लहानपणी काऊ चिऊ हे जगण्याचे अविभाज्य घटक असतात. त्यांच्यापासून सुरू झालेली पक्षी मैत्री आता माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहे.

काऊ आणि चिऊ लहानपणीचे खूप आवडणारे पक्षी आणि अगदी पहिले मित्र होते माझे. लहान असताना कावळा चिमणीला भेटल्याशिवाय जेवण जायचंच नाही मला.. ते समोर असतील तर किती जेवतेय तेही कळायचं नाही.. पण काऊ किंवा चिऊ , कोणीच नसेल बागेत तर मी जेवण बंदच करायचे.. मग आई त्यांच्या गोष्टी सांगून जेवण भरवायची.. लहानपणी काऊ आणि चिऊ .. फक्त तिथपर्यंतच मजल गेली होती माझी. त्यांना पाहून आणि त्यांच्या गोष्टी ऐकून मोठी झाले खरी पण नंतर अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये मी इतकी रममाण झाले की माझ्या आयुष्यातून पक्षी कुठे तरी हरवूनच गेले. बागेत किती तरी पक्षी यायचे, पण कोणत्याही पक्ष्याकडे पाहायला मला वेळच नव्हता. पक्षी माझ्या आयुष्यातले अविभाज्य घटक होते आणि मी त्यांना कशी काय विसरले काय माहीत. आणि ती गोष्ट कधी माझ्या लक्षातही नाही आली..
एकदा वेळ मिळाला म्हणून निवांत बसले होते बाल्कनीत. काऊ आणि चिऊ बरोबर खूप छोटे पक्षी दिसले. मला कल्पनाही नव्हती, आमच्या बागेत इतके पक्षी येतात ते! मला आश्चर्यच वाटलं होतं बागेत इतके पक्षी पाहून. खरं तर ते पक्षी नेहमीच तिथे असायचे पण मी त्यांना कधी नीट पाहिलंच नव्हतं.. त्या एका निवांत क्षणामुळे माझी पक्षी पाहण्याची इच्छा पुन्हा एकदा जागी झाली आणि तेव्हापासून पक्षी पाहण्याचं वेडच लागलं मला.. तसं मला नीट आठवत नाही, मोठी झाल्यावर मला पक्षी निरीक्षणाची आवड परत कधीपासून निर्माण झाली? पण हे नक्की आठवतंय, ब्राह्मणी मैनेला पहिल्यांदाच इतक्या शांतपणे पाहायला मिळालेला वेळ मला. त्या छोटय़ाशा पक्ष्याकडे पाहून मी इतकी आनंदून गेले होते! किती सुंदर पक्षी!!! नंतर बरेच पक्षी दिसायला लागले आणि त्या क्षणापासून वेगवेगळे पक्षी पाहायची माझी ओढ वाढतच गेली. त्या दिवसानंतर पक्षी पाहणं माझ्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. जेव्हा जेव्हा वेळ मिळायाचा तेव्हा पक्ष्यांच्या शोधात माझा वेळ जायला लागला. मला जेव्हा निसर्गाकडे आणि पक्ष्यांकडे पाहून जगण्याची सवय लागली तेव्हा मी खऱ्या अर्थाने आनंद मिळवतेय असं मला जाणवायला लागलं होतं. मी जेव्हा बाल्कनीमध्ये जाते आणि पक्ष्यांना पाहते तेव्हा मी कोणत्या तरी वेगळ्याच जगात जाते. पक्ष्यांना पाहिलं की सगळ्या चिंता, सगळी दु:खं.. कुठे तरी धूसर होऊन अस्पष्ट व्हायला लागतात.. किती सुंदर असतं त्यांचं जग. इतक्या असंख्य प्रकारचे पक्षी पाहून अवाक् व्हायला होतं. पक्ष्यांकडे काही तरी जादू नक्कीच असते. त्यांना एकदा पाहिलं की परत परत पाहायची इच्छा होते आणि त्यांचा शोध काही थांबत नाही. आधी माझी मजल फक्त घराबाहेरचे पक्षी पाहण्यापर्यंतच होती. पण नंतर हळूहळू पक्षी पाहायची ओढ इतकी वाढायला लागली की जिथे जमेल तिथे जायला सुरुवात झाली. प्रथमदर्शनी काऊ , चिऊ , वेडा राघू हे त्यातल्या त्यात ओळखीचे वाटले होते मला. पण चष्म्या, सूर्यपक्षी, शिंपी पहिल्यांदा पाहिले आणि लक्षात आलं, प्रत्येक पक्ष्याची काही तरी वेगळी ओळख आहे. आधी नुसते पक्षी पाहून मी खूश व्हायचे. पण नंतर त्यांची नावं काय, त्यांची थोडी फार माहिती, त्यांची घरटी कुठे असतात हे पाहायला माझी सुरुवात झाली. पक्ष्यांची घरटी फार नाही दिसली. पण घरासमोरच शिंपी घरटं बांधत होता. योगायोगानेच तिथे घरटं आहे हे मला कळलं. शिंप्याचा तिथला वावर खूप वाढला होता आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा नजर अचानक घरटय़ावर पडली.. मी किती तरी वेळा बाहेर पाहिलं होतं, पण ते घरटं माझ्या नजरेतून सुटलेलं.. घरटं बांधण्याचं त्यांचं काम चालू आहे हे कळल्यावर मात्र मी त्याच्याकडे लांबूनच लक्ष ठेवायला सुरुवात केली. इतक्या सुबकतेने तो त्याचं घरटं बांधत होता! किती हुशारीने कोणाच्या नजरेस पडणार नाही असं घरटं त्याने बांधलं होतं! त्याची तन्मयता पाहून मी अवाक् झालेले. मी पाहिलेलं पहिलं घरटं होतं ते. मी प्रचंड खूश झालेले. घरटी सहज नजरेस पडत नाहीत. पण आता माझा घरटी दिसतायत का याचा शोध चालू झाला आहे.
हळूहळू आवाजावरून पक्षी कळायला लागले. सगळे पक्षी नाही, पण घराच्या आजूबाजूला असलेले पक्षी मी आवाजावरून ओळखायला लागले. कोणाचा आवाज आला तर तो पक्षी हाक मारून मला बोलावतोय असा भासही मला व्हायला लागला. पक्ष्यांचा आवाज आला तरी धावत जाऊ न त्यांना पाहायचा असा कार्यक्रम चालू झाला. पक्ष्यांशी परत एकदा मैत्री करून मी प्रचंड खूश झालेले. आणि आता आमची ही मैत्री आता कधीच तुटणार नाही हे नक्की!
खरंच, किती असंख्य प्रकारचे पक्षी आहेत. दूरवरून प्रवास करून येणारे पक्षी, घराजवळ आढळणारे पक्षी. प्रत्येक नवीन पक्षी पहिला की माझ्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो शब्दांत सांगता येणारच नाही. ते त्यांचं काम करत असतात आणि नकळतपणे आनंदाचा वर्षांव करत असतात. मी त्यांच्या दिनक्रमात कधी लुडबुड करणार नाही फक्त लांबूनच त्यांना पाहणार. मी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच पक्षी पाहिले आहेत. अजून खूप पक्षी पाहायचे आहेत.. कितीही पक्षी पाहिले तरी अजून पक्षी पाहायची ओढ आता कधीच संपणार नाही हे निश्चित. कारण समुद्रासारखं अथांग आहे पक्ष्यांचं जग. कितीही पक्षी पाहिले तरी फक्त समुद्रातल्या ओंजळभर पाण्याइतकेच पक्षी पाहिलेले असतात. लहानपणी काऊ आणि चिऊ यांपासून झालेली पक्ष्यांशी मैत्री आता सगळ्या पक्ष्यांबरोबर चालूच राहणार. आता फक्त एक निश्चय, वेळ मिळेल तेव्हा आणि जमेल तिथे जाऊ न पक्षी पाहायचे. पण त्यांना लांबूनच पाहायचं. त्यांना काही त्रास होऊ न देता..

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
rajesh tope devndra fadnavis
“एक टक्काही दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन”, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान; जरांगे पाटलांबाबत स्पष्ट केली भूमिका!