lp29पालकत्व ही आपल्या मुलांकडून मिळालेली देणगीच असते; पण त्याचबरोबर ती एक जबाबदारीदेखील असते. तसं पाहिलं तर सोप्पी आणि नीट निभावली नाही, तर मग बिकट वाट बनते; पण त्यासाठी कोणतेही पूर्वशिक्षण, पूर्वतयारी नसते, तर ती तुमची तुम्हालाच शिकायची असते. प्रत्येकालाच आपल्या मुलानं चांगलं शिकावं, चांगला नागरिक व्हावं आणि आयुष्यात यशस्वी व्हावं असं वाटत असतं; पण त्यासाठी आपल्या मुलांचं संगोपन कसं करतो हे महत्त्वाचं आहे. हेच नेमकं या पुस्तकातून मांडलं आहे. मूल जन्माला आल्यापासून ते पौगंडावस्थेत पोहोचेपर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यावरील जबाबदारी पेलण्याचे प्रत्यक्ष उपाय सांगणारं आणि पालकांच्या असंख्य प्रश्नांचं निरसन करणारं हे पुस्तक पालकांसाठी वरदानच म्हणावं लागेल.
सुजाण संगोपन
लेखक : डॉ. उमेश शर्मा,
अनुवाद : डॉ. अरुण मांडे, रोहन प्रकाशन, पृष्ठसंख्या : २५६, मूल्य : रु. २००/-.

lp30चार देश भटकल्यावर चार नवी ठिकाणं जशी कळतात, तसेच चार नवी माणसंदेखील कळतात. मग ते त्या देशातील उच्चभ्रू असोत, की अतिधनाढय़ व्यावसायिक असोत, की एखाद्या गावात भेटलेला साधा गरीब खेडूत असो. लेखकाला स्वत:च्या व्यवसायानिमित्ताने घडलेल्या जगभ्रमंतीच्या दरम्यान अशाच शेकडो लोकांशी परिचय झाला. त्यांचं जीवन त्यानं एका वेगळ्याच चष्म्यातून अनुभवलं आणि तेच रंजक पद्धतीनं कागदावर उतरवलं. त्यातील काही अनुभव गमतीशीर आहेत, तर काही मनाला चटका लावून जाणारे, तर काही अंतर्मुख करायला लावणारे. त्यामुळेच हे लेखन म्हणजे केवळ प्रवासवर्णन न राहता त्या त्या समाजाचा आरसाच बनून गेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला तत्कालीन राजकीय आणि सामाजिक बदलाची डूबदेखील मिळाली आहे.
एक होता मित्र.., लेखक : उमेश कदम, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या : १९४, मूल्य : रु. २००/-

lp31मनोरुग्णांचं विचित्र विश्व म्हणावं असंच काहीसं या पुस्तकाचं स्वरूप आहे. विचित्र विश्व असलं तरी त्याला कारुण्याची, रुग्णाच्या पीडितांच्या व्यथेची, मानवाच्या वर्तणुकीविषयी असणारं असाधारण आव्हान या पुस्तकातील मनोविकारग्रस्तांच्या कथांमधून उलगडतं. अर्थातच या आव्हानात्मकतेतून मनोविश्लेषणाच्या शास्त्रातदेखील अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत हे यातील उदाहरणांवरून जाणवते. जगभरातील ३२ कथांमधून जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिकांनी उलगडणारं हे विश्व विचित्र असलं तरी सत्य आहे.
द ममी अ‍ॅट द डायनिंग रुम टेबलट
लेखक : जेफरी ए. कोट्लर, जोन कार्लस्न, अनुवाद : वसु भारद्वाज, साकेत प्रकाशन, पृष्ठसंख्या : ३७६, मूल्य : रु. ३५०/-

lp32पत्रकारितेत कायमच एक थ्रिल दडलेलं असतं. त्यातच गुन्हे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराच्या आयुष्यात तर कधी ना कधी असे थरारक अनुभव येतात, की त्याचं आयुष्यच बदलून जातं. अबीर गांगुली या बंगाली तरुण पत्रकाराच्या आयुष्यात अशीच एक घटना घडते. पोलीस निष्पाप व्यक्तीस दहशतवादी ठरवून मारतात आणि त्या घटनेची उकल करण्यात त्याचं आयुष्यच बदलून जातं. माणसामाणसांतील फरक, समाजातील वेगवेगळ्या गटांतील फरक, गुन्हेगारीचं आणि पोलिसांचं विचित्र विश्व या सर्वाचा तो कसा वेध घेतो हे अतिशय रंजक पद्धतीनं या छोटेखानी कादंबरीत मांडण्यात आलं आहे. त्या दरम्यान त्याला भेटलेल्या अनोख्या सान्चोची ही कथा.
माझा मित्र सान्चो, लेखक : अमित वर्मा, अनुवाद : शिल्पा दातार जोशी, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या : १५६, मूल्य : रु. १६०/-.

lp37मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांना घडवणं आणि आयुष्यात यशस्वी करणं ही अनेक पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. पण आपल्यावरची पालकत्वाची जबाबदारी त्यांना मनापासून निभवायची असते. पण नोकरी व्यवसाय सांभाळून पालकत्व निभवायचं आणि तेदेखील हसतखेळत तर ते एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळेच पालकत्वाचं शिवधनुष्य लीलया कसे पेलावे हे सांगणारे एक पुस्तक नव्या पिढीतली पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पालकत्वाचा बाऊ न करता आपल्या मुलांची निकोप वाढ करायची असेल तर हे विक्रमी खपाचे पुस्तक वाचावे लागेल.
हसत-खेळत बालसंगोपन
लेखक : डॉ. ख्रिस्तोफर ग्रीन,
अनुवाद : मंजुषा आमडेकर,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठसंख्या : ४३०, मूल्य : रु. ३४०/-.

lp35आज आपल्या आयुष्यात पावलोपावली विज्ञान भरून राहिले आहे. किंबहुना विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय आपले जगणेच अवघड होईल की काय अशी आजची परिस्थिती आहे. पण अनेक वेळा हे विज्ञान आपल्याला नीटसे उलगडत नाही. नोकरी मिळावी म्हणून अभ्यासल्या जाणाऱ्या विज्ञानाच्या पलीकडे जायची आपली तयारी नसते. एखाद्या गोष्टीबाबत उत्सुकता असलीच तर विज्ञानविषयक माहिती मिळवताना भाषेची अडचणदेखील जाणवते. त्यामुळेच सामान्य माणसालादेखील रोजच्या जगण्यातील महत्त्वाच्या घटनांमागील विज्ञानाचे आकलन व्हावे या उद्देशाने हे पुस्तक तयार झाले आहे. प्रत्येकाला माहीत हवे असे हे व्यवहार्य-उपयोगी विज्ञान वाचनीय आहे.
विज्ञानातील निवडक माहिती
प्रा. डॉ. पुरुषोत्तम जोशी,
साकेत प्रकाशन, रु. १२०/-, पृष्ठसंख्या १२८.

lp33अनेक पिढय़ा गेल्या तरी काही लोकांबद्दल जगात सर्वाच्याच मनात सदैव कुतूहलच राहणार आहे. त्यापैकी एक म्हणजे अ‍ॅडॉल्फ हिटलर. नाझी भस्मासुर म्हणून ओळखला जाणाऱ्या हिटलरबद्दल जगातील सर्वाच्याच मनात घृणा असली तरी हे रसायन नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची इच्छा असते. संपूर्ण जर्मनीला एका वेगळ्या ध्येयवादाने भारून टाकणारा आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारण झालेल्या हिटलरच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झाला आहे.
अ‍ॅडॉल्फ हिटलर
लेखक : रघुवीरसिंह राजपूत, साकेत प्रकाशन,
मूल्य : १०० रुपये, पृष्ठसंख्या : १२०.

lp38आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असणाऱ्या संगणकाची कार्यप्रणाली असणारे मायक्रोसॉफ्ट हे आपल्या सर्वाच्याच कार्यप्रणालीचीदेखील भाषा झाली आहे. जगातील बहुतांश संगणकांचा आधार असणाऱ्या या मायक्रोसॉफ्टचा निर्माता बिल गेट्स यांचा प्रवास हा थक्क करून सोडणारा आहे. कोणतीही व्यवसायाची पाश्र्वभूमी नसलेले बिल गेट्स यांचा संगणक युगातील हा धडाडीचा प्रवास मुळातून जाणून घेणं हा औत्सुक्याचा विषय आहे. हाच प्रवास या पुस्तकातून सोप्या शब्दांत उलगडतो.
संगणक युगाचा महानायक, बिल गेट्स : लेखक सुधीर आणि उत्कर्ष सेवेकर, साकेत प्रकाशन, मूल्य- रु. १५०, पृष्ठसंख्या- १५२.

lp34दहा हजार चौरस मैलांच्या त्या दलदलीत अनेक किमती ऐवज असणारे विमान कोसळून तब्बल सात वर्षे झालेली असतात. विमान कोसळल्याची जागा माहीत असणारी विमान मालकाची मुलगी पुन्हा एकदा ते विमान शोधायला कंबर कसून तय्यार होते. कारण कोसळलेल्या विमानातील संपत्ती तिला चर्चसाठी वापरायची असते. पण अनेकांना तीच संपत्ती वेगळ्या कारणांसाठी हवी असते आणि मग सुरू होते खुफ्रानच्या दलदलीतले एक थरारनाटय़.
द खुफ्रा रन – जॅक हिगिन्स
अनुवाद : स्नेहल जोशी, साकेत प्रकाशन, पृष्ठे : २०८, मूल्य : रु. २००/-

lp36न्यूयॉर्कमध्ये अचानक झालेला ब्लॅकआऊटच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या अनेक घटनांची एक छोटेखानी कादंबरी. हॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी एक धडपडणारी नटी, तिला घटस्फोट दिलेला तिचा नवरा, आयुष्यात आलेल्या एका कटू अनुभवामुळे तरुणांना जाळ्यात फसवून त्यांचा छळ करणारी दुसरी एक तरुणी, ब्लॅकआऊटच्या रात्रीचा फायदा उचलणारे भुरटे, चौकाचौकांत जमलेली तरुणाई, न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागातील एका रात्रीत घडणाऱ्या अनेक कथांची सांगड बेमालूमपणे एकमेकांत मिसळेल्या या पाठलाग कथेत अनुभवता येतात.
झ्ॉप्ड – कॅरॉल हिगिन्स क्लार्क
अनुवाद : जयंत गुणे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या- १३०, मूल्य- रु. १४०/-.
प्रतिनिधी