हल्ली वृत्तपत्र उघडले की दोन बातम्या हमखास असतात. एक बलात्कारसंबंधी व दुसरी ‘लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक.’ लाच घेणे तर आता अगदी कॉमन झाले आहे. शिपाई, तलाठी, तहसीलदार, पोलीस, उपायुक्त नगरसेवक.. इंजिनीअर्स.. सर्व क्षेत्रात लाच हा प्रकार ‘एस्टॅब्लिश’ झाला आहे. लाचखोर कधी ना कधी ‘अ‍ॅण्टी करप्शन’च्या जाळय़ात सापडतोच. ती बातमी होते. मग त्याने जमा केलेली अवैध संपत्ती, जमा केलेली व गुंतवणूक केलेली लाखाची-कोटीची माया.. आकडे वाचताना डोळे फिरतात..
मग मनात विचार येतो ही माया काही महिन्या-दोन महिन्यांत जमा झालेली नाही.. वर्षांनुवर्षे हे लाच खाणे चालले आहे.. फक्त पापाचा घडा भरल्यावर अटक!
परंतु आश्चर्य याचे वाटते, या काळात पत्नी, मुले झोपली होती का? आपला पती लाच खातो, आपले वडील लाचखोर आहेत याची त्यांना घृणा येत नाही का? त्यांना अटकेची भीती वाटत नाही का? मग घरातील पत्नी, मुले भीतीपोटी का होईना त्यांना अटकाव का करीत नाही? अहो, लाच घेताना तुम्हाला अटक झाली तर किती बेअब्रू होईल, नातेवाइकात तोंड दाखवता येईल का.. लाचखोर बापाचा मुलगा-मुलगी.. शाळेत, कॉलेजात किती धिंडवडे निघतील याची चर्चा घरात का होत नाही? मी नि:स्पृह आहे, निष्कलंक आहे हा स्वाभिमान व्यक्तीला का नाही?
मला आठवते-साधारण पंचावन्न वर्षांपूर्वी आमच्या चाळीत राहणाऱ्या बावधनकर साहेबांनी त्या काळी सर्वात महाग ‘फिलिप्स’ सायकल मुलासाठी घेतली. त्यात निम्मे पैसे आजोबांचे होते. सायकल बघताच शेजारचे जोशी म्हणाले, ‘आता काय बुवा बावधनकरास डिपार्टमेंटला (कलेक्टर कचेरी) कमाईच कमाई..’ खोटे वाटेल, पण त्याच क्षणी बावधनकरांनी काडकन् जोशींच्या श्रीमुखात भडकावली! स्वाभिमान तो हा. त्याच दरम्यान कलेक्टर कचेरीत काम करणाऱ्या बारसेंना अ‍ॅण्टी करप्शनखाली अटक झाली.. दुसऱ्या दिवशी मिसेस बारसेंनी विहीर जवळ केली!
आता हे शक्य नाही; परंतु पती, पत्नी, मुले घरातील वृद्ध आई वडील यांना लाच घेणाऱ्या, अवैध संपत्ती जमा करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला वेळीच अटकाव करणे शक्य आहे. असा काळा पैसा नको. स्वाभिमानाने ताठ राहू.. पगारात भागवू शकवू, हा विचार व्हायला हवा आणि असेही बघा हे लाचखोर निदान व्यवस्थित जेवण करू शकतात का? शांत झोप घेऊ शकतात का? नाही. डायबेटिस, निद्रानाश, ब्लड प्रेशर ही मैत्री त्यांना सुखाने जगू देत नाही. मग पतीच्या आरोग्याची काळजी पत्नीने घेण्यास काय हरकत आहे?
‘‘तू गप्प राहा.. तुला काही समजत नाही’’ नवरोजीने पत्नीला हे सुनावणे इतिहासजमा झाले आहे. आता पत्नीदेखील सुशिक्षित, एज्युकेटेड असते, काही ठाम निर्णय ती घेऊ शकते. मुलेही आता स्मार्ट झाली आहेत. चांगल्या, वाईट गोष्टी त्यांना समजतात. मग ही ‘गप्प’ची गोडी का? करावा घरातूनच ठाम विरोध या अवैध मायेला. कमी करावी चैन, मौजमजा.
पूर्वी एक गोष्ट सांगितली जायची. चोरीच्या आरोपाखाली एका मुलाला जबर शिक्षा झाली. तुरुंगात जाण्यापूर्वी त्याने आपल्या आईस भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तो आईजवळ गेला न त्याने कडकडून आईच्या कानाचा चावा घेतला. म्हणाला, ‘आई तू मला चोरी करण्यापासून दूर ठेवले असते, तर ही वेळ आली नसती.. तू कर्तव्य विसरलीस..’
तात्पर्य- घरातील कोणी लाच घेऊन अवैध संपत्ती गोळा करीत असेल तर त्याला घरच्यांनी वेळीच अटकाव करावा.. ठाम विरोध करावा आणि होणारी घरची बेअब्रू टाळावी..
अरविंद ज. खडमकर response.lokprabha@expressindia.com