lp00कमी मार्क मिळाले म्हणून निराश होणाऱ्या, आयुष्यात आता काही उरले नाही असा विचार करणाऱ्यांनी प्रकाश अंबुरेंचे विलक्षण असे व्यावसायिक करिअर समजून घेतले तर निराशा त्यांच्या आसपासही फिरकणार नाही..

‘‘शाळेत तुम्ही किती गुण मिळवलेत हे नंतर उभ्या आयुष्यात तुम्हाला कुणीही विचारत नाही. त्यातही तुम्ही यशस्वी झालेले असाल, तर मग प्रश्नच येत नाही. त्यामुळे शाळेत कमी मार्क मिळाले म्हणून आशावाद हरवून बसू नका. शाळेतले मार्क म्हणजे अंतिम सत्य नाही. माझ्या अनुभवातून मी हे सांगतो आहे. शाळेत असतानाचे माझे मार्क नेहमी जेमतेम किंवा सर्वसाधारणच असायचे; पण आयुष्याच्या परीक्षेत मात्र आज माझी गणना यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये होते. मी आज यशस्वी उद्योजक आहे. केवळ आपल्यात राज्यात नाही, तर परराज्यात म्हणजे थेट राजस्थानात जाऊन मी माझ्या यशाची गुढी उभारली, ज्याचा अभिमान समस्त महाराष्ट्रीयांना वाटावा.. जबरदस्त निरीक्षणशक्ती, मेहनत घेण्याची तयारी, संयम आणि प्रयत्नांमध्ये सातत्य व आपण यशस्वी होणारच या स्वत:च्या धारणेवर श्रद्धा असेल, तर यश नक्कीच तुमचे आहे!’’
राजस्थानातील यशस्वी उद्योजक असलेले अस्सल मराठमोळे नाव म्हणजे प्रकाश अंबुरे. राजस्थानातील दगडखाणींचे मालक, त्याच्याशी संबंधित उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि हृदयशस्त्रक्रियेत लागणाऱ्या स्टेंटच्या अत्याधुनिक व्यवसायामध्ये पदार्पण करण्याच्या बेतात असणारे अंबुरे ‘लोकप्रभा’ करिअर विशेषांकाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याने lp12व्यथित झालेले अंबुरे म्हणतात, आयुष्य शाळा-महाविद्यालयापेक्षाही खूप मोठे आहे. आपल्या कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी नंतरही आयुष्यात येतात, यावर विश्वास ठेवा आणि वाटचाल करा.
मुंबईत गिरगावातील झावबाच्या वाडीत असलेल्या दिव्याची चाळीमध्ये अंबुरेंचे बालपण एकत्र कुटुंबामध्ये गेले. वडिलांनी नोकरी सोडली आणि ते शेती करण्यासाठी कोकणात गेले. अंबुरे मग सुरुवातीला भांडुपला, तर नंतर बोरिवलीला असे काकांसोबत राहिले. आज आपण जे काही आहोत, त्यात काका-काकींचे योगदान खूप मोठे असल्याचे ते मान्य करतात. काका-काकूंना मूल झाल्यानंतरही त्यांची माया आटली नाही किंवा मुलांमध्ये असलेला अग्रक्रम बदलला नाही. कुटुंबाची ही साथ नंतरही खूप महत्त्वाची ठरली. यशस्वी उद्योजकाला कुटुंबाची साथ तेवढीच महत्त्वाची असते, अंबुरे नमूद करतात.
नववीला बोरिवलीत श्रीकृष्ण नगरातील चोगले शाळेत असतानाच प्रथम पैशांचे महत्त्व कळले, ज्या वेळेस आर्थिक अडचण निर्माण झाली. मग शाळेत असतानाच कंदील विकणे, फटाके विक्री करणे सुरू झाले. वटपौर्णिमेच्या वेळेस फणस, आंबे विकले, असे अनेक अनुभव अंबुरे सांगतात. ती आपल्यातील उद्योजकाची सुरुवात होती, असे आज लक्षात येते. शाळेतील शिक्षक आणि मित्रांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.
अकरावी-बारावीत असताना अर्धवेळ कामही केले, कारण त्याशिवाय महाविद्यालयात शिकणे परवडणारे नव्हते. निराला मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये नोकरी केली. तरीही भागेना. अखेरीस बारावी अर्धवट सोडावी लागली. मग जाहिरात वाचून ‘डाका सिरॅमिक्स अ‍ॅण्ड केमप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या फर्नेस मटेरियलचे काम करणाऱ्या कंपनीमध्ये दाखल झालो. उरणला प्रशिक्षण झाले आणि सुपरवायजर म्हणून कामाला सुरुवात केली. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या प्रसिद्ध वैज्ञानिक अलमेत्रा पटेल. अचानक उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली. त्या वेळेस शिफ्ट्स वाढवून उत्पादन वाढविता येईल, असे अंबुरेंनी सांगितले. जबाबदारी घेतली आणि यशस्वीरीत्या पारही पाडून दाखवली. ५० टनांचे उत्पादन थेट २५० टनांपर्यंत वाढवत नेले. दरम्यानच्या काळात आर. जे. मेहता यांची युनियन कंपनीत दाखल झाली आणि मग प्रकरण संपापर्यंत गेले. कंपनी बंद पडली, पण तोपर्यंत अंबुरे यांनी उत्पादन ३१० टनांपर्यंत नेले होते. हे सारे सुरू असताना हिलेल जुडा हे कंपनीचे व्यवस्थापक होते. शिवाय परमेश्वरन नावाचे एक सहअधिकारीही होते. जुडा आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
कंपनी बंद पडल्यानंतर अश्रू गाळत न बसता अंबुरे यांनीच पुढाकार घेतला आणि जुडा व परमेश्वरन यांना प्रश्न केला की, आपण राजस्थानवरून कच्चा माल घेऊन याच तंत्रावर नवीन फॅक्टरी चालवायची का? अंबुरे म्हणतात, आजही आठवते, ठाण्याला तलावपाळीला एक तांबे हॉटेल होते, तिथे बसून आम्ही ही चर्चा केली होती. मॅन्युफॅक्चिरग आवडायचे आणि ते आपल्याला जमतेही आहे, हे तोपर्यंत लक्षात आले होते. स्टील किंवा कोणत्याही धातूसाठी लायनिंग मटेरिएल म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडाची भुकटी करण्याचे हे काम होते. प्रश्न असा होता की, परप्रांतात म्हणजे राजस्थानला कोण जाणार?
उद्योजक व्हायचे तर नवीन प्रांत धुंडाळावे लागतात आणि धोकेही पत्करावे लागतात. नवीन आव्हाने स्वीकारल्याशिवाय मोठे होता येत नाही. उद्योगाची कल्पना मनात आली त्याच वेळेस ठरवले होते की, लागेल ते आपणच करायचे, प्रकाश अंबुरे सांगत होते. मग जुडा, परमेश्वरन यांनी नातेवाईक मित्रांकडून पैसे गोळा केले. मी काकांना सांगितले, काका- काकी दोघेही पाठीशी ठाम उभे राहिले. काकीने तिचे दागिने गहाण टाकले. राजस्थान गाठले, ज्यांच्याकडून कच्चा माल घ्यायचा त्यांच्याशी पाच वर्षांचा करार केला. जे आपल्याकडे नाही ते बाहेरून घ्यायचे ठरवले. सुरुवातीला केवळ दोनच कामगार होते. त्याचे नंतर एक एक करत ३० कामगार झाले. पहिली फॅक्टरी ‘जे. पी. मिनरल’ अशा प्रकारे सुरू झाली. या सर्व कालखंडात बायको छाया पूर्णपणे पाठीशी उभी राहिली. नुकतेच लग्न झाले होते, पण तिने कोणतीही कुरकुर केली नाही.
दरम्यानच्या काळात कच्च्या मालाची गुणवत्ता घसरू लागली आणि असे लक्षात आले की, उत्पादनाची गुणवत्ता घसरू द्यायची नसेल, तर खाणीतून येणारा माल आपलाच असला पाहिजे. तरच आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवता येईल. प्रकाश अंबुरे पुढे सांगतात, हे लक्षात आल्यानंतर मी खाण व्यवसायात उतरलो. चार खाणी घेतल्या, त्यामुळे मग आता खाणींतून येणारा कच्चा माल चांगला मिळू लागला, कारण खाणी स्वत:च्या होत्या.

मी खरे तर कोकणातून आलो आहे. त्यामुळे मला शेतीची आवड आहे. आताशा शेती फारशी फायदेशीर राहिलेली नाही, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. त्याला मला यशस्वी छेद द्यायचा आहे. मी त्यासाठीचा शोधही पूर्णत्वास आणला आहे.

अनेकांना वाटते की, व्यवसाय-उद्योगामध्ये आपण स्थिरावलो की काम झाले. मग आयुष्यभर काही पाहायला नको, पण उद्योगात असे कधीच होत नाही. काळाप्रमाणे बदलावे लागते. कायमस्वरूपी असे काहीच नसते. खाण उद्योगात काळाबाजार वाढला, राजकीय व पोलिसी हस्तक्षेप वाढला, त्या वेळेस लक्षात आले की, आपल्याला आता काही तरी वेगळे करावे लागणार. मग त्या वेळेस हळूहळू आवरते घेण्यास सुरुवात lp14केली. आणि ग्राइंडिंगचे काम करणारी ‘सरस्वती एन्टरप्रायझेस’ ही कंपनी आईच्या नावाने सुरू केली.
दरम्यानच्या काळात आणखी एक नवा उद्योग सुरू केला होता तो होता एचडीपी बॅगचा. या बॅग हा तयार झालेला माल भरण्यासाठी लागायच्या. त्याच्या वाढत्या किमती पाहून मनात आले की, हा उद्योग आपणच का सुरू करू नये. मग माहीतगार माणसे सोबत घेतली आणि प्लास्टिक बॅगचा व्यवसाय सुरू केला. प्रथम आमच्या उद्योगाला लागणाऱ्या बॅगा तयार करायचो आणि मग उरलेल्या बाजारपेठेत विक्री करायचो. हा तोच कालखंड होता की, ज्या वेळेस मुलगाही मोठा झाला. पुण्यात एमआयटीमधून त्याने मेकॅनिकल इंजिनीअिरग पूर्ण केले आणि तोही व्यवसायात उतरण्याच्या बेतात होता. त्यानेही ग्राइंडिंगपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत मित्र भागीदार म्हणून होते. तिथे या व्यवसायासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा प्रश्न आला त्या वेळेस अंबुरेंच्या लक्षात आले की, आपण एवढा काळ या व्यवसायात आहोत, की थोडे तांत्रिक ज्ञान कामाला लावले, तर त्याची यंत्रणाच आपण उभी करू शकतो. शिवाय मग त्याची निर्मिती करून ती इतरांनाही विकू शकतो. मग त्यांच्या नेहमीच्या धाटणीने त्यांनी त्यालाही हात घातला आणि तिथेही त्यांना व त्यांचा मुलगा अभिजित याला यश आले.
दरम्यानच्या काळात खाण व्यवसायातून बाहेर पडून काही चांगले करता येईल का याचा शोध घेणाऱ्या प्रकाश अंबुरे यांना लक्षात आले की, आताचा जमाना हा स्वच्छ इंधनाचा आहे. पर्यावरणास अनुकूल असे इंधन हा भविष्याचा मंत्र असणार आहे. शोध घेत अखेरीस ते एका उत्पादनावर स्थिरावले. शेतीमधून तयार होणाऱ्या कचरा कॉम्पॅक्टरमध्ये वापरून त्यापासून ब्रॅकेट व्हाइटकोलची निर्मिती त्यांनी केली. सध्या हा उद्योग उत्तम चालला आहे.
मुलगा अभिजित तोपर्यंत वडिलांच्या मागे लागला होता. अनुभवातून आलेल्या ज्ञानाला तुम्ही शिक्षणाचा पाया द्या, असे त्याचे म्हणणे होते. मग मुलाच्या विनंतीवरून त्यांनी एस. पी. जैन मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट या मुंबईतील प्रख्यात कॉलेजमधून वयाच्या पंचेचाळिशीत एमबीए पूर्ण केले. अंबुरे म्हणतात, या एमबीएमध्ये खूप काही नवीन शिकायला मिळाले. त्यातून आणखी काही नवीन उद्योगाच्या कल्पना मिळाल्या. माझ्यासारखेच नवी कल्पक उद्योजक असलेले मित्र मिळाले. तुम्ही कुणासोबत राहता, वावरता हेही तेवढेच महत्त्वाचे असते. आता अंबुरे यांनी आयुष्यातील एक मोठा टप्पा पार करून हनुमान उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक हृदयरुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करावी लागते. त्यासाठी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक स्टेंट म्हणजेच स्प्रिंग टाकली जाते. रक्तप्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम ही स्टेंट करते. या स्टेंटला खूप मागणी आहे. आता या स्टेंटमध्येही अद्ययावतता आली असून काम संपल्यानंतर चक्क विरघळून जाणाऱ्या अशा स्टेंटची निर्मिती करण्याचा विडा उचललेल्या कंपनीने अंबुरे यांची कारकीर्द पाहून त्यांना भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेकांना वाटते की, व्यवसाय-उद्योगामध्ये आपण स्थिरावलो की काम झाले. मग आयुष्यभर काही पाहायला नको, पण उद्योगात असे कधीच होत नाही. काळाप्रमाणे बदलावे लागते. कायमस्वरूपी असे काहीच नसते.

याशिवायही आणखी काही करणे आता बाकी आहे काय, या प्रश्नावर तेवढय़ाच उत्साहाने अंबुरे म्हणतात, हो तर, बरेच काही बाकी आहे. मी खरे तर कोकणातून आलो आहे. त्यामुळे मला शेतीची आवड आहे. शेती करण्याचे स्वप्न आहे. अर्थात ती मी केलेली शेती असल्याने त्यातही तुम्हाला निश्चितच खूप नावीन्यपूर्ण प्रयोग पाहायला मिळतील. आताशा शेती फारशी फायदेशीर राहिलेली नाही, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. त्याला मला यशस्वी छेद द्यायचा आहे. मी त्यासाठीचा शोधही पूर्णत्वास आणला आहे. वनौषधींची निवडही केली आहे. आता पुढच्या काळात मुख्य उद्योगातून बाजूला होत मी शेतीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
नववीत असताना वटपौर्णिमेला आंबे-फणस, तर दिवाळीत कंदील विक्री करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता हृदयविकारावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटपर्यंत पोहोचला आहे. अंबुरे यांचा प्रवास केवळ कौतुकास्पदच नाही, तर शालेय शिक्षणामध्ये फारशी प्रगती दाखवू न शकलेल्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. त्याबाबत प्रकाश अंबुरे म्हणतात, शालेय जीवनातील मार्क म्हणजे अंतिम सत्य नाही हे लक्षात ठेवा. जबरदस्त निरीक्षणशक्ती, मेहनत घेण्याची तयारी, काळाप्रमाणे बदलण्याची मानसिकता आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची धमक असेल, तर उद्योग क्षेत्रात तुमचे स्वागतच आहे.
राजस्थानसारख्या परक्या प्रदेशात जाऊन स्थिरावणे सोपे नव्हते, कारण तिथे मित्र-नातेवाईक कुणीच नव्हते. भाषा शिकण्यापासून सुरुवात होती. ते सारे आत्मसात केले. आता त्यांना मी त्यांच्यातीलच एक वाटतो.
व्यवसायासाठी म्हणून अनेकदा आपल्या आवडीनिवडीही बाजूला ठेवाव्या लागतात, हेही तरुणाईने लक्षात घेतले पाहिजे, अंबुरे सांगतात. राजस्थानातील या व्यवसायाशी संबंधित बरीच मंडळी ही जैन होती. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ शाकाहारच केला जायचा. त्यामुळे मीही आता पक्का शाकाहारी झालोय. सुरुवातीला व्यवसायासाठी म्हणून पूर्ण शाकाहार स्वीकारला. आता त्याचे फायदे लक्षात आल्याने आनंदीच आहे.
व्यवसायामध्ये खूपदा अडचणी येतात. एखादी गोष्ट आपल्याला येत नसते आणि नेमकी तीच गरज म्हणून उभी राहते, अशा वेळेस काय करायचे, असा यक्षप्रश्न असतो. मग लोक उगाचच जी गरज आहे ती मुळापासून शिकण्यामध्ये वेळ घालवतात. अशा अडचणी मलाही आल्या, पण मी त्या सर्व गोष्टी स्वत: करण्यात वेळ नाही घालवला, तर त्या गोष्टी येणारी तज्ज्ञ माणसे जोडली. त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित केले आणि त्यांनी माझ्याचकडे केलेले काम त्यांच्यावर लक्ष ठेवत असताना शिकूनही घेतले. व्यवसाय-उद्योगात नियोजनाला सर्वाधिक महत्त्व असते. तुम्ही किती शिकला आहात, यापेक्षा तुम्ही शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी कशी करता, याला अधिक महत्त्व असते. तुम्ही किती चांगले नियोजनकार आहात, यावर तुमचे यश अवलंबून असते.
काळाप्रमाणे बदलता येणे हाही उद्योगामधला सर्वात महत्त्वाचा गुणविशेष असतो. तुमच्यामध्ये कामाची लवचीकता असावी लागते. कोणत्याही क्षणी नवीन क्षेत्र समोर उभे ठाकले, तर त्याला सामोरे जाता यायला हवे. सर्वात महत्त्वाचा सोबत असतो तो तुमचा आत्मविश्वास. हा तुम्हाला तुमच्या कामामधून येतो. नववीत विकलेले फणस आणि कंदील यांनी त्याचा पाया रचला. त्याच्याच बळावर आज माझी उद्योगाची इमारत उभी आहे, अंबुरे सांगतात.
विनायक परब