lp46कल्पना करा, तुम्ही फेसबुकवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करत आहात. तिच्याशी तुमची छान ऑनलाइन मैत्री होते आणि अचानक एक दिवस चॅटिंग बंद होते. तुम्ही अस्वस्थ होता. आपला ऑनलाइन मित्र कधीतरी पुन्हा चॅटिंगला येईल, अशी तुमची समजूत असते. पण, तसे होत नाही. दरम्यान तुम्ही हा विषय विसरूनही जाता. अचानक एक दिवस तुम्हाला कळते की तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅटिंग करत होतात, ती व्यक्ती या भौतिक जगात अस्तित्वात नाही. मग तुम्ही तिच्याशी मारलेल्या ऑनलाइन गप्पांचं काय, माहितीच्या महाजालात ते शब्द, ते विचार, तसेच राहणार का पुसले जाणार असे विचार तुमच्या मनात यायला हवेत. पण, थ्रीजी, फोरजीच्या या जगात असा विचार करायला कोणाकडेही वेळ नाही. याचात विचार ‘एक्झिट पॉइंट’ ही कादंबरी आपल्याला करायला लावते.
प्रशांत महासागराच्या तळाशी असलेल्या इंटरनेटच्या केबल्समध्ये तांत्रिक बिघाड होतो. त्याच्या झटक्याने त्या परिसरात विहार करत असलेल्या माशांचा मृत्यू होतो. या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातील इंटरनेट कनेक्शन बंद होते. परिणामी त्या देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडायला सुरुवात होते. सागराच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलमध्ये कोण छेडखानी करू शकते, त्याला अटकाव कसा करायचा, पुन्हा आर्थिक गाडा रुळावर आणायचा कसा, यामागे कोण आहे, या सगळ्याचा तपास ऑस्ट्रेलियन गुप्तचर संस्थेकडे सोपवला जातो. जसजसा तपास पुढे सरकत जातो तसतशी एकेक धक्कादायक, चक्रावून टाकणारी, मती गुंग करणारी माहिती गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांसमोर येत राहाते आणि त्यातून एकेक कोडे उलगडत जाते. अतिशय हुशार, षोडशवर्षीय आणि नेटअ‍ॅडिक्ट असलेल्या परंतु लहानपणापासूनच आईच्या प्रेमाला पारख्या झालेल्या मेगनचा अचानक मृत्यू होतो. तत्पूर्वी तिच्याच वडिलांनी त्यांच्या घरातल्या विश्वासू नोकराची गळा दाबून हत्या केलेली असते. मेगन या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असते. बाबांच्या नकळत तिने हे कृत्य पाहिलेले असल्याने ती प्रचंड घाबरलेली असते. या कृत्याची माहिती ती हाँगकाँगमध्ये असलेल्या आपल्या ऑनलाइन मैत्रिणीला देत असतानाच मेगनचा अचानक मृत्यू होतो. परंतु तिच्या मृत्यूनंतरही हाँगकाँगमधील तिची मैत्रीण मेगनशी चॅटिंग करत असते. मेगनचा मृत्यू झालेला असताना तिच्या नावाने भलताच कोणीतरी हाँगकाँगमधील तिच्या मैत्रिणीच्या संपर्कात असतो. कोण असतो तो, त्याला काय माहिती मिळवायची असते, हाच तरुण ऑस्ट्रेलियन तपास अधिकाऱ्यांना मेगनच्या हत्येच्या तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवतो. लाजराबुजरा, मीतभाषी, विशीही न ओलांडलेला हा तरुण प्रत्यक्षात एका महाकाय आयटी कंपनीचा कर्ताधर्ता आहे. त्याचा आणि मेगनचा संबंध काय, तो तिला काय मदत करणार असतो, मेगनचा मृत्यू कसा होतो, मृत्यूनंतरही ती तिच्या मैत्रिणीच्या संपर्कात कशी राहू शकते, तरुणाची नेमकी भूमिका काय या सगळ्या प्रकरणात, अतिशय चक्रावून टाकणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे एक्झिट पॉइंट या टेक थ्रिलर कादंबरीत मिळतात. अगदी पहिल्या प्रकरणापासून वाचकाच्या मनाची पकड घेणारी ही कादंबरी खऱ्या अर्थाने पेज टर्नर आहे. २००४ ते २०१६ हा या कादंबरीचा कालखंड. आगामी काळात माहितीचे महाजाल कसे असेल, मोबाइल कसा असेल, संपर्काच्या साधनांमध्ये कोणकोणते क्रांतिकारी बदल होतील आदींची उत्तरेही या कादंबरीत मिळतात.
माहिती-तंत्रज्ञान, माहितीचे महाजाल, हॅकिंग, व्हायरस, सुपरबग अशा विषयांच्या टेक थ्रिलर कादंबऱ्या अलीकडे आपल्याकडे वाचकांना आवडू लागल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ‘एक्झिट पॉइंट’ ही अनिल गोयल यांची कादंबरी. जगभरातील आयटीतज्ज्ञांनी एकाच दिवशी नोकरीचा त्याग केला तर काय परिस्थिती उद्भवेल याचे चित्रण असलेली ‘रिलीज टू पॉइंट झीरो’ ही लोकप्रिय कादंबरीही त्यांचीच. ही कादंबरी दहा वर्षांपूर्वीची. ‘रिलीज टू पॉइंट झीरो’ने टेक थ्रिलरसाठी एक नवा पायंडा पाडला. याच अनुभवाच्या शिदोरीतून एक्झिट पॉइंट ही गोयल यांची दुसरी टेक थ्रिलर कादंबरी आकाराला आली आहे. कादंबरीचा सुरुवातीचा भाग क्लिष्ट असल्याने कंटाळवाणे वाटते खरे. मात्र, मेगनच्या मृत्यूच्या तपासातून पुढे येणारी माहिती व आलोकचे गूढ व्यक्तिमत्त्व यातून ही कादंबरी पानोपानी वाचनीय होत जाते. मात्र त्या तुलनेत कादंबरीचा शेवट पठडीतला वाटतो.
कादंबरीचा की-पॉइंट असलेल्या एक्स-नेट आणि डेथस्वीच अ‍ॅप याचे वर्णन लेखकाने विस्ताराने केल्याने यातील भयावहता जाणवते. खरंच भविष्यात असे सॉफ्टवेअर विकसित होऊ शकते याची खात्री वाटू लागते. फेसबुक, जीमेल, ट्विटर, लिंक्डइन या सर्व माध्यमांतून आपण अनेकांशी कनेक्ट असतो. या माध्यमातून आपण अनेकांशी जोडले जातो, अगदी अनोळखी व्यक्तीही आपल्या परिचयाच्या होतात. यातून मग चॅटिंग करतो, परंतु या आभासी विश्वात समोरची व्यक्ती कितपत पारदर्शी व्यक्तिमत्त्वाची आहे, याचा विचार केला जातो कधी गांभीर्याने. याचं उत्तर व्यक्तिसापेक्ष असू शकेल, परंतु ज्या तरुण (म्हणजे खरे तर टीनएजर्सच) वर्गाला समोर ठेवून लेखकाने हा एक्झिट पॉइंटचा पसारा मांडलाय, तो पाहता या पिढीला ही कादंबरी विचार करायला लावणारी नक्कीच आहे. सतत नेटविश्वात रममाण असलेल्यांसाठी ही कादंबरी खरोखर आत्मचिंतन करायला लावणारी आहे. टू बी नोटेड, एक्झिट पॉइंट वाचाच..
एक्झिट पॉइंट
लेखक : अनिल गोयल
प्रकाशक : फ्रॉग बुक्स
पृष्ठे : ४९८
मूल्य : रु. ३४५
प्रकार : टेक थ्रिलर (फिक्शन)
विनय उपासनी