News Flash

दखल : चंदेरी दुनियेची अनोखी मुशाफीरी

चित्रपट जगताचं आकर्षण नाही अशी व्यक्ती मिळणं अवघडच म्हणावं लागेल. त्यामुळे केवळ चित्रपट पाहून कोणाचंच समाधान होत नाही. त्याला चित्रपटाबरोबरच या चंदेरी दुनियेत डोकावयाची प्रबळ

| April 17, 2015 01:08 am

lp61चंदेरी दुनियेची अनोखी मुशाफीरी

चित्रपट जगताचं आकर्षण नाही अशी व्यक्ती मिळणं अवघडच म्हणावं लागेल. त्यामुळे केवळ चित्रपट पाहून कोणाचंच समाधान होत नाही. त्याला चित्रपटाबरोबरच या चंदेरी दुनियेत डोकावयाची प्रबळ इच्छा असते. अर्थातच मग मनोरंजनाच्या क्षेत्रात पत्रकारिता करणाऱ्यांना या सेटवरून त्या सेटवर भटकताना इतके भन्नाट अनुभव येतात की विचारूच नका. गेली २०-२५ वर्षे सिनेपत्रकारितेत असणाऱ्या दिलीप ठाकूरांची चंदेरी अनुभवाची पोतडी अशीच शिगोशीग भरली आहे. वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून बातम्या, लेख लिहिल्यावरदेखील अनेक किस्से शिल्लक राहतातच. मग चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते अगदी चित्रपट पडण्यापर्यंतच्या शेकडो गोष्टी दिसतात. चित्रपटाच्या ब्रेकिंग न्यूज, दिग्दर्शकांचे तऱ्हेवाईक नमुने, चित्रपटातली लग्नं, पब्लिसिटी अशा असंख्य किश्शांनी त्यांचं हे पुस्तक नटलं आहे. सिनेमाच्या गोष्टीपलीकडच्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टी वाचणंदेखील नक्कीच रंजक असं आहे.
बडिशेप, लेखक : दिलीप ठाकूर, अनघा प्रकाशन, पृष्ठसंख्या १९०, मूल्य रु. १९०/-

lp62स्रियांचा राजकीय ठसा
राजकारण हा स्त्रियांचा प्रांत नाही, असं वारंवार म्हटलं जातं. किंबहुना राजकारणातल्या चिखलात स्त्रियांनी उतरू नयेच, असाच सल्ला सर्वत्र दिला जातो; पण स्त्रियांनी स्वकर्तृत्वाने राजकारणातदेखील आपला ठसा उमटविला आहे. हे केवळ तोंडदेखलं प्रतिनिधित्व नाही, तर महिलांनी जगभरातील ५० देशांचं थेट पंतप्रधानपददेखील भूषविलं आहे. या पन्नास देशांत केवळ प्रगत देशांचाच समावेश आहे असं नाही, तर ज्या देशात स्त्रियांना योग्य असं स्थान नाही अशा देशांतदेखील महिला पंतप्रधानांचं अस्तित्व दिसून येतं. अर्थातच या महिलांच्या धडाडीच्या सत्यकथा प्रेरणादायी तर आहेतच, पण जागतिक पटावर स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकायचा प्रयत्न या पुस्तकातून होताना दिसतो. पंधरा वर्षांपासून ते अगदी दोन दिवसांपर्यंत कार्यकाळ गाजविणाऱ्या निवडक ५० महिला पंतप्रधानांचं विश्व जाणून घेण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरू शकतं.
देशोदेशीच्या पंतप्रधान, लेखिका : शिल्पा बेळे, परममित्र पब्लिकेशन्स, पृष्ठसंख्या १४८, मूल्य रु. १५०/-

lp63महामंदीचा लेखाजोखा
‘महामंदी’ या शब्दातच धडकी भरविण्याची ताकद आहे, किंबहुना त्यामुळेच २००७-०८ मध्ये सुरू झालेल्या जागतिक मंदीची कृष्णछाया आजही अनेकांना घाबरवून सोडताना दिसते; पण आपल्याकडे असणारी अर्थनिरक्षरता इतकी गंभीर आहे की; अनेकांना या महामंदीचा नेमका अर्थ उलगडत नाही. मग काही झालं की मंदीचं कारण पुढं करायचं हाच पायंडा पडतो. सुरुवातीला आपल्या देशास कसलाही धोका नाही असं जरी आपल्या सरकारनं छातीठोकपणे प्रतिपादन केलं असलं तरी त्यातील फोलपणा कालांतराने जाणवला आहे. असो, पण महामंदीचा आजवरचा इतिहास पाहिला तर मंदी संपवणं शक्य असल्याचंच दिसून येतं. मंदी संपवता येणार नाही हा खोटा प्रचार मोडून काढण्यासाठी लेखकाने नोबेल पारितोषकविजेत्या अर्थतज्ज्ञांच्या भाष्याचं सोप्या मराठीत विवेचन या पुस्तकात केलं आहे. अर्थविषयक पुस्तकांची मराठीतली उणीव काही प्रमाणात तरी यामुळे भरून निघू शकेल.
महामंदीतून सुटका, लेखक : अतुल कहाते, साकेत प्रकाशन, पृष्ठसंख्या १५२, मूल्य – रु. १५०/-

lp64वेध अथांगतेचा
समुद्र म्हटला की अथांग हा शब्द आपसूकच त्यामागे जोडला जातो, किंबहुना अथांग शब्दाची परिपूर्णताच सागरात होताना दिसून येते. अर्थात अशा सागराचा वेध घ्यायचा म्हटलं तर ते काम कठीणच, पण लेखकानं पाठय़वृत्तीचा लाभ घेत सलग दोन महिने या अथांगाचा थांग शोधण्यात घालवले. सागराच्या पोटात दडलेल्या यच्चयावत घटकांचा वेध घेत हे पुस्तक सिद्ध झाले आहे. सागराच्या अथांगतेनं भूशास्त्र, हवामानशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक आंतरशास्त्रीय विज्ञानशाखांना सामावून घेतलं आहे. सागराचं कुतूहल शमविणारं हे पुस्तक नवोदितांसाठी उपयोगी असं झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ सागराची व्याप्ती न मांडता सद्य:स्थितीत या बदलत्या वातावरणाचा, प्रदूषणाचा सागरावर होणारा परिणाम टिपत बदलतं दर्यावरणदेखील मांडलं आहे आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शोध सागराचा, लेखक : शैलेश माळोदे, परममित्र पब्लिकेशन्स, पृष्ठसंख्या २०८, मूल्य रु. २५०/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 1:08 am

Web Title: book review 37
Next Stories
1 मुलाखत : ‘टाइमपास टू’ नंतर टीव्ही..
2 तारे डान्स फ्लोअरवरचे!
3 पॅगोडांच्या देशात…
Just Now!
X