खिळवून ठेवणारी कादंबरी

गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियात बेसुमार लोकसंख्यावाढ झाली. या वाढीमुळे उपासमार, गरिबी असे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले. या गंभीर समस्यांमुळे रशियातील लाखो मुले बेघर झाली. अन्न, वस्त्र तर नाहीच पण, त्यांना राहण्यास निवारा मिळणेही अशक्य होऊ लागले. पयार्याने अशी बेवारस मुले रस्त्यांवर निवारा शोधू लागली. पण, अशा बेवारस मुलांचा सांभाळ केला तो तिथल्या रानटी कुत्र्यांनी. अशी आगळीवेगळी कथा मांडली आहे ‘डॉग बॉय’ या पुस्तकात. रोमोचका या एका डॉग बॉयची कथा या कादंबरीत आहे. कुत्र्यांवर प्रेम असलेल्यांसाठी ही कादंबरी म्हणजे पर्वणीच आहे. कादंबरी वाचतानाच कुत्र्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. भूतदया वर्षांनुवर्षे चघळला जाणारा विषय आहे. ‘डॉग बॉय’ या कादंबरीतल्या रोमांचक कथेच्या माध्यमातून या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. प्राणिजगताबद्दल आढळून येणारी आस्था या कादंबरीत प्रतिबिंबित होते. आजच्या युगात माणसामाणसांतील नात्यांविषयी खात्री देता येत नाही, पण प्राणी आणि माणूस यांच्यातील नाजूक धागा कादंबरीतून प्रकाशित होतो. पुढे काय होईल याबाबतची उत्सुकता टिकून राहते. मनावर खोलवर परिणाम करणारे, खिळवून ठेवणारे वास्तववादी चित्रण करणारी असे या कादंबरीचे वर्णन करता येईल. रोमोचकाचा मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे आणि पुन्हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे झालेल्या प्रवासाची मांडणी प्रभावी झाली आहे. चित्तथरारक अशी ही कादंबरी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवते.
डॉग बॉय ; मूळ लेखिका : इव्हा हॉर्नगन
अनुवाद : स्वाती काळे
प्रकाशक : सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग
मूल्य : रु. २००/-; पृष्ठसंख्या : १८४

साहित्याचे विचारमंथन मांडणारा लेखसंग्रह
मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. साहित्याची भाषा, त्यातून प्रकट होणारे विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, व्याकरण, साहित्यप्रकार अशा विविध घटकांनी समृद्ध अशा मराठी साहित्याचा आवाका मोठा आहे. या प्रत्येक घटकांमध्ये कालांतराने बदल होत गेले. या सर्व बदलांसह मराठी साहित्याविषयी भाष्य करणारी लेखमाला म्हणजे ‘नवी जाणीव’ हे पुस्तक. मराठी साहित्यातील स्थित्यंतरे अभ्यासण्यासाठी ‘स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य’ हा लेख वाचनीय ठरतो. मराठी साहित्यात चरित्र लेखनाचीही परंपरा आहे. त्यातही स्त्रियांची चरित्रे अधिक संघर्षमय आहेत. चरित्रलेखनाचे स्वरूप, विशिष्ट कालखंडातील चरित्रलेखन, तपशील-हेतू याबाबतचा लेखही या संग्रहात आहे. तसेच कवितेचे व्याकरण, पुरोगामी साहित्य आणि रोमॅण्टिसिझम, मला समजलेला ‘अस्तित्ववाद’ अशा प्रकारच्या लेखांचाही समावेश आहे. कोणत्याही कलाकृतीच्या आविष्कार स्वातंत्र्याविषयी नेहमी भाष्य केले जाते. त्यामुळे कलाकृतीचे आविष्कार स्वातंत्र्य नेमके काय, त्याचे स्वरूप याविषयीही ‘कलाकृतीचे आविष्कार स्वातंत्र्य’ हा लेख आहे. साहित्य आणि जीवनानुभूती यांचे समांतरत्व मानणारी लेखकाची भूमिका ‘कलावादी’ आहे हे दिसून येते. अध्ययन, अध्यापन आणि जीवन-अनुभव यातून लेखकाचे विचारमंथन म्हणजे ‘नवी जाणीव’ असे या लेखसंग्रहाचे वर्णन करता येईल.
/ नवी जाणीव
लेखक : डॉ. शशिकांत लोखंडे
प्रकाशक : प्रकाश विश्वासराव, लोकवाङ्मय.
मूल्य : रु. २५०/- ; पृष्ठसंख्या : १०४

गूढ रहस्यांवर प्रकाश
आज विज्ञानाने जगातील यच्चयावत घटनांचा अर्थ लावला आहे. किंबहुना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच गोष्टींमागचं रहस्य उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आजदेखील सुरूच असतो. इतकेच नाही तर अनेक रहस्यांच्या उलगडण्यातून विज्ञानाची प्रगतीच झाली आहे.
तरीदेखील आजही अशा काही घटना आहेत, की ज्यांचा पूर्णपणे वैज्ञानिक वेध घेऊन त्यामागचं रहस्य उलगडता आलेलं नाही. अर्थात त्यासाठी वैज्ञानिक भरपूर प्रयत्न जरूर केले आहेत. पण ते ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशाच काही न उलगडलेल्या रहस्यांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. आसामातल्या जातिंगा येथील पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या, हिमालयातील यतीचे गूढ, पक्ष्यांना लागणारी भूकंपाची चाहूल, किर्लिआन फोटोग्राफी, क्रॉप सर्कलल्स, वॉटर डाऊझिंग, हिमयुगाचे रहस्य, स्वयंभू आत्मदहन, प्रतिपदार्थाचे ब्रह्मांड अशा घटनांवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक काही केवळ रंजनात्मक पद्धतीने चमत्कृती मांडणार नाही. प्रत्येक घटनेच्या मागंच विज्ञान उलगडण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले आहेत त्याची सविस्तर माहिती हे या पुस्तकाचं विशेष म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक चमत्काराचं पुस्तक न राहता त्याला रहस्य उलगडण्याचे विज्ञानाचे प्रयत्न मांडणारं ठरतं आणि विचार करावयास प्रवृत्त करतं.
/ विज्ञानाला न उलगडलेली रहस्यं
लेखक : पंकज कालुवाला
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स
मूल्य : रु. १५०/-; पृष्ठसंख्या : १००