कधी कधी काही पुस्तकं त्यातले लेख तुम्हाला आत्मशोध घ्यायला, तुमच्यातले स्वत्व शोधायला मदत करतात. तुमचे विचार पुन:पुन्हा घासून-पुसून लख्ख करतात. जुन्या आठवणींना उजाळा देत त्याचे संदर्भ, त्यामागची भूमिका, आपले विचार यांची साखळी पुन्हा जोडली जाते आणि आपण वर्तमानातलं आभाळ पेलायला तयार होतो. पद्मजा फाटक (मजेत) याचं ‘रत्नांचं झाड’ वाचताना असाच अनुभव घेता येतो. 

पद्मजा फाटक यांचे हे पुस्तक त्यांनी ‘मिळून साऱ्या जणी’, ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक तसेच ‘हंस’, ‘अक्षर’, ‘एकता’, पद्मगंधा’ आणि ‘माहेर’ या दिवाळी मासिकांतून लिहिलेल्या लेखांची गुंफण आहे. ‘गोपद्म’ या त्यांच्या संकल्पनांपर लेखात हा आपला शेवटचा ललित लेखसंग्रह असल्याचं त्या सांगतात आणि ते खरेच ठरले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे त्याच्या लिखाणातून मिळणारी वैचारिक रत्नांची माळ आपल्याला पुन्हा गुंफता येणार नसल्याची रुखरुख लागते.
आपल्या लेखांतून, लिखाणातून वास्तव मग ते आपल्याच बाबतीत, आपल्या आप्तस्वकीयांच्या बाबतीत असलेलं का असेना ते मांडण्याचं धाडस फारच कमी जण करतात. आपल्या चुका आपले विचार यांच्यावर अनुभवांचे संस्कार करून पुन:पुन्हा बदलण्याचं आणि ते प्रांजळपणे सांगण्याचं, मांडण्याचं धाडसही कमी जणांजवळ असतं. ते पद्मजा फाटक यांच्याकडे होतं. रत्नांचं झाड, लक्ष्मीपूजन, गोष्टींचा तास यातून याचा प्रत्यय वारंवार येतो.
आपल्या फजितीलाही विनोदाची झालर चढवून हसवण्याचं कर्तब त्यांच्या लेखांमध्ये आहे. एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून त्या महिलांच्या स्वभावाचे, विचारांचे जे विश्लेषण आपल्या लेखातून मांडतात ते वाचताना आपल्या विचारपद्धतीवर चढलेली परंपरेची काजळी दूर होते. त्यांना फार पूर्वीपासून अस्वस्थ करणारे प्रश्न त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन (म्हणजे मनुष्य वाचन) पाहिले की त्यांच्या निरीक्षण शक्तीला, प्रत्येक माणसातून त्याची सकारात्मकता, गुण, दृष्टिकोन शोधण्याच्या कलेला आपसूकच दाद दिली जाते.
अगदी ‘स्त्रियांना आयुष्यात हवं असतं तरी काय’ यात त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधील मेहतरणीचे दिलेले उदाहरणही यासाठी पुरेसे ठरते.
स्त्री-स्वातंत्र्यावर भाष्य करताना त्या म्हणतात, ‘स्त्री-स्वातंत्र्य कशासाठी? तर स्त्री म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही स्वत:च्या क्षमतांचा विकास साधण्यासाठी, आत्मविकासासाठी लागणारी एक अमुक इतकी नैसर्गिक अवस्था म्हणून एक स्त्री-माणूस म्हणून जीवनाचा समर्थपणे आस्वाद घेण्यासाठी. पुरुषांना आपली लायकी सिद्ध करून स्वातंत्र्यासाठी अर्ज करायला लागतो का? आत्मविकासाचा परवाना मिळवायला लागतो का?’ त्यांच्या या प्रश्नातच त्यांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार, त्यामागची ठाम भूमिका लक्षात येते. या ललित लेखात त्यांनी सांगितलेली चॉसरची कहाणी (जी सध्या वॉट्सअ‍ॅपवर मोठय़ा प्रमाणात फिरत आहे), आणि त्यातील ‘द वुमन वॉण्टस् टू कंट्रोल हर ओन डेस्टिनी’ म्हणजेच स्त्रियांच्या ठिकाणी स्वत:च्या आयुष्याला स्वत: घडवायची स्वत:च्या आयुष्याचं स्वत: नियंत्रण करायची इच्छा सर्वात प्रबळ असते, हे सांगून तशी स्त्री शोधण्याचा प्रयास त्या करतात. त्यांनी प्रत्यक्षात अशी स्त्री पाहिलेली नाही पण ती त्यांना तुकडय़ा-तुकडय़ांतून दिसते असं त्या सांगतात. यातून त्यांचं स्त्रीच्या जाणिवांचा सातत्यानं शोध घेणारं व्यक्तिमत्त्व आपल्यापुढे येतं. त्यांनी एक स्त्री म्हणून कुटुंबसंस्था, त्यातलं स्त्री-जीवन, स्त्रियांचे मनोविश्व याचा जवळून अनुभव घेतला असल्यामुळे स्त्रीच्या प्रत्येक नात्याचा पदर, त्यामागचे मनोविश्लेषण त्या अगदी नेमकेपणाने करतात. म्हणूनच स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पनेबाबत अट्टहास न करता त्या संकल्पनेला – ‘जिचं तिनेच ते आत्मशोधाच्या वाटेने जाताना हुडकायचं आहे, वेळोवेळी तपासत राहायचं आहे,’ असा सल्लावजा विचार त्या रुजवतात.
त्यांनी केलेल्या समृद्ध वाचनाचा, त्यातील संदर्भाचा वापर त्यांच्या लिखाणात असल्याने आपल्यालाही वेगवेगळ्या साहित्यिकांची, विचारवंतांची त्यांच्या लिखाणाची त्यातील अत्युत्तम अशा विचारांची माहिती होते. पद्मजा फाटक बालसंगोपनावरही भाष्य करतात, कधी प्रत्यक्षपणे तर कधी लेखातील माहितीतून. गोष्टीचा तास, छदामीचं झाड यातून ते आपल्यासमोर येतं. त्यातून त्यांना बालमन, त्यांचे विचार, त्यांचे खेळ, त्यांची भाषा, समज याचे अप्रुप आहे याचा प्रत्यय येतो.
पद्मजा फाटक यांचे लिखाण हा कल्पनाविलास नाही. त्यातील कुठलीच पात्रे ही त्यांनी निर्माण केलेली नाहीत. त्यांच्या आयुष्यभराच्या प्रवासात, त्यांच्या आजारपणात, त्यांच्या निरीक्षणपर संशोधनात त्यांना ती गवसली. त्यांनी त्यांची नावे किंवा त्यांचे स्थळकाल बदलले एवढेच. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक ललितात कसलाच अभिनिवेश नाही, ते वास्तव आणि तरीही जीवनमूल्य सांगणारे आहे. त्याच्या लिखाणात विषयाचे नावीन्य आणि विविधता तर आहेच पण पदोपदी त्यांची विनोदबुद्धी, प्रगल्भ दृष्टिकोनही जाणवतो. विनोद असला तरी बोचरा उपहास नाही. त्यामुळेच त्यांचे लिखाण जवळचे, अगदी जवळचे आणि अर्थपूर्ण, आशावादी वाटते. त्याच्या या पुस्तकाला डॉ. नीलिमा गुंडी यांनी लिहिलेली प्रस्तावनाही त्यांचे एकंदरच सर्व लिखाण, साहित्य मानवी मनाला स्पर्श करणारे कसे आहे याचेच दाखले देणारे आहे.
रत्नांचं झाड
लेखिका – पद्मजा फाटक (मजेत)
रोहन प्रकाशन,
पृष्ठे-२०८, मूल्य रु. २००.
रेश्मा भुजबळ

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र