विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
नर्सिग हे काही करिअर नाही. ती केवळ घरखर्चाला हातभार लावण्यापुरती नोकरी.. गेल्या काही वर्षांत ही प्रतिमा वेगाने बदलत गेली. आज या क्षेत्राचा परीघ खेडेगावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून परदेशांतल्या गलेलठ्ठ पगाराच्या संधींपर्यंत आणि शाळेतल्या नर्स टीचरपासून, विमानातल्या नर्स एअरहोस्टेसपर्यंत विस्तारला आहे. दहावी-बारावीत जेमतेम उत्तीर्ण होणाऱ्यांपासून ते अतिशय उत्तम गुण मिळवणाऱ्यांपर्यंत सर्वानाच या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कारकीर्द सुरू करून डॉक्टरेटपर्यंत पोहोचलेल्या आणि सध्या सिस्टर टय़ुटर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपाली उमाळे निमकर्डे यांच्याशी चर्चा करताना या क्षेत्राचा आवाका आणि त्यातील संधींची व्याप्ती उलगडत जाते.

डॉ. दीपाली स्वतच्या कारकीर्दीविषयी सांगतात, ‘रुग्णसेवेच्या या क्षेत्रातल्या संधींची नीटशी माहिती अनेकांना नसते. मीसुद्धा अशांपैकीच एक होते. वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी करावं अशी इच्छा होती, पण घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी रुग्णालयात जनरल नर्सिग अ‍ॅण्ड मिडवाइफ (जीएनएम) या तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्या वेळी मुलाखत आणि बारावीचे गुण या निकषांवर प्रवेश देण्यात येत असे. जीएनएम पूर्ण करून मी नोकरी करू लागले.’

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

डॉ. दीपाली यांनी सुरुवातीच्या काळात काही खासगी रुग्णालयांत नोकरी केली. त्याविषयी त्या सांगतात, ‘मी पदविका मिळवली तेव्हा सरकारी रुग्णालयांत परिचारिकांची भरती पाच र्वष बंद होती. त्यामुळे काही काळ पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, चर्नी रोडचं पारसी जनरल रुग्णालय अशा विविध खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांत नोकरी केली. अर्थार्जन सुरू झालं होतं पण शिक्षण एवढय़ापुरतंच मर्यादित ठेवणं योग्य वाटत नव्हतं. त्याच सुमारास राज्य सरकारने एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीमसाठी परिचारिकांची भरती करण्यास सुरुवात केली होती. त्यात माझी निवड झाली. २००४ साली मी जे. जे. रुग्णालयाच्या इंडियन नर्सिग एज्युकेशन (आयएनई) या परिचारिका महाविद्यालयात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पोस्ट बेसिक बीएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. खरंतर हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असतो, पण त्यासाठी पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागला असता. मला नोकरी करता करता शिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे मी तीन वर्षांच्या दूरस्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. यात वर्षांतून केवळ दोन महिने प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जावं लागे आणि एरव्ही अधेमधे परीक्षा होत.’

सरकारी सेवेतील परिचारिकांना पाच र्वष सेवा दिल्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम करण्याची मुभा दिली जाते. यात त्यांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या काळात वेतनही दिले जाते. दीपाली यांनी या सुविधेचा लाभ पुढील शिक्षणासाठी घेतला. ‘नोकरी सुरू असताना शिक्षण सुरू ठेवायचं असेल, तर अनेक अटी-शर्तीची पूर्तता करावी लागते. त्यामुळे अशी संधी मिळवणं अतिशय कठीण होऊन बसतं. आमच्या ईएसआयएसच्या सर्व परिचारिकांपैकी अशी संधी मिळवलेली मी एकमेव होते. पहिली दोन र्वष मी विविध महाविद्यालयांच्या सीईटी दिल्या. त्यात मी उत्तीर्ण होत असे, माझी निवडही होत असे, पण सरकारी प्रक्रियेत अडकून राहिल्यामुळे मला प्रवेश घेता येत नव्हता. अनेक प्रकारची कागदपत्रं सादर करावी लागली, विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागल्या. अखेर लीलाबाई ठाकरसी या एसएनडीटी युनिव्हर्सिटीतल्या अतिशय प्रथितयश महाविद्यालयात मला एमएस्सीसाठी प्रवेश मिळाला. त्यासाठी चार सीईटी द्याव्या लागल्या. २०१३ ते २०१५ दरम्यान मी तो अभ्यासक्रम पूर्ण केला.’

एमएस्सी झाल्याबरोबर दीपाली यांना परिचारिका प्रशिक्षणाच्या क्षेत्रात नोकरीची संधी मिळाली. ‘ईएसआयएसला संलग्न असलेल्या एमजीएम रुग्णालयात स्कूल ऑफ नर्सिग हे परिचारिका महाविद्यालय आहे. त्यांच्याकडे शिक्षकांची कमतरता होती. त्यामुळे २०१५मध्ये माझी तिथे सिस्टर टय़ुटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. परिचारिका प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आल्यामुळे या क्षेत्राविषयी अधिक ज्ञान मिळवणं, अभ्यास करणं गरजेचं वाटू लागलं. त्या दृष्टीने पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमच उपलब्ध होते आणि पूर्ण वेळ देणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी जेजेटीयू या राजस्थानातल्या विद्यापीठात प्रवेश घेतला.

पीएच.डी.विषयी त्या सांगतात, ‘एमएस्सीला मी मेडिकल सर्जिकल नर्सिग हा विषय घेतला होता. त्यात हृदयरोगांच्या संदर्भात स्पेशलायझेशन केलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तीन मिनिटांत उपचार सुरू होणं गरजेचं असतं. अन्यथा शरीराच्या विविध अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची, त्याच्या मेंदूच्या पेशी मृत होण्याची भीती असते. नंतर कितीही उपचार केले, तरीही फायदा होत नाही. केवळ योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला प्राण गमावावे लागल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या मी पाहत होते, त्यामुळे पीएच.डी.साठी कार्डिओपल्मनरी रीससिटेशन (सीपीआर) हा विषय निवडला. एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे हे कसं ओळखावं आणि त्याच्यावर त्वरित कोणते उपचार करावेत, याविषयीचं हे शास्त्र आहे. याचा उपयोग परिचारिकांनी कसा करावा, या संदर्भातलं काम मी केलं. एखादा रुग्ण अचानक कोसळतो तेव्हा त्याच्या हृदयात काही प्रमाणात रक्त शिल्लक असतं, शरीराच्या महत्त्वाच्या भागांना त्याचा पुरवठा होत राहिला तर पुढचा धोका टळू शकतो. त्यासाठी आधी रुग्णाची नाडी तपासावी लागते, पण ती तपासण्यात दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवून चालत नाही. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे रुग्णाच्या छातीच्या मधोमध ठेवून छातीवर दाब द्यावा लागतो. तो कशा पद्धतीने द्यावा, किती वेळ द्यावा, किती प्रमाणात द्यावा, तोंडाने श्वास कधी द्यावा, किती वेळा द्यावा, या उपचारांचा क्रम कसा असावा, या चक्राची पुनरावृत्ती किती वेळा करावी याची माहिती परिचारिकांना दिली. एईडी यंत्र किंवा विजेचे सौम्य धक्के देण्याचा पर्याय कधी आणि कसा वापरावा याविषयी मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडून डमीवर प्रात्यक्षिकं करून घेतली. ईएसआयएस रुग्णालयातल्या सुमारे ४२६ परिचारिकांना हे प्रशिक्षण दिलं. त्यांना गरज पडेल तेव्हा संदर्भ घेता यावा म्हणून या उपचारांसंदर्भातला एक व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर सर्वाना उपलब्ध करून दिला. परिचारिकांच्या प्रशिक्षणापूर्वीच्या आणि नंतरच्या कौशल्यांचा विविध निकषांवर अभ्यास केला आणि सांख्यिकीशास्त्राच्या आधारे निष्कर्ष काढले. परिचारिकांच्या प्रशिक्षणात या साऱ्याचा समावेश असतोच, पण बराच काळ असे उपचार देण्याची वेळ आली नाही, तर त्यांना त्याचा विसर पडतो. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी अशी प्रशिक्षणं आयोजित केल्यास आणि व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिल्यास परिचारिकेच्या ज्ञानातही भर पडू शकते आणि रुग्णाचा जीव वाचवण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं त्यातून निदर्शनास आलं. जून २०२०मध्ये माझं पीएच.डी. पूर्ण झालं.’ नर्सिगमध्ये पीएच.डी. केलेल्या व्यक्ती अतिशय मोजक्याच आहेत. राज्यातल्या ईएसआयएस रुग्णालयांतल्या परिचारिकांपैकी पीएच.डी. मिळवलेल्या दीपाली या पहिल्या परिचारिका ठरल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता ईएसआयएसमधल्या अन्यही दोन परिचारिका पीएच.डी.साठी तयारी करत आहेत.

थोडक्यात परिचारिका पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यापासून दीपाली सातत्याने या क्षेत्रातले विविध अभ्यासक्रम करत राहिल्या आणि नवनव्या संधी त्यांना मिळत राहिल्या. १३ र्वष रुग्णसेवा केल्यानंतर त्या गेल्या सहा वर्षांपासून अध्यापन करत आहेत. प्रत्यक्ष रुग्णसेवा करताना मिळालेल्या अनुभवाचा अध्यापनात फायदा होत असल्याचं त्या सांगतात. ‘परिचारिकांचा अभ्यासक्रमच अशा प्रकारे तयार केलेला असतो की १७-१८ वर्षांची नवखी मुलगी तीन वर्षांत एक व्यावसायिक परिचारिका म्हणून सज्ज होऊनच संस्थेतून बाहेर पडते. पहिल्या वर्षी रुग्णांच्या मूलभूत गरजांची काळजी कशी घ्यावी हे शिकवलं जातं. त्यानंतरच्या वर्षी वैद्यकीय आणि शस्त्रक्रियांशी संबंधित विषय शिकवले जातात. शिवाय लहान मुलं, वृद्ध यांची काळजी घेण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तिसऱ्या वर्षी प्रसूतीशास्त्र शिकवलं जातं. या साऱ्याचा प्रात्यक्षिक अनुभवही मिळतो. त्यामुळे कोणतंही काम अचूक आणि तत्परतेने करण्याची सवय या काळात विद्यार्थिनींना लागत जाते.’

‘नवखी विद्यार्थिनी पहिल्यांदाच वॉर्डमध्ये जाते तेव्हा तिच्यासाठी तो एक मानसिक धक्काच असतो. पण त्या अतिशय वेगाने तयार होत जातात. त्यांच्यावर शिस्त, गोपनीयता, समर्पण बिंबवलं जातं. प्रशिक्षणाच्या काळात त्यांच्यात नीतिमत्ता, कष्ट करण्याची तयारी, संयम, रुग्णाचं म्हणणं बारकाईने ऐकण्याची वृत्ती, उत्तम निरीक्षण, आपलं म्हणणं समजावून सांगण्याची क्षमता, रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांविषयी आदर, शिस्त असे गुण विकसित होत जातात. त्या गणवेशाचं, त्या शपथेचं महत्त्व आणि जबाबदारी त्या कधीही विसरत नाहीत.’

परिचारिकेच्या कामातल्या जोखमीविषयी दीपाली सांगतात, ‘परिचारिकेवर थेट जिवंत माणसाच्या आरोग्याची, त्याच्या जीवनाची जबाबदारी असते. त्यामुळे छोटीशी चूकही महागात पडू शकते. आपल्यामुळे रुग्णाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये आणि रुग्णालयाची प्रतिमा डागाळू नये म्हणून परिचारिकांना सतत सावध राहावं लागतं. त्यांना ‘महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल’कडे स्वत:ची नोंदणी करावी लागते. डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही लायसन्स काढावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि या लायसन्सचं दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावं लागतं. त्यासाठी क्रेडेन्शिअल्स मिळवावे लागतात. जीएनएम केलेल्या परिचारिका हे लायसन्स मिळवण्यासाठी पात्र असतात. परिचारिकेकडून काही चुका झाल्यास तिचं लायसन्स आणि ती काम करत असलेल्या रुग्णालयाचीही मान्यता (अ‍ॅक्रेडिशन) रद्द केली जाऊ शकते.’

परिचारिकांना काम करताना अनेकदा जिवावरच्या संकटांनाही तोंड द्यावं लागतं. या संकटांचं गांभीर्य करोनामुळे सर्वानाच समजलं आहे. त्याविषयी दीपाली सांगतात, ‘देशावर जेव्हा असं जैविक संकट येतं तेव्हा परिचारिका संसर्गाच्या आणि मृत्यूच्याही भीतीवर मात करून रुग्णसेवेसाठी सज्ज असतात. कोविडकाळात तर त्यांनी हे सिद्धच केलं आहे. गेलं दीड र्वष अनेक परिचारिका रजा न घेता अथक मेहनत करत आहेत. अनेक परिचारिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोविड होऊन गेला आहे. काहींनी त्यात जीव गमावला आहे. पण म्हणून त्यांनी रुग्णसेवा सोडलेली नाही. अनेकींची लहान मुलं आहेत, काही जणी घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तीन-तीन महिने घरीच गेलेल्या नाहीत, आपल्या मुलांना भेटलेल्या नाहीत. पीपीई किट, मास्क, शिल्ड घालून, तासन्तास काम करण्याचं आव्हान त्यांनी ते स्वीकारलं आहे.’

आपल्या वाटचालीत रुग्णसेवेविषयीच्या आपल्या संकल्पनांत बराच बदल झाल्याचं डॉ. दीपाली सांगतात ‘पदविका ते पीएचडी या प्रवासात परिचारिकेचं काम, जबाबदारी, दायित्व याविषयीच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होत गेल्याचं दीपाली सांगतात. सुरुवातीला केवळ लक्षणं आणि उपचार यावरच लक्ष केंद्रित असे. सर्वाधिक भर हा प्रत्यक्ष सेवा देण्यावर, उपचार करण्यावर असे; पण उच्चशिक्षण घेत गेले तसं शरीरशास्त्रविषयी सखोल ज्ञान मिळू लागलं. आता रुग्णाकडे पाहून त्याची लक्षणं आणि संभाव्य आजाराचा अंदाज येतो. त्यांची मानसिकता अधिक चांगल्या पद्धतीने कळू लागली आहे,’ असं त्या सांगतात. एक काळ असा होता जेव्हा नर्सिग हे विधवा, परित्यक्तांचं, गरजूंचं क्षेत्र म्हणून ओळखलं जात होतं. पण आज शेकडो पर्याय घेऊन ती एक समृद्ध करिअर शाखा म्हणून पुढे आली आहे. अधिकाधिक विद्यार्थी ती स्वीकारू लागले आहेत.

संधी

नर्सिग हे आता केवळ रुग्णालयांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. परिचारिकांसाठी विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत.

  • विमानवाहतूक- एअरोस्पेस नर्स, नर्स एअरहोस्टेस म्हणून विमानतळावर आणि विमानात काम करण्यासाठी परिचारिकांची आवश्यकता असते. इथे वजन, उंची इत्यादी निकषांवरही पात्र ठरावं लागतं.
  • ल्ल सैन्य दले – हे क्षेत्र निवडलेल्या परिचारिकांना वैद्यकीय शिक्षणाबरोबरच रोज सकाळी दोन तास लष्करी प्रशिक्षणही दिलं जातं. काही विशिष्ट रुग्णालयांतच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परिचारिकेचं नियमित प्रशिक्षण घेतलेल्यांनाही नंतर लष्करी परिचारिका म्हणून काम करता येते. फक्त त्यासाठी त्यांना शारीरिक क्षमतेचे निकष पूर्ण करावे लागतात.
  • साथरोग- साथरोगांच्या नियंत्रण आणि निर्मूलनात परिचारिकांची (एपिडेमिऑलॉजिस्ट नर्स) भूमिका फार महत्त्वाची आसते. साथीच्या सुरुवातीला जेव्हा रुग्णसंख्या नगण्य असते, तेव्हाच या परिचारिका यंत्रणांना त्या संदर्भातली माहिती देतात. प्रसाराचं प्रमाण, मृत्यूदर अशी सर्व माहिती त्या रोज संकलित करतात. त्या आधारे त्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या जातात. पाहणी आणि जनजागृती केली जाते. औषधांचं वाटप केलं जातं. मलेरिया, कांजिण्या, गॅस्ट्रो या आणि अशा किती तरी साथी थोपवण्यात आणि पसरल्याच, तर त्वरित नियंत्रणात आणण्यात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते.
  • क्लिनिकल नर्स स्पेशालिस्ट- परदेशांत ही एक महत्त्वाची शाखा आहे. यात परिचारिकांनाही डॉक्टरांप्रमाणे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याची, आजाराचं निदान करून रुग्णाला औषधं देण्याची परवानगी असते. तिथे अनेक रुग्ण आधी अशा नर्स प्रॅक्टिशनरकडेच जातात. भारतातही ‘इंडियन नर्सिग काऊन्सिल’ने काही राज्यांत या स्वरूपाचं शिक्षण देणारा ‘नर्स प्रॅक्टिशनर’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. एम.एस्सी. केलेल्या परिचारिका या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतात. त्या डॉक्टरांची मदत न घेता स्वत: प्रसूती करू शकतात. आपल्याकडे बेंगळूरु आणि गुजरातमध्ये अशा प्रकारे प्रसूती करण्यास परवानगी आहे. या परिचारिका स्वत:चं सूतिकागृहही सुरू करू शकतात. त्यांना केवळ एक डॉक्टर नियुक्त करावा लागतो. अचानक काही गुंतागुंत झाली, तर तो साहाय्य करतो.

महाराष्ट्रात लवकरच अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरूहोण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत डॉक्टरांची कमतरता नेहमीच भासते. त्यामुळे तिथे परिचारिकांनाच दोन र्वष प्रशिक्षण देऊन रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. नर्स प्रॅक्टिशनरच्या दिशेने उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

  • समुपदेशक- काही वेळा रुग्णांचं शस्त्रक्रियेपूर्वी किंवा रुग्णालयातून घरी पाठवताना समुपदेशन करणंही आवश्यक असतं. त्यांच्या मानसिक स्थितीचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. समुपदेशक परिचारिका (नर्स काऊन्सिलर) त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र- येथील परिचारिका आजार होऊच नयेत, साथी पसरू नयेत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामीण भागांत पाच हजार लोकवस्तीसाठी एक आरोग्य उपकेंद्र असतं. अशा प्रत्येक उपकेंद्रात दोन परिचारिका असतात, तिथे डॉक्टर नेमलेले नसतात. या परिचारिका वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती, सर्वेक्षण करतात आणि एखादी साथ पसरत असल्याचं आढळल्यास लगेच प्रतिबंधात्मक उपचार सुरू करतात. शिवाय गर्भवतींना मार्गदर्शन करणं, त्यांची वेळच्या वेळी तपासणी, काही गुंतागुंत आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार मिळवून देणं ही कामं या परिचारिका करतात. ‘ऑक्सिलिअरी नर्स अ‍ॅण्ड मिडवाइफ’ (एएनएम) हा बारावीनंतर दोन र्वष कालावधीचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना इथे संधी मिळू शकते. जिल्हा रुग्णालयांत हे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एनएनएम केलेल्या सात परिचारिका आणि जीएनएम पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेली एक परिचारिका असते.
  • ब्रदर- परदेशात जम बसवण्याची संधी असल्याचं पाहून आता अनेक पुरुषही या क्षेत्राकडे वळू लागले आहेत. भारतातही त्यांच्यासाठी काही संधी खुल्या होऊ लागल्या आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णवाहिकेत रुग्णावर प्रथमोपचार करण्यासाठी, अलीकडे आलेल्या मोटारसायकल रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रात, मानसोपचारांच्या क्षेत्रात त्यांना संधी मिळू लागली आहे. पूर्वी ब्रदर्सना प्रसूती करण्याची परवानगी नव्हती, पण आता तीदेखील देण्यात आली आहे. वृद्धाश्रमांतही त्यांना संधी आहे.
  • परिचारिका अधीक्षक- लहान रुग्णालयांत मेट्रन आणि असिस्टन्ट मेट्रन असतात आणि मोठय़ा म्हणजे जिथे हजारपेक्षा जास्त बेड आहे, अशा रुग्णालयांत परिचारिका अधीक्षक (नर्स सुपरिटेण्डण्ट) असतात.
  • औद्योगिक- १०० पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांत ऑक्युपेशनल नर्स, इण्डस्ट्रिअल नर्सची नेमणूक करणं बंधनकारक आहे, अपघात झाल्यास त्वरित उपचार करून नंतर कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करणं ही तिची जबाबदारी असते.
  • शस्त्रक्रिया- शस्त्रक्रियेत मदत करणाऱ्या परिचारिकांना (ऑपरेशन थिएटर नर्स) शस्त्रक्रियेची तयारी कशी करायची, संसर्ग नियंत्रणात कसे ठेवावेत, शस्त्रक्रियागृह र्निजतुक कसं करावं, कोणत्या शस्त्रक्रियेसाठी कोणती उपकरणं लागणार आहेत इत्यादी माहिती असते. शस्त्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कामं आणि शेवटी टाके घालून ड्रेसिंग करणं अशी सर्व कामं त्या लीलया करतात.
  • रिकव्हरी- रिकव्हरी नर्स हादेखील एक प्रकार आहे. शस्त्रक्रिया झालेला रुग्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत त्याची काळजी घेणं ही या परिचारिकेची जबाबदारी असते.
  • प्रशिक्षण- परिचारिका प्रशिक्षणातही अनेक संधी आहेत. व्याख्याते, साहाय्यक व्याख्याते, प्राध्यापक, प्राचार्य या पदांवर काम करता येतं.
  • अन्य- बालकांसाठीच्या परिचारिका (पिडियाट्रिक नर्स), वृद्धांना सेवा देणाऱ्या परिचारिका (जिरिअ‍ॅट्रिक नर्स), मनोरुग्णांना सेवा देणाऱ्या (सायकियाट्रिक नर्स), मृत्युशय्येवर असणाऱ्यांचं आयुष्य सुकर करणाऱ्या परिचारिका (हॉस्पाइस नर्स) अशा विविध शाखा आहेत. संशोधन करणाऱ्या परिचारिका (नर्स रिसर्चर), घरी जाऊन सेवा करणाऱ्या परिचारिका (होम केअर नर्स), आयसीयूमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिका (क्रिटिकल केअर नर्स), रुग्णालय प्रशासन- संपूर्ण रुग्णालयाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या परिचारिका (नर्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटर), कर्करुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिका (नर्स ऑन्कॉलॉजिस्ट), क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडर, नर्स अ‍ॅडव्होकेट इत्यादी.

वेतन

सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील परिचारिकांच्या वेतनात प्रचंड दरी आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून नुकत्याच बाहेर पडलेल्या परिचारिकांना खासगी रुग्णालयांत अवघं २० हजार रुपये वेतन मिळतं. त्याच वेळी राज्य सरकारी रुग्णालयांत रुजू होणाऱ्या परिचारिकांना सुरुवातीलाच ४५ हजार रुपये तर केंद्र सरकारी रुग्णालयांत रुजू होणाऱ्यांना तब्बल ६०-६५ हजार रुपये वेतन मिळतं. खासगी रुग्णालय अगदी नामांकित असलं, तरी परिचारिकांना अतिशय तुटपुंजंच वेतन दिलं जातं. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील ही वेतन तफावत दूर करण्यात यावी, अशी मागणी परिचारिका अनेक वर्षांपासून करत आहेत.

आव्हानं

अलीकडे या क्षेत्रातला आर्थिक मोबदला आणि नोकरीच्या मुबलक संधी पाहून अनेक मुली आणि मुलंदेखील परिचारिका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, पण प्रत्यक्ष शिक्षण-प्रशिक्षण सुरू झालं की खरी आव्हानं काय आहेत हे त्यांना कळू लागतं. केवळ अर्थार्जनासाठी हा पर्याय स्वीकारल्यास भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक असते. बारावीनंतर आपले मित्र जेव्हा महाविद्यालयीन जीवनाचा आंनद घेत असतीत तेव्हा आपण पूर्णपणे अभ्यासात गुंतून पडलेले असतो. १३ विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. शिवाय केवळ अभ्यास पुरेसा नसतो. रुग्णाची काळजी घेण्याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षणही घ्यावं लागतं. १७-१८ वर्षांच्या किशोरवयीन मुलींसाठी रुग्णसेवा शिकणं हे एक आव्हान असतं. सरकारी रुग्णालयांत विविध प्रकारचे रुग्ण येतात. त्यातील काही अतिशय जर्जर असतात, अस्वच्छ असतात, रस्त्यांवर राहणारे महिनोन्महिने अंघोळ न केलेले, दात न घासलेले, केस न धुणारे, व्यसनाधीनही असतात. त्यांच्यावर उपचार करणं हे कोणत्याही नवख्या विद्यार्थिनीसाठी एक मोठं आव्हान असतं. पण हळूहळू त्यांना त्यांच्यावरच्या जबाबदारीचं भान येऊन त्या सराईत होत जातात.

शिक्षण संपवून प्रत्यक्ष नोकरीच्या प्रवाहात आल्यानंतरही ही आव्हानं कायम राहतात. आपल्याकडे परिचारिका क्षेत्रात मनुष्यबळाची नेहमीच कमतरता असते. आयसीयूमध्ये दर तीन रुग्णांसाठी एक परिचारिका असं प्रमाण राखणं आवश्यक असतं, पण आपल्याकडे ते कधीच राखलं जात नाही. त्यामुळे परिचारिका सतत कामात गुंतलेल्या असतात. काही वेळा जेवायलाही वेळ मिळत नाही. ६०-७० रुग्णांच्या वॉर्डमध्ये एखाद्या रुग्णाची अवस्था अचानक गंभीर झाल्यास काय करायचं याचंही भान परिचारिकेला ठेवावं लागतं. विविध शिफ्ट्समध्ये काम करावं लागतं.

पात्रता

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. काही अभ्यासक्रमांसाठी सीईटी द्यावी लागते. परिचारिका होण्यासाठी शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणं आवश्यक आहे. मोठं शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना परिचारिका अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात नाही. रंगांधळेपणा, दृष्टिदोष, गंभीर अपंगत्व, हृदयरोग असलेल्या व्यक्तींना प्रवेश मिळू शकत नाही. सौम्य स्वरूपाचं अपंगत्व असेल आणि त्यामुळे कामात काही अडथळा येणार नसेल, तर मात्र प्रवेश मिळू शकतो.