29 February 2020

News Flash

भांडारकरांच्या ‘कॅलेण्डर गर्ल्स’

मधुर भांडारकर यांचे चित्रपट असं म्हटलं की, लगेचच प्रेक्षकांना चटकन आठवतात ते ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’ आणि ‘हिरॉईन’ हे त्यांचे चार चित्रपट. त्या तुलनेत

| July 17, 2015 01:11 am

मधुर भांडारकर यांचे चित्रपट असं म्हटलं की, लगेचच प्रेक्षकांना चटकन आठवतात ते ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’ आणि ‘हिरॉईन’ हे त्यांचे चार चित्रपट. त्या तुलनेत ‘कॉपरेरेट’, ‘जेल’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ हे कदाचितचटकन आठवणार नाहीत. याचे एक कारण म्हणजे पहिले चार चित्रपट विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित होते. बारगर्लची दुनिया सर्वसामान्यांना नवलाईची, अनोखी वाटत होती तेव्हा ‘चांदनी बार’ आला होता. तर समाजातील गर्भश्रीमंत वर्ग सोडला तर अन्य कुणालाच ‘पेज थ्री’ संस्कृतीशी काही देणेघेणे असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे अशा काळात आलेल्या ‘पेज थ्री’मधील वास्तवाने सर्वसामान्यांना क्लब कल्चर आणि गर्भश्रीमंतांच्या अंतर्गत घडामोडी-व्यवहारांवर एक प्रकारे ‘क्ष-किरण’ अनुभवता आला. तर ‘फॅशन’मधून मधुर भांडारकर यांनी फॅशन जगतातील स्त्री-मॉडेल्सचे जगणे दाखविले होते.
बारगर्ल्स आणि गुन्हेगारी, गर्भश्रीमंत लोकांची दुनिया आणि फॅशन जगत या तिन्ही क्षेत्रांविषयी सर्वसामान्यांना मनातून वाटणारे सुप्त आकर्षण होते किंवा असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच या विषयांवरील चित्रपट लोकप्रिय झाले.
आता ‘कॅलेण्डर गर्ल्स’ या आपल्या आगामी चित्रपटाद्वारे मधुर भांडारकर ‘कॅलेण्डर’वरील बिकिनी मॉडेल्स आणि मुख्यत्वे प्रिंट अ‍ॅडमधील स्त्री-मॉडेल्स आणि त्यांचे अंतर्गत विश्व यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे या चित्रपटाचा ट्रेलर, टीझर पोस्टर पाहून अंदाज करायला हरकत नाही.
मयुरी, नाझनीन, श्ॉरोन, नंदिता आणि पारोमा अशा पाच तरुणींच्या व्यक्तिरेखांभोवती चित्रपटाची गोष्ट गुंफण्यात आली आहे. पाचही व्यक्तिरेखांची नावेच या पाचही जणी देशांतील निरनिराळ्या भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत हे चटकन समजते. त्याचबरोबर त्यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, आर्थिक-सामाजिक स्तर आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरनिराळा असावा असाही अंदाज करण्यास जागा आहे.
टीझर ट्रेलर नीट पाहिला तर या पाचही प्रमुख व्यक्तिरेखांचे चेहरे दाखविण्यात आले असून त्याचबरोबर पाश्र्वभूमीला एक प्रकारचा विशिष्ट आवाज ऐकू येतो. हा आवाज पाचही व्यक्तिरेखा ट्रेलरमध्ये दिसतात तेव्हा तेव्हा ऐकू येतो. त्यात एक समान धागा आहे असेही म्हणता येईल किंवा यातून कॅलेण्डर मॉडेल्सच्या विश्वातील भयंकर विदारक सत्याची चाहुल असे काहीसे सांगणारा हा ध्वनी असावा असे वाटते.
ट्रेलर पाहूनच हल्ली चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतो असे आजघडीला मानले जाते. काही प्रमाणात ते खरे असले तरी चित्रपट हीट-सुपरहिट होण्याची खात्री मात्र ट्रेलर कितीही प्रभावी असला तरी देता येत नाही. फक्त प्रेक्षकांमध्ये आपल्या चित्रपटाविषयी पुरेसे कुतूहल निर्माण होईल याची काळजी निर्माते ट्रेलर बनविताना घेत असतात. ट्रेलर पाहूनही प्रेक्षकांचे त्या चित्रपटाबाबतचे अंदाज चुकू शकतात.
‘कॅलेण्डर गर्ल्स’मध्ये काय पाहायला मिळणार याचे औत्सुक्य ट्रेलरने निर्माण केले आहे.
‘Photographs are perfect because they are still but life doesn’t stand still’. या चित्रपटाच्या टॅगलाइनवरूनही काही अंदाज बांधता येतात.
मधुर भांडारकरांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रमुख व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने, किंवा खरे तर त्यांच्या बहुतांशी चित्रपटांच्या सर्व प्रमुख व्यक्तिरेखा या स्त्री-व्यक्तिरेखा असतात त्यामुळे असेही म्हणता येईल की, प्रमुख स्त्री व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्रांतील वास्तव टिपण्याचा प्रयत्न भांडारकर करतात.
सात ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘कॅलेण्डर गर्ल्स’ या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटांत चमकलेली अभिनेत्री आकांक्षा पुरी, नवोदित तारका क्यारा दत्त, अवनी मोदी, रूही सिंग आणि सत्रूपा पायने अशा पाच जणी प्रथमच हिंदीच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
भांडारकरांच्या आधीच्या सर्व चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींना भूमिका दिल्या होत्या. परंतु, या चित्रपटाद्वारे प्रथमच भांडारकर यांनी नवोदित अभिनेत्रींना स्थान दिले असून हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on July 17, 2015 1:11 am

Web Title: calendar girls movie
Next Stories
1 एकाच शुक्रवारी चार मराठी चित्रपट
2 विनोदी-रहस्यमय-थरारपट
3 वेगळ्या विषयांची जुगलबंदी
X
Just Now!
X