सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-नेपच्यूनचा समसप्तम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. रवीचा अधिकार आणि नेपच्यूनची भावदर्शकता यांच्या संयोगाने नवी नाती जोपासाल. नोकरी-व्यवसायात शिस्तबद्ध पद्धतीने अनेक कामे हातावेगळी कराल. वरिष्ठांच्या पाठिंब्याचा मोठा आधार मिळेल. सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. परदेशसंबंधित कामांना गती येईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मुलांच्या कलागुणांचे कौतुक होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. छातीत जळजळ व अपचनाकडे दुर्लक्ष नको.

वृषभ चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग हा कल्पकतादर्शक योग आहे. उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली मोठी बाजी माराल. सहकारी वर्गाकडून नव्या व्याख्या शिकायला मिळतील. अनुभवात भर पडेल. जोडीदाराला त्याच्या कामाची योग्य पोचपावती मिळेल. मुलांच्या हजरजबाबीपणामुळे संकट टळेल. कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतील. सण उत्साहाने, आनंदाने साजरा कराल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील.

मिथुन चंद्र-गुरूचा लाभ योग हा उद्बोधक योग आहे. एखाद्या प्रश्नाची उकल शोधताना नव्या मार्गाचा अवलंब कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल. सहकारी वर्ग मदतीस तत्परता दाखवेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना त्याचा चांगला मित्र किंवा मैत्रीण बनून विचारविनिमय कराल. मुलांच्या गुणांचे कौतुक आणि अभिमान वाटेल. नातेवाईकांच्या भेटीतून प्रगतिकारक बाबी समजतील. पोटाचे विकार बळावल्यास औषधोपचार घ्यावा. पथ्य पाळावे.

कर्क चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. नोकरी-व्यवसायात नवे अनुभव गाठीशी बांधाल. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. सद्य:स्थितीत काळजी घेणे इष्ट ठरेल. सहकारी वर्गाच्या योगदानाचा विशेष उल्लेख कराल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांच्या बौद्धिक विकासाला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे असेल. नाती जपल्याचा आनंद मोठा असेल. आरोग्य चांगले राखण्यासाठी पथ्य आवश्यक!

सिंह रवी-चंद्राचा लाभ योग हा यशकारक योग आहे. अधिकारांचा कारक रवी आणि कृतितत्पर चंद्र यांना एकमेकांची चांगली साथ लाभेल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना गती येईल. वरिष्ठांकडून मान्यता मिळवाल. सहकारी वर्गाला आवश्यक असे प्रशिक्षण द्याल. समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे सरसावाल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. नव्या-जुन्या विचारांचा मेळ जुळवून आणाल. मुलांची प्रगती समाधान देईल. रक्ताभिसरण संस्थेमध्ये अडचणी येतील.

कन्या चंद्र-बुधाचा लाभ योग हा व्यवहार सांभाळणारा योग आहे. मनाची चंचलता कमी होऊन बुद्धिमत्तेचे नवे आव्हान स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय योग्य वेळी घेतल्याने नुकसान टळेल. सहकारी वर्गाला त्यांच्या मदतीचे श्रेय द्याल. जोडीदाराची कामाच्या ठिकाणी मानसिक कुचंबणा होईल. त्याच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहण्याची गरज भासेल. मुलांच्या बुद्धिमत्तेला शिस्तीची जोड देणे आवश्यक आहे. मूत्रविकार वाढल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.

तूळ चंद्र-शुक्राचा युती योग हा कलात्मक योग आहे. मनातील विचार आणि भावना उत्तम प्रकारे व्यक्त कराल. तसेच इतरांच्या भावनांचाही मान राखाल. नोकरी-व्यवसायात प्रवास योग संभवतो. चांगल्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे नव्या संकल्पना आकार घेतील. सहकारी वर्गाच्या धाडसाचे कौतुक कराल. जोडीदाराच्या लहरीपणामुळे त्याची मोठी संधी हुकेल. मुलांच्या समस्या चर्चेने सोडवाव्यात. कामातील ताणामुळे गुडघे, पोटऱ्या भरून येतील.

वृश्चिक चंद्र-शनीचा लाभ योग हा मेहनतीला यश देणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या प्रगल्भ विचारांचा लगाम बसेल. काल्पनिक गोष्टींचे अवडंबर न माजवता वस्तुस्थिती नीट समजून घ्यावी. नोकरी-व्यवसायात समज-गैरसमज बळवण्याची शक्यता! योग्य काळजी घेतल्यास नुकसान टळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल. मुले आपल्या मार्गावर प्रगतिकारक वाटचाल करतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. वाद टाळावेत. पोटाच्या तक्रारी वाढतील.

धनू चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा संघर्षदर्शक योग आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल. नोकरी-व्यवसायात बुद्धिमत्ता आणि कलात्मकतेचा उपयोग करून कार्य साध्य कराल. वरिष्ठांच्या संमतीने नव्या निर्णयांची अंमलबजावणी कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराची रखडलेली कामे मार्गी लागतील. गरजवंतांना समाजकार्याद्वारे मदत कराल. मुलांच्या प्रगतीचा चढता आलेख बघून समाधान वाटेल. स्कीन इन्फेक्शन होण्याची शक्यता भासते. काळजी घ्यावी.

मकर गुरू-चंद्राचा केंद्र योग हा मार्गदर्शक योग आहे. चंद्राच्या कुतूहलाला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळाल्याने प्रगल्भता वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले मुद्दे समजावून द्याल. सहकारी वर्गासह सध्या तरी वादाच्या गोष्टींवर चर्चा टाळा. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. एकमेकांना समजून घ्याल. मुलांची उन्नती होईल. नातेवाईक, मित्र-परिवार यांच्या भेटी होतील. परिस्थितीचे भान ठेवावे. कामाच्या व्यापामुळे दमणूक होईल. वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक!

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. इतरांची मानसिकता सांभाळाल. नोकरी-व्यवसायात तणावाचे वातावरण निर्माण होईल. परंतु ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडे आहेत त्यांचा स्वीकार करून नव्या योजना आखा. वरिष्ठांसह चर्चा कराल. सहकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. जोडीदार त्याच्या कामकाजात अधिक व्यस्त असेल. अधिकाराचे पद भूषवेल. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्यावर शिस्तीचा अंकुश आवश्यक! पाठ व कंबर यांचे दुखणे बळावेल.

मीन  चंद्र-शुक्राचा लाभ योग हा कल्पक योग आहे. नव्या योजना अमलात आणाल. विचारांमध्ये सुसूत्रता येईल. नोकरी-व्यवसायात आपल्या दृष्टिकोनात महत्त्वाचे बदल कराल. वरिष्ठांची मर्जी संभाळाल. सहकारी वर्गाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तापदायक घटनांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या गुणांची दखल घेतली जाईल. मुलांना त्यांचे विचार मोकळेपणे मांडण्याची संधी द्याल. शेजारी आणि नातेवाईकांना मदत कराल. डोळे, हृदय आणि मणका यांची विशेष काळजी घ्यावी.