आपल्याला तोराबोराच्या पर्वतराजींमध्ये गरुडांच्या साक्षीने मरण यावं असं ओसामा बिन लादेनला वाटत होतं. प्रत्यक्षात सहा वर्षे पाकिस्तानमधल्या अ‍ॅबटाबादमध्ये एका लहानशा घरात त्याला काढावी लागली. अमेरिकेने त्याला नेमकं शोधून कसं काढला याची कहाणी-

अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर झालेल्या विमानहल्ल्यानंतर जागतिक राजकारणाचे आयामच बदलले. तो अमेरिकेच्या गंडस्थळावरच केलेला हल्ला होता. जगाच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला निसर्गदत्त हक्क आहे, असं मानणाऱ्या अमेरिकेला इस्लामी जगातल्या जहाल मतवादी तरुणांनी दिलेलं ते उत्तर होतं. अमेरिकेची जागतिक राजकारणातली ढवळाढवळ बरोबर आहे का, या प्रश्नाचं उत्तर जसं नाही हेच येतं तसंच अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी असं काही करणं योग्य होतं का, याचं उत्तरही नाही असंच आहे. त्यानंतरची दहा वर्षे अमेरिका आपली सगळी ताकद पणाला लावून ओसामा बिन लादेनचा शोध घेत राहिली आणि लादेनही अमेरिकेला चकवून जीव खाऊन पळत राहिला. त्याचा ठावठिकाणा लागल्यापासून ते अमेरिकेने थेट पाकिस्तानात जाऊन त्याचा खात्मा करेपर्यंतच्या सगळ्या घडामोडींचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारं हे पुस्तक आहे. लादेनच्या शोधाची ही थरारक सत्यकथा डिस्कव्हरी चॅनेलवरूनही दाखवली गेली आणि अनेकांनी ती पाहिली; पण एखादी गोष्ट पाहणं आणि वाचणं यात अनुभवाचा जो फरक आहे तो या पुस्तकातून अनुभवायला मिळतो.

लेखक पीटर बर्गन यांनी लादेन आणि अल कायदा या विषयावर आजवर ‘होली वॉर, इंक’, ‘द लाँगेस्ट वॉर’ ही दोन पुस्तकं आणि आता ‘मॅन हंट’ हे त्यांचं तिसरं पुस्तक आहे. त्यांनी नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी आणि सीएनएनसाठी पत्रकारिता केली असून ते आता सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांनी १९९७ मध्ये पूर्व अफगाणिस्तानातल्या पर्वतांच्या परिसरात जाऊन ओसामा बिन लादेनची टीव्हीसाठी मुलाखतही घेतली होती. थोडक्यात सांगायचं तर, ते लादेनला प्रत्यक्ष भेटलेले पत्रकार आहेत. मार्च १९९७ मध्ये पीटर बर्गन अफगाणिस्तानात लादेनला भेटले. त्यांना असं वाटत होतं की, आता आपण एका आवेशपूर्ण जहाल क्रांतिकारकाला भेटणार आहोत. प्रत्यक्षात त्यांना भेटला तो एखाद्या सामान्य मुल्लाप्रमाणे दिसणारा, वागणारा लादेन; पण याच भेटीत, बर्गन यांच्या मुलाखतीत लादेनने कॅमेऱ्यासमोर अमेरिकेविरोधातलं आपलं युद्ध घोषित केलं. त्यानंतर चारच वर्षांनी सप्टेंबर २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर्सच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला.

लादेनच्या मृत्यूनंतर बर्गन यांनी पाकिस्तानला अ‍ॅबटाबादला भेट दिली. लादेनचं घर, कारवाई झाली ती सगळी ठिकाणं, लादेनची तिसऱ्या मजल्यावरची रूम या सगळ्याला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. लादेनच्या मृत्यूची तपासणी करणाऱ्या, त्याच्या बायकोमुलांशी बोलणाऱ्या पाकिस्तानी लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याशिवाय लादेनच्या शोधमोहिमेशी संबंधित व्हाइट हाऊस, सुरक्षा मंत्रालय, सीआयए, स्टेट डिपार्टमेंट, राष्ट्रीय दहशतवादविरोधी विभाग, राष्ट्रीय गुप्तहेर विभाग अशा सर्व विभागांतल्या जवळजवळ सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. लादेनच्या कंपाऊंडमध्ये हाती लागलेल्या सहा हजार कागदपत्रांपैकी काही कागदपत्रं व्हाइट हाऊसने त्यांना हाताळायला दिली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर लादेनच्या हालचाली आणि त्याच्या अ‍ॅबटाबादच्या घरापर्यंतचा सीआयए अधिकाऱ्यांनी घेतलेला माग या माहितीसाठी त्यांना विकिलिक्सने उघड केलेल्या ग्वान्तानामोबद्दलच्या गुप्त कागदपत्रांचा हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना खूप उपयोग झाला.

ओसामा बिन लादेन या माणसाबद्दल अमेरिकेला जेवढा दुस्वास आहे, तेवढंच सामान्य माणसाला कुतूहल. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात तसंच एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात दहशतवादाचा चेहरा म्हणून लादेन लोकांना परिचित आहे. जगात कुणी तरी, कुठे तरी आपल्या विरोधात उभं आहे आणि त्याचा सर्वशक्तिनिशी कायमचा नायनाट करून टाकणं हीच सहसा हॉलीवूड सिनेमांची थीम असते. ट्विन टॉवर्सवरच्या हल्ल्यांनी लादेनने हाच प्रत्यक्ष अनुभव अमेरिकेला दिला. त्यामुळेच अमेरिकेला हादरवणारा माणूस म्हणून सामान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. लादेनचा मार्ग चुकीचा असला तरी जगाच्या पोलीसगिरीचा मक्ता घेतल्याच्या थाटात वावरणाऱ्या अमेरिकेबद्दलही जगात नाराजी होतीच. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर लादेनचं पुढचं पाऊल, पुढचं उद्दिष्ट काय असू शकतं ही भीतीवजा शंकाही होती. सगळ्या दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत जाळ्याच्या निर्मितीच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या आपल्यासारख्या देशाला तर ती जास्तच होती. म्हणूनच अमेरिकेवरचा हल्ला झाला तेव्हा ती सगळी मोहीम लादेनने कशी आखली, कशी पार पाडली, तो अमेरिकेला सापडत नव्हता तेव्हा तो नेमका कुठे असेल, मुळात जिवंत असेल का आणि त्याचा खात्मा झाल्यानंतर अमेरिकेने त्याला कसं शोधलं, ही मोहीम कशी आखली, कशी प्रत्यक्षात आणली, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील, आहेत. त्या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक निदान तिसऱ्या टप्प्यातल्या अनेक प्रश्नांची माहिती देणारं आहे.

‘सुखद निवृत्ती’ या पहिल्याच प्रकरणात पीटर बर्गन यांनी अ‍ॅबटाबादमधलं लादेनचं घर, त्याचा तिथला निवास, त्याची बायकामुलं, त्याचं तिथलं रोजचं जीवन यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्याच्या सगळ्या सुशिक्षित, अगदी पीएच.डी.पर्यंत शिकलेल्या बायका, त्याची मुलं, त्याचं टीव्ही आणि रेडिओवर बातम्या पाहण्याचं व्यसन, त्याचं लिखाण-वाचन, त्याचा नैसर्गिक औषधांचा आग्रह, तोराबोरा पर्वतरांगांमध्ये सहकाऱ्यांबरोबर मोकळंढाकळं जगणारा आणि इथे अ‍ॅबटाबादमध्ये घरात अडकून पडलेला लादेन असा सगळा लादेन आपल्याला समजतो.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतरची परिस्थिती, त्यावरची लादेनची आणि त्याच्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया, अमेरिकेतली परिस्थिती, तिथल्या प्रशासकीय पातळीवरच्या प्रतिक्रिया, हालचाली, मुल्ला ओमरचं व्यक्तिमत्त्व, त्याची लादेनविषयीची भूमिका, अबू जंदालला तपास अधिकाऱ्यांनी बोलतं केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती अशा सगळ्या गोष्टी पुस्तकात तपशीलवार येतात. ओसामा बिन लादेनचा या हल्ल्यातल्या सहभाग नाकारणारे तालिबानी तोंडघशी पडतील म्हणून या हल्ल्यांबाबत ठोस भूमिका न घेणारा लादेन ते अल जजीराच्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेवरच्या हल्ल्याचं समर्थन करणारा लादेन असा लादेनचा प्रवास वाचायला मिळतो. लादेनला पकडण्यासाठी अमेरिकेने तालिबान्यांशीदेखील कशी हातमिळवणी करायचा प्रयत्न केला याचे तपशीलवार वर्णन वाचायला मिळतं.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने निकराने लादेनचा शोध सुरू केला. तेव्हा लादेन तोराबोराच्या पर्वतरांगांमध्ये पळून गेला. तिथल्या गुहांमध्ये राहून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेविरोधात लढायचं ठरवलं. तोराबोरा हे लादेनला तळहाताच्या रेषांसारखं माहीत होतं, कारण १९८७ मध्ये तिथून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रशियन फौजांविरोधातली जाजीची लढाई लढली होती. १९९६ मध्ये सुदानमधून हकालपट्टी झाल्यावरही तो आपल्या कुटुंबकबिल्यासह तोराबोरामधल्या मिलवा या खेडय़ात राहायला गेला. आताही तिथे जाणं हाच पर्याय त्याच्यासमोर होत्या. तोराबोराच्या अतिदुर्गम भागातून आपण लढा देऊ आणि एक दिवस रशियन फौजांनी माघार घेतली तसंच अमेरिकेचंही होईल असं त्याला वाटत होतं; पण तसं काहीच झालं नाही. अमेरिकेचा तुफानी बॉम्बहल्ला थोडय़ा थोडय़ा काळाने होत राहिला आणि अमेरिकेनेच अर्थसाहाय्य केलेले तीन अफगाणी सरदार आणि अल कायदा यांच्यातील चकमकी होत राहिल्या. अमेरिकेचा डेल्टा ग्रुप तिथे तळ टाकून होता. लादेन आणि त्याचे अनुयायी, तालिबान यांच्यातले रेडिओ संदेश पकडणं, त्यांचा अर्थ लावणं हे सगळं काम युद्धपातळीवर सुरू होतं. तोराबोरामध्ये राहणं अशक्य झाल्यावर अशा सगळ्या परिस्थितीतूनही लादेन आणि त्याच्या अंगरक्षकांच्या तुकडीने अमेरिकेच्या हातावर तुरी दिली. विशेष म्हणजे तोराबोराचं युद्धमैदान सोडून जाताना लादेनने आपल्या मुलांसाठी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती, त्यात म्हटलं होतं की, ‘मला जिहादची हाक आली तेव्हापासून मी तुमच्यासाठी फार थोडा वेळ देऊ शकलो याबद्दल मला माफ करा. मी फार कठीण रस्ता निवडला. त्यासाठी मला कष्ट, कटुता आणि दगाबाजी भोगावी लागली. मी तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही अल कायदाबरोबर काम करू नका.’ आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुश आणि त्यांचे सहकारी कितीही नाकारत असले तरी उपलब्ध कागदपत्रांवरून पीटर बर्गन यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर तीनच महिन्यांनी तोराबोरामध्ये त्याला जिवंत वा मृत पकडण्याची संधी अमेरिकेला मिळाली होती; पण लादेनने अमेरिकेवर मात केली आणि तिथून तो अलगद निसटला.

अमेरिकेवर हल्ला करण्यापूर्वी अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेचं स्वरूप पीटर बर्गन लिहितात त्याप्रमाणे एखाद्या कंपनीसारखं होतं. त्यात युद्धनियोजन, व्यापार, माध्यमसंपर्क, शेती अशा समित्या होत्या. त्यांचा एक मुख्य अधिकारी होता. काम करणाऱ्या लोकांना नियमित पगार दिला जायचा. नव्याने भरती होणाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण दिलं जायचं. प्रशिक्षणासाठी लोकांना अर्ज करावे लागत. काम करणाऱ्यांना वैद्यकीय लाभ मिळायचा. त्यांच्यासाठी विमा योजना होत्या. सुट्टीकाळात त्यांना भत्ते मिळायचे. प्रसंगी त्यांचं निलंबन केलं जायचं. या सगळ्यासाठी ३२ पानांचे पोटनियम होते. वेगवेगळ्या कामांसाठी चक्क व्हाऊचरवर पैसे दिले जायचे. काम नीट न केल्यास मेमो दिला जायचा. महागडं फॅक्स मशीन घेऊन पैसे उधळल्याबद्दल येमेनी अल कायद्याच्या एक सदस्याला अल् जवाहिरीने कानपिचक्या दिल्या होत्या. पीटर बर्गन लिहितात, अल कायदा ही जिहादला वाहून घेतलेली संघटना असली तरी अमेरिकेवरच्या हल्ल्यापूर्वी तिचं स्वरूप एखाद्या विमा कंपनीसारखंच होतं, फक्त ही विमा कंपनी जरा जास्तच शस्त्रसज्ज होती. अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर मात्र सगळी परिस्थिती कायमसाठी बदलली.

लादेन कुठे लपला असावा यासाठीचा अमेरिकी सुरक्षा यंत्रणांचा अभ्यास, त्यासाठीचे सिद्धांत, ते कसे मांडले गेले, कसे अभ्यासले गेले, लादेनचे वेगवेगळे पैलू कसे लक्षात आले गेले याचं तपशीलवार वर्णन पुस्तकात आहे. लादेनला पकडण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर सातत्याने माहिती मिळवली गेली. त्यासाठी सीआयएने अल कायदामध्ये आपली माणसं पेरायचा भरपूर प्रयत्नही केला; पण त्यात त्यांना यश आलं नाही. परत याचं कारण म्हणजे अल कायदाची रचना. तिथं साखळीतल्या प्रत्येक माणसाला त्याला जेवढी माहिती असणं आवश्यक आहे, तेवढीच माहिती दिली जात असे. त्याहून जास्त कुणालाच काहीही माहीत नसे.

लादेन पाकिस्तानात पळून गेला आहे, एवढय़ा निष्कर्षांवर अमेरिका आली होती; पण तो तिथं कसा राहतो आहे, कुणाच्याही डोळ्यात न येता तिथं राहण्यासाठी त्याला नेमकी कुणाची आणि कशी मदत होते आहे, लादेनला शेवटपर्यंत सर्व प्रकारची मदत करणारा कुवेती हा त्याचा विश्वासू माणूस, त्याचं कुटुंब हे अमेरिकेच्या बराच काळ डोळ्यात भरलंच नाही. त्याच्या हालचालींचं निरीक्षण, विश्लेषण, तो अ‍ॅबटाबादमध्ये लादेनलाच मदत करतो आहे या निष्कर्षांपर्यंत अमेरिकेने येणं याबाबत मात्र पुस्तकातून फारशी माहिती मिळत नाही. त्यानंतर मिळते ती थेट अमेरिकेच्या कारवाईचीच तपशीलवार माहिती, तीही मुळातून वाचावी अशीच आहे.

अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर लादेन हा एक दंतकथाच बनून गेला होता. आपल्याला तोराबोराच्या पर्वतांमध्ये वीरश्रीयुक्त मरण यावं, अशी त्याची इच्छा होती; पण तसं काही झालं नाही. सहा वर्षे दिवाभीताप्रमाणे काढल्यानंतर एका छोटय़ा खोलीत, अमेरिकी सैनिकांनी बायकामुलांसमोर त्याला गोळ्या घालून मारलं आणि त्याचा मृतदेह समुद्रात सोडण्यात आला. लादेनच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रांमधून आलेली सगळी माहिती अत्यंत तपशीलवार अशी आपल्याला वाचायला मिळते.

लेखकाने अफगाणिस्तान, पाकिस्तान तसंच अमेरिकी नेव्ही सीलच्या अ‍ॅबटाबादमधल्या कारवाईचे नकाशे, वेगवेगळे फोटो तसंच भरपूर संदर्भ पुस्तकात उपलब्ध करून दिले आहेत. पुस्तक वाचताना सतत हे लादेनच्या बाजूने लिहिलेलं पुस्तक आहे का, असा एक फील येत राहतो. तसं खरंच आहे का, हे वाचकांनी ठरवावं.
मॅन हंट : बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा – पीटर बर्गन
अनुवाद- रवि आमले; डायमंड पब्लिकेशन; पृष्ठे-३२२; मूल्य- रु. ३९५.