lp41जेरुसलेम आपल्याला माहीत असतं ते ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांचं पवित्र स्थान म्हणून. या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे हेसुद्धा आपल्याला माहीत असतं पण त्याचे फारसे तपशील ज्ञात नसतात. ते खोलात समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी सायमन मांटफिऑरी यांनी लिहिलेलं आणि सविता दामले यांनी अनुवादित केलेलं ‘जेरुसलेम एक चरित्रकथा’ हे पुस्तक म्हणजे अक्षरश: या शहराची तीन हजार वर्षांची सफर आहे. कारण या शहराचा तीन हजार वर्षांचा इतिहास या पुस्तकातून जिवंत करण्यात आला आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये एक उल्लेख आहे, तो असा – लोकांमध्ये जेरुसलेमचं वेड एवढं आहे की प्रत्यक्षातल्या आणि कल्पनेतल्या जेरुसलेममधला फरक एवढा दुखदायक असतो की दर वर्षी ‘जेरुसलेम ज्वराने’ (जेरुसलेम सिण्ड्रोम) पछाडलेल्या शंभर रुग्णांना तरी दवाखान्यात भरती करावं लागतं. कारण जेरुसलेमला भेट देण्याच्या कल्पनेनेच ते उचंबळून आलेले असतात, पण तिथे गेल्यावर नैराश्य येऊन ते भ्रमिष्ट होतात. जेरुसलेमला या तीन धर्मीयांच्या मते किती महत्त्व आहे, हे स्पष्ट करण्यासाठी हा उल्लेख पुरेसा बोलका आहे.
जेरुसलेम म्हणजे मेडिटेरियन आणि मृत समुद्राच्या मधला एकेकाळचा टेकडय़ांचा प्रदेश. तिथे ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षांपासून लोकवस्ती होती. आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी हे दोघंही जेरुसलेमवर आपली राजधानी म्हणून दावा सांगतात. त्यासाठी गेली अनेक वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे. आजच्या काळातले ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम हे तीन प्रमुख धर्म या प्रदेशात जन्माला आले. जेरुसलेमवर ताबा मिळवण्यासाठी, आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी या तिन्ही धर्मीयांनी सतत एकमेकांशी संघर्ष केला आहे. जेरुसलेम हे पुस्तक ही त्यांच्या या संघर्षांची गाथाच आहे. हा संघर्षही कसा तर एका आकडेवारीनुसार दोन वेळा जेरुसलेम पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. २३ वेळा त्याला वेढा घातला गेला. ५२ वेळा या शहरावर हल्ले झाले आणि ४४ वेळा ते सत्ताधाऱ्यांकडून हिसकावून घेतलं गेलं. अर्थात ही ज्ञात इतिहासाची आकडेवारी आहे, पण त्यावरून जेरुसलेमसाठी सातत्याने कशा लढाया झाल्या याची कल्पना यावी.
पुस्तकाच्या उपोद्घातात दिलेल्या माहितीनुसार इसवी सन ७० मध्ये रोमन सम्राट व्हस्पाझियनचा पुत्र टायटस याचं सैन्य चार महिन्यांपासून जेरुसलेमला वेढा घालून बसलेलं असतं. टायटसने आणि त्याच्या सैनिकांनी जेरुसलेम ताब्यात घेऊन जी जाळपोळ केली त्याची वर्णनं अंगावर काटा आणणारी ठरतात. (पुढे वेळोवेळी घडत गेलेल्या संघर्षांची अशीच वर्णनं आहेत.) टायटसने वेढा घातला, हल्ला केला तेव्हा शहरात पाच लाख ज्यू अडकलेले असल्याची माहिती हे पुस्तक सांगतं. त्यावरून जेरुसलेमची त्या काळातली व्याप्ती लक्षात येईल. त्याआधी बरोबर पाचशे वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांनी जेरुसलेमचा असाच विध्वंस केलेला असतो. त्याही आधी म्हणजे टायटसने जेरुसलेम ताब्यात घेतलं त्याच्याही आधी हजार वर्षे (ख्रिस्तपूर्व हजार वर्षे) राजा डेव्हिडने जेरुसलेम ताब्यात घेतलं. अर्थात तेव्हा त्याला शहराचं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं तर ते डोंगरी किल्ला असलेलं छोटंसं गाव होतं. त्याही आधी ते जेरिको या तिथून जवळच असलेल्या ४० हजार लोकवस्तीच्या शहरातले लोक जेरुसलेमच्या डोंगरांचा उपयोग दफनभूमीसारखा करत. हळूहळू तिथेच गिहॉन तळ्याभोवती छोटी छोटी घरं बांधून त्यांनी वस्ती करायला सुरुवात केली. एका खडकातून कालवा काढून तो किल्ल्याच्या आतल्या तळ्याला जोडला. किल्ल्यात पाणीसाठय़ाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीचे पुरावेही अलीकडच्या उत्खननात सापडले आहेत.
आधीचा इतिहास जेरुसलेमला असला, तरीही राजा डेव्हिडपासून जेरुसलेमला खरी ओळख मिळायला सुरुवात झाली. डेव्हिड, त्याच्यानंतर सॉलोमन, त्यानंतरचे वेगवेगळे राज्यकर्ते आणि त्यांचा इतिहास हे सगळं विलक्षण नाटय़मय आहे. त्यातही इतिहासप्रसिद्ध राणी क्लिओपात्राची कारकीर्द, येशू ख्रिस्ताची जेरुसलेममधली लोकमान्यता ते त्याला सुळावर चढवलं जाणं, त्याच्या थडग्याचा नंतर घेतला गेलेला शोध, मोहम्मद पैगंबरांचा कालखंड हे सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे.
लेखकाने राजा डेव्हिडपासून सुरू झालेला जेरुसलेमचा इतिहास या पुस्तकात आजच्या काळापर्यंत आणून जोडलेला आहे. काळाच्या या दोन टोकांच्या मध्ये आहेत त्या रक्तरंजित लढाया, कत्तली, कपटकारस्थानं, नातेसंबंधांमधलं प्रेम आणि नातेसंबंधांमधला हिंसक संघर्ष, सत्ताबदल आणि या सगळ्याच्या तालावर झुलणारं जेरुसलेम. जगातल्या आणखी कोणत्याही शहराने अनुभवला नसेल इतका धगधगता इतिहास या शहरानं पाहिला, अनुभवला आहे. त्या सगळ्याचे तपशील इथे देणं शक्य नाही. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. जेरुसलेमबद्दल आपण खूपदा ऐकत असतो, पण त्याचे सर्व तपशील बारकाईने मांडणारे हे पुस्तक वाचायला हवं.
जेरुसलेमसारख्या मोठा वारसा असलेल्या शहराचा असा राजकीय-धार्मिक-सांस्कृतिक इतिहास लिहिणं हेच मोठं आव्हान आहे. ते लेखकाने आणि अनुवाद करताना अनुवादकानेही लीलया पेललं आहे. लेखकाने दिलेली संदर्भसूचीच तब्बल २९ पानांची आहे.
जेरुसलेम एक चरित्रकथा
सायमन सीबग मांटफि ऑरी
अनुवाद : सविता दामले
डायमंड पब्लिकेशन्स
मूल्य : रु. ८९५.
पृष्ठे : ७४२
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com