उन्हाळा संपता संपता पावसाची लागलेली चाहूल मनाला सुखावणारी असते आणि भिजवणारीही. ढग मोठय़ा धिटाईने आकाशभर संचार करू लागलेले असतात. अवचित सूर्यालाही झाकण्याचं धाडस करू धजावतात ते. उन्हाची धग कमी होते आणि चाहूल लागते पावसाच्या पहिल्या सरीची. पावसाची वाट पाहण्याचा हा काळ, उन्हाळा संपतानाचा.
पाऊस येणार! त्याच्या येण्याचा आनंद साजरा करायला उत्सुक असतो सारा आसमंत. उन्हाने शिणलेली झाडं, शुष्कं झालेल्या मातीच्या वाटा, तापलेले डांबरी रस्ते, तहानलेले पक्षी आणि उन्हाळ्याला कंटाळलेले आपण.. साऱ्यांनाच घामेजल्या दिवसांचा कंटाळा आलेला असतो.
उन्हं संपत आलेली, वातावरण ओलं, आकाश सावळं, ढगांना घेऊन येणारा वारा, मध्येच येणारी वळवाच्या पावसाची सर, कधी पावसाचा हात धरून येणाऱ्या गारा. उन्हाळ्यातली रखरखता संपणार असते आता. रसरशीत दिसू लागणार असतो निसर्ग. पावसाळ्याची नुसती चाहूल ही किमया करते. येऊ  घातलेल्या त्या किमयागार पावसाची वाट पाहणंही सुखदच. तो येणार हे माहीत असतं तेव्हां! सूर्याने आगही ओकू नये, पावसाने कोसळूही नये, फक्त भिजवून जावं तनामनाला.. असं वाटण्याचा तो काळ.
पावसाची चाहूल लागताच, पावसाळी आठवणीही धाव घेतात मनाकडे. ढगांसारख्या दाटून येतात मनाच्या आभाळात. पावसाशी जोडलेला असतो वास मातीचा आणि नव्या पुस्तकांचाही. सुट्टीचं संपणं, शाळेचं सुरू होणंही पावसाशीच जोडलेलं. म्हणून मातीच्या वासाबरोबर सुगंध येतो शाळेचा. दोन्ही वासात तेच नवेपण. उन्हाळ्याचं संपणं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचंही. तेही चुटपुट लावणारं, ओलं. पावसाळ्याची चाहूलही किती ओली, पावसाळी.
वळीवाची सर येते आणि निसर्ग चिंब होऊन जातो. ऊन लुप्त होते आणि आभाळ गडद निळे. पाऊस येण्याआधीची ती ओलसर वेळ उगाच जुन्या आठवणी जाग्या करते. लहानपण आठवतं, शाळा आठवते, पावसाची कविता आठवते, पाण्यात होडय़ा सोडणं आठवतं.. कॉलेजमधलं ते इंद्रधनूशी जगणं आठवतं, वाफाळलेली कॉफी आठवते. त्याला ती आठवते, तिला तो. दोघांना आपलं पहिलं प्रेम आठवतं. त्याला पावसाची सर आपल्या सखीसारखी वाटते, तिला पाऊस आपला सख्खा मित्र वाटतो.
आठवणींचं ओलसर वातावरणाशी, पावसाशी, सरत्या उन्हाळ्याशी खूप जवळचं नातं असावं, आहेच! त्यांच्यातलं सरलेपण, उन्हाळ्याच्या संपण्यासारखं; त्यांच्यातलं हळवेपण, मेघांच्या सावळेपणासारखं; आणि पाऊस तर दोन्हीकडे, तिकडे मेघाताला, इकडे डोळ्यांतला.    
निकाल
प्रथमेश पवार
वर्षां ऋतूचे आगमन झाले होते. काही दिवसांतच निकालाची वाट संपणार. तो दिवस म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात. चैत्रपालवी दिवसांत रमलेले मन दाहक क्षणांतून तरळत पावसाच्या सरींनी हर्षित झाले. मी नेहमीसारखा पावसात भिजत घरी आलो आणि पेपर उघडला. बघतो तर निकालाचा दिवस फायनल झाला होता. आता माझा डोळ्यांभोवती तारे चमकले. मृद्गंधाच्या नशेची आता माझी भुरळ संपली. वास्तवाची चिंता सतत करावी लागत नव्हती. मी अनेक दिवस फक्त आणि फक्त उनाडक्या करण्यात घालवले होते. अचानक येणाऱ्या सरीसारख्या बातमीने मला भिजवले तेसुद्धा घराच्या चार भिंतींत. दिवस जसजसे पुढे सरकत तसे हृदयाचे ठोके वाढत. चालताना कोणी ओळखीचे भेटले की तोच विषय. नंतर काही दिवस मी रस्ता बदलला. आता तर मी चातक झालो, स्वप्नसुद्धा त्याच दिवसाची असत का कोण जाणे. ‘काय मग?’ या प्रश्नाने मला प्रचंड प्रहार केल्यागत डोके सुन्न होई.
अखेर तो दिवस आला आणि माझ्या धावणाऱ्या मनाची आज घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे अवस्था झाली होती. आजचा दिवस माझा शेवटचा की काय या अवस्थेत मी शाळेत प्रवेश केला. निकालाची वेळ झाली. मी शांत. सर्वापासून दूर उभा. या एकाकीपणाची जाणीव सतत कोणी ना कोणी करून देत होते. ‘कोण आलंय सोबत?’ या अशा माझ्या दृष्टीने निर्थक प्रश्नाला उत्तर कधीच मिळाले नाही. मी हसायचो आणि गप्प बसायचो. कधी एकदा निकाल हाती लागतो आणि घरी जाऊन माझ्या खोलीत शांत बसतो असे सतत वाटायचे. मेच्या सुट्टीत खाल्लेले आंबे-फणस माझ्या डोळ्यांसमोर उभे राहत असताना मला अचानक आवाज आला. आवाजाच्या दिशेने वळलोच तोच माझ्या मित्राने मला मिठी मारली आणि जोरजोरात ओरडत सुटला. मला काहीच ऐकू येत नसावे एवढय़ा जोरात ओरडला. मला कळलेच नाही काय झाले याचे. क्षणात मी भानावर आलो. चालतचालत माझ्या वर्गापाशी गेलो. सर्व जण एकमेकांचे निकाल पाहण्यात दंग होते. मला पाहताच माझ्या वर्गशिक्षिका सुर्वे बाईंनी माझ्यावर एक कटाक्ष टाकला. त्याच बरोबर मी त्यांच्या पुढे उभा राहिलो. निकाल घेतला. मी हसलो आणि निकाल न पाहता पळत सुटलो. त्याच बरोबर माझे अवली मित्र माझा पाठलाग करत माझ्यामागे आंबराईत आले. मी निकाल उघडला. पाहतो तर काय, हे काय कळतच नव्हते. मी पुन्हा पुन्हा नाव तपासून पाहिले. सीट नंबर पाहिला आणि एकदाची खात्री पटली. एक दीर्घ श्वास घेतला. मित्रांना चकवा देत मैदानावर आलो. थांबलो. आकाशातले ढग पाहत नंतर विस्तीर्ण क्षितिज संपवत नजर शाळेकडे थांबली. डोळ्यात ढग दाटले होते. सरीवर सरी कोसळल्या. का कोणास ठाऊक. अश्रू आनंदाचे होते की दु:खाचे पण भावना तीच होती.. आदराची आणि आजही आहे. तेव्हा कळले गुपित. निकालाचा जो दिवस आपल्यासाठी एक नवीन काळ घेऊन येतो..

Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
summer
सुसह्य उन्हाळा!
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
how to take Care of indoor plants
घरातल्या झाडांची निगा