महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे द्रष्टे नेते, स्वतंत्र भारताच्या राजकीय जडणघडणीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. या महान व्यक्तिमत्त्वाची जडणघडण नेमकी कशी झाली, त्यांचे बालपण, त्यातून त्यांना आकार देणाऱ्या व्यक्ती, घटना, स्थळं याविषयीची उकल म्हणजे ऋणानुबंध होय.

लहानपणापासून आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, त्यांची छाप आपल्या मनावर कायम राहते. तसंच काही ठिकाणांचं होतं. त्यांच्याशी असलेलं नातं अगदी कायम कायमचं मनात घर करतं. ऋणानुबंध निर्माण करतात. आपलं मन जेव्हा भूतकाळात जातं, गतकाळच्या आठवणींमध्ये रमतं, त्या वेळी अशा व्यक्ती, ठिकाणं, प्रसंग त्यामागचे ऋणानुबंध मनाचा तळ ढवळून वरती उसळी घेतात. तेच ऋणानुबंध यशवंतरावजी यांनी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज यशवंतराव चव्हाण म्हटले की त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषयाचे चिंतनशील विचार डोळ्यांसमोर येतात. त्याविषयीचे लेख, त्यांचा अभ्यास, त्याविषयीचे चिंतन, त्यांची तळमळ यांची ओळख होते. ऋणानुबंध वाचताना यशवंतराव चव्हाण यांच्या यापेक्षाही वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत जाते. बालपणात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या समृद्ध संस्कारात वाढणारे यशवंतरावजी, त्याही काळात कराडसारख्या ठिकाणी चालणाऱ्या स्वातंत्र्य चळवळी, त्या वेळची त्यांची अस्वस्थता, चळवळी आणि त्यांचे नेतृत्व करणारे नेते, त्यांचे विचार यांचे बारकाईने वाचन, त्यांच्यावरील त्यांचे चिंतन याविषयीची माहिती ते ‘नियतीचा हात’ या प्रकरणात मांडतात. खरं तर ती माहिती म्हणण्यापेक्षा ते भूतकाळ आपल्यासमोर ठेवतात.
यशवंतरावजी सांगतात की, मी माझ्या आईच्या अवतीभवती वाढलो. त्यांच्या जडणघडणीत आईच्या कर्तृत्वाचा, तिने केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. यशवंतरावजींना शालेय जीवनात झालेल्या शिक्षेचा प्रसंग असो अथवा विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलावण्याचा प्रसंग. त्यांच्या मातेने कोणतेही अवडंबर न करता केलेले संस्कार त्यांच्या भविष्याच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे ठरले.
यशवंतरावजी यांनी हे आपले आत्मचरित्र नाही हे आपल्या मनोगतातच स्पष्ट केले आहे. हे आत्मचरित्र नसलं तरी त्या झिरपलेल्या आणि मनात घट्ट रुतून बसलेल्या आठवणी आहेत हे ‘कुलसुम दादी’सारख्या प्रकरणातून दिसून येते. यशवंतरावजींच्या आठवणी, संस्कार, त्यांना भावलेली व्यक्तिमत्त्वं अशी प्रकरणं जरी या पुस्तकात असली तरी वाचक त्यांत गुंतून जातो. यशवंतरावजींचे शब्द, शब्दांचे सामथ्र्य आणि सौंदर्य याची आपल्याला भुरळ पडत जाते. त्यांच्या चिंतनशील लेखातूनही त्यांचे विचार त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे, भाषेच्या सौंदर्यामुळे ते बोजड न ठरता आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हटलं की नकळत त्यांच्या लिखाणावर भाषणशैलीचा प्रभाव असावा असा आपला समज त्यांचे लिखाण खोटं ठरवतो. म्हणूनच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, बुद्धिवंत मुत्सद्दी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ते अगदी शिवाजी महाराजांपर्यंत लिहिलेले लेख वाचकाला गुंतवून ठेवतात.
‘केल्याने देशाटन’मध्ये केलेली प्रवासवर्णनं आपल्याही नकळत आपल्याला कृष्णाकाठपासून परदेशाची सफर घडवून आणतात. त्यांच्या प्रत्येक लेखात जाणवत राहते त्यांचे लिखाण, त्यांची शैली, त्यांचे शब्द आणि त्यातून होणारा अचूक परिणाम. त्यांची साहित्याची जाण वेळोवेळी आपल्याला अचंबित करत राहते. एवढे असूनही यशवंतरावजी आपल्या मनोगतात नम्रपणे आपल्याला एक रसिक वाचकच म्हणवून घेतात. ‘नवनिर्मितीचे सर्जनशाली कार्य जसे शब्द करतात, तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळवण्याचे संहारक सामथ्र्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे, तर मी ज्या क्षेत्रात गेली जवळजवळ पन्नास वर्षे क्रियाशील आहे, त्या राजकारणाचेही प्रमुख माध्यम शब्दच आहे. त्या अर्थाने साहित्यिक आणि राजकारणी शब्दबंधू आहेत. शब्दांचे आणि आमचे हे साहचर्य व सौहार्द जुने आहे. साहित्याच्या क्षेत्राशी काही नाते सांगावयाचे असेल, तर एवढेच आहे.’ अशा शब्दांत यशवंतरावजी आपल्या भावना व्यक्त करतात.
‘ऋणानुबंध’मधून महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुण पिढीला व्हावी या हेतूने यशवंतरावजींच्याच लेखणीतून साकार झालेले हे पुस्तक पुनप्र्रकाशित करण्याचा रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी घेतलेला निर्णय त्यामुळे नक्कीच स्तुत्य ठरतो.
ऋणानुबंध
लेखक यशवंतराव चव्हाण
रोहन प्रकाशन
पृष्ठे २४८ किंमत १९५ रुपये
रेश्मा भुजबळ