scorecardresearch

राशिभविष्य : दि. १८ ते २४ फेब्रुवारी २०२२

चंद्र-मंगळाचा लाभ योग हा कर्माला भाग्याची जोड देणारा योग आहे.

zodiac sign weekly astrology
साप्ताहिक राशिभविष्य : असा असेल तुमचा आठवडा

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-मंगळाचा लाभ योग हा कर्माला भाग्याची जोड देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात  मेहनत घ्यायची तयारी दाखवाल.  सहकारी वर्गाच्या मदतीने आगेकूच कराल. जोडीदाराचा अंदाज खरा ठरेल. कौटुंबिक बाबींकडे दुर्लक्ष नको. आपला निर्णय मुलांसाठी लाभदायक ठरेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जुने आजार डोकं वर काढतील. पथ्य सांभाळा. विश्रांतीची आवश्यकता.

वृषभ चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यावहारिक गोष्टींमध्ये करायला सुलभता देईल. नोकरी-व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कराल. सहकारी वर्ग आडमुठेपणा करेल. जोडीदार आपल्या हुशारीने कार्यक्षेत्र गाजवेल. त्याचा अभिमान बाळगाल.  मुलांच्या जिद्दीचे कौतुक वाटेल. ऋतुमानातील बदलाचा त्वचेवर परिणाम होईल.

मिथुन चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा कला आणि व्यापार यांच्यात दुवा साधणारा योग आहे. वरिष्ठांपुढे आपले मुद्दे मांडताना आत्मविश्वास दिसून येईल. सहकारी वर्गावर प्रभाव पडेल. जोडीदाराच्या विचारांना मान्यता मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांना आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. अपचनाचा त्रास दुर्लक्षित करू नका.

कर्क चंद्र-बुधाचा केंद्र योग  हा बुधाच्या व्यावहारिक दृष्टिकोनाला नव्या संकल्पनेची जोड देईल. परिस्थितीनुसार होणारे बदल स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात नवी उमेद निर्माण होईल. वरिष्ठांचा विश्वास खरा करून दाखवाल. जोडीदारासह बौद्धिक, शाब्दिक चकमक होईल. मुलांना आर्थिक नियोजनाचे धडे द्याल. ओळखीच्या व्यक्तींकडून आनंददायी वार्ता समजेल. स्नायुबंध, शिरा यांचे दुखणे उद्भवेल.

सिंह चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा करारी स्वभावाला स्नेहभावाची किनार देणारा योग आहे. आपल्यातील ममता जागी होईल. नोकरी-व्यवसायात कटू सत्य पचवावे लागेल. निडरपणा उपयोगी पडेल. वरिष्ठांच्या निर्णयास मान्यता द्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभा राहील. वातविकार बळावल्याने सांधेदुखी सहन करावी लागेल. पाठीचा मणकादेखील सांभाळावा.

कन्या चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा भावना आणि व्यवहार यांना सांभाळणारा योग आहे. कामकाजाच्या व्यापात नातीगोतीदेखील चांगली जपाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मान्य करावा. नव्या संधीचे सोने कराल. जोडीदाराचा पािठबा पूरक ठरेल. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्याल. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकाल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा.

तूळ चंद्र-नेपच्यूनचा सम सप्तम योग हा स्फूर्तिवर्धक योग आहे.  नव्या संकल्पना रुजवाल. नोकरी-व्यवसायात आर्थिक जोखीम पत्करू नका. वरिष्ठांना आपली बाजू स्पष्टपणे सांगाल. सहकारी वर्गाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. संस्थेचे हित लक्षात घ्यावे. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांना कष्टाचे फळ मिळेल. घसा आणि कफ यासंबंधित विशेष काळजी घ्या.

वृश्चिक चंद्र-बुधाचा लाभ योग हा भावनांवर विचारांचा ताबा मिळवणारा योग आहे. सकारात्मक वा नकारात्मक भावना व्यक्त करताना समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात सर्वच गोष्टी उघडपणे बोलता येणार नाहीत. सहकारी वर्गाकडून महत्त्वाची माहिती हाती लागेल. जोडीदाराचे खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलं मेहनत घ्यायला तयार होतील. छातीत जळजळ होईल. वाताचाही त्रास वाढेल.

धनू चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा शिस्तीसह प्रेम आणि वात्सल्य देणारा योग आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करताना वेळेचे भान राहणार नाही. नोकरी-व्यवसायात स्वप्ने साकार करण्यासाठी अधिक मेहनत घ्याल. मुलांना आपल्या प्रेमाने जिंकाल. वातावरणातील बदलाचा त्वचेवर परिणाम होईल. आवश्यकतेनुसार पाणी पिणे गरजेचे ठरेल.

मकर चंद्र-शनीचा नवपंचम योग हा जिद्द टिकवून ठेवेल. चंद्राच्या कृतिशीलतेला शनीच्या सातत्याची पुष्टी मिळेल. लांबणीवर पडलेली कामे वेग घेतील. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गासह वाद घालू नका. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. त्याची उन्नती होईल. मुलांचे विचार ऐकून घ्याल. योग्य वेळी त्यांना समज द्याल. थंडीपासून बचाव करावा. हाडे, सांधे, मणका यांची काळजी घ्यावी.

कुंभ रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे. मेहनत घेतल्यास फळ मिळेल. बौद्धिक बळ वापरून कामे पुढे न्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल. सहकारी वर्गाचा सल्ला उपयोगी ठरेल. नातेवाईकांना आपली गरज भासेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. मुलांच्या वागणुकीचे कौतुक वाटेल. सांधे आखडतील. अंग जड होईल.

मीन चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावणारा योग आहे. िहमत वाढवाल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात आपल्या वैशिष्टय़पूर्ण स्वभावाची झलक दाखवाल. रखडलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकाराल. जोडीदार कामकाजात मग्न असेल. मांडय़ा, पोटऱ्या भरून येतील. वैद्यकीय सल्ला व तपासणीची गरज भासेल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2022 at 00:35 IST

संबंधित बातम्या