एडिनबर्ग येथील ‘वैद्यकीय कायदा’ विषयाचे प्राध्यापक असलेल्या अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ या स्कॉटिश लेखकाची ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ हे याच मालिकेतील नीला चांदोरकर यांनी अनुवाद केलेलं दुसरं पुस्तक होय. जगभरातील चाळीस भाषांमध्ये अनुवाद झालेली ही मालिका, आपल्याला आफ्रिका खंडातील बोट्स्वाना या जगावेगळय़ा देशात नेऊन तेथील जीवनाचं दर्शन घडवते. वेगळय़ा देशातील वेगवेगळी पात्रे आणि कथांमधील विषय वैविध्यामुळे ही कथामालिका वाचकांना विशेष आवडते.

गुप्तहेरगिरीविषयी काहीही व्यावसायिक ज्ञान नसलेली प्रेश्यस रामोत्स्वे तिच्यातील अंगभूत हुशारीच्या जोरावर अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवते. तिच्यातील अंत:प्रेरणा लोकांना बोलतं करण्याची कला आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती या स्वभावामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या क्लिष्ट केसेस सोडवण्यास मदत होते.
या पुस्तकातील कथानक दक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना या भागात घडते. एक विशीतील अमेरिकन तरुण अचानकपणे नाहीसा होतो. अनेक प्रकारे शोध घेऊनही त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नाही. शेवटी हताश होऊन पोलीस ती केस बंद करतात. परंतु त्याची आई मिसेस कार्टिन ही खूप अस्वस्थ असते. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यापासून ती सतत माहिती काढून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. परंतु काहीच हाताला लागत नाही. त्याचा मृतदेह बघेपर्यंत तो मेला आहे या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवायला तिचे मन तयार नसते. खरंतर ही घटना दहा वर्षांपूर्वी घडलेली असते. पण केवळ मुलगा मायकल हा अचानक नाहीसा झाला म्हणजेच तो मेलाच असेल असे कसे काय समजावे? हा एकच प्रश्न तिला सतत सतावत असतो. म्हणून या घटनेची उकल करण्याची विनंती मिसेस कार्टिन प्रेश्यस रामोत्स्वेकडे करते. दहा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचे धागेदोरे शोधून काढणे ही खरोखर अशक्यप्राय गोष्ट असते.
तरी पण एका आईचे दु:ख ऐकून प्रेश्यस रामोत्स्वे यांचे काळीज हेलावते आणि भिडस्तपणाच्या स्वभावापायी मिसेस कार्टिनना काहीतरी मदत करायला हवी असे वाटून प्रेश्यस भावनेच्या भरात केस स्वीकारते.
जे.एल.बी. मातेकोनी या गॅरेज मालकाशी प्रेश्यस रामोत्वेचे लग्न ठरते. मातेकोनींच्या घरतील दुष्ट प्रवृत्तीची लबाड स्वार्थी कामवाली बाई लॉरेन्स पेको हीला हे लग्न होऊ द्यायचे नसते. कारण या लग्नानंतर कामवालीची गरज नसल्यामुळे तिला हे काम सोडून दुसरीकडे जावे लागणार असते. त्याचबरोबर मातेकोनींच्या गैरहजेरीत मित्रांबरोबर चालणारी तिची ऐय्याशी बंद पडणार असते. यासाठी खूप विचारांती ही पेको बाई प्रेश्यसविरुद्ध एक कट रचते. परंतु या कटात ती ज्या मित्राची मदत घेते तो तिचा डाव तिच्यावरच उलटवतो. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची हवा खावी लागते. अशा प्रकारे मातेकोनी आणि प्रेश्यस यांच्यातील पेकोबाईचा अडसर दूर होतो.
अनेक ठिकाणी चौकशी करत, त्या त्या गावी जाऊन बराच प्रवास करत एक एक दुवा शोधून दुसऱ्या दुव्यापर्यंत पोचत, प्रेश्यस रामोत्स्वे मायकेलच्या मृत्यूचा छडा लावते. ती त्याच्या घराला भेट देते तेव्हा तिला एक जुना फोटो तिथे सापडतो. त्या फोटोच्या आधारे घटनेची उकल करत, फोटोतील माणसापर्यंत पोचते. त्याला शाब्दिक धमकी देऊन त्याच्याकडून गुन्हा वदवून घेते. त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा घटनास्थळाला भेट देते. त्यानंतर त्याने सांगितलेल्या कथेतील दुसऱ्या स्त्रीला ही प्रत्यक्ष जाऊन भेटते. तिच्याकडूनही त्याने सांगितल्या प्रकाराची खात्री करून घेते.
केवळ इथपर्यंत प्रकरणाचा छडा लागला म्हणून केस सोडून न देता माणुसकीच्या नात्याने त्या स्त्रीला मिसेस कार्टिनला भेटण्यास येण्याची विनंती करते. त्या स्त्रीचे नाव कार्ला असते. तिचे मायकेल वर प्रेम असते व तिला मायकेलपासून एक मुलगा झाला असतो. सरतेशेवटी मिसेस कार्टिन व कार्ला यांची प्रेश्यसच्या ऑफिसमध्ये भेट होते. कार्ला मायकेलच्या बाबतीत घडलेली घटना सविस्तर रूपाने मिसेस कार्टिनना सांगते. आता आपल्या मुलाच्या मृत्यूवर त्यांचा विश्वास बसतो. पण त्याचबरोबर छोटासा मायकेल जो त्यांचा नातू असतो, त्याला पाहून आनंदही होतो.
प्रेश्यस तिची अशील असलेल्या मिसेस कार्टिनला देण्यासाठी एका गरीब बाईकडून एक वेतकामाची टोपली विकत घेते. या टोपलीत ‘जिराफांच्या अश्रूंचे’ रहस्य दडले आहे. ज्याच्यामुळे पुस्तकाला ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ असे नाव दिले गेले आहे. हे नाव देण्यामागे काय कल्पना आहे व त्यामध्ये काय भाव आहे हे वाचकांनी स्वत:च वाचावे.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मनुष्य स्वभावातील साधम्र्य आढळते. त्यामुळेच या कथेतील नावे गावे प्रांत वेगवेगळे असले तरी या वेगळेपणाच्या भिंती आपोआप गळून पडतात व ही गोष्ट कधी आपली होऊन जाते ते कळतच नाही.
अतिशय शिताफीने उलगडलेली या कथेतील रहस्य खरतर प्रत्यक्ष वाचण्यात जास्त मजा आहे. प्रेश्यसची या कथेतील वाटचाल वाचकाला शेवटपर्यंत कथानकाशी खिळवून ठेवते.

टिअर्स ऑफ द जिराफ
मूळ लेखक :
अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ
अनुवाद : नीला चांदोरकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या : २१६
मूल्य : २२०/- रुपये