23 February 2019

News Flash

विष्णुपूरची मृत्तिका मंदिरे

आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या मंदिरांमध्ये थक्क करून टाकणारी स्थापत्यकला पाहायला मिळते.

| April 10, 2015 01:04 am

आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या मंदिरांमध्ये थक्क करून टाकणारी स्थापत्यकला पाहायला मिळते. पश्चिम बंगालमध्ये विष्णुपूर येथील टेराकोटामध्ये घडवलेली मंदिरेही डोळ्याचे पारणे फेडतात.

कोलकात्याचे ‘इंडियन म्युझियम’ (स्थानिक नाव ‘जादूघर’) हे वस्तुसंग्रहालय दोनशे वर्षे जुने आहे. तिथल्या एशियाटिक सोसायटीच्या कामाचा विस्तार म्हणून १८१४ साली हे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते केंद्र सरकारच्या शासनाखाली आले. १९व्या शतकाच्या कोलकात्यामधल्या ब्रिटिश स्थापत्याची सर्व वैशिष्टय़े मिरवणारी याची भव्य इमारत चौरिंगी रोडवर स्थित आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या वतीने सर्वसाधारण नागरिकांसाठी एक छोटा अभ्यासक्रम घेतला जात असे. दर शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळात घेण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमात भारतीय चित्रकला, भारतीय शिल्पकला, भारतीय मंदिरस्थापत्य, भारतातील नाणी अशा विषयांची तोंडओळख करून दिली जात असे. या अभ्यासक्रमांची मुदत तीन महिन्यांची होती. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दोन अभ्यास-सहलींचे आयोजन केले होते. एक सहल दिवसभराची आणि दुसरी सहल दोन दिवसांची. अभ्यासक्रमाच्या अखेरीस एक छोटी लेखी परीक्षाही घेतली जात असे. अभ्यासक्रम म्युझियमच्या इमारतीतच घेतला जात असे.
Untitled-1१९९१ साली कोलकात्यात असताना स्थानिक वृत्तपत्रात मी या अभ्यासक्रमाची जाहिरात वाचली व त्यासाठी नाव नोंदवले. वर्गात पन्नासेक विद्यार्थी होते. सगळी नोकरी करणारी तरुण मुले-मुली. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी. प्रौढ संसारी बाई मी एकटीच होते आणि बंगाली नसलेलीही मी एकटीच. अभ्यासक्रमातल्या विषयांचे माहितीपत्रक इंग्रजीत दिलेले होते, पण सगळे विद्यार्थी बंगाली आणि सगळे तज्ज्ञ व्याख्यातेही बंगाली. त्यामुळे व्याख्याने बंगालीतच होत असत. दोन्ही सहलींसाठी बस ठरवली होती. रस्ताभर Untitled-1कवितांची मैफल चालायची, जुन्या प्रसिद्ध कवींच्या कविता, ‘देश’च्या ताज्या अंकातल्या कविता आणि स्वरचित कवितादेखील! (चार बंगाली माणसांचा गप्पांचा फड-अड्डा- कुठेही जमला की त्यात कवितांचा प्रवेश होतच असे, असे आम्ही कोलकात्याच्या मुक्कामात पाहिले. लांब-लांबलचक कविता-खास करून रवींद्रनाथांच्या तोंडपाठ म्हटल्या जात असत.) आयोजकांच्या परवानगीने या दोन्ही सहलींमध्ये माझे यजमानही सामील झाले होते. त्यामुळे बंगालच्या या नव्या-जुन्या सांस्कृतिक संचिताची ओळख दोघांनाही झाली.
एका दिवसाची अभ्यास सहल सप्रग्राम परिसराची होती. हुगळी नदीच्या काठावरचा सप्रग्रामचा परिसर एके काळी अतिशय समृद्ध होता. (बकिमचंद्र चटर्जीच्या ‘कमालकुंडवा’ या ऐतिहासिक कादंबरीत सप्रग्रामचा उल्लेख येतो. ) या परिसरात १३ व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंतच्या स्थापत्याचे विशेषत: मंदिर स्थापत्याचे नमुने शाबूत किंवा अवशेषांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. ते दाखवायलाही सहल आयोजित केली होती. पाल, सेन, पठाण, मोगल यांच्यानंतर १६व्या शतकापासून या भागात युरोपातल्या वसाहतवादी देशांचा पायरव ऐकू येऊ लागला. त्यांची पदचिन्हेही बऱ्याच चांगल्या स्थितीत दिसतात. बांदेलचे पोर्तुगीज चर्च, चिंसुराची डच लोकांची मालगोदामे, चंद्रनगरच्या फ्रेंच गव्हर्नरचे दुप्लेचे फ्रेंच धर्तीवर बांधलेले निवासस्थान. (तिथे आता म्युझियम, लायब्ररी आणि इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेंच लँग्वेज आहे.) चंद्रनगरला हुगळीच्या काठाकाठाने पायी फिरण्यासाठी युरोपिअन धर्तीवर प्रोमोनेड बांधलेली आहे. हुगळीचा इमामबाडा ही मदिनेच्या मशिदीची प्रतिकृती आहे. बांदेलचे पोर्तुगीज चर्च सोळाव्या शतकाच्या अखेरीस बांधलेले आहे. हे सगळे कमी-अधिक चांगल्या स्थितीतले ऐतिहासिक अवशेष सप्रग्राम परिसरातल्या त्या त्या काळातल्या समृद्धीची ओळख सांगतात.
सप्रग्राम परिसरातल्या काही मंदिरांच्या रचनेवर त्या त्या काळानुसार मशीद आणि चर्च यांच्या रचनावैशिष्टय़ांचा प्रभाव पडलेला दिसतो. पण बंगालमधल्या मंदिरस्थापत्याचे वेगवेगळे नमुने आम्हाला पाहायला मिळाले ते दोन दिवसांच्या विष्णुपूरच्या सहलीत.
विष्णुपूर हे गाव बंगालच्या पश्चिम भागात ‘राढ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात आहे. विष्णुपूरची ओळख पूर्वी सांगितली जायची ती ‘नाच, गाना, मोतीचूर/ तीन निये विष्णुपूर’’ अशी नर्तन, गायन, मिष्टान्न भोजन- विष्णुपूरचं तत्कालीन वैभव आणि तिथल्या राजांची कलासक्ती या दोन्ही गोष्टी यातून सांगितल्या गेल्या आहेत. आज विष्णुपूरला या तिन्हीपैकी काहीही नाही, पण तिथे असलेल्या मृत्तिका मंदिरांचे (टेराकोटा टेंपल्स) संकुल या प्रदेशाच्या एके काळच्या वैभवाचे व रसिकतेचे साक्षीदार आहे. वेगवेगळ्या रचनाशैलींची मृत्तिका मंदिरे इथे एकाच परिसरात पाहायला मिळतात.
राढ प्रदेशातली स्थानिक सत्ता मल्ल या आदिवासी समाजाच्या हातात होती. १४ व्या शतकात सेन राजांच्या काळात इथे हिंदू धर्माचा प्रवेश झाला. मल्ल राजांनी हिंदू धर्म स्वीकारला व आपल्या नावापुढे ‘सिंह’ ही उपाधी लावायला सुरुवात केली. विष्णुपूरची मृत्तिका मंदिरे कृष्णाची असून ती १७ ते १९ या शतकांमध्ये वेगवेगळ्या मल्लराजांनी बांधली. या मंदिरांची भव्यता व अलंकरण मल्लांचे शासन स्थिर आणि समृद्ध असल्याची साक्ष देते.
सर्वसाधारणपणे जुन्या मंदिरांचे बांधकाम दगडाचे असते. विष्णुपूरची मंदिरेदेखील दगडाची असल्यासारखी दिसतात. पिवळट तांबूस रंगाच्या वाळूच्या दगडांची, पण मंदिरांचा हा तांबूस-रंग दगडांचा नसून विटांचा आहे. ही मंदिरे मोठय़ा-मोठय़ा आयताकृती विटांनी बांधलेली आहेत. ओल्या मातीच्या विटा तयार करून त्यांच्यावर आधी ठरवलेले नक्षीकाम किंवा आकृती रिलीफ पद्धतीने कोरून, मग त्या विटा भाजून त्यातून जे दृश्य दाखवायचे असेल त्याप्रमाणे त्या भाजलेल्या विटा एकमेकींना जोडून त्यांची पॅनेल्स तयार केली आहेत. अशी पॅनेल्स वापरून मंदिरांच्या भिंती, स्तंभ वगैरे तयार केले आहेत. बंगालमधली लाखो वर्षांच्या साठलेल्या गाळाची मऊ माती या कोरीवकामासाठी अनुकूल ठरली आहे. इथल्या मातीच्या अशा वैशिष्टय़ामुळेच अशी भाजलेल्या मातीची मंदिरे बांधण्याची कल्पना स्थानिक कारागिरांना सुचली असावी. खूप बारीक बारीक तपशिलांची विविध दृश्ये असलेली ही टेराकोटा किंवा दग्धमृत्तिका मंदिरे दगडाइतकीच भक्कम आहेत व काळाच्या ओघात उत्तम स्थितीत टिकली आहेत.
मंदिरांच्या स्थापत्यशैलीत आणि नक्षीकामाच्या विषयांमध्ये बदलत्या काळाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. यांच्यापैकी काही मंदिरे त्यांच्या रचनाशैलीमुळे, तिच्या वेगळेपणामुळे विशेष प्रसिद्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने राऊमंच, जोड बंगला, मदन मोहन, श्यामराय यांचा समावेश होतो. जोडबंगला मंदिराचे शिखर पत्त्यांचा बंगला करताना पत्ते एकमेकांना जोडून उभे करतात तसे दिसते. मदन मोहन मंदिराचे शिखर चर्चच्या धर्तीचे आहे.
मंदिराचे शिखर ओरिसाच्या मंदिर शिखर शैलीचे आहे. श्यामराय मंदिरावर बंगाली रत्नपद्धतीची पाच शिखरे आहेत. काही मंदिरांवर मशिदीच्या रचनेची छाप आहे. अशा मंदिरामध्ये आतील वळणदार जिना असून त्यावरून वपर्यंत जाता येते.
Untitled-1सर्वच मंदिरांच्या भिंती, स्तंभ व छत नक्षीकामाने भरून टाकलेली आहेत. पण लांबून पाहताना केवळ नक्षीकाम वाटणारी ही कोरीव शिल्पे जवळून पाहिल्यानंतर वैविध्य व वैचित्र्य प्रकट करतात. रामायण-महाभारताच्या दृश्यांपासून ते रोजच्या व्यवहारातल्या दृश्यांपर्यंत, एकासारख्या एक आकृतींच्या रांगेपासून ते वेगवेगळे भाव दर्शवणाऱ्या स्वतंत्र आकृतींपर्यंत लक्ष वेधून घेणाऱ्या आणि नजर खिळवून ठेवणाऱ्या आकृती या नक्षीकामात कोरलेल्या आहेत. शरशय्येवरचा भीष्म, पृथ्वीच्या पोटातून गंगेचा प्रवाह वर काढण्यासाठी शरसज्ज झालेला अर्जुन, राम-रावण युद्ध, बंदूकधारी सैनिकांना घेऊन जाणारी युद्धनौका, सजवलेला हत्ती आणि सजवलेला घोडा यांच्या स्वारांचे युद्ध, मंगलवाद्ये वाजवणारा वादकांचा ताफा, डोक्यावर टोपल्या घेऊन रांगेत जाणारी माणसे, प्रेमी युगुले, नर्तिका, नावेतून जाणारे प्रवासी, हंसावली, मृगावली, उखळात कांडण करणाऱ्या स्त्रिया, लहान बाळाला कडेवर घेऊन दाराशी उभी असलेली स्त्री, बाळाला स्तनपान करवणारी आई, लाजून चेहरा दुसरीकडे वळवणाऱ्या स्त्रीचा अनुनय करणारा तिचा प्रियकर आणि त्यामुळे ‘खंडित’ होऊन त्याच्याकडे पाठ फिरवणारी त्याची दुसरी सखी, प्रियेची हनुवटी वर उचलून तिचे चुंबन घेण्यासाठी अधीर झालेला तिचा प्रियकर, त्याच्या ओष्ठद्वयातून उमटलेली त्याची कामातुरता या सगळय़ा आकृती अगदी लहान लहान आहेत व लांबून पाहताना केवळ नक्षीकामासारख्या दिसतात.
Untitled-1
या मंदिर संकुलामध्ये रास मंदिर हे इतर सर्व मंदिरांपेक्षा अगदी वेगळे आहे. याची रचना दुरून पिरॅमिडसारखी दिसते. ही रचना छोटय़ा छोटय़ा पायऱ्यांनी बनवली आहे. पिरॅमिडसारखे हे उतरते कोनाकृती शिखर चारही बाजूंनी मजबूत बैठय़ा खांबांनी तोलून धरलेले आहे. या खांबांवर त्यांना जोडणाऱ्या ‘चाल’ पद्धतीच्या छोटय़ा छोटय़ा कमानी आहेत. याचे सरळ, तिरप्या, आडव्या रेषांनी सिद्ध झालेले पिरॅमिडसारखे दिसणारे शिखर भव्यतेचा परिणाम करते, तर त्याच्या खालच्या लहान-लहान कमानी त्या भव्यतेला नाजूक सौंदर्याची किनार जोडतात. कृष्ण आणि राधा यांची प्रीती रासमंदिराच्या रूपात मूर्त झाली आहे. ही जाणीव मनात उतरत जाते.
रासमंदिर सर्वतोभद्र प्रकारातले आहे. मात्र कोणत्याही बाजूने प्रवेश करता येतो. मंदिराच्या आत भूलभुलैया पद्धतीची रचना केलेली आहे. तिचा उद्देश वारा खेळवण्यासाठी होता, असे आम्हाला सांगण्यात आले. कदाचित तत्कालीन गोप-गोपींना लपाछपी खेळण्यासाठीदेखील हा भूलभुलैया उपयोगी पडत असेल! मंदिराच्या भोवती एकाबाहेरून एक असे चार प्रदक्षिणा मार्ग आहेत. राधाकृष्णाच्या या रासमंदिरात ते बांधणाऱ्यांची नावेदेखील कोरलेली आहेत. मंदिराच्या छतावर आतल्या बाजूला एकात एक तीन वर्तुळे आहेत. मध्यावरच्या छोटय़ा वर्तुळात राधाकृष्ण आहेत. कृष्ण मुरली वाजवतो आहे. त्याच्याजवळ उभी असलेली राधा त्याच्या मुरलीवादनाने मुग्ध होऊन मान किंचित वर उचलून त्याच्याकडे पाहते आहे. तिचा आविर्भाव नृत्य करताना थबकल्याचा आहे. बाहेरच्या दोन मोठय़ा वर्तुळांमध्ये गोप-गोपींनी समोरासमोर उभे राहून एकमेकांचे हात धरून रासनृत्याचा फेर धरला आहे. खालून बघताना ते शोभिवंत नक्षीकाम असल्यासारखे दिसते.
या संकुलातले एक मंदिर तिथल्या आदिवासी राजांच्या मूळ आदिवासी देवीचे ‘मृण्मयो’चेही आहे. विष्णुपूरच्या या मंदिर संकुलात वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांची मंदिरे एकाच परिसरात पाहायला मिळतात. उतरत्या वक्राकार छपरांची ‘चाला’ पद्धतीच्या बंगाली छपरांची मंदिरे, प्रवेशद्वारावर दोन टोकदार समभुज कोनांचे बांधकाम असलेली ‘जोड बांगला’ पद्धतीची मंदिरे, ‘रत्न’ पद्धतीची शिखरे असलेली मंदिरे, ओरिसा शैलीची छाप असलेली, चर्चच्या शिखरांची छाप असलेली, माशिदींच्या घुमटांचा प्रभाव दर्शविणारी, लांबून पिरॅमिडसारखी दिसणारी, रथासारख्या रचनेची (महाबलीपुरम्ला आहे त्या पद्धतीची) असे अनेक प्रकार या मंदिरांमध्ये आहेत. भाजलेल्या मातीने बांधलेल्या या मंदिरांच्या दर्शनी भागावर व आतही वेगवेगळ्या प्रकारची बारीक, रिलिफ पद्धतीची कोरीव शिल्पे आहेत. खरे तर ‘हेरिटेज’चा दर्जा मिळायला हवा असे हे मंदिरसंकुल आहे. पण त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, आग्रह धरायला हवा, नेट लावायला हवा, पुरावे गोळा करायला हवे व हे सर्व करण्याची मुळात इच्छा असायला हवी. पण शासनाचे अग्रक्रम नेहमीच वेगळे असतात. पश्चिम बंगालचे तर आणखीनच वेगळे.
हे मंदिरसंकुल पाहून आल्यानंतर आमच्या अभ्यास सहलीच्या आयोजकांनी आम्हाला एका अगदी वेगळ्या ठिकाणी, अगदी वेगळी वस्तू पाहण्यासाठी नेले. ही वस्तू म्हणजे एक तोफ होती. तिचे नाव होते ‘दलमर्दन’. ही तोफ गोपालसिंग या अठराव्या शतकातल्या स्थानिक मल्ल राजाने मुद्दाम बनवून घेतली होती. १८व्या शतकात बंगालपर्यंत धडक मारून त्या प्रवेशात लुटालूट करणाऱ्या मराठय़ांच्या फौजांपासून आपल्या प्रदेशाचे रक्षण करणे या उद्देशाने त्याने ही तोफ बनवून घेतली होती. (ज्या कारणासाठी १७४२ साली इंग्रजांनी कलकत्त्याभोवती ‘मराठा डिच्’ या नावाने ओळखला जाणारा खंदक खोदला होता, ज्यावर आताचा सक्र्युलर रोड बांधलेला आहे तसेच हे कारण होते.) नागपूरकर भोसल्यांचे सेनापती भास्कर पंडित यांच्या मराठा फौजांनी त्या काळच्या सर्वसाधारण बंगाली समाजात दहशत पसरवली होती. या लुटारू फौजांनी बंगाली भाषेतला एक शब्दही बहाल केला- ‘बुरगी’- ‘बारगीर’चा अपभ्रंश ‘बुरगी’, लहान मुलांना घाबरवायला मराठीत ‘बागुलबुवा’ येईल असे म्हणतात, तसे ‘बुरगी येईल’ अशी भीती आम्ही मुलांना दाखवतो, असे आमच्या जुन्या बंगाली शेजारणीने एकदा सांगितले होते.
सहलीचे आयोजक या तोफेबद्दल माहिती देत होते तेव्हा एकदम त्यांच्या लक्षात आले की, तिथल्या सर्व बंगाली मंडळींमध्ये आम्ही दोघे मराठी आहे. ते बोलायचे थांबले. मग म्हणाले, हे सर्व मनावर घेऊ नका. या गोष्टी आता इतिहासजमा झालेल्या आहेत. त्यानंतर आम्ही काही बोलतो की काय याची त्यांनी वाट पाहिली. आम्ही ‘तो काळ, त्या वेळची राजकीय परिस्थिती’ असे काही तरी पुटपुटलो, पण त्यात काही अर्थ नव्हता. अठराव्या शतकात मराठय़ांच्या फौजांनी परप्रांतांत शिरून केलेल्या लुटालुटीच्या आणि त्या दरम्यान झालेल्या गरीब निरपराध लोकांच्या छळाच्या आठवणी बंगाली लोकांच्या मनात आजही ताज्या आहेत, हे आमच्या लक्षात आले. तरीदेखील बंगाली लोक मराठी लोकांचा द्वेष करीत नाहीत, हेदेखील लक्षात आले.
परतीचा प्रवास सुरळीत पार पडला. ही अभ्यास-सहल असल्याने प्रवासात एक छोटी प्रश्नपत्रिका दिली गेली. त्यात सगळ्यात जास्त गुण मिळविणाऱ्यांना छोटेसे बक्षीसही मिळाले.
आज वीसेक वर्षांनंतर जेव्हा विष्णुपूरची मृत्तिका मंदिरे आठवतात, तेव्हा त्या सुंदर आठवणींना दलमर्दन तोफेचे गालबोट लागलेले असते. हे मात्र खरे.
(लेखातील छायाचित्रे: अर्णव दत्ता, अमर्त्यबाग, जोनॉयकोबंगाली – मूळ स्रोत विकिमिडीया कॉमन्स)

First Published on April 10, 2015 1:04 am

Web Title: bishnupur kruttika mandir
टॅग Travel