एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने आपल्या ‘खूबसूरती’चं ‘राज’ सांगण्याचे प्रसंग जाहिरातींमधून आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहेत, पण त्या शेवटी जाहिराती असतात आणि त्यातलं ते सगळं खोटं असतं, हेदेखील आपण जाणून असतो. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपणहून आपल्या सौंदर्याचं, स्टाइलचं रहस्य प्रांजळपणाने सांगितलं, तर ऐकायची उत्सुकता नक्कीच असेल. करिना कपूरसारखं स्टाइलिश आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व स्वत:च्या सौंदर्याचं रहस्य सांगणार असेल आणि त्याबरोबर स्टाइल आणि फॅशनचा मंत्रही देणार असेल, तर उत्सुकता आणखी वाढणार यात शंका नाही. सिने आणि फॅशन पत्रकार रोशेल पिंटो हिच्या सहकार्याने करिना कपूरनं लिहिलेल्या ‘फॅशन गाईड’ पुस्तकातून या उत्सुकतेचं बऱ्यापैकी समाधान होतं. 

करिना तिच्या अभिनयासोबतच (किंबहुना अभिनयापेक्षा जास्त) तिच्या स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. एका चित्रपटासाठी तिनं वजन कमी केलं, तेव्हा देशभर ‘साइझ झीरो’ची लाट आली होती. कुठल्याही चित्रपटातलं तिचं ‘दिसणं’ नक्कीच लक्षवेधी ठरतं. त्यामुळे अशा फॅशन सेन्स चांगला असणाऱ्या, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाविषयी जागरूक असणाऱ्या अभिनेत्रीकडून स्टाइलसंदर्भात चार गोष्टी येतात, तेव्हा त्या निश्चितच खास असतात.
करिनाचे चाहत्यांनाच नाही, तर फॅशन आणि आधुनिक जीवनशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेकींना करिनाचं हे ‘फॅशन गाईड’ एक दिशा नक्कीच देऊ शकतं. रुपेरी पडद्यावरची फॅशन आणि सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातली फॅशन यातला फरक जाणून तो करिनाने उदाहरणांसकट नमूद केला आहे. कपडे, दागिने, चपला, बूट, पर्स, स्कार्फ, मेक-अप या सगळ्यांतून एक स्टाइल स्टेटमेंट करता येतं. त्यासाठी याची खरेदी कशी विचारपूर्वक करावी, हे करिना स्वत:च्या उदाहरणांसह सांगते. त्याबरोबरच चारचौघांत उठून दिसायला लागतो तो करेक्ट अॅटिटय़ूड हेदेखील प्रकर्षांनं नमूद करते. कपडे, हेअरस्टाइल, रेड कार्पेट लुक या सगळ्याबद्दल करिना या पुस्तकातून सविस्तर सल्ले देते. भटकायला जाताना कसं राहावं, ऑफिसमध्येही नीटनेटकं कसं राहावं, अगदी काय खावं, कधी, कसं इथपासून तिच्या टिप्स सुरू होतात. त्यामध्ये मग व्यायाम, योगासनं, शॉपिंग, भटकंती, कामाच्या वेळा, समारंभांना जाणं, अगदी प्रेमात पडणं आणि आपल्या प्रियासाठी भेटवस्तू खरेदीपर्यंतच्या टिप्स ती देते आणि प्रत्येक वेळी तिच्या आयुष्यातल्या घडामोडींचे दाखले देत प्रत्येक प्रकरण पुढे जातं. साइझ झीरो कसं साध्य केलं, ते योग्य आहे का, या गोष्टीही करिनाने पुस्तकातून विस्ताराने सांगितल्या आहेत.
संपन्न पंजाबी घरातली, कायम प्रकाशझोतात असणाऱ्या कुटुंबातली एक तरुण मुलगी करिनाच्या लिखाणातून जाणवत राहते. करिनाला आपल्याभोवतीच्या वलयाची पुरती जाणीव आहे आणि लोकांना कशाबद्दल उत्सुकता असू शकते, याचीही जाण आहे. म्हणूनच पुस्तकाची रंजकता वाढवण्यासाठी तिने तिच्या खासगी आयुष्यातली काही अप्रकाशित छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट केली आहेत. म्हणजे अशी वलयांकित नटी, त्यातून कपूर खानदानाची बेटी स्वत:च्या दिसण्याबद्दल, राहण्याबाबत काय विचार करते, एवढंच नाही तर ती नेमकी काय खाते, कुठून खरेदी करते, कुठे जाते याचा अंदाज यातून येऊ शकतो.
या विषयावरची, अशा प्रकारची पुस्तकं मराठीमध्ये फार अभावाने दिसतात. त्यामुळे याचा अनुवाद प्रसिद्ध होणं ही स्वागतार्ह गोष्ट आहेच; पण त्यानिमित्ताने मराठीत अस्पृश्य असलेले काही विषयही पुस्तकात आले असं म्हणता येईल. सौंदर्यविषयक सल्ले देताना करिना अगदी बारकाव्यानिशी सगळं सांगते. त्यातून अंतर्वस्त्रांच्या योग्य निवडीसारखा विषयही तिने वगळलेला नाही, हे विशेष. याचा विचार आणि याबाबतचा सल्ला किती रास्त आहे, हे याविषयी अज्ञानी असणाऱ्या अनेक मुलींना मनोमन पटेल.
लग्नासाठीची तयारी कशी कराल, प्रवासाला जाताना काय घालाल, कशी तयारी कराल, पार्टीसाठी मेक-अप कसा हवा, हेअर कट कसा हवा वगैरे गोष्टींबद्दल मार्गदर्शन ती करते. त्याबरोबर काही गमतीदार अनुभव, जोडीदाराबद्दलची परखड मतं यातून तिच्यासारख्या अभिनेत्रीची लाइफस्टाइलदेखील अधोरेखित होत जाते. आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी त्याला काय भेट द्यावी, हा बहुतेक सगळ्या स्त्रियांना पडणारा प्रश्नही करिना तिच्या पद्धतीनं सोडवते. पुरुषांना काय आवडत नाही, यावर तिचं स्पष्ट आणि मार्मिक भाष्य मनोमन पटून जातं.
केवळ बाह्य़सौंदर्यावर नाही, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या, हे सांगताना करिना तिच्या योगगुरूच्या सल्ल्यांचा उल्लेख करते. तिची डाएटिशिअन ऋजुता दिवेकर हिने नेमून दिलेला डाएट चार्टही करिना पुस्तकातून शेअर करते. मेक-अप केलेला चेहरा म्हणजेच मुखवटा सुंदर असून चालणार नाही. सौंदर्य आतून आलेलं असलं पाहिजे, यावर पुस्तकाच्या पहिल्या पानापासून करीना ठाम राहते. जाता जाता तिच्या लेखी स्टाइलची व्याख्याही सांगून जाते. ती म्हणजे ‘स्टाइल म्हणजे फक्त महाग डिझायनर कपडे किंवा दागिने घालणे नाही. स्टाइल म्हणजे दुसऱ्याची नक्कल न करता तुम्ही जसे आहात तसा आत्मविश्वासाने स्वीकार करणे.’ करिनाचा हाच आत्मविश्वास तिच्या व्यक्तिमत्त्वातून दिसतो आणि या पुस्तकातूनही व्यक्त होतो. फॅशन गाईड
करिना कपूर, रोशेल पिंटो
अनुवाद – अश्विनी लाटकर
प्रकाशक – अमेय प्रकाशन
पृष्ठे- २८०, मूल्य- ३९५ रु.
अरुंधती जोशी