डॅन्यूब नदीच्या पश्चिमेला असलेलं बुडा आणि पूर्वेला असलेलं पेस्ट या दोन वेगवेगळ्या शहरांचा विकास होत आजचं बुडापेस्ट तयार झालं आहे. युरोपची धडकन असलेल्या या शहराची धावती सफर-

lp79दुसरं महायुद्ध संपून जग आपापल्या उद्योगात मश्गूल होऊन बराच काळ लोटला म्हणजे अक्षरश: आता तिसऱ्या-चौथ्या पिढीचं किती तरी वेगळ्या शैलीचं जगणं सुरू झालं असलं तरीही युरोपमध्ये फिरताना सतत जाणवत राहतं, की आजही त्या युद्धाच्या भयानक आठवणींचा इथल्या लोकांच्या जगण्यावर एक व्रण कायम आहे. या भल्या मोठय़ा व्रणाखालची जखम अजूनही ओली आहे आणि तरीही माणसं वेगवेगळ्या व्यापात बुडून आनंद शोधण्यात मग्न आहेत. अंडरग्राऊंड टय़ूबनं प्रवास करताना कधी आपल्या शेजारी एखादी अगदी जख्ख म्हातारी अंगावरचा ओव्हर कोट आणि डोक्यावरची हॅट सांभाळत येऊन बसते. तिच्या कातडीवर वयानुसार येणाऱ्या डिकलिरगच्या डागांकडे बघताना वाटतं हिनं नक्कीच अनुभवला असेल तो काळ. म्हणूनच आजही ती तिचं स्वातंत्र्य फार असोशीनं जपू पाहतेय. अख्ख्या युरोपभर दुसऱ्या महायुद्धाच्या खुणा सांभाळणारी स्मृतिस्थळं आहेत. म्युनिचची हेर हिटलरनं तयार केलेली ‘दकाऊची’ पहिली छळ छावणी पाहिली नि लगेच आम्ही युरेलनं व्हिएन्नात परत आलो होतो. एक दिवस हाताशी होता. मनाच्या उदासीन अवस्थेतून बाहेर पडायचं म्हणून मग आम्ही अख्ख्या युरोपची धडकन असलेलं बुडापेस्ट धावत पळत का होईना बघून यायचं ठरवलं.
टूर सकाळी सातला सिटी सेंटरपासून सुरू व्हायची होती. व्हिएन्ना-बुडापेस्ट हे अंतर जरी फक्त २१७ किलोमीटरचं असलं तरी वेळेच्या बाबतीत व्हिएन्ना बुडापेस्टच्या १० मिनिटं आणि जवळजवळ ५० सेकंद मागे आहे. याचा अर्थ आता बुडापेस्टही पळायला लागलं असणार.
काचेचं स्वच्छ तावदान असलेल्या खिडकीतून मी बाहेर पाहू लागले. डिसेंबरचा दुसरा आठवडा म्हणजे मस्त थंडीत गुरफटलेल्या युरोपचं बर्फाळ सौंदर्य अनुभवण्याचा काळ. या आठवडय़ात जरी स्नो फॉल झाला नव्हता तरी गेल्या आठवडय़ात भरपूर बर्फ पडलं होतं त्यामुळे घरांच्या छपरांवर पांढरे शुभ्र सांडगे वाळत घालावे तसे जागोजागी बर्फाचे लहान लहान ढीग दिसत होते. रस्त्याच्या कडेला दूरवर शेतं दिसू लागली त्या शेतांमधे बर्फ दूरवर तुकडय़ा तुकडय़ांनी पहुडलं होतं. जसं काही बर्फच शेतात पिकवलं जात होतं. मरियमनं पुन्हा माइक हातात घेत म्हटलं, ‘जस्ट लिसन फॉर अ मिनिट, आय वूड लाऊक टु आस्क यू ‘बुडापेस्ट’ इज इट द नेम ऑफ वन सिटी ऑर टु सिटीज?’
असा कसा प्रश्न हिचा.. बसमध्ये शांतता पसरली. मग तिनं सांगायला सुरुवात केली, ‘या शहराला फार पुरातन इतिहास आहे. रोमन साम्राज्याच्या सीमेवरची ही वसाहत असल्यामुळे या ठिकाणी कायमच लढाया होत राहिल्या पुढे पाचव्या शतकात हान सम्राटांनी इथून रोमन लोकांना हुसकावून लावून हा भाग ताब्यात घेतला. जर्मन फ्रेंच, वॅलंन, स्लाव्ह लोकांनी या भागात वेगाने वस्ती करायला सुरुवात केली होती. डॅन्युबच्या दोन्ही तीरांवर वेगानं वस्ती वाढू लागली. डॅन्युबच्या वेस्टला असलेल्या वसाहतीचं नावं पडलं ‘बुडा’. स्लाव्ह भाषेत बुडा म्हणजे पाणी तर ईस्ट साइडला असलेल्या वस्तीला नाव पडलं ‘पेस्ट’. स्लाव्ह भाषेत ‘पेस्ट’ म्हणजे ‘फन्रेस’. याचा अर्थ ही दोन शहरं होती. पुढे १७ नोव्हेंबर १८७३ ला ही दोन्ही शहरं एक झाली आणि मग हे एक झालेलं शहर ओळखलं जाऊ लागलं बुडापेस्ट म्हणून. पहिल्या महायुद्धा पर्यंत हे शहर ऑस्ट्रो-हंगेरी राज्याचं उपराजधानीचं शहर होतं पण या युद्धानंतर या शहराचा हा रुबाब ओसरला. बुडापेस्ट तरीही युरोपातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.’
lp80एवढी माहिती सांगून झाली नि तिनं बसमध्ये हंगेरीतल्या पारंपरिक म्युझिकची कॅसेट लावली. त्या सुंदर सुरावटीत वेळ कसा सरला कळलंही नाही. बसमध्ये बसून आता जवळ जवळ दोन तास व्हायला आले होते. एका छोटय़ा गावात चहा-पाण्यासाठी म्हणून बस थांबली. आम्ही बसमधून खाली उतरलो. तिथे एक टपरीवजा चहापानाचं छोटं दुकानं होतं. गरमागरम कॉफी घेऊन पुन्हा प्रवास सुरू झाला.
प्रवास आणि भाग्य जर हातात हात घालून आलं तर परदेशात तुम्हाला तुमच्या शेजारी इंग्रजी बोलणारी व्यक्ती सापडते आणि दहा पुस्तकं वाचूनसुद्धा जे समजणार नाही ते सगळं म्हणजे स्थानिक संस्कृती, राजकारण, समाजमन अशा अगणित गोष्टी अशा व्यक्तीशी बोलून समजतात. आज माझं भाग्य नक्कीच माझ्यासोबत असलं पाहिजे. कारण इतका वेळ आमच्यासोबत असलेल्या एक आजीबाई, मागच्या सीटवरून उठून माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसल्या आणि आपुलकीने त्यांनी विचारलं, ‘यू इंडियन?’ मी साहजिकच उत्तर दिलं, ‘येस.’
lp81आणि मग त्यांचे आजोबा पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतात आले होते आणि पुण्यातल्या सिम्रिटीत कसे अजूनही पहुडलेले आहेत हे अगदी काल-परवा गोष्ट घडली असावी अशा आत्मीयतेने सांगत राहिल्या आणि मग खूप ओळख असल्यासारख्या आमच्या गप्पा रंगू लागल्या. त्यातून मला एवढं कळलं की, सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची केवळ बार्बी डॉलच जशी अशी दिसणारी ही एमिली आजी चालली होती ख्रिसमससाठी आपल्या मुलीकडे.
आजीशी गप्पा मारता मारता वेळ चटकन पसार झाला होता. अकरा वाजायला आले होते. आम्ही बुडापेस्टला येऊन पोचलो होतो. समोर डॅन्युबचं केवढं मोठं विशाल पात्र दिसत होतं. पाण्यात असंख्य बोटी फिरताना दिसत होत्या. बसनं आम्हाला नदीजवळच्या एका चौकात आणून सोडलं. आम्ही तिथे बसमधून खाली उतरलो नि चालू लागलो. रस्ता चांगला रुंद होता. सूर्यप्रकाशदेखील थंडी हटवण्याइतपत सक्षम झाला होता. आम्ही आमच्या गाईडच्या मागे चाललो होतो. इतक्यात आमचं लक्ष रस्त्याच्या कडेला मुसलमान लोक ज्या अवस्थेत नमाज पढताना बसतात, त्या स्थितीत एक माणूस ओणवा बसलेला होता तिकडे गेलं. त्याच्यासमोर एक मळकट फडकं ठेवलेलं होतं. त्या फडक्यावर एक रिकामं कार्टन आणि त्यात काही सेंट, एखाददुसरं युरोचं नाणं टाकलेलं दिसत होतं. याचा अर्थ हा इसम या स्थितीत बसला होता ते भीक मागण्यासाठी. आमच्यातल्या अमेरिकन जोडप्यानं तत्परतेनं त्याच्या समोरच्या कर्टनमध्ये काही सेंट्स टाकलेसुद्धा. गाईड तत्परतेनं म्हणालीसुद्धा, ‘ही मे बी फ्रॉम युगोस्लव्हिया. लॉट ऑफ पावर्टी. वॉर हॅज ब्रोकन युरोपियन इकॉनॉमी.’ मला प्रश्न पडला विच वॉर? पण एव्हाना आम्ही अगदी नदीतीरी आलो होतो आणि आमची बस आमच्यासमोर पुन्हा एकदा आणून उभी करण्यात आली होती.
lp82आता एक नवी बाई गाईड म्हणून आमच्या बसमध्ये आली होती. तिचं नाव होतं रूथ. ओळखपाळख संपताच ती म्हणाली, ‘नाऊ, प्लीज रिमेंबर, आय विल हॅव धिस यलो हँकरचिप विथ मी, आय विल कीप इट अप लाइक धिस.’ तिनं तिचा हात उंच करून यलो रुमाल फडफडवला आणि ती म्हणाली, ‘हेन्स फोर्थ प्लीज फॉलो धिस साइन. नाऊ वी आर प्रोसिदिंग तुवर्दस चेन ब्रिज.’
एकूण काय, तर आता आमचा कळप या बाई राखणार होत्या तर. डॅन्युबच्या तीरानं बस जात होती. विविध प्रकारानं बांधलेल्या उत्तम इमारतींचं धावतं दर्शन होत होतं. अगदी टोकाला पोचल्यावर आमची बस एका दगडी पुलाजवळ थांबली. आम्ही बसमधून उतरलो नि आमच्या लक्षात आलं, बुडापेस्टची खूण म्हणून अनेकदा दाखवतात त्या चेन ब्रिजपाशी आम्ही येऊन पोचलो आहोत.
आम्ही बसमधून खाली उतरलो आणि कोंडाळं करून या नव्या गाईडभोवती जमा झालो. तिनं माहितीचा फवारा उडवायला सुरवात केलेली होती. ‘या पुलाला चेन ब्रिज हे नाव पडण्याचं कारण म्हणजे लोखंडाच्या साखळ्या वापरून हा ब्रिज उभा केलेला आहे. हा सुरवातीला झुलता पूल होता. आम्ही आता पुलावरून चालत पुलाच्या दुसऱ्या टोकाला आलो होतो. दोन्ही बाजूला सिंहांची भारदस्त आकृती कोरून काढलेली दिसत होती. अक्षरश मॅग्निफिसंट सिंह होते ते. अतिशय रुबाबदार. बाई सांगत होत्या, ‘ही कलाकृती जानोस मार्शलाको (खंल्ल२ टं१२ूँं’‘) या कलावंताने निर्माण केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ही कलाकृती कुठल्याही प्रकारे नुकसान न होता शाबूत राहिली हे एक महद्आश्चर्यच मानलं जातं. बुडा आणि पेस्ट ही दोन्ही गावं जोडणारा डॅन्युब नदीवरचा पहिला दगडी पूल. आज बुडापेस्टची ओळख असल्यासारखा हा ब्रिज हंगेरीवरच्या अनेक माहितीपटात दिसतो. २० नोव्हेंबर १८४९ या दिवशी या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
lp83वास्तविक दुसरं महायुद्ध हरत चाललेल्या जर्मन सन्यानं बुडापेस्टमधून बाहेर पडताना शहरातले सर्वच्या सर्व ब्रिज नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा ब्रिजदेखील या विध्वंसातून फार वाचला नाही, पण ते सिंह मात्र वाचले. १९४९ मध्ये हा ब्रिज पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आला. वेळोवेळी या ब्रिजचं रुंदीकरण करण्यात आलं पण दर खेपेला ब्रिजचं मूळ रूप शाबूत कसं राहील याचा विचार करूनच भर घातली गेली आणि म्हणून आज आपण हा ब्रिज या स्थितीत पाहात आहोत.’ आम्ही ब्रिजवरून सभोवतालचं बुडापेस्ट पाहत होतो. बघता बघता हवा बदलू लागली. आकाशात ढग जमू लागले आणि गारठाही जाणवण्याइतका वाढला.
आता बस वेगाने ब्रिज पार करून पलीकडे पोचली होती. आम्हाला उंच डोंगरावर तटबंदी दिसू लागली तेव्हा गाईडनं सांगितलं, हाच तो प्रसिद्ध ‘बुडा कॅसल.’ या ट्रीपमध्ये आपण नाही व्हिजिट करू शकत. कारण तिथे जायचं तर सहज तीन तास तरी खर्च होणार, तर तुम्ही पुढच्या खेपेला हा कॅसल पाहायला परत या.’ एवंच काय, तर कॅसलची बाहेरची बाजू आम्हाला बसमधूनच पाहायची होती.
गाईड माहितीचा झरा अव्याहत वाहता ठेवत होती. ती सांगू लागली, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जेत्यांमध्ये जे साटेलोटे झाले, त्यात बुडापेस्ट्मध्ये रशियन राजवट कम्युनिझम आलं. त्यांच्या मते हा किल्ला म्हणजे आधीच्या सत्तेचं प्रतीक म्हणून मग राज्यकर्त्यांनी या ऐतिहासिक वास्तूचा विध्वंस केला. पण नियती नावाची काही एक चीज आहे. १९८९ मध्ये माज केलेल्या रशियाचेच तुकडे पडले. त्यानंतर हंगेरीत सत्तेवर आलेल्या लोकशाहीवादी सरकारनं या किल्ल्याची डागडुजी केली.
आम्ही इतिहासाच्या पानांवरून फिरत असताना बस हलकेच त्या परिसरातून बाहेर पडली नि एका हॉटेलपाशी येऊन थांबली. आम्ही बसमधून उतरून हॉटेलमध्ये शिरलो. इथे आमची लंचची सोय केलेली होती. हे हॉटेल म्हणजे एक अगदी छोटं रेस्टॉरंट होतं. एका फॅमिलीनं चालवलेली शुद्ध मराठीत ती एक खाणावळ होती. युरोपमध्ये प्रवास करताना असं आढळून आलंय की टुरिस्ट कंपन्या या अशा फॅमिली रेस्तराँशी संधान बांधून असतात. आतासुद्धा तसंच होतं.
आम्ही आणि गाडीत माझ्या शेजारी बसलेली आजी हीदेखील शाकाहारीच असल्यामुळे आमची सोय आतल्या खोलीत केलेली होती. या रेस्तराँची सजावट मात्र भलतीच साधी असली तरी अगदी आयडियाची कल्पना लढवून केलेली होती. चक्क छतापासून खाली इंदधनुष्य पसरावं तशा विविध रंगातल्या कापडाचा वापर करून झकास कोलाज बनवलं होतं या लोकांनी.
शाकाहारी म्हटल्यावर आमच्यासमोर चार प्रकारचे चीजचे नमुने ठेवण्यात आले आणि जोडीला हंगेरीची प्रसिद्ध टोकाजी वाइन होती. वेटरनं आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगितलं, ‘आमच्या राष्ट्रगीतातसुद्धा हिचा उल्लेख आम्ही आभिमानानं करतो.’
वाईन फार आवडीनं अशी मी घेतच नाही तरीही या वाइनबद्दल इतकं अभिमानानं सांगितलं गेलं म्हणताना चाखली थोडी, खरंच ही वाइन फार  छान होती म्हणून मग आनंदात घेतली. जेवण झालं नि आम्ही रेस्तराँच्या बाहेर आलो. आमची बस दिसत नव्हती.
गाईड एव्हाना तिचंही जेवण उरकून बाहेर आली होती. इतका वेळ आमच्याबरोबर असलेल्या आजी माझा निरोप घेऊन म्हणाल्या, ‘तुझी भेट झाली. खूप गप्पा झाल्या. इतकं छान वाटलं की मी ठरवलं नक्की यायचं इंडियाला आणि तुझ्या पुण्यालासुद्धा, मग जाइन मी त्या सिम्रिटीत, बघीन माझ्या आज्याचं थडगं.’
म्हातारी हरवली आपल्याच मनाच्या तळात. पण आम्ही जेव्हा गाईडबरोबर बॅसिलिकाकडे जायला निघालो तेव्हा तिनं आमचा निरोप घेतला नि गेली टय़ूबचं जवळच असलेलं स्टेशन गाठायला. आम्ही एव्हाना सुपरफास्ट स्पीडनं चालणाऱ्या गाईडच्या मागे धावायला सुरवात केली होती.
रस्ता चढणीचा होता गाइड माहिती ओतत होती. या भागात म्हणे फार पूर्वीपासून वस्ती होऊ लागलेली. इटालियन आले ते आपले एकमेकांना धरून जवळजवळ राहू लागले. मग फ्रेंच आले तेदेखील असेच आपले आपले ग्रुप करून राहू लागले. जर्मनसुद्धा आले. यातले अनेक वेगवेगळ्या उद्योगांत प्रवीण होते. त्यांनी आपापले व्यवसाय सुरू केले अणि आज एकविसाव्या शतकातसुद्धा ही माणसं घेट्टो करून या रस्त्याच्या आजूबाजूलाच राहात आहेत. बुडापेस्टमधला हा खूप जुन्या वस्त्यांचा भाग आहे.
एव्हाना अंधारून येऊ लागलं होतं आणि अगदी अचानक अंगावर साबुदाण्याच्या आकाराचं हिम पडू लागलं. काही क्षणात माझ्या अंगावरच्या ओव्हरकोटावर पांढऱ्या शुभ्र साबुदाण्याएवढय़ा बर्फानं नक्षीच तयार केली. मी हात पुढे केला नि अलवारपणे हातात ते हिम साठवण्याचा अट्टहास सुरू केला. आयुष्यात पहिल्यांदा मी असं बर्फ झेलत होते. मला अतीव आनंद झाला होता. पण असे एक-दोन क्षण गेले नि माझा हात काकडून गेला, बोटं एकदम बधिर झाली म्हणून मग नाइलाजानं हात ओव्हरकोटाच्या खिशात कोंबला. हातावर साठलेलं बर्फ कोटाच्या खिशाच्या उबेत विरघळून खिसा ओला झाला होता. आता माझ्या तोंडावरसुद्धा हिम.. नाकाच्या शेंडय़ावर हिमं.. डोक्यावरच्या टोपीवरसुद्धा मस्त हिमकण साचायला लागले होते. गाईड मात्र या हिमवर्षांवात पुढे जायचं सोडून एका दुकानात शिरली नि तिनं आम्हालाही दुकानात यायला लावलं.
तिथे सगळ्यांनीच ब्लॅक कॉफी घेतली. आत डोकावलो. विणकाम, भरतकाम केलेल्या छान वस्तूंनी दुकान भरलेलं होतं. प्रत्येकानं काही ना काही खरेदी केलीच. एव्हाना हिमवर्षांव थांबला होता. अंधाराला पांगवून पुन्हा सूर्य डोकावला होता आणि त्यानं पसरवलेल्या उन्हात मगाशी जागोजागी थबकलेलं हिम पार वितळून पाणी जमा झालं होतं. या पाण्यात सूर्याचे किरण नाचत होते नि विविध रंग उधळले जात होते. दुकानातून बाहेर पडून चालता चालता हे सगळं एन्जॉय करत असताना आणखी थोडे चालत वर गेलो नि डोळे दिपवणारं दृश्य दिसलं.
आम्ही हंगेरीतल्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या पूर्वीच्या पेस्ट वसाहतीत होतो. आता बुडापेस्ट शहराचा विस्तार इतका झाला होता की आता शहराचा मध्य वाटावा इतकं ते महत्त्वाचं ठिकाण होतं. समोर रोमन कॅथलिक स्टेफन्स बॅसिलिका उभी होती.. त्या आवारात स्टेफन राजाचा अश्वारूढ पुतळा होता. समोर पसरलेल्या मोठय़ा प्रांगणात अनेक टुर्स आलेल्या होत्या. त्यामुळे खरोखर जर कुणी ग्रुप सोडून मागे पडलं तर हरवण्याची भीती होती.
आमच्या गाईडच्या हातातल्या पिवळ्या रुमालाकडे लक्ष ठेवत आम्ही तिच्या मागे त्या गर्दीतही जाऊ लागलो. एका ठिकाणी ती थांबली. आपला सगळा कळप नीट आपल्या मागे आलेला आहे याची खात्री पटल्यावर तिनं तिचा माहितीचा खजिना उघडला. ती सांगू लागली, ‘ इथलं बांधकाम पूर्ण व्हायला ५४ वर्षे लागली. १९०५ मध्ये ते पूर्ण झालं. एवढी वर्षे लागण्याचं कारण इथले दोन भले मोठे बेल टॉवर्स कोसळल्यामुळे बांधकामातली गुंतागुंत वाढली होती. हे बांधकाम रिव्हाइव्हल गोथिक स्टाइलमधलं आहे. अर्थात रिव्हाइव्हल गोथिक स्टाइल म्हणजे नेमकं काय हे आम्हाला मुळीच कळलं नाही पण एक मात्र जाणवलं समोरच्या बॅसिलिकाचं बांधकाम नजर ठरून राहावी इतकं आकर्षक होतं.
बाई पुढे म्हणाल्या, ‘हंगेरीचा पहिला राजा ‘स्टेफन’ याचं नाव या बॅसिलिकाला देण्यात आलंय. या राजाची कारकीर्द अतिशय गाजली. राजाचा अनकरप्ट असा उजवा हात अजूनही इथे चर्चमध्ये ठेवलेला आहे. ज्या कुणाला तो पाहायचा असेल त्यांनी तो पाहून यावा.’
आमच्या ग्रुपमधले काही जण तो पाहायला चर्चमध्ये गेले. बाई अजून माहिती सांगतच होत्या. या बांधकामाची उंची ९६ मीटर आहे आणि ती पार्लमेंट बिल्डिंग एवढी आहे याचा अर्थ हंगेरीत धर्म व राजकारण या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्त्व आहे. दक्षिणेकडे उंच टॉवर दिसत होता आणि एक अवाढव्य घंटाही दिसत होती. तिकडे बोट दाखवत बाई सांगू लागल्या, ‘तो जो टॉवर दिसतोय तिथे असलेल्या घंटेचं वजन ३६४ टन आहे. जर कुणाला त्या घुमटावर जायचं असेल तर इथे लिफ्टची सोय आहे किंवा पायऱ्या चढूनही जाता येतं.
आम्ही लिफ्ट घेऊन वर पोहोचलो आणि अक्षरश: डोळ्यांचं पारणं फिटलं. तिथून अख्खं बुडापेस्ट दिसत होतं. हवा भयंकर जोरात वाहू लागली होती. त्यामुळे गाईड परत फिरण्याची घाई करू लागली नव्हे ती परत फिरलीसुद्धा. नाइलाजाने आम्ही तिच्यामागे धावत सुटलो. वर चढताना जेवढा वेळ लागला त्यापेक्षा निम्म्या वेळात आम्ही खाली उतरलो होतो आणि तिथे आम्हाला न्यायला बस हजर होती.
बसमध्ये बसलो. बस वेगानं पळत होती. आम्ही पुन्हा डॅन्युबच्या काठानं जाऊ लागलो होतो. एका ठिकाणी बसचा वेग अतिमंद झाला. बस जवळजवळ थांबलीच होती त्या वेळी गाईड माईक हातात घेऊन आपल्या सीटवरून उठून उभी राहात म्हणाली, सगळ्यांनी समोर दिसणारी भव्य इमारत पाहावी. या इमारतीत हंगेरीचं पार्लमेंट भरतं आणि या इमारतीची उंचीसुद्धा ९६ मीटर आहे म्हणजे स्टेफन्स बॅसिलिकाच्या उंचीएवढी बरं का! ज्या वेळी आबुदा, पेस्ट आणि बुडा या तीनही वसाहतींनी एक होऊन एकच नगर तयार करायचं ठरवलं त्या वेळी हे पार्लमेंट हाऊस बांधण्यात आलं. आम्ही ऐकत होतो आतापर्यंत पेस्ट आणि बुडा या दोन वसाहतींविषयी ऐकलं होतं आता त्या माहितीत आबुदा या आणखी एका जुन्या वसाहतीविषयी माहिती मिळाली.
बस आता अगदी हार्ट ऑफ द सिटीतून जात होती. रस्त्यावर बरीच वर्दळ होती. आमची बस आता बुडापेस्ट मधल्या जेव्हिश डिस्ट्रिक्ट भागातून चालली होती. बघता बघता बस दोन्ही सिनेगॉग समोर येऊन थांबली.
आम्ही बसमधून खाली उतरलो. आता आम्ही ज्यूंच्या युरोपातल्या दोन प्रार्थनास्थळासमोर उभे होतो. अतिशय भव्य होतं ते प्रार्थनास्थळ. गाईड सांगू लागली, ‘‘आज सॅटरडे असल्यामुळे आपल्याला आत जाता येणार नाही पण हे प्रार्थना गृह इतकं मोठं आहे की आत तीन हजार लोक प्रार्थनेसाठी एका वेळी बसू शकतात.’’
आम्ही ज्यूंच्या प्रार्थना स्थळासमोर उभे होतो आणि त्याच वेळी आमच्यातल्या एका अमेरिकन ज्यू बाईच्या मनातली खदखद बाहेर पडली. आपल्या हातातल्या रुमालाशी चाळा करत एका क्षणी ती म्हणाली, ‘‘महायुद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे विसाव्या शतकात या बुडापेस्टमध्ये सगळ्याच युरोपियन देशातून इतके ज्यू येऊन राहिले होते की या नगरीला ज्यूंची मक्का असे संबोधलं जाई. याच बुडापेस्टमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं नि ज्यूंचं म्हणजे आमच्या लोकांचं हिटलरनं इतकं शिरकाण केलं की मेलेल्यांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त होती. त्याही परिस्थितीत माणुसकीचा प्रत्यय येणारी एक गोष्ट घडली ती म्हणजे बुडापेस्टमधील स्वीस काऊन्सिलरने भराभरा अनेक ज्यूंना स्वीडिश पासपोर्ट देऊन वंशविच्छेदापासून वाचवलं. अशाच एका वाचलेल्यापैकी मी आहे.’’ ते सगळं ऐकलं नि सगळीच खिन्न झाली. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जखमेवरची खपली निघून ती अशी अचानक वहायला लागली असतानाच गाईडनं सगळ्यांना बसमध्ये पुन्हा बसायला सांगितलं नि बस एँदेसी एॅव्हेन्यूच्या दिशेनं पळू लागली. आता जवळजवळ मध्यरात्र असावी इतका अंधार दाटून आला होता. एव्हाना दुपारचे पाच वाजायला आले होते.
गाइड अव्याहत माहिती देतच होती, ‘‘दुसरं महायुद्ध संपलं आणि हंगेरी रशियन आधिपत्याखाली गेलं. १९४९ पासून आमचा देश ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ हंगेरी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हंगेरियन माणूस अतिशय स्वातंत्र्यप्रिय आहे. कम्युनिस्ट राजवटी विरुद्ध या मंडळींनी बंड केलं. २३ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर एवढं आयुष्य या बंडाला लाभलं होतं. सुरुवातीला शांततामय मार्गाने निदर्शनं सुरू होती, पण मग सगळाच नूर पालटला. रशियन रणगाडे बुडापेस्टमध्ये आग ओकत घुसले. स्वातंत्र्यप्रेमी लोकशाहीवादी जनता आणि रशियन सन्य यांच्यात टक्कर झाली. बंड चिरडले गेले. १५ नोव्हेंबपर्यंत तीन हजार लोक शहीद झाले. थोडय़ा काळासाठी तरी लोकशाहीवादी हंगेरियन फोस्रेसनी रशियन सन्याला नमविले होते त्याचे हिरोज स्केअर हे आज प्रतीक आहे. आपण आता सिटीपार्क जवळ पोचलो आहोत आणि आता आपण आलो ‘ìहरो स्केअर’ला. आम्ही पटापटा बसमधून खाली उतरलो.
चौकात मध्यभागी मिलेनियम मॉन्युमेंट उभं असलेलं दिसलं. एका चबुतऱ्यावर स्तंभाभोवती सात घोडेस्वार दिसत होते. हा स्तंभ उंच तरी किती असावा, ३६ मीटर उंच! स्तंभावर आर्चएंजल गॅब्रियलचा पुतळा होता. जवळच्या फलकावर माहिती लिहिलेली होती. तसंच इथे एका अनामिक सनिकाचं थडगंसुद्धा दिसत होतं. शिवाय हंगेरीच्या काही राष्ट्रीय नेत्यांचे पुतळेसुद्धा असल्याची नोंद फलकावरच्या माहितीमुळे आम्हाला झाली. हंगेरीच्या अलीकडील इतिहासात या चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक राजकीय घटना या चौकात घडलेल्या आहेत. रशिया विरुद्ध लोकशाहीवाद्यांनी जो उद्रेक केला त्याचा नेता इमरी नाग्गी (के१ी ठंॠ८). या नेत्याला १९५६मध्ये फाशी देण्यात आलं होतं. रशियन जोखडातून हंगेरी १९८९ मध्ये मुक्त होताच या नेत्याला याच चौकात अडीच लाख लोकांच्या उपस्थितीत पुन्हा सन्मानाने पुरण्यात आलं. असा आहे महिमा या चौकाचा.
जनतेनं रशियन सन्याला ज्या शौर्यानं तोंड दिलं त्या स्मृतीच्या पंधराव्या स्मृतिदिनी हा स्क्वेअर उभारण्यात आला. ते साल होतं २००६. ज्या बुडापेस्ट्चा उल्लेख रशियन लोक अति छद्मीपणानं ‘ईस्ट ब्लॉक मधली आनंदी छावणी’ असा करत असत त्याच बुडापेस्ट्नं आज रशियन फौजांना टक्कर दिलेल्या स्वातंत्र्यप्रेमी वीरांचं स्मारक उभारलेलं आहे. इतिहास चुका दुरुस्त करतोच.’ गाइड हंगेरियन असल्यानं तिच्या भावना हे सांगताना अगदी उचंबळून आल्या होत्या. खरंतर हे सगळं तिनं तिच्या व्यवसायामध्ये अनेक वेळा सांगितलं असेल, पण तरीही ती भावनाशील झालेली आम्ही पाहिली.
अनेकांना खरेदीची हौस भागवून घ्यायची होती त्यामुळे मंडळी अध्र्या तासात परत यायच्या बोलीवर इथल्या अतिशय प्रसिद्ध अशा ख्रिसमस मार्केट्कडे जाण्यासाठी म्हणून इथून जवळ असलेल्या  एम वन मेट्रो लाइनच्या थांब्याच्या दिशेनं जाऊ लागली तेव्हा. ‘ही जगातली सगळ्यात जुनी मेट्रोलाइन आहे, तिची सुरुवात १८८९ ला झाली आणि आज जागतिक वारसा म्हणून तिचा उल्लेख केला जातो.’ गाइड घाईघाईनं बस थांब्याकडे निघालेल्या आणि न निघालेल्या सगळ्यांनाच ऐकू जाइल अशा बेताने म्हणाल्या.
आम्हाला कुठल्याही प्रकारच्या खरेदीत रस नव्हता, पण आता गरमागरम कॉफी मात्र हवीच होती म्हणून मग आम्ही जवळच्या कॅफेत गेलो. तिथे ट्रॅडिशनल हंगेरियन म्युझिक सुरू होतं. गाइडनं आम्हाला आवर्जून बग्ली (ुी्रॠ’्र) खाऊन बघायला सांगितलं होतं. ही इथली परंपरागत िवटर पेस्ट्री आहे. यात खसखस होती. ती खाऊन आणि सोबत ब्लॅक-कॉफी पिऊन आम्ही बसमध्ये येऊन बसलो आणि ठीक ठरलेल्या वेळेला परतीच्या प्रवासासाठी बस मार्गस्थ झाली. अजून मंडळी कशी आली नाहीत वगरे लाड कुणाचेही केले गेले नाही.
अंधार कापत बस वेगानं व्हिएन्नाच्या दिशेनं पळत होती. बुडापेस्टबरोबरच्या औट घटकेच्या डेटिंगवर आलेले आम्ही इथल्या इतिहासाच्या पानांवरून फिरताना या शहराबरोबर अमचं लव्ह अफेअर सुरू झालं होतं. आम्हाला आता या शहरात पुन्हा यावंच लागणार होतं कारण या शहरानं आम्हाला पार पागल करून टाकलं होतं.
(छायाचित्रे – पुडेलेक, न्यूमी, सिव्‍‌र्हटन, अ‍ॅडम क्लिकझेक –  मूळ स्रोत विकिमिडीया कॉमन्स)

– योगिनी वेंगुर्लेकर