आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला घाबरून न जाता सकारात्मक विचार करून जर तुम्ही त्याला सामोरे गेलात तर त्यातून नेहमी चांगल्याच गोष्टी घडतात, किंबहुना त्या सकारात्मकतेतून तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या सहवासात असणाऱ्यांचेही जीवन समाधानी बनवता, हेच झरीनाच्या संघर्षकथेचे सार म्हणता येईल.

झरीना लाकडावाला, उज्जैनसारख्या छोटय़ा शहरात दाऊदी बोहरा या जमातीत जन्मलेली मुलगी. पन्नासच्या दशकात जिथे मुलींना शिकवले तर शिकवले, नाही तर नाही, अशी स्थिती असताना झरीनाने त्या काळात आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले. आठवीत असतानाच तिची सगाई आदिल बनातवाला या तरुणाशी होते. ती केवळ १३ वर्षांची आणि आदिल २१ वर्षांचे. अर्थात त्या काळच्या रितीरिवाजाला धरूनच. वाहत्या पाण्यात आपणही वाहत राहायचं आणि असेल त्या परिस्थितीत सुख मानायचं असंच जगणाऱ्या झरीनाला पुढील शिक्षण देण्यासाठी तिचे वडील म्हणजेच भाई मोठय़ा प्रयासाने तयार होतात. त्या मिळालेल्या संधीचा ती पुरेपूर वापर करत आपला सर्वागीण विकास करत पदवीपर्यंत शिक्षण घेते. तिचे शिक्षण सुरू असतानाच तिचे लग्न होते. त्या दरम्यान तिच्या सासरचा, बनातवाला यांच्या श्रीमंतीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झालेली असते. उबदार कुटुंबात जन्माला येऊन खूप श्रीमंतीत नसली तरी सुखवस्तू म्हणता येईल असे जीवन जगलेली, सगाईनंतर अत्यंत श्रीमंत कुटुंबाची सून झालेली झरीना लग्न होऊन सासरी जाईपर्यंत सगळेच फासे उलटे फिरलेले असतात. सासरचा पोकळ वासा आणि वाटणीमुळे माहेरची झालेली वाताहत यामुळे तिला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. .. आणि लग्नानंतर राजा-राणीचा सुखाचा संसार सुरू झाला. असा तिच्या कथेचा शेवट न होता प्रारंभ होतो तिच्या जगण्यासाठीच्या, अस्तित्वासाठीच्या लढय़ाला. स्वाभिमानाने जगण्यासाठी ती एक वर्षांच्या मुलीला घेऊन उज्जनमधून मुंबईला येते. पाचमजली हवेलीत राहणारी झरीना वेळप्रसंगी अंबरनाथ, कुल्र्याच्या झोपडपट्टीतही संसार मांडते. मुंबईत मानाने जगण्यासाठी आणि आपल्या मुलीला सनालाही मानाने वाढवण्यासाठी तिला आत्मनिर्भर बनवून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र कष्ट करते. तिचा ठिगळ जोडल्यासारखा संसार, तिच्या संघर्षांला तिच्या वडिलांची मिळालेली साथ, तिच्या संघर्षांत भेटलेली अनेक माणसे, त्यांच्या स्वभावाचे पैलू अशा अनेक गोष्टी या कथेत आहेत. झरीनाची कथा संपते तेव्हा आपल्यालाही एक समाधान मिळते ते झरीनाला तिच्या कष्टाचे फळ मिळते तेव्हा..
शोभा बोंद्रे यांनी ‘एक मुठ्ठी आसमाँ’मध्ये मांडलेली झरीनाची कथा ही सामान्य माणसाची कथा. फ्लॅशबॅक पद्धतीने ती आपल्यासमोर उलगडते. त्या कथेतील प्रसंग आपल्याही जीवनात घडणारे. तिथे दिसणारे मानवी स्वभावाचे कंगोरे आपल्यालाही जाणवलेले. म्हणूनच तिचा संघर्ष वाचताना आपण गुंगून जातो. अनेक प्रसंगांना आपणही सामोरे गेलेलो असतो. तिच्या कथेत आहे ती प्रचंड सकारात्मकता. आपल्या मुलीकडे पाहून जगण्याची असोशी. अन्यथा राजमहालातून झोपडीत येणाऱ्यांचे जीवन एकतर भूतकाळातल्या आठवणींमध्येच रमून जाते, नाहीतर खोटी प्रतिष्ठा सांभाळण्यात जाते. वर्तमानातला जगण्याचा ताण असह्य़ होऊन ती माणसं निराशेच्याच गर्तेत गुरफटली जातात. संघर्ष करायचा राहून जातो किंवा त्यांच्यात ती शक्तीच उरत नाही. झरीनाचे तसे नाही, ती सातत्याने संघर्ष करते पण त्यात कुठेही परिस्थितीला दोष देताना आढळत नाही. तर आहे त्या त्या घडीला आपल्यापेक्षा हलाखीत जगणाऱ्यांचे आयुष्य डोळ्यासमोर ठेवून जगते.
तिच्या या संघर्षांत बरेचदा तिला तिच्या आप्तांच्या विक्षिप्तपणाचाही अनुभव येतो. त्यातून ती कोलमडून जाते, मात्र हार मानत नाही.
तिलाही मुसलमान असल्यामुळे धर्मभेदाचे चटके सहन करावे लागतात. अगदी शालेय जीवनात आणि मुंबईला आल्यावरही. मात्र कडवट न होता ती आपल्या मुलीला सनाला सर्व धर्माचा आदरच करायला शिकवते. जसे तिला तिच्या आईने म्हणजे हुस्साबेनने शिकवलेले असते तसेच. एवढेच नव्हे तर स्वतला आणि सनाला अंधश्रद्धेपासूनही दूर ठेवते. तिने धर्म, परंपरा, रूढी यांच्यावर केलेले भाष्य विचार करायला लावणारे आहेच पण तिची सर्वधर्म समभाव ही विचारसरणी त्यामागचे समृद्ध विचार, विवेकशील वृत्ती आणि संस्कार यांचे दर्शन घडते. ती एका ठिकाणी म्हणते, सर्व धर्माची शिकवण ही माणसाच्या भल्याकरता असते, त्याच्या चांगल्यापणाला खतपाणी घालणारीच असते. तुम्ही वाईट वागा, वाईट आचरण करा, असा कुठलाही धर्म सांगत नाही. तिच्या याच विचारांमुळे ती तिच्या पतीचा आदिलचा तिरस्कार करत नाही तर त्याच्या वागण्यामागची परिस्थिती समजून घेते. तिचा विश्वास असतो तो प्रयत्नांवर, मेहनतीवर आणि सर्वात म्हणजे संयमावर.
तुम्हाला इथे झटपट काहीच मिळणार नाही, पण प्रयत्न केले, मेहनत घेतली त्यामागे जात-पात, धर्म, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद, मर्यादा पाळल्या नाही तर तर यश तुमच्या मागे येतेच या एकाच विश्वासावर ती संघर्ष करत राहते. शोभा बोंद्रे यांनी ही कथा लिहिताना वाचकांची उत्कंठा कायम राहील यांची काळजी घेतली आहे.
झरीनाच्या या कथेत तिच्या संघर्षांबरोबरच दाऊदी बोहरा समाजाच्या चालीरीती, खाद्य संस्कृती, परंपरा यांची सखोल माहिती आपल्याला होते.
एक मुठ्ठी आसमाँ
लेखिका – शोभा बोंद्रे
रोहन प्रकाशन
पृष्ठे – २५२, मूल्य रु. २४०
रेश्मा भुजबळ