बच्चेकंपनीला आता मोबाइल गेम्स पटकन समजतात, आणि आई-बाबांच्या, मम्मी-डॅडीच्या मोबाइलमधील आपले स्वत:चे फोटो शोधून काढण्याइतकी आजची बच्चेकंपनी टेकसॅव्ही नक्कीच आहे. परंतु, तरीसुद्धा लहान मुलामुलींना प्राणी-पक्षी-झाडाच्या पानांचे रंग, फुलांचे विविधरंग, खारूताईपासून ते फुलपाखरांपर्यंत आणि वाघ-सिंहापासून ते ससा यापर्यंत अनेक प्राणी-पक्ष्यांविषयी प्रचंड कुतूहल असते. सुप्रसिद्ध इसापनीतीच्या कथा, त्यात सांगितलेल्या प्राण्यांच्या गोष्टी आणि गोष्टीला असलेले तात्पर्य यातून नकळत सुसंस्कार करण्याची अफलातून पद्धत हे आता मागे पडले आहे. काळ बदलला आहे. परंतु, तरीसुद्धा कवी दिलीप साळगांवकर यांनी लिहिलेल्या ‘जंगल मॉल’ या बालकवितासंग्रहात इसापनीतीमधील प्राणी-पक्ष्यांचे एकमेकांशी माणसांसारखे गोष्टीरूप संवाद साधण्याच्या फॉर्ममध्ये बालकविता मांडल्या आहेत. साध्या सोप्या परंतु आजच्या बच्चेकंपनीलाही सहज आपल्याशा करणाऱ्या कविता यात आहेत. आजच्या बच्चेकंपनीने गाढव, कोल्हा, जिराफ, डुक्कर, अस्वल, लांडगा, गरुड हे प्राणी व पक्षी पाहिले नसले तरी कवितेच्या रूपात साळगांवकर यांनी हे प्राणी-पक्षी दाखविले आहेत. उंदीरमामा, मनीमाऊ, घोडा, हत्ती, कुत्रा, माकड, पोपट, कावळा, चिमणी, आणि पुस्तकात किंवा गूगलवरच पाहायला मिळणारे वाघ-सिंह संवादरूपी कवितांमधून दाखविले आहेत. ‘एक होती मुंगी तिने वाजवली पुंगी’, ‘एक होता घोडा त्याने प्यायला सोडा’ अशा सोप्या शब्दांतून बालगोपाळांच्या ओठांवर हसू फुलविणाऱ्या कविता यात पानोपानी आहेत. थुई थुई नाचणारा मोर असेच वर्णन मुलांसमोर नेहमी केलेले आहे. त्यामुळे ‘मयुरेश नर्तनाशाळा’ या कवितेतून मोर अन्य प्राण्यांना नाच करायला शिकवितो अशी कल्पना मांडली आहे. ‘जंगल मॉल’ असे समर्पक शीर्षक देऊन कवीने आजच्या बच्चेकंपनीलाही आवडेल अशा तऱ्हेने कवितांची शब्दरचना केली असून त्याला उत्तम अशा चित्रांची जोड दिल्याने कवितासंग्रह निश्चितच चटकन-पटकन वाचून मुलांच्या आनंदात भर घालणारा झाला आहे. चित्रमय शब्दरचना आणि सुबक चित्रांची जोड हे या कवितासंग्रहाचे वैशिष्टय़ ठरले आहे.

जंगल मॉल
कवी दिलीप साळगांवकर
संवेदना प्रकाशन, नीता नीतीन हिरवे
पृष्ठसंख्या : ३२; मूल्य : रु. ६०/-.