25 February 2021

News Flash

मुलाखत : भारतीय क्षमता अफाट, पण अद्याप जोखल्या गेलेल्या नाहीत… – बिल गेट्स

भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि या लोकसंख्येकडे खूप क्षमता आहेत.

बिल गेट्स

अनंत गोएंका – response.lokprabha@expressindia.com

बिल आणि मेलिंदा गेट्स फाउंडेशन या जगातल्या सगळ्यात मोठय़ा खासगी विश्वस्त संस्थेचे प्रमुख बिल गेट्स यांच्याशी अनंत गोयंका यांनी साधलेला संवाद.

तुम्ही शिफारस केलेले ‘फॅक्टफुलनेस’ हे पुस्तक मी वाचले. पूर्वीपेक्षा जगाचे आता खूपच चांगले चालले आहे, हिंसाचार कमी झाला आहे, पूर्वीच्या तुलनेत समानता आहे, गरिबी कमी झाली आहे अशी मांडणी त्या पुस्तकात केली आहे. करोनाच्या महासाथीचा या मानवतावादी सिद्धांतालाही फटका बसला आहे का? 

बिल गेट्स : करोनाची महासाथ हा अवाढव्य फटका आहे. खरे तर त्यासंदर्भातली सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाच्या पातळीवर प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही हा फटका किती प्रचंड आहे हे मोजणे अतिशय अवघड आहे. आणखी दोन ते पाच वर्षांनी आपण, ही महासाथ सुरू झाली तेव्हा ज्या टप्प्यावर होतो त्या टप्प्यावर पुन्हा पोहोचूत. त्यामुळे त्या अर्थाने हे कायमस्वरूपी नुकसान नाहीये. पण हा आवाकाच मोजायचा तर या महासाथीमुळे झालेल्या नुकसानीची महायुद्धाच्या काळाशी तुलना करता येईल. त्याचे कारण म्हणजे ज्या देशांमध्ये करोनामुळे एकही मृत्यू झाला नाही, ते देशही आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाले आहेत.

तुम्ही पुढच्या दोन ते पाच वर्षांत सगळे जग पूर्वस्थितीला येईल असा उल्लेख केला आहे. म्हणजे पुढच्या दोन ते पाच वर्षांत दुसरी एखादी महासाथ येणार नाही असे तुम्ही गृहित धरलंय का? की हा तुमचा आशावाद आहे? 

बिल गेट्स : दरवर्षी एखादी महासाथ, नैसर्गिक महासाथ येण्याची शक्यता साधारणपणे दोन टक्के असते. दुसरीकडे एक पूर्ण दशकभर एकही महासाथ येणार नाही अशीही शक्यता असते. आपली सरकारे निदान, उपचार, लसनिर्मिती करण्याची क्षमता विकसित करत आहेत. आणि त्यामुळे यापुढच्या काळात अशी एखादी महासाथ आली तर आपली सरकारे त्यांना तातडीने प्रतिसाद देऊ शकतील. संभाव्य महासाथ या वेळेसारखे उग्र रूप धारण करणार नाही याची आपण खात्री बाळगायला हरकत नाही. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या देशांनी कोविड १९ च्या संदर्भात तातडीने पावले उचलली आणि त्यामुळे त्यांचे कमीतकमी नुकसान झाले हे आपण पाहिले आहे.

आता पुन्हा कधी अशी महासाथ आलीच तर आता आपण तिला तोंड देण्यासाठी पुरेसे तयार आहोत असे तुम्हाला वाटते का? की जेवढी तयारी आपण करू शकतो तेवढी अजून केलेली नाही?

बिल गेट्स : यासंदर्भात २०१५ मध्येच तज्ज्ञांनी इशारा दिला होता. माझ्या ‘टेडटॉक्स’मध्येदेखील मी यासंदर्भात बोललो होतो. पण त्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. सीईपीआय (कोअ‍ॅलिशन फॉर एपिडेमिक प्रीपेअरनेस इनोव्हेशन्स) नावाचा एक गट यासंदर्भात स्थापन करण्यात आला होता. या गटानेही या महासाथीच्या संदर्भात आपले योगदान दिले आहे. पण हे सगळे आपल्या क्षमतेच्या पाच टक्केदेखील नाहीये. पोलिओ आणि मलेरियासंदर्भातले काम करण्यासाठी जी माणसे नेमली होती त्यांनाच कोविड १९ च्या कामाकडे वळवण्यात आले आहे. त्याचा खूप उपयोगही झाला आहे. पण तरीही या महासाथीच्या कामासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्याबरोबरच निदान करण्यासाठी अधिक चांगली साधने उपलब्ध करून देणे, निरीक्षण करणे, संशोधन आणि विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करणे या सगळ्यावर आता यापुढच्या काळात काम करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत अशीच एखादी महासाथ आली तर तिच्यासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत असे म्हणता येणार नाही. ही सगळी साधने उपलब्ध नसताना पुन्हा अशी एखादी महासाथ येऊ नये आणि आपण त्यात अडकू नये एवढीच आशा आपण करू शकतो.

आपण या महासाथीकडून आपल्या जगण्याशी संबंधित आणखी कोणते धडे शिकलो असे म्हणता येईल? आपल्या जगण्याशी संबंधित कितीतरी गोष्टी निसर्गाच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत. ही महासाथ आपले डोळे उघडणारी, आपल्याला जागे करणारी धोक्याची घंटा होती असे म्हणता येईल का? की ही महासाथ आणि आपले जगणे यातला संबंध अजून नीट जोडता आलेला नाही?

बिल गेट्स : सहसा एखादे संकट आपल्यासमोर येऊन उभे ठाकते तेव्हा ते निपटून टाकण्यावर कुणाचेही लक्ष केंद्रित झालेले असते. सुदैवाने या महासाथीबाबत असे झालेले नाही. हवामानबदलाचे अनेक तडाखे आपण सोसले आहेत आणि आता हवामानाशी संबंधित समस्यांवर अनेक तरुण लोक बोलायला लागले आहेत. त्यातला त्यांचा रस मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. काही सरकारे, उदाहरणार्थ युरोपियन युनियनने हे सगळे सुधारण्यासाठी हवामानाशी संबंधित प्रकल्पांकडे पैसे वळवायला सुरूवात झाली आहे.

या खरोखरच चांगल्या गोष्टी आहेत. हवामानाशी संबंधित काही करण्यासाठी आपल्याकडे भरपूर ऊर्जा आहे, पण नियोजनाचा अभाव आहे. कार्बन उत्सर्जनाचे फक्त मोटारी आणि वीज उत्पादन नाही तर सिमेंट, स्टील हे आणि यांसारखे अनेक स्रोत आहेत. ते समजून घेऊन सरकारांनी आपल्या वतीने भविष्यात उद्भवू शकणाऱ्या मोठय़ा समस्यांचा विचार करणं आवश्यक आहे. यासंदर्भातल्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे, हे या महासाथीने आपल्या लक्षात आणून दिले आहे.

तर या महासाथीमध्ये आपण काय पाहिले तर ‘बायोटेक’ आणि ‘फायझर’ या कंपन्या एकत्र काम करायला लागल्या. ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ ही कंपनी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’बरोबर काम करायला लागली. कोविडची समस्या दूर करणे या एकाच हेतूने या पद्धतीने लोक एकत्र आले. करोना विषाणू या शत्रूशी लढण्यासाठी नेहमीची बाजारपेठेची गणिते, नफेखोरी बाजूला ठेवून फक्त मानवतेच्या उदात्त हेतूने या पद्धतीने लोक एकत्र आले हे खरोखरच रोमांचक आहे.

जगातल्या लसनिर्मिती करणाऱ्या सगळ्यात मोठय़ा फॅक्टरी भारतीय आहेत. त्यामुळे आमच्या संस्थेचे या उत्पादकांशी जवळचे संबंध आहेत.  चांगल्या दर्जाच्या लसनिर्मितीसाठी आम्हीदेखील गुंतवणूक केली आहे.

तुमचे ‘सीरम इन्स्टिटय़ूट’शी पूर्वापार असलेले संबंध मला माहीत आहेत. भारतात स्थानिक पातळीवर लस विकसित होण्यासंदर्भात तुमचे मत काय आहे?

बिल गेट्स : जगभरात लसनिर्मितीचे जवळजवळ १५० प्रयत्न सुरू आहेत ही फारच उत्तम गोष्ट आहे. यातल्या बऱ्याच प्रयत्नांचा उपयोग होणार नाही किंवा बऱ्याच लशी वेळेवर येणार नाहीत हे तर उघड आहे. त्यामुळे या प्रयत्नांमधून ज्या लशी हाताला लागतील त्या सोन्यासारख्या बावनकशी असतील. कारण या लशींच्या बाबतीत त्यांची सुरक्षितता आणि एकंदर प्रभावक्षमता या दोन गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. खूप मोठय़ा प्रमाणात आणि त्याचबरोबर कमी किमतीत त्यांची निर्मिती होऊ शकते. ‘फायझर’ तसेच ‘मॉडेर्ना’ची एमआरएनए (mRNA) लस बऱ्यापैकी महाग आहे. त्यांची संख्या वाढवता येणेही कठीण आहे. त्यामुळे ती उपलब्ध असली तरी विकसनशील देशांसाठी मोठय़ा प्रमाणावर लस लागेल आणि तिथे अशा महाग लशींचा उपयोग करता येणार नाही.

फायझरने चार कोटी लशी पुरवण्याचे मान्य केले आहे. आणि आपल्याला त्याशिवाय दोन अब्ज लशींची गरज आहे. त्या लौकरात लौकर उपलब्ध व्हाव्यात अशीच सगळ्यांची इच्छा आहे. ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’, ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘नोवाव्ॉक्स’ यांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांवर सगळ्यांचे लक्ष केंदित झालेले आहे.

या लशींना या चाचण्यांमधून आवश्यक ती सगळी माहिती उपलब्ध झाली की त्या तेवढय़ा प्रमाणात लशीचे उत्पादन करू शकतील का हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्या करू शकत असतील तर ते उत्तमच आहे. जितक्या जास्त प्रमाणात करतील तितके ते चांगले आहे. पण या घडीला असे दिसते आहे की, सुरुवातीला तरी या पाच लशी सगळ्या जगाचे लसीकरण करणार आहेत.

अमेरिका, युरोप, इंग्लंड यांच्या तुलनेत भारत तसेच विकसनशील देशांचा कोविडच्या संसर्गाचा आलेख वेगळा असणे हे खरेच अनाकलनीय आहे. भारतात दहा लाख लोकांमध्ये एका रुग्णाची नोंद झाली तर अमेरिकेत दर दहा लाखांमागे ६५ जणांना कोविड १९ चा संसर्ग झाला. याबद्दल तुम्ही काय सांगाल? 

बिल गेट्स : या महासाथीबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तरुण असणाऱ्यांना, घराबाहेर पडून काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका अतिशय कमी होता. त्यामुळे भारतासारखा किंवा थोडाफार कमी-जास्त आर्थिक विकास असणाऱ्या देशांपैकी फारच थोडय़ा देशांमध्ये या महासाथीच्या काळात मृत्यूचे प्रमाण जास्त असेल. आता काही देशांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात एकत्र कुटुंबपद्धती आहे, तर तिथे परिस्थिती हाताबाहेर गेलेली असू शकते. कारण मग तिथे घरातल्या घरात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. भारतात अशा पद्धतीने एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि शहरांमध्ये लोकसंख्येचे प्रमाणही जास्त आहे. तिथेही अशी परिस्थिती असू शकते. पण तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे. करोनामुळे तरुणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण काही पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात जवळपास नगण्य  होते.

तुम्ही सामाजिक कामांसाठी बऱ्याच पैशांचा विनियोग करता. एका परोपकारी माणसाच्या चष्म्यातून बघताना तुम्हाला श्रीमंत देशामधला अब्जाधीश आणि गरीब देशांमधला अब्जाधीश यांच्यात काही फरक जाणवतो का?

बिल गेट्स : श्रीमंत देशामधल्या अब्जाधीशाने त्याचा थोडा पैसा त्याच्या देशाबाहेर पाठवण्याचाही विचार केला पाहिजे. त्याला ज्या समाजातून एवढे सगळे यश मिळालेले असते तिथे आपला पैसा खर्च करावा असे त्यालाही वाटत असणारच. पण त्याने तो तिथे खर्च करण्याबरोबरच बाहेरही पाठवला पाहिजे. आता माझे आणि मेलिंदाचेच बघा. आम्ही दोघांनी अमेरिकेत उत्तम शिक्षण घेतले. आता आमची फाऊंडेशन अमेरिकेत शिक्षणावर पैसा खर्च करून तिथली शिक्षणव्यवस्था अधिक सुधारण्याचा प्रयत्न करते आहे.

समजा, भारतातला किंवा आफ्रिकेमधला अब्जाधीश असेल तर तो त्याचा बहुतेक पैसा त्याच्याच देशात देईल. कारण भारतात प्राथमिक आरोग्याच्या सेवेसंदर्भात खूप समस्या आहेत. इथे उष्णकटिबंधीय देशातले आजार खूप मोठय़ा प्रमाणात आहेत. भारतीय अब्जाधीशांनी या प्रश्नामध्ये रस घ्यावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो. असमानता, आरोग्य तसेच शिक्षण या प्रश्नांवरही त्यांना सक्रिय करता येईल अशी मला आशा आहे.  फरक असलाच तर एवढाच आहे.

दायित्वासंदर्भातली पूर्वेकडची पद्धत आणि पश्चिमेकडची पद्धत यात तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतो का?

बिल गेट्स : मुख्य फरक असा आहे की, पिढय़ान्पिढय़ा श्रीमंत असलेली घराणी असतात. ती एखाद्या राजघराण्यासारखी असतात. ते खूपदा पैसे देऊन टाकतात पण त्यांची सरंजामी तत्त्वे टाकून देत नाहीत. पण समजा की कुणी तरी अलीकडच्या काळातल्या तंत्रज्ञानातून चांगला पैसा कमावलेला असतो, त्यांना त्यापैकी ५० टक्के किंवा ९० टक्के पैसा देऊन टाकायची इच्छा असते. त्यांना असे वाटत असते की, त्यांना जो पैसा मिळाला आहे तो निव्वळ नशिबाने मिळाला आहे. त्या पैशावर त्यांच्या कुटुंबाचा काहीही हक्क नाही. त्यामुळे मार्क झकरबर्गने त्याने मिळवलेल्या उत्पन्नापैकी ९९ टक्के पैसे देऊन टाकण्याचे ठरवले. मी ९५ टक्के पैसे देऊन टाकायचे ठरवले. आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत उदार, प्रेमळ असलो तरी आम्ही तो पैसा त्यांच्यासाठी ठेवला नाही.

तुमच्या आणि मेलिंदा गेट्स यांच्या वार्षिक पत्रात वाढत्या असमानतेचा उल्लेख आहे. त्याचा लिंगभावाच्या पातळीवर काही फटका बसला आहे असे वाटत का?

बिल गेट्स : शिक्षण मिळणे, घराबाहेर पडून इतर स्त्रियांशी बोलू शकणे याबाबतीत गरीब देशांमधल्या स्त्रियांची परिस्थिती तिथल्या पुरुषांपेक्षा जास्त वाईट आहे. त्या दिवसाचे खूप तास, खरे तर संपूर्ण दिवसभर जवळपास कष्टाचे म्हणता येईल असे अतिशय अवघड काम करत असतात. स्वत:हून एखादा निर्णय घेणे, हिंसेपासून स्वत:चे संरक्षण करणे या क्षमता त्यांच्याकडे अतिशय मर्यादित असतात. सुदैवाने आर्थिक विकासामुळे हे बदलायला सुरुवात होते. विशेषत: शहरी भागात हे बदल आधी होतात.

कोविडच्या महासाथीसारखा मोठा फटका बसतो, तेव्हा आपण सतत हे लक्षात ठेवले पाहिजे की, तो स्त्रियांना जास्त मोठय़ा प्रमाणात बसतो. अगदी श्रीमंत देशामध्येसुद्धा स्त्रियाच जास्त घरकाम करतात. मुलांना त्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मदत करतात. ही सगळी कामे नेहमी आईवरच पडतात. लिंगाधारित धोरणे स्त्रियांवरील बोजा कमी करू शकतील या संदर्भात मेलिंदा नेहमी मांडणी करत असते.

अचानक वाढलेली ही असमानता कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही मार्ग निघू शकेल असे तुम्हाला वाटते का?

बिल गेट्स : आम्ही ऑनलाइन शिक्षणामधली गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन शिकण्यासाठी इंटरनेट जोडणी आणि संगणक वगैरे सुविधांची गरज असते. त्याशिवाय ऑनलाइन शिक्षणासाठी आशयनिर्मिती करणाऱ्या आणि त्यात विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतवून ठेवू शकणाऱ्या शिक्षकाची गरज असते.

कोविडच्या काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले गेले. पण ही महासाथ जेव्हा संपेल, त्यानंतरही शिक्षण सुधारण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा वापर करता येईल. त्यामध्ये तशा पद्धतीच्या खूप क्षमता आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत मी खूप आशावादी आहे. या पद्धतीने शिकताना मुले एका जागी, एकत्र बसलेली नसली तरी ती इतर मुलांना ऑनलाइन भेटू शकतात. एखादी गोष्ट समजली नसेल तर त्याबद्दल लगेच सांगू शकतात. आणि अर्थातच आपण अशा पद्धतीने शिक्षणात सुधारणा केली तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेला फायदा होईल. मनुष्यबळ ही कोणत्याही देशाची प्रमुख साधनसंपत्ती असते. भारताचेही तसेच आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल, अधिक चांगली कशी करता येईल याचा मी सतत विचार करत असतो. कारण देश वेगाने बदलण्यासाठी चांगले शिक्षण ही गुरुकिल्ली आहे.

तंत्रज्ञानाची अपरिहार्यता कोविडच्या महासाथीने अधोरेखित केली आहे. त्याच्या हाताळणीसंदर्भात तुमचे म्हणणे काय आहे? मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासंदर्भात सरकार तसेच लोकांच्या पातळीवर काही नवे मार्ग असायला हवेत असे तुम्हाला वाटते का? 

बिल गेट्स : सगळ्या कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नावीन्यपूर्णता आणत आहेत आणि त्यांच्या सीमारेषांचे त्यांना भान आहे. तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसतसे त्यांच्या सीमारेषाही स्पष्ट होत जातील. उदाहरणार्थ सध्या संवाद आणि बातम्या देण्याच्या क्षेत्रासंदर्भात हे घडते आहे. लशीच्या विरोधातल्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जाणे कसे थांबवायचे यासंदर्भात सरकारला लक्ष घालावे लागेल. वांशिक संघर्ष मोडून कसा काढायचा हे बघावे लागेल. एखाद्या राजकारण्याने एखादे आक्षेपार्ह विधान केले आणि त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर ती कशी हाताळायची यावर चर्चा होऊ शकते. या सगळ्या संदर्भात तंत्रज्ञान कंपन्यांनी काय करणे अपेक्षित आहे हे त्यांना सांगितले जाऊ शकते.

तुम्ही जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये झालेल्या ध्रुवीकरणाबद्दल सातत्याने बोलत असता. ते कमी करण्यासाठी मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतील का? की ते त्यांचे कामच नाही असे तुम्हाला वाटते?

बिल गेट्स : नियम ठरवणे आणि ते तंत्रज्ञान कंपन्यांना सांगणे हे सरकारचे महत्त्वाचे काम आहे. वांशिकतणाव, सगळ्या लशींवर टीका करणे असे काही तुम्ही केले तर ते तुमचे विधान हे राजकीय विधान म्हणूनच धरले जाईल असे सरकारने लेखी स्पष्ट केले की तंत्रज्ञान कंपन्यांनाही आपण त्यासंदर्भात काय करायचे ते समजते.

मला तुम्हाला रॅपिड फायर पद्धतीचे काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही त्या प्रश्नांना फार विचार न करता पटकन उत्तर देणे अपेक्षित आहे.

नियती की मुक्त इच्छा?

बिल गेट्स : मुक्त इच्छा

शिक्षण की अनुभव?

बिल गेट्स : माझा जास्त भर शिक्षणावर आहे, पण दोन्हीची गरज असते हे मान्य आहे.

हुकलेल्या संधीचे एखादे उदाहरण?

बिल गेट्स : तुम्हाला माहीतच आहे, मायक्रोसॉफ्टला फोन ऑपरेटिंग सिस्टिमवर पुरेसे नीट काम करता आले नाही. त्यासंदर्भातल्या चुकांचा मला खेद वाटतो.

तुम्हाला इंटरनेटची पुनर्उभारणी करण्याचे उद्दिष्ट दिले गेले तर तुम्ही त्यातली कोणती गोष्ट बदलाल?

बिल गेट्स : मूलत: तुम्ही अज्ञात आहात असे गृहीत धरण्यातून काही गोष्टी अवघड होतात. त्यातून अडचणी निर्माण होतात. सुरक्षितता नियंत्रित करता येत नसेल तर त्यातूनही काही प्रश्न अवघड होतात. इंटरनेट हे अविश्वसनीय आहे, पण त्यात तुम्हाला एक ओळख असणे आणि सुरक्षितता असणे यावर एक प्रकारचा पडदा अपेक्षित आहे. मुख्य म्हणजे ते अपेक्षेइतके नैसर्गिक नाहीये. ०००

तुम्ही भारतात आजवर अनेकदा आलेले आहात. तुम्हाला भारताने कोणती एक गोष्ट दिली असे तुम्ही सांगाल? भारतात तुम्हाला कोणता एक धडा मिळाला?

बिल गेट्स : भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि या लोकसंख्येकडे खूप क्षमता आहेत. शिक्षणव्यवस्थेतून कष्टाने शिकून वर आलेले खूप हुशार लोक इथे तुम्हाला भेटतात. इथे तुम्हाला तेल दिसत नाही की मोठमोठय़ा खाणी वगैरे दिसत नाहीत. इथे फक्त माणसेच माणसे दिसतात. माणसांचा हा प्रचंड समूह मला अचंबित करून टाकतो. या सगळ्या लोकांना शिक्षण देता आले आणि त्यांच्या क्षमता विकसित करता आल्या तर जे काही घडेल ते अविश्वसनीय असेल. भारताच्या संदर्भात विचार करताना मला असे वाटते की इथल्या माणसांची क्षमता अजून जोखली गेलेलीच नाहीये.

आमच्या फाउंडेशनच्या किंवा मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात भारतीय शिक्षणव्यवस्थेतून उत्तम शिक्षण घेतलेले लोक काम करतात. ते अतिशय स्मार्ट आहेत आणि चांगले योगदान देत आहेत. आणि तरीही या देशात अनेकजण अजूनही संधीपासून वंचित आहेत असेही दिसते. तुम्हाला इथल्या लोकांमध्ये क्षमता आहेत हे दिसते आणि ती अजूनही पुरेशी वापरली गेलेली नाही असेही दिसते तेव्हा काहीसे उद्विग्न झाल्यासारखे वाटते.

आपल्याला बिल गेट्स यांच्यासारखे व्हायचे आहे अशी भारतातल्या अनेक तरुण उद्योजकांची इच्छा असते. त्यांना तुम्ही आज घडीला कोणता सल्ला द्याल?

बिल गेट्स : खरे सांगायचे तर आपल्याला यश मिळेल की नाही असे सुरुवातीच्या काळात वाटण्याची शक्यता खूप मोठय़ा प्रमाणात असते.  महत्त्वाकांक्षा असणे ही खूप चांगली, मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला ज्यात काहीतरी योगदान द्यायचे आहे अशा क्षेत्राची निवड करणे उत्तम ठरेल असे मला वाटते.

आजपर्यंत तयार केल्या गेलेल्या रोबोट्सपेक्षा उत्तम रोबोट्सची निर्मिती तुम्हाला करायची आहे का? किंवा तुम्हाला लोकांना त्यांच्या संशोधनात मदत करायची आहे का? तुम्हाला लोकांना त्यांचा वेळ आणि पैसा यांचे नियोजन करायला मदत करायची आहे का? हे सगळे करून लोकांची कामे करून द्यायची आहेत का? सॉफ्टवेअर, औषध, हवामानबदल ही सगळी क्षेत्रे अशी आहेत की एके काळी या क्षेत्रात कुणीही नव्हते आणि कुणीतरी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. म्हणजे कुणीतरी या क्षेत्रात सगळ्यात पहिल्यांदा काम सुरू केले. तरीही यापैकी कोणत्याही क्षेत्रात आपल्याला रस आहे, त्यातच आपल्याला काहीतरी करायचे आहे, याच क्षेत्रामधले सखोल ज्ञान मिळवायचे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला मोठय़ा कंपनीत काम मिळो न मिळो किंवा खूप पैसा मिळो ना मिळो, त्यापेक्षाही आपण मानवतेच्या मोठय़ा समस्येची उकल करण्यासाठी योगदान दिले हे समाधान तुम्हाला खात्रीने मिळेल.

(‘इंडियन एक्स्प्रेस’मधून)

(अनुवाद- वैशाली चिटणीस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 3:04 pm

Web Title: bill gates interview mulakhat dd70
Next Stories
1 तंत्रज्ञान : भारत के लिये ‘फौजी’
2 राशिभविष्य : दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२१
3 ट्रम्पतात्यांना आणखी एक घरचा आहेर
Just Now!
X