राणीबागेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या एका सुंदर संदर्भ ग्रंथाविषयी…

राणीबाग अर्थात वीर जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, पूर्वाश्रमातील व्हिक्टोरिया गार्डन या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान १८६२ साली जनतेसाठी खुले करण्यात आले. नंतर १८९० साली त्यास प्राणी संग्रहालय जोडले गेले. ज्यामुळं उद्यानाच्या वैभवात भर पडली. एकूण ५३ एकर भूप्रदेशावर पसरलेल्या या उद्यानात अनेक जातीच्या वनस्पतींद्वारे एक समृद्ध अधिवास लाभल्याने अनेक पक्षी, कीटक आणि छोटय़ा सस्तन प्राण्यांना आसरा लाभला आहे.
प्रस्तुत पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी मुंबईतील तीन गैरसरकारी संस्थांनी स्वीकारली- बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज आणि नव्याने स्थापन झालेल्या सेव्ह राणीबाग बॉटनिकल गार्डन फाऊंडेशन यांस अर्थसहाय्य जमनालाल बजाज फाऊंडेशन, फिरोजशा गोदरेज फाऊंडेशन आणि टाटा रिअल्टी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी केले आणि संपादनाची बाजू हुतोक्षी रुस्तम फ्राम आणि शुभदा निखार्गे यांनी सांभाळली आहे.
हे पुस्तक राणीबागेच्या १५०व्या वर्धापन वर्षांचे औचित्य साधून २०१२ साली प्रसिद्ध झालेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे.
राणीच्या बागेला बृहन्मुंबई वारसा अधिनियमावली अंतर्गत १९९५ साली २ब दर्जाचे नामांकन प्राप्त झाले आहे.
प्रस्तावनेत शहरातील मोकळ्या जागा आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर बघता मुंबई शहर जागतिक तुलनेत आणि किमान अपेक्षा यांत खूपच मागे आहे. एवढे असूनही जुन्या पिढीतील मुंबईकर आणि उत्तम श्रेणीचे ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या दूरदृष्टी आणि सामाजिक बांधीलकीच्या जाणिवांमुळं प्रस्तुत बागेची स्थापना झाली. हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेल्या बॉटनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बेचे स्थलांतर १९६० साली भायखळा या ठिकाणी झाले. कारण दक्षिण मुंबई येथील वास्तव्य असलेल्या साहेबांसाठी भायखळा हे मध्यवर्ती ठिकाण ठरले. उपनगरे नेहमीच मुंबईच्या बाहेर आहेत असा समज होता.
उद्यानाची विभागणी साधारण २/३ वनस्पती उद्यान आणि १/३ प्राणीसंग्रहालय अशी आहे. प्रामुख्याने राणीबाग वनस्पती उद्यान आहे या गोष्टीचा पाठपुरावा सेव्ह राणीबाग बॉटनिकल गार्डनच्या लढय़ादरम्यान पुन्हा एकदा चर्चेत आला. प्राणिसंग्रहालय योग्य ठिकाणी उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसे बघितल्यास ही सूचना काही नवीन नाही. २० वर्षांपूर्वी विज्ञान संस्था मुंबईचे माजी संचालक, राणीबाग झू कमिटीवर असतानाही प्राणी संग्रहालय नैसर्गिक अधिवासाच्या सान्निध्यात असावे अशी सूचना करण्यात आली होती. त्यावेळी गोरेगाव पूर्व येथील आरेचा परिसर डोळ्यांसमोर होता.
प्रस्तुत पुस्तकात लेखकांनी राणीबागेसंबंधी आपआपल्या अनुभवांचे कथन केले आहे. त्यामुळे राणीबागेचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यास मदत झाली आहे.
हरित परंपरेची सम्राज्ञी- बिट्टू सहगल यांनी लिहिलेल्या या लेखात प्रामुख्याने प्राण्यांसंबंधी लिखाण करण्यात आले आहे. मौजेसाठी येणारे पर्यटक हे प्राण्यांच्या मुळावर आले आहेत. प्राण्यांसाठी अयोग्य व अपुऱ्या जागेसंबंधी या लेखात खंत व्यक्त करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालय स्थापनेचे आणि पूर्वी शिकार करण्याच्या मानसिकतेशी काय घेणे देणे? लेखकाला नेमके काय सांगायचे आहे? खरं तर अपुरा अधिवास आणि त्यामुळं प्राण्यांवर होणारे परिणाम ही नकारात्मक बाबही शिक्षणाच्या दृष्टीने एक चांगली संधी म्हणायला हरकत नाही. यातूनच योग्य अधिवासाची महती सांगता येऊ शकते. प्राणी संग्रहालयाची आवश्यकता कधीच कमी होऊ शकत नाही. कारण प्रत्यक्षात निसर्गात एक तर मोठे प्राणी दिसणे दुर्लभ. जवळून बघायचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांच्या अभ्यासाविषयी तर बोलूच नका. याची लेखकालाही चांगलीच जाणीव आहे. प्राणी संग्रहालयाची आवश्यकता नाही, असा काहीसा सूर लेखातून अधोरेखित होत आहे असे जाणवले.
निसर्गाचा ठेवा मुंबईचा वारसा – मरियम ठोसल यांच्या या लेखात राणीबागेच्या स्थापनेपासूनचा सविस्तर इतिहास नमूद करण्यात आला आहे. पाश्चात्त्य लोकांनी त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचा गोषवारा त्यांच्या दुर्मीळ छायाचित्रांसह घेण्यात आला आहे. स्थापनेच्या काळातील उद्देश, शिवडी ते भायखळा स्थलांतर, उद्यानाचा जुना आराखडा आणि नियोजनासंबंधी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींचे आणि उद्यानातील महत्त्वपूर्ण वास्तूंची छायाचित्रे दिल्याने लेख चांगलाच माहितीपूर्ण झाला आहे. शेवटचा परिच्छेद मात्र कार्यकत्यांच्या भूमिकेतून लिहिला आहे.
निसर्ग आणि वास्तुकला – विकास दिलावरी हे लेखक वास्तुकला विशारद, संवर्धन या विषयात निष्णात असल्याने अतिशय नेटक्या स्वरूपात राणी बागेतील स्थापत्यकला, शिल्पकला यांची चांगली मांडणी झाली आहे. जोडीस निवडलेली छायाचित्रे लेखाची शोभा वाढवतात. कन्झरवेटरीचा उल्लेख प्रामुख्याने करावासा वाटतो. कारण हा एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे संपूर्ण वाचल्याने खेद एकाच गोष्टीचा वाटतो, की राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांपर्यंत हे सर्व पोहचते का? तसा प्रयत्नही होताना दिसत नाही. मार्गदर्शकांची उणीव त्यामागचे प्रमुख कारण आहे. राणीबाग म्हणजे शिल्लक असलेले प्राणी बघणे, मौजमजा करणे, जमल्यास एखाद-दुसऱ्या झाडाकडे बघणे इतकेच भेट देणाऱ्यांना माहिती असते. शेवटच्या परिच्छेदात लेखकाने केलेली कळकळीची सूचना नगरवासीयांपर्यंत कशी पोहचणार हा कळीचा मुद्दा आहे.
अवर्णनीय वनसंपदा- मार्सेलीन आर. अलमेडा यांचा हा प्रस्तुत लेख राणीबाग १५० वर्षे या पुस्तकाचा गाभा म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. लेखकाचे राणीच्या बागेशी जुने नाते आहे, लेखक वनस्पतीतज्ज्ञ आहे. व्यासंगी आहे. राणीबाग वनस्पतीशास्त्राच्या, विशेष करून वर्गीकरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी जणू एक जिवंत प्रयोगशाळाच आहे.
प्रत्येक वनस्पतीला योग्य न्याय देण्यासाठी लेखकाने लेखांचे तीन भागात विभाजन केले आहे- देशी वृक्ष, विदेशी वृक्ष आणि वेली व झुडपे.
पहिल्या भागात अनेक देशी वृक्षांबद्दल माहिती देताना वृक्षांची शास्त्रीय नावं कशी आणि कोणी दिलीत, जुने व दुर्मीळ आहेत का, याचे विवेचन केले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प असलेला तामण, तिवराच्या प्रजातीमधील महाराष्ट्रात आढळणारा एकमेव वृक्ष अर्थात सुंदरी, तुळतुळीत पानांचा उंडी वृक्ष. विविध प्रकारचे वड, विशेष उल्लेखनीय म्हणजे बागेत असलेला कृष्णवड त्यासंबंधीच्या आख्यायिका हे विस्ताराने नमूद करण्यात आले आहे. सीता अशोक व त्यासंबंधी दंतकथा, आदिवासींसाठी महत्त्वपूर्ण असलेला मोहवृक्ष, सुवासिक फुलांचा सदाहरित बकुल, छोटेखानी वृक्ष नागकेसर, कोवळ्या पोपटी पानांचा करंज, गुलाबी पानांचा कुसूम आणि बेहडा, लालभडक फुलांचा कौशी. उपयोगी वृक्ष मोठा करमळ, औषधी वृक्षात अर्जुन, आवळा, शिवण उपयोगासहित देण्यात आले आहे. ‘मुंबई सुगरण’ जो प्रदेशनिष्ठ वृक्ष आहे त्याचे
राणीच्या बागेत असणे विशेष उल्लेखनीय आहे. यापैकी काहींची छायाचित्रेही देण्यात आली आहेत.
दुसऱ्या भागात ‘अतिथी देवो भव’ ही उक्ती सार्थ करत बाहेरून आलेल्या अनेक वृक्षांना राणीबागेत स्थान मिळाले. ते कसे आले. मुळात कोठून आले? हे वृक्ष अनेक वर्षांपूर्वी आले, भारतीय मातीत रूळले आणि त्यांची नैसर्गिक वाढ पण होत आहे. अपवाद म्हणून उर्वशी आणि क्लीनोव्हिया याचा उल्लेख करण्यात आला आहे. कारण या वृक्षांची नैसर्गिक वाढ होताना दिसत नाही, पण प्रयत्नांती करता येते. अतिथी देवो भवो असे म्हणत असताना विदेशी वृक्षांचा स्थानिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो. दीडशे ते दोनशे वर्षांपासून या भूमीत स्थायिक झालेल्या वृक्षांस विदेशी का म्हणावे व नाकारावे. देशी वृक्षांना प्राधान्य देण्याबाबत कोणाचेही दुमत नसावे.
उपयुक्त, असामान्य, भव्य अशा काही वृक्षांचा उल्लेख त्यांचा सुंदर छायाचित्रासह करण्यात आला आहे. बावबॉब किंवा गोरखचिंचेचा जाड-जूड वृक्ष, अतिशय मोहक शेंदरी फुलांच्या तुऱ्यांनी शोभून दिसणारा एकमेव, अद्वितीय ठेंगणा-ठुसका उर्वशी. मुंबईत फक्त तीनच ठिकाणी बघायला मिळतो. मोठय़ा छत्रीसारखा विस्तार असलेला पर्जन्यवृक्ष. पर्णसंभाराखाली केशरी फुलांचे गुच्छ लपविणारा ब्राउनीया मुंबईत दुर्मीळ असणारा ऑस्ट्रेलियन चेस्टनह, लिगनम विटे, फिश पायझन, कलाबाश, खोडावर फुलं आणि फळ येणारा कैलासपती आणि कोको. भव्य पण मऊ खोडाचा कानुपुट वृक्ष. ऑइल पाम, बॉटल पाम, मुंबईत फक्त राणीच्या बागेत दिसणारा लेमन सेंटेडगय एक निलगिरीचा प्रकार. याच्या पानास पर्णाभ म्हणण्यात आले आहे. त्यासंबंधी अभ्यास होणे गरजेचे वाटते. संरक्षितेत वाढणारे सायकस, तबल्यासारखी फळं दिसणारा गुस्थाव्हिया अशा वृक्षांची माहिती छायाचित्रासहित देण्यात आली आहे. छायाचित्रे खूपच विलोभनीय आहेत. तिसऱ्या भागात काही अनोखी झुडपं आणि वेलींचा समावेश करण्यात आला आहे. पॅरट्स बीकची भव्य वेल. जेव्हा फुलते तेव्हा तिची लोबंकळणारी पिवळी फुलं मोहक दिसतात. गुलाबी पुष्प गुच्छानी, बहरलेला लसूणवेल, मोठय़ा हिरव्यागार पानाचा आणि मोठी निळी किंवा पांढऱ्या फुलांचा थनबार्जिया, दिवसातून रंग बदलणारा ब्रुमफेलसीया. तुतारीवजा फुलांचा ब्युमोनशिया आणि जपानीज गार्डनमधील परगोलावर स्थिरावलेला क्लाईबिंग ओलिएडंर बागेची शोभा वाढवित आहे. झुडपांमध्ये उल्लेखनीय सदाहरित गुलाबी फुलांचा रॉव्हेनिया, पानाच्या टोकास काटेरी असलेला जॅक्विनीया, मुसांडा. विलायती मेंदी, रोडेलेनशिया उल्लेखनीय असून सचित्र देण्यात आली आहे. सरतेशेवटी लेखकाने उद्यान परिसरात एक हरबेरियम आणि पुस्तकालय असावे अशी सूचना केली आहे ती योग्य आहे. किंबहुना कुठल्याही बॉटेनिकल गार्डनचा तो अविभाज्य अंश आहे.
रंगमंचामागील नाटय़ – केटी बंगाली यांच्या प्रस्तुत लेखात राणीच्या बागेतील गर्द झाडी, ढोल्या तयार झालेले मोठाले वृक्ष. अधूनमधून दिसणाऱ्या पाणथळ जागा. अशा वैविध्यपूर्ण अधिवासाने मूळ आढळणारं जैववैविध्य याचे सुंदर वर्णन आहे. भाषांतरकाराने प्राण्यांच्या सवयी आणि गुणवैशिष्टय़ांचा उपयोग करून प्राण्यांची माहिती देताना वापरलेल्या शीर्षकामुळं लेखास एक वेगळेपणा आला आहे. वटवाघळे, मुंगूस यांसारखे सस्तन प्राणी, रंगबिरंगी फुलपाखरे, विविध आकार आणि प्रकारांचे पक्षी यांचे अस्तित्व बागेची शोभा वाढवतात. पाणकोंबडी, बगळा, ऋतूप्रमाणे दिसणारे कीटक यांची आकर्षण छायाचित्रे या लेखाची जमेची बाजू आहे. शहराच्या मध्यावर असलेली राणीबाग, गोंगाटमयी वातावरणात असूनही तेथील हरित पट्टा जैवविविधतेसाठी एक पूरक अधिवास म्हणून ओळखला जातो. ही एक समाधानाची गोष्ट आहे.
उद्यानाच्या कालातीत आठवणी- फिरोजा गोदरेज यांचा लेख म्हणजे लहानपणी वडीलधारी आप्तांसोबत राणीच्या बागेतील भेटींच्या आठवणीवजा लेख आहे. जुन्या आठवणी लेखकास भारावणाऱ्या आणि आनंददायी वाटतात. संरक्षकगृहाचा मोठा लाकडी पिंजरा, लाड संग्रहालयातील विविध ठेवे, घारापुरी येथून आणलेला पाषाणाचा हत्ती हे सर्व आनंद देणारे आहे. पूर्वीची प्रदूषणाचा मागमूस नसलेली राणीची बाग आनंद देऊन जात असे आणि सद्य कमी प्रमाणातील वनस्पती आणि विशेषकरून प्राण्यांची दैन्यावस्था क्लेश देणारी आहे.
तरीही बालकांसाठी निसर्ग शिक्षण, प्राणी आणि वनस्पतींची ओळख करून देणारी जणू एक शाळाच आहे. असे हे उद्यान पुढच्या पिढीसाठी जपायला हवे. ही कळकळ लेखातून जाणवते.
लोकोधामाचा चिरंतन वारसा- हुतोक्षी रुस्तमफ्राम, शुभदा निखार्गे यांच्या या प्रस्तुत लेखात पुनश्च एकदा स्थापनेपासूनचा इतिहास, त्यासाठी काही वर्तमानपत्रांचे दाखले देऊन जास्त विस्ताराने मांडण्यात आला आहे. पूर्वी राणीच्या बागेस भेट देण्यासाठी शुल्क नव्हते. बाग सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहात असे. काही विशेष कार्यक्रमांसाठी, प्रामुख्याने चांदण्या रात्री बाग दहा वाजेपर्यंत खुली असे. पुष्परचना आणि पुष्पप्रदर्शन भरविणे एक भाग असे तो आजतगायत सुरू आहे. राणीच्या बागेला भेट देणाऱ्याची रोजची आणि सुट्टीच्या दिवशीची संख्या देण्यात आली आहे. यापैकी किती लोक राणीबागेस बॉटनीकल गार्डन म्हणून भेट देतात? वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आणि अल्प प्रमाणातील निसर्गप्रेमी वगळता हा आकडा नगण्य आहे. वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकांनी उद्यानाला आणि त्याच्या उपयोगितेला वाखाणल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सेव्ह राणीबाग बॉटनीकल गार्डन कमिटीने राणीच्या बागेच्या अस्तित्वासाठी दिलेला लढा आणि मिळवलेल्या यशाबद्दल उल्लेख शेवटी करण्यात आला आहे.
सेव्ह राणी बाग संघर्ष-
लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई शहर जगातील कमी खुल्या जागा असणारे शहर आहे आणि या पाश्र्वभूमीवर राणीबागेसारख्या उद्यानाचे महत्त्व लक्षात येते.
३२१३ वृक्ष, १४९ कुळांमधील ८५३ जातीच्या वनस्पती आणि इतर जैवविविधता खरोखरच लक्षणीय आहे. उद्यान टिकून राहण्यासाठी दिलेल्या लढय़ाचे विवेचन हुतोक्षी व शुभदा यांच्या या लेखात करण्यात आले आहे. लढय़ासाठी लागणारे जुने पुरावे, दस्तावेज, नकाशे आणि लिखाणाचा समावेश करण्यात आला आहे. दृक्श्राव्य माध्यमातून शाळा-कॉलेजातून जनजागरण करण्यात आले. कोर्ट-कचेरीही करावी लागली. प्रसिद्धीमाध्यमांनी या कार्यास मदत केली. पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचीही लढय़ास मदत मिळाली.
वारसादर्जा असलेल्या वनस्पती उद्यानाचे भौगोलिक स्थानच महत्त्वाचे आहे, ते कसे कळू शकले नाही.
प्राणी संग्रहालयाची गरज असल्यास तर ते इतरत्र कोठेही उभारावे या युक्तिवादास सर्वानी पाठिंबा दर्शविला. प्राणी संग्रहालयाच्या गरजेचा मुद्दा उपस्थित करून मात्र लेखकांनी त्या संकल्पनेला छेद दिल्यासारखे जाणवले.
पुस्तकाची मांडणी आणि छपाई सुरेख आहे. योग्य ठिकाणी घातलेल्या छायाचित्रांनी लेखांची शोभा द्विगुणित झाली आहे. प्रत्येकाच्या, प्रामुख्याने शाळा-कॉलेजच्या ग्रंथालयात अवर्जून असावे, असे हे पुस्तक.
राणीबाग १५० वर्षे
संपादक : हुतोक्षी रुस्तमफ्राम, शुभदा निखार्गे,
प्रकाशक : बीएनएचएस, नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ ट्रीज आणि सेव्ह राणीबाग बॉटनीकल गार्डन फाऊंडेशन.
पृष्ठसंख्या : १६०
मूल्य : रु. १८००/-