विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

सत्यं वद ।  र्धम चर।

स्वाध्यायान्मा प्रमद: ।

तैत्तरिय उपनषिदातील हा उपदेश करिअरच्या मार्गावर जाण्यापूर्वीपासून ते अगदी अंतिम श्वासापर्यंत सर्वानीच लक्षात ठेवावा आणि आचरणात आणावा असाच आहे. हल्ली सर्वच अभ्यासक्रमांचे आणि त्यातही खासकरून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेव फुटले आहे. त्यासाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत;  त्यासाठी शिबिरे- कार्यशाळादेखील घेतल्या जातात. मात्र अभाव आहे तो आपण कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर वागायचे कसे हे सांगणाऱ्या किंवा एकूणच व्यवसायातील नीतिमत्तेविषयी सांगणाऱ्यांचा. कारण याचे वर्ग कुठेच घेतले जात नाहीत. नाही म्हणायला अनेक अभ्यासक्रमांमध्ये तोंडी लावण्यापुरता या नीतिमत्तेच्या धडय़ांचा समावेश केलेला असतो. वैद्यकीय किंवा सनदी लेखापालांसारख्या  काही क्षेत्रांमध्ये मात्र त्या व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वी शपथ घ्यावी लागते. या शपथेपासून ढळल्यास थेट कारवाईची टांगती तलवार असते. मात्र असे अनेक व्यवसाय आहेत की, जिथे अशा प्रकारची कोणतीही शपथ घ्यावी लागत नाही आणि कोणत्याही कारवाईची टांगती तलवारही नसते; साहजिकच अनाचाराला मुक्त वाव असतो. मात्र आपणच आपल्या ध्येयाविषयी सजग असायला हवे आणि आपल्याभोवती स्वयंशिस्तीचे एक कुंपण आपणच घातलेले असेल तर मग अनेक आव्हानांना सामोरे जाताना किंवा नीतिमत्तेविषयीच्या प्रश्नांना आपल्या व्यवसायात- नोकरीत सामोरे जाताना अडचण येत नाही. कारण आपल्या डोक्यातील कल्पना सुस्पष्ट असतात.

तैत्तरिय उपनिषदातील हा उपदेश अगदी सोपा आहे. सत्यं वद म्हणजे खरे बोला. र्धम चर यात धर्म म्हणजे हिंदूू किंवा इतर धर्म नव्हे तर कर्तव्यपालन या अर्थाने इथे धर्म हा शब्द आला आहे. आणि स्वाध्यायान्मा प्रमद: याचा अर्थ अभ्यास करायला चुकू नकोस/ अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस किंवा अभ्यासात निष्काळजीपणा करू नकोस. हा सारा नीतिमत्तेचा भाग आहे. नीतिमत्ता असा शब्द आला की, अनेकांना असे वाटते की, हे तत्वज्ञान आहे. तर हे कायम लक्षात ठेवायला हवे की, तो तत्त्वज्ञानापेक्षाही आचारणाचा भाग अधिक असतो. आपणच आपल्या आचरणासाठी तयार केलेली संहिता म्हणजेच नीतिमत्ता होय. ती इतरांनी सांगितलेली म्हणून नव्हे तर आपल्याला पटते म्हणून आचरणात आणायला हवी. आणि यात चूक किंवा बरोबर असे दोनच पर्याय असतात. ‘चूक किंवा बरोबर यांच्यामधला’ असा कोणताच पर्याय अस्तित्वात नसतो. सत्यही नाही आणि असत्यही नव्हे असे काही नसते. सत्य किंवा असत्य एवढेच दोन पर्याय असतात. या नीतिमत्तेतून माणसाचे चारित्र्य उभे राहते. या चारित्र्याकडे समाजाचे लक्ष असते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाज टळत नाही किंवा टाळता येत नाही. तुमच्या नीतिमत्ता पालनातून तुमच्याविषयी, तुमच्या कामाविषयी आदरभाव तयार होतो आणि त्यातून तुमच्याविषयीची विश्वासार्हता समाजात तयार होते. विश्वासार्हता ही पैशांत विकत घेता येत नाही ती आपल्या आचरणातून, चांगल्या कामांतून व्यक्तीला कमवावी लागते. आपल्या कामामध्ये आपले हितसंबंध जोडले गेलेले नसतील तर कोणताच ठपका आपल्यावर कधी येणार नाही आणि चारित्र्य निर्दोष राहील. अन्यथा लौकिकार्थाने कदाचित मोठेही होता येईल मात्र खासगीत चर्चा होईल ती मात्र चांगली नसेल. केवळ आपणच आपल्या जाणीव व नेणीव या दोन्ही अवस्थांमध्ये याविषयी सजग असू तर आयुष्यात अडचणींचे पर्वत आले किंवा आमिषे आली तरी आपला मेहूल चोक्सी किंवा घोटाळावीर होणार नाही. याच सजगतेविषयी समर्थ रामदासस्वामी म्हणतात, सावधपण सर्वविषयी!

सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा

यशस्वी भव!