बॉलीवूडला वर्षभरात बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी ठरणाऱ्या निदान ८-१० चित्रपटांची गरज असते. यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सुपरडुपर हिटचा फलक ‘एबीसीडी टू’, ‘गब्बर इज बॅक’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ या चित्रपटांसमोर लागला. त्याखालोखाल ‘बेबी’, ‘पिकू’, ‘दिल धडकने दो’, ‘दम लगा के हैशा’, ‘एनएच टेन’, ‘बदलापूर’, ‘हंटर’ या चित्रपटांनाही चांगले यश मिळाले.
एस. एस. राजामौलीकृत ‘बाहुबली’ हा मुळातला दाक्षिणात्य; परंतु हिंदीतही एकाच वेळी प्रदर्शित झालेला सिनेमा आणि त्यानंतर आलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे, अजूनही हे दोन चित्रपट गल्लापेटी भरत आहेत.
आता ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडे एक नजर टाकली तर ‘स्टार व्हॅल्यू’ असलेल्या सिनेमांची यादी दिसून येते. ‘बंगिस्तान’, ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘ब्रदर्स’, ‘ऑल इज वेल’, ‘फॅण्टम’ असे चित्रपट झळकणार आहेत.
lp55बहुचर्चित चित्रपटांमध्ये ‘ब्रदर्स’, ‘ऑल इज वेल’ आणि ‘फॅण्टम’ या चित्रपटांची नावे घेता येतील.
‘ब्रदर्स’ या चित्रपटात सुपरस्टार आणि ज्याचा हमखास प्रेक्षक वर्ग आहे असा अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे संभाव्य बॉक्स ऑफिस हिट चित्रपट म्हणून या चित्रपटाची बॉलीवूड व्यापाऱ्यांमध्ये अधिक चर्चा केली जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अक्षयकुमार आणि मार्शल आर्ट्समध्ये त्याची असलेली हुकूमत ही प्रेक्षकांना चांगलीच माहीत आहे. ‘ब्रदर्स’मध्ये मार्शल आर्ट्स करताना अक्षयकुमार त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याने हमखास यशाचा फॉम्र्युला म्हणून बॉलीवूड व्यापारी या चित्रपटाकडे पाहत आहेत.
‘ब्रदर्स’ या शीर्षकावरून आणि या चित्रपटाच्या ट्रेलरवरून मुष्टियुद्ध खेळणाऱ्या दोन भावांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा दोघे सख्खे भाऊ म्हणून रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्राची ‘लव्हरबॉय’ ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करणारा ‘ब्रदर्स’ हा सिनेमा असू शकेल. कारण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोजके चित्रपट केल्यानंतर आता एकदम राकट नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अग्निपथ’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक करण मल्होत्रा यांचा ‘ब्रदर्स’ हा दुसरा चित्रपट आहे. दोन भावांच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करतोय. मूळ अमेरिकन चित्रपटातील वडिलांच्या भूमिकेतील कलावंताला पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे २०११ सालच्या ‘वॉरियर’ या अमेरिकन चित्रपटाचा अधिकृत रिमेक करण्यात आला आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे दर्शन ‘ब्रदर्स’मधून प्रेक्षकांना घडणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय.
बऱ्याच कालावधीनंतर अभिषेक बच्चन, असिन, ऋषी कपूर, सुप्रिया पाठक अशा जोडय़ा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट २१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. एका अर्थाने रस्तेमार्गे गाडीने जातानाचे चित्रण यात केले असावे असे ट्रेलरवरून दिसतेय. अभिषेक बच्चनच्या आई-वडिलांच्या भूमिकेत सुप्रिया पाठक-ऋषी कपूर दिसणार आहेत. भरमसाट कर्ज ऋषी कपूरने घेतले आहे. त्याचा बेकरी व्यवसाय नुकसानीत आहे. अशात मुलगा अभिषेक बच्चन यातून मार्ग कसा काढतो यावर चित्रपट बेतला असावा असे दिसते. ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट असल्यामुळे करमणुकीची हमी मिळू शकेल असे मानायला हरकत नाही.
२००९ साली आलेल्या ‘दिल्ली सिक्स’ या राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर आता हे दोघे ‘ऑल इज वेल’मध्ये एकत्र दिसणार आहेत. तऱ्हेवाईक बाप आणि त्याने केलेल्या उचापती निस्तरण्याचे काम करणारा मुलगा असे काहीसे स्वरूप या चित्रपटाचे असावे असे ट्रेलरवरून समजते. ‘ओह माय गॉड’प्रमाणेच या चित्रपटाद्वारेही महत्त्वाचा प्रश्न आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न उमेश शुक्ला यांनी केला आहे, असेही मानले जाते. ‘ब्रदर्स’ आणि ‘ऑल इज वेल’ हे दोन्ही चित्रपट आशय-विषयदृष्टय़ा वेगळे असून ‘स्टार व्हॅल्यू’मुळे यशस्वी ठरू शकतील असे मानायला हरकत नाही.
सुनील नांदगावकर