थयथयाट आपण पाहणार आहोत, पुढे २१ फेब्रुवारीपासून हा गोचर ‘मंगळ’ कृत्तिका या उग्र – क्रूर अशा नक्षत्रात प्रवेश करेल. तिथे तो २१ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत राहणार आहे. या ‘कृत्तिका’ नक्षत्रातील मंगळ भ्रमणात अनेक नाटय़पूर्ण घटना घडणार आहेत. या गोचर मंगळाचे गोचर राहूवरून भ्रमण होणार असून हा गोचर ‘मंगळ’ महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील प्लुटोच्या केंद्रात तर गुरूच्या षडाष्टकात राहणार असल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पहिल्या चार महिन्यांत लसीच्या निमित्ताने येणारे अडथळे आपण पाहिले. लस प्रत्येकाला किमान दोनदा तरी घ्यावी लागणार आहे. नवा वैश्विक कालसर्प योग पुन्हा एकदा सुरू होत असून नव्या वर्षांत हा कालसर्प (वैश्विक) योग मार्चच्या अखेरीस संपेल. याच कालावधीत आणखी दोन साथी अन्य देशांतून पसरण्याची भीती असून पुढची दोन वर्षे तरी मास्क वापरणे प्रत्येक भारतीयाला अनिवार्य ठरणार आहे. संसर्गापासून संरक्षणाविषयी सरकारने मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली आहे. यापुढे बनावट लसीपासून सावध राहण्याविषयीही अशाच स्वरूपाची जनजागृती करणे आवश्यक ठरेल. थोडक्यात लस वितरणाचे आव्हान सरकारपुढे असून ते सक्षमपणे पेलावे लागणार आहे.