11 July 2020

News Flash

मूलभूत विज्ञान : मूलभूत विज्ञानातील संधी

सर्वोच्च गुण मिळवणारे वैज्ञानिक होतीलच असे नाही. खरे तर बहुतांश वैज्ञानिक आपापल्या शैक्षणिक कारकीर्दीत सर्वात पुढे कधीच नव्हते. म्हणूनच शाळेतल्या तुमच्या गुणांवरून वैज्ञानिक होण्याची पात्रता

| May 8, 2015 01:18 am

lp00सर्वोच्च गुण मिळवणारे वैज्ञानिक होतीलच असे नाही. खरे तर बहुतांश वैज्ञानिक आपापल्या शैक्षणिक कारकीर्दीत सर्वात पुढे कधीच नव्हते. म्हणूनच शाळेतल्या तुमच्या गुणांवरून वैज्ञानिक होण्याची पात्रता ठरवू नका.

जगातल्या कोणत्याही देशाच्या विकासासाठी मूलभूत विज्ञानाची गरज असते. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा विश्वाच्या रहस्याचा उलगडा होतो तेव्हाच नवीन तंत्रज्ञानाच्या कल्पना सुचतात. उदाहरणच द्यायचे तर सूर्य उजेड आणि ऊर्जा का देतो या प्रश्नाच्या उत्तरातून अणुबॉम्ब आणि अणुऊर्जानिर्मिती झाली. अर्थातच आज सर्वच देश मूलभूत वैज्ञानिक संशोधनात शास्त्रज्ञांना साहाय्य करत असतात. गेल्या १५ वर्षांत भारताने देखील मूलभूत वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. मूलभूत विज्ञानाकडे वळणाऱ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती अभ्यासक्रमनिर्मिती करण्यात आली आहे. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, इन्स्पायर्ड शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बी.एसस्सी. व एम.एसस्सी विद्यार्थ्यांना महिना पाच हजार रुपये स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते हे त्यापैकीच एक महत्त्वाचे उदाहरण सांगता येईल.
आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो हे वैज्ञानिक नक्की काय करतात? वैज्ञानिक म्हणजे दिवसेंदिवस कामात गढलेली, घरदार विसरलेली, दाढींचे खुंट वाढलेली विचित्र असामी नसते तर तुमच्या आमच्यासारखीच व्यक्ती असते. काही वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करून सिद्धांतांची पडताळणी करतात, तर काही वैज्ञानिक गणितांद्वारे नवीन सिद्धांत तयार करत असातत. काही वैज्ञानिक हसतमुख असतात काही अंतर्मुख असतात. काही वैज्ञानिक धडपडे असतात काही ऑर्गनाइझ्ड असतात. म्हणजे थोडक्यात सर्वानाच एकाच मापात तोलता येत नाही. पण त्यांच्यातील समान दुवा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचे रहस्य समजून घेण्याची ईष्र्या आणि उत्कंठा.. ही ईष्र्या तुम्हाला कधीही स्वस्थ बसू देत नाही. आपल्यासमोर असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय वैज्ञानिकांना चैन पडत नाही. जसा एखादा खेळाडू वर्षांनुवर्षे एका पदकासाठी जीव तोडून प्रयत्न करतो, तसेच वैज्ञानिकांनी आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी झोकून दिलेले असते.
आजच्या काळात वैज्ञानिक संशोधन हे खूप वेगळ्या पद्धतीने केले जाते. प्रयोगांसाठी अतिप्रचंड अशी उपकरणे असतात. तर काही प्रकल्पांमध्ये हजारो वैज्ञानिक एकत्र येऊन प्रयोग करतात. सैद्धांतिक संशोधनासाठीदेखील संगणकाचा वापर खूप मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळेच आपल्याला प्रोग्रामिंगचे ज्ञान असणेही अत्यावश्यक असते.
जर का तुम्हाला वैज्ञानिक व्हायचे असेल तर काही सवयी मात्र लहानपणापासूनच अंगी बाणवाव्या लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यास हा परीक्षेसाठी न करता, विषय समजून घेण्यासाठी केला पाहिजे. परीक्षेत मी कसे उत्तर लिहिल्यावर अधिक गुण मिळतील यापेक्षा आज शिकलेल्या गोष्टीं दहा वर्षांनी कशा उपयोगी पडतील हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की संशोधनामध्ये पाठांतराला बिलकूल महत्त्व नाही. त्यामुळे धडेच्या धडे पाठ करून पैकीच्या पैकी गुण मिळवणे याला ज्ञान समजण्याची गल्लत करू नये. वैज्ञानिक हा नेहमी स्वत:ला पटेल त्याच गोष्टी मान्य करतो, त्यामुळे कोठच्याही नवीन माहीतीबाबत हे असेच का? हा प्रश्न विचारायची सवय लावून घ्या. इंटरनेटवर लिहलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असे मानण्यास काहीच अर्थ नाही. आपण शाळेत शिकलेल्या विज्ञानाशी आपल्याला नवीन मिळणारी माहिती सुसंगत आहे की नाही ह्य़ाचा पडताळा आणि चिकित्सा स्वत:करता येणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची पहिली पायरी आहे.
विज्ञान संशोधनाचे क्षेत्र हे आव्हानात्मक आहे, आणि त्यात आपल्याला मिळणारा आनंद शब्दांनी वर्णन करण्यापलीकडचा आहे. मात्र वैज्ञानिक क्षेत्र हे तुम्हाला झटपट प्रसिद्धी मिळवून देईलच असे नाही. संशोधन ही १०० मीटरची शर्यत नसून मॅरेथॉन असते. जर आपण पूर्णपणे झोकून आणि संयम बाळगून आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला तरच आपल्याला यशाची फळे चाखता येतात. वर म्हटल्याप्रमाणे शाळेत मिळणारे गुण हे तुमच्या वैज्ञानिक पात्रतेवर अवलंबून नसल्यामुळे सर्व वैज्ञानिक सर्वोच्च गुण मिळवणारे वैज्ञानिक होतीलच असे नाही. खरे तर बहुतांश वैज्ञानिक आपापल्या शैक्षणिक कारकीर्दीत सर्वात पुढे कधीच नव्हते. म्हणूनच शाळेतल्या तुमच्या गुणांवरून वैज्ञानिक होण्याची पात्रता ठरवू नका.
आज देशाला वैज्ञानिकांची गरज आहे. अनेक संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिकांसाठी असलेल्या जागा रिक्त आहेत. पण वैज्ञानिक होणे हे इतर क्षेत्रांप्रमाणे एक नोकरी नसून आयुष्यभराची साधना असते. म्हणूनच योग्य व्यक्ती मिळाल्याशिवाय या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक वैज्ञानिक हा असाधारणच असतो. तुम्हाला कधीच सामान्य कुवतीचा वैज्ञानिक सापडणार नाही. आणि एका अर्थाने हीच या क्षेत्राची मर्यादा आहे. जर तुम्ही विशेष प्रावीण्य प्राप्त करू शकला नाहीत तर तुम्हाला वैज्ञानिक म्हणून वाव मिळणार नाही. आणि या क्षेत्रामध्ये त्या स्वरूपाच्या इतर संधी उपलब्ध नसतात. थोडक्यात तुम्ही एक तर राजा किंवा रंक अशा दोन टोकाच्या गटात पोहोचता. विज्ञान क्षेत्रातील जे पदवीधारक वैज्ञानिक होत नाहीत त्यांना वैज्ञानिक संस्थांमध्ये किंवा विविध उद्योगांमध्ये तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळेतील तंत्रसाहाय्यक अशा पद्धतीच्या नोक ऱ्या मिळू शकतात किंवा काही विद्यार्थी विज्ञान पत्रकारिता, विज्ञान प्रचार आणि प्रसार अशा क्षेत्रांमध्ये जातात.
बऱ्याच पालकांचा एक असा गैरसमज असतो की वैज्ञानिकांना पुरेसा पगार मिळत नाही. हा समज आजच्या काळात तरी साफ चुकीचा आहे. पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर जेव्हा एखादा तरुण संशोधक आपल्या स्वतंत्र कारकीर्दीची सुरुवात करतो, तेव्हा त्याचा पगार हा एखाद्या उच्च पदावरील सरकारी अधिकारी अथवा सैन्याधिकारी इतका असतो. गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या अभियांत्रिकी संस्था व मॅनेजमेंट संस्था यांनी आपापल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पगाराचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे अनेकांचा गैरसमज होऊ लागला. हे पगाराचे आकडे त्या त्या संस्थेतील सवरेत्कृष्ट अशा थोडय़ाच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पगाराचे आकडे असतात आणि त्याच संस्थेतील इतर अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या पावपट पगाराची नोकरीही मिळत नाही. त्या सर्वोत्तम पगाराशी स्पर्धा करणे सरकारला कधीच शक्य नाही. आणि शास्त्रज्ञांची तशी अपेक्षाही नाही. ज्यांना आयुष्यात पैसा हे मुख्य ध्येय आहे त्यांना आपले संपूर्ण लक्ष संशोधनाकडे केंद्रित करणे शक्यच होत नाही. आणि सरकार सध्या देत असलेला पगार हा इतर अनेक उद्योगांत मिळणाऱ्या पगारांपेक्षा नक्कीच चांगला असल्यामुळे शास्त्रज्ञांना पैशाची कमतरता मुळीच नसते.
तुमच्या मुलीने/मुलाने शास्त्रज्ञ व्हावे की नाही या प्रश्नाचे सरळ सोप्पे उत्तर देणे अवघड आहे. अनेक जण अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टच्या पायरीपर्यंत जाण्याआधी काही सोप्या चाचण्या मी सुचवू शकतो. सर्वात पहिली चाचणी म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या रिकाम्या वेळात काय करतात किंवा काय वाचतात? ह्य़ातून मुलांची आवड लक्षात येते. किंवा अभ्यास करायला सांगितल्यानंतर तो किंवा ती कोठल्या विषयांची पुस्तके आपसूक बाहेर काढतात यातून तुम्हाला त्यांची आवड कळते. यामागे तत्त्व हे की मुलांचे शिक्षण वयाच्या वीस ते पंचवीस पर्यंत पूर्ण होते आणि त्यानंतर साधारण पस्तीस ते चाळीस वर्षे ते त्यांनी ठरवलेल्या क्षेत्रात काम करीत असातात. ते क्षेत्र त्यांच्या आवडीचे नसेल तर चाळीस वर्षे सतत चांगले काम करत राहणे हे त्यांना शक्य होणार नाही. समजा मुलांना विज्ञान आवडते हे तुम्ही नक्की केलं त्याच्यानंतर मुलांची अभ्यास करायाची पद्धत समजून घ्या. त्यांना परीक्षेपुरती उत्तरे शोधण्यामध्ये रस आहे की काही तरी करून उत्तरापर्यंत पोहचण्यामध्ये रस आहे की अमुक एका प्रश्नाचे उत्तर तसेच का आले यावर विचार करण्यामध्ये रस आहे? यावरून त्यांची अ‍ॅप्टिटय़ूड तुम्हाला कळते. तुमचा मुलगा/मुलगी पहिल्या गटात असेल तर विज्ञान तंत्रज्ञानामध्ये त्याला तिला फार प्रगती करणे शक्य होणार नाही. दुसऱ्या गटातील विद्यार्थी हे अभियांत्रिकी वैद्यकीय इत्यादी उपयोगी क्षेत्रांमध्ये चांगली कामे करू शकतात. तर तिसऱ्या गटातील विद्यार्थी हे उत्तम वैज्ञानिक होऊ शकतात.
वैज्ञानिक होण्यासाठी विज्ञान शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर होणे आवश्यक आहे. भारतातील अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रम हे उपयोगी स्वरूपाचे असतात व त्यात मूलभूत विषयांवर भर दिला जात नाही. त्यामुळे अभियांत्रिकी करून विज्ञानाकडे परतू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा मूलभूत विषयातील पाया कच्चा असतो. एम.एस्सी. पूर्ण होईपर्यंत त्या त्या विषयातील अनेक विषयांची ओळख विद्यार्थ्यांना होत राहते. त्यातील आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड विद्यार्थी आपल्या पीएच.डी.साठी करतात. पीएच.डी. करताना एखाद्या प्रथितयश संशोधकाकडून संशोधन कसे करावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. आणि पीएच.डी.नंतर तो विद्यार्थी स्वतंत्रपणे संशोधन करण्यासाठी तयार होतो.
आज आपल्या देशात मूलभूत विज्ञान शिक्षण व संशोधनासंदर्भात बरीच जागरूकता आली असल्यामुळे अनेक संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत. सरकारने मूलभूत विज्ञानासाठीचे विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी अनेक संस्थांना मोठय़ा प्रमाणात निधी दिला आहे. त्यामध्ये पुढील संस्थांचा समावेश होतो. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयआयएसईआर – आयसर – पुणे, कलकत्ता, भोपाळ, त्रिवेंद्रम, मोहोली -१२ वीनंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम), राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (एनआयएईआर – नायसर- भुवनेश्वर), सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स (सीबीएस – मुंबई), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी – त्रिवेंद्रम), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस, बंगलोर इ.. लवकरच आणखी तीन नवीन आयसरची स्थापना तिरुपती, ओरिसा, नागालॅण्ड येथे करण्यात येणार आहे. या संस्थांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तसेच इतर विद्यापीठांमधून बाहेर पडणारे गुणवान विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रात किती तरी अधिक संधी उपलब्ध आहेत. सध्या बहुतांश प्रमाणातील नोक ऱ्या या सरकारी क्षेत्रातच उपलब्ध आहेत.
या क्षेत्राकडे पाहण्याचा आजचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. आता गरज आहे ती आपला कल जोखून सर्वात महत्त्वाचे देशाला वैज्ञानिकदृष्टय़ा सजग करणाऱ्या या क्षेत्राकडे तरुणांनी मोठय़ा प्रमाणात वळण्याची.

(लेखक हे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथे प्र-पाठक आहेत)
डॉ. अनिकेत सुळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:18 am

Web Title: career special 22
टॅग Coverstory
Next Stories
1 वैद्यकीय क्षेत्र : रुग्णसेवेचं व्रत
2 प्रशासकीय सेवा : आयएएस अर्थात सनदी सेवांमधील संधी…
3 तंत्रज्ञान : कौशल्य विकास : काल, आज आणि उद्या…
Just Now!
X