lp58नोकरीनिमित्ताने हाँगकाँगला असणाऱ्या धाकटय़ा मुलाला भेटायचं म्हणून अनेकदा जाण्याचा योग लेखिकेला आला. केवळ मुलाला भेटण्यासाठी न जाता त्यांनी हाँगकाँग धुंडाळायला सुरुवात केली आणि या पर्यटनाचा अनुभव त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. स्वंतत्रपणे हाँगकाँग फिरण्यातली मजा त्यांनी पुस्तकात टिपली आहे. हाँगकाँगमधील म्युझिअम, ऐतिहासिक ठिकाणं, पार्क, गार्डन, खाद्यभ्रमंती, डिस्ने लॅण्ड अशा अनेक ठिकाणांचा अनुभव पुस्तकात वेगवेगळ्या प्रकरणांमधून मांडला आहे. टायफून या चक्रीवादळाबाबतचा त्यांचा अनुभवही त्यांनी एका लेखात मांडला आहे. तिथला निसर्ग, राहणीमान यांचे विविध पैलू या पुस्तकातून उलगडतात. एखाद्याला एकटय़ाने जर भटकायचं असेल तर या पुस्तकातील माहितीचा नक्कीच फायदा होईल.
हाँगकाँग सफारी;
लेखिका : पद्मा कऱ्हाडे,
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन;
मूल्य : रु. १२०/-

lp60असा पाहावा महाराष्ट्र
साधारणपणे पठडीतल्या पर्यटन पुस्तकांमधून नेहमीच्याच आणि साहजिकच गर्दीच्या पर्यटन स्थळांबद्दल वाचायला मिळते. तर पर्यटन कंपन्याबरोबर जातानादेखील त्याच रुळलेल्या वाटेने जावं लागतं. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक प्राचीन वारसा स्थळं आजही सर्वाना माहीत नसतात. नेमक्या अशाचं स्थळांना मध्यवर्ती ठेवत संपूर्ण महाराष्ट्राची एक अनोखी ओळख ‘सफर देखण्या महाराष्ट्राची’ या पुस्तकातून होते.
या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे ही भटकंती एक सर्किट डोक्यात ठेवून याची रचना केली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा शहराच्या सभोवती असणाऱ्या शे-दोनशे पर्यटनस्थळांची ओळख तर होतेच पण हे सारं कसं पाहाव याचा एक अंदाज मिळतो. आशुतोष बापट हे इतिहास अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक वेगळाच बाज आला आहे. अनेक प्राचीन मंदिर, लेणी, धबधबे, झाडीपट्टी रंगभूमीसारखी कलाकेंद्रांचा यात समावेश आहे. या पर्यटनाच्या जोडीनेच त्यांनी महाराष्ट्राच्या शिल्पवैभवाची ओळख करून दिली आहे. त्यामुळे आपल्या वारसा स्थळांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन लाभतो. लेखक हे केवळ अभ्यासकच नाही तर डोंगरभटके असल्यामुळे काही गिरिस्थानांचादेखील यात समावेश आहे. आगळीवेगळी देवीस्थाने, गणपती मंदिरे, समर्थाच्या घळी, शिलालेख, दीपमाळा, ताम्रपट असा बहुअंगाने आशुतोष बापट या हाडाच्या भटक्याने दाखवलेला महाराष्ट्र आवर्जून पाहण्यासारखा आहे.
सफर देखण्या महाराष्ट्राची
आशुतोष बापट
स्नेहल प्रकाशन
मूल्य :२२५/-

lp59ऑफबिट देशांची भ्रमंती
विविध ठिकाणी फिरायला सगळ्यांनाच आवडतं. सहसा नेहमीच्याच ठिकाणांचाच फिरण्यासाठी विचार केला जातो. पण नेहमीपेक्षा काही तरी वेगळं, शांत, निसर्गरम्य, ऐतिहासिक ठिकाणांचा पर्याय दिला तर पर्यटकांसाठी ती पर्वणी ठरेल. अशा ठिकाणी थेट जाण्याची नाही, पण तिथल्या संपूर्ण माहितीची मेजवानी देतं ‘ऑफबिट भटकंती- २’ हे पुस्तक. जयप्रकाश प्रधान यांनी आतापर्यंत सपत्निक ६७ देशांची भटकंती केली आहे. बहुतांश वेळा स्वत:च नियोजन करून केलेल्या भटकंतीमुळे, दुनियेची सैर, कमीतकमी खर्चात हे त्यांचे भटकंती-सूत्र राहिलेलं आहे. अमेरिकेत तर त्यांनी अमेरिकन जोडप्याबरोबर अमेरिकन स्टाइलनेच तब्बल ४० दिवसांची भटकंती केली आहे. फ्रान्सची निसर्गरम्य बेटं, फ्रान्सची कंट्रीसाइड व व्हिनयार्ड्स, ग्रीस परिसरातील पांढरी-निळी बेटं, पोलंड, झेक प्रजासत्ताक अशा भटकंतीतून विविध देशांमधील भाषा, संस्कृती, वातावरण, निसर्ग, राहणीमान या सगळ्याचा रोमांचकारी अनुभव त्यांनी या पुस्तकातून उलगडला आहे. या देशांचं केवळ वर्णन न करता तिथे कधी, कसं जायचं ही माहिती दिली आहे. तसंच कोणता देश किती सुरक्षित याबाबत सांगितलं आहे. वर्णनासह लेखकाने काही आकर्षक छायाचित्रंही दिली आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडातील काही हटके देशांची भ्रमंती घडवणारं हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि त्याप्रमाणे भटकण्याचा प्रयत्न करावा अशी ऊर्मी देणारं आहे.
ऑफबिट भटकंती- २
जयप्रकाश प्रधान
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मूल्य : रु. २४०/-
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com