04 July 2020

News Flash

वैद्यकीय क्षेत्र : रुग्णसेवेचं व्रत

विविध नवनवीन क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण आता इथे एमबीबीएस होऊन प्रॅक्टिस करणं हा एकच पर्याय नाही, तर

| May 8, 2015 01:17 am

lp00विविध नवनवीन क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण आता इथे एमबीबीएस होऊन प्रॅक्टिस करणं हा एकच पर्याय नाही, तर इतरही अनेक संधी आहेत.

साधारणत: ४० वर्षांपूर्वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी/ विद्यार्थिनीने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हावे अशी अपेक्षा असायची. आज अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत तरीही डॉक्टर होणे ह्यबद्दल अनेक विद्यार्थाना ओढ आहेच. अजूनही वैद्यकीय करिअर हे एक वलयांकित करिअर आहे. इतरही विविध आव्हानात्मक उत्तमोत्तम करिअर संधी आजू बाजूला असतानादेखील वैद्यकीय क्षेत्राकडे वळण्याचा ओघ अजूनही तसाच आहे.
वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी बारावी (विज्ञान) नंतर सीइटी (CET- Common Entrance Test) ही परीक्षा द्यावी लागते. ही सीइटी एक एमएचसीइटी (MHCET) म्हणजे महाराष्ट्र राज्याची असते. ह्य परीक्षेत बसण्यासाठी महाराष्ट्रातील एसएससी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य किंवा महाराष्ट्रातील अधिनिवासी असल्यास (Domicile) तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. महाराष्ट्रबाहेर असलेल्या महाराष्ट्र सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ही परीक्षा देता येते. महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय, दंत व आयुर्वेदिक इत्यादी शाखेतील ( शासकीय व निमशासकीय महाविद्यालये) एकूण ८५ टक्के जागा ह्य महाराष्ट्र सीईटीने भरल्या जातात. उरलेल्या १५ टक्के भारत सरकारच्या अखिल भारतीय पातळीवर घेतलेल्या सीईटीने भरल्या जातात, ज्यामध्ये संपूर्ण देशातील विद्यार्थी परीक्षेस बसतात. निवड प्रक्रिया पूर्णपणे प्राप्त गुणांवर व यादीतील तुमच्या नंबराप्रमाणे ठरते. पन्नास टक्के आरक्षण हे विविध जाती/जमातींसाठी (एससी १३, एसटी ७, व्हीजे/ एनटी ११, ओबीसी १९ टक्के) असतात. उरलेल्या पन्नास टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी असतात.
सीईटी प्राप्त गुणांवर तुम्ही अ‍ॅलोपथी, दंतवैद्यक, आयुर्वेदिक, होमियोपथिक, युनानी, फिजियोथेरपी (Physiotherapy), व्यवसायोपचार (Occupational Therapy) , श्रवणशास्त्र (Audiology and Speech Therapy) किंवा पशोपचार (Veterinary) मध्ये बेसिक करिअर कोर्स तुम्ही निवडू शकता. ह्य सर्व कोर्सेसमध्ये प्रावीण्य मिळून तुम्ही समाजात रुग्णसेवा करू शकता. समाजाभिमुख असे हे सर्व कोर्सेस असले तरी पुढे जाऊन तुम्ही कॉपरेरेट क्षेत्रात शिरण्यासाठी फार्माकॉलॉजी (Pharmacology) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन फार्मा इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करू शकता. किंवा हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट मध्ये कोर्सेस करून व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करता येते किंवा शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करता येते.
खासगी महाविद्यालयांमधूनही एमबीबीएस आणि ओटी, पीटी, स्पीच थेरपी (M.B.B.S. U O.T., P.T., Speech Therapy) करता येते. त्यांच्या वेगळ्या सीइटी असतात. वर्षांची फी बरीच जास्त असते. त्यात त्या त्या महाविद्यालयांची स्वायत्तता असते. गेल्या महिन्यातच सरकारने सर्वाची एकच परीक्षा घेण्याचे ठरवले आहे, हा अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय आहे.
आज आपण अ‍ॅलोपथी म्हणजे एमबीबीएस M.B.B.S. व त्याचे संबंधित अभ्यासक्रम म्हणजे ओ.टी. पी.टी., स्पीच थेरपी, डेन्टिस्ट्री या वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसंबंधीच्या बाबी पाहू.
वैद्यकीय क्षेत्र
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम हा सर्व क्षेत्रांपेक्षा जास्त वेळ लागणारा आहे. स्पेश्ॉलिटी, व सुपरस्पेश्ॉलिटी करून शिक्षण संपवून बाहेर पडेपर्यंत वयाची तिशी-बत्तिशी उलटते, हे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही जण सरकारी नोकरी तर काही खासगी रुग्णालयांमध्ये नोकरी करतात, तर काही आपल्या योग्यतेप्रमाणे खासगी व्यवसाय सुरू करतात.
अ‍ॅलोपथीमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून साडेपाच वर्षांनंतर उत्तीर्ण होऊन पुढे समाजामध्ये फॅमिली प्रॅक्टिस करू शकता. चांगला फॅमिली फिजिशियन म्हणून नाव कमावू शकता. लोकांचा पूर्ण विश्वासू असा कुटुंब आरोग्य मार्गदर्शक बनू शकता.
एमबीबीएस झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असल्यास विविध शाखांमधून आपल्या आवडीची शाखा निवडून तुम्ही एमएस किंवा एमडी करू शकता आणि त्या त्या विषयांमध्ये तज्ज्ञ किंवा स्पेश्ॉलिस्ट बनू शकता. जसे की, सर्जन, नाक-कान-घसा यांचे तज्ज्ञ किंवा डोळय़ांचे तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ वगैरे.
यांच्यापुढे जाऊनही ज्यात एखाद्या विषयामध्ये अतिविशेषोपचार (Superspeciality) करायची असेल तर तसेही करता येते. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून यात एमएस किंवा एमडी झालेले डॉक्टर शाखेसाठी पात्र असतात व तुम्ही हृदयरोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ, नेफ्रोलॉजीतज्ज्ञ, पोटाच्या विकारांविषयीचे तज्ज्ञ बनू शकता. येथे पदवी डीएम किंवा एमसीएच अशी असते.
डॉक्टर झाल्यावर खोऱ्याने पैसा ओढता येतो, असे वाटत असेल तर ते तितकेसे बरोबर नाही. डॉक्टरला कष्टही खूप असतात. वेळी-अवेळी रुग्णसेवेकरिता जावे लागते. शिवाय डोक्यावर रुग्णाच्या आजाराचा ताण असतोच. वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे आजारी, जखमी, दु:खी व पीडितांची सेवा हे होय. हा एक उदात्त व्यवसाय नक्कीच आहे. वैद्यकीय क्षेत्र निवडणे म्हणजे आयुष्यभर अभ्यास व समाजाच्या आरोग्याची जोखीम असते. वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आजारांच्या अभ्यासाबरोबर नैतिकता, वैद्यकीय क्षेत्रातील कायदे, आजार होऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी (Preventive Medicine), संभाषणकला व संशोधनशास्त्र ह्या गोष्टी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे.
दंत वैद्यक शास्त्र
डेंटिस्ट्री किंवा दंतवैद्यक शास्त्र – हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे व पुढे एक वर्ष इंटर्नशीप असते. त्यानंतर बीडीएस ही पदवी मिळते. पुढे पीजी-सीइटी एन्ट्रन्स देऊन दंतवैद्यकशास्त्रातील विविध शाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यास करता येतो व एमडीएस ही पदवी प्राप्त करता येते. आज वाढत्या तंत्रामुळे ह्यामध्ये नवनवीन उपचार पद्धती येत आहेत.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी व इतर शास्त्र
हा अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा असतो व त्या मध्ये आयुर्वेदातील/ होमिओपथीमधील विविध शास्त्रे शिकवली जातात. ह्यमध्ये शस्त्रक्रिया, वैद्यकशास्त्र इत्यादी विषय असतात. यातील विविध शाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यास करता येतो व एमडी/एमएस ही पदवी प्राप्त करता येते. या शास्त्रामध्ये रुग्ण व्यवसाय करता येतो. या डॉक्टर्सना अ‍ॅलोपथीची औषधे वापरण्यास परवानगी नाही. परंतु यावर वाद चालू आहे.
फिजियोथेरपी (Physiotherapy), व्यवसायोपचार (Occupational Therapy) , श्रवणशास्त्र थेरपी (Audiology and Speech) बारावीनंतर हे विविध कोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहेत.
भौतिक उपचार (फिजियोथेरपी – पी.टी.)
शारीरिक उपचार किंवा फिजिओथेरपी या मध्ये विविध प्रकारचे व्यायाम, शेक, कसरती अल्ट्रासाऊंड, डायथर्मी इत्यादी उपायांनी शरीरातील आखडलेले स्नायू, सांधे यावर उपचार करतात. शरीरातील स्नायूंची हालचाल, त्यांचे कार्य आणि त्यांचे पुनर्वसन भौतिक थेरपिस्ट करतात. रुग्णसेवेव्यतिरिक्त, शारीरिक उपचार संशोधन, शिक्षण, सल्ला, व प्रशासन यांचादेखील या अभ्यासक्रमात समावेश आहे. अनेक वेळा, शारीरिक उपचार सेवा व वैद्यकीय सेवा संयुक्तपणे केले जाऊ शकते. ह्यांचा अभ्यासक्रम हा चार वर्षांचा असतो. बीएससी ही पदवी मिळते. पुढे त्यामध्येही एमएससी करता येते व विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्यही (Specialisation) मिळवता येते.
व्यवसायोपचार (ओटी)
विविध आजारांमुळे शरीराच्या शारीरिक, मानसिक विकासावर परिणाम झाला असेल तर त्यांना विकसित करून काम कौशल्य राखण्यासाठी या उपचाराचा वापर आहे. व्यवसायोपचारतज्ज्ञ रुग्णांमधील आजारपणामुळे आलेल्या कमजोरीवर उपचार करून त्यांना रोजच्या कामात पुन्हा कार्यरत करण्यासाठी कौशल्य शिक्षण देतो. व्यवसायोपचार तज्ज्ञ अनेकदा शारीरिक उपचार व्यायाम, उपकरणे तयार करून समुपदेशनाने त्या रुग्णास व्यवसाय योग्य करून परत समाजात राहण्यायोग्य बनवतो. ह्यंचा अभ्यासक्रम हा चार४ वर्षांचा असतो. बीएससी ही पदवी मिळते. पुढे त्यामध्येही एमएससी करता येते.
श्रवणशास्त्र व भाष्य उपचार
ज्या रुग्णांना ऐकण्याचे आजार असतात त्याबद्दलचे हे शास्त्र आहे. रुग्णांच्या श्रवण शक्तीच्या तपासण्या करून त्यावर उपचार केले जातात. त्याचबरोबर ज्यांना बोलण्याचे आजार असतात (बोबडे बोलणे, तोतरे बोलणे इत्यादी) त्यावरही स्पीचथेरपी दिली जाते. हल्ली उच्च प्रतीचे श्रवणयंत्र (Cochlear Implant) लहान मुलांना शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्या यंत्राचा उत्तम उपयोग होण्यासाठी श्रवणतज्ज्ञ यांची नितांत गरज असते. ह्यांचा अभ्यासक्रम हा चार वर्षांचा असतो. बीएससी ही पदवी मिळते. पुढे त्यामध्येही एमएससी करता येते.
नर्सिग कोर्स
बारावीनंतर नर्सिगचा कोर्स हा दोन पद्धतीने करता येतो. एक तर एएएनएम हा केईएम, सायन किंवा नायर अशा मोठय़ा रुग्णालयात बारावीनंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. एसएनडीटी किंवा इतर नर्सिग कॉलेजमध्ये बी. एस्सी. नर्सिगचा अभ्यास करता येतो. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असतो. नर्सिग विषयाचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना खासगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वृद्धाश्रम, आयुर्वेदिक उपचार केंद्रे, आरोग्य केंद्रे, व्यक्तिगत शुश्रूषा आदी ठिकाणी चांगली संधी आहे. जगात रुग्णालयांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ नर्सेसची आवश्यकता वाढत आहे.
हल्ली नर्सिग क्षेत्रातही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये स्पेशलायझेशन करता येते. यामध्ये ऑपरेशन किंवा आयसीयू इत्यादीमध्ये एमएससी- पीएच.डी. करता येते. ह्यानंतर सरकारी किंवा इतर रुग्णालयात त्या विशिष्ट शाखेमध्येही उत्तमोत्तम संधी मिळू शकते. रुग्ण सेवेबरोबर, नर्सिग शिक्षिका म्हणूनही संधी असते.
पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठतर्फे हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. केईएम, सायन किंवा नायर अशा मोठय़ा रुग्णालयांत बारावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. पहिल्या वर्षांत अ‍ॅनॉटॉमी, फिजिऑलॉजी आणि बायोकेमिस्ट्री ह्या विषयांचा समावेश असतो. दुसऱ्या वर्षांनंतर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, अ‍ॅनेस्थेशिया इत्यादी ठिकाणी अनुभव दिला जातो. यामध्ये तेथे असलेल्या विविध मशीन्सची माहिती व वापर, उपचार पद्धती आणि रुग्णसेवेचा अनुभव मिळतो. विद्यापीठातर्फे दरवर्षी परीक्षा घेऊन तीन वर्षांनंतर पदवी दिली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये करिअरची चांगली संधी मिळू शकते. जसे एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन तसेच ऑपरेशन थिएटर, आयसीयू, अ‍ॅनेस्थेशिया टेक्निशियन म्हणून तांत्रिक कर्मचारी म्हणून रुग्णालयात नोकरीची संधी मिळू शकते.
गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमातील जागा खूप वाढल्या आहेत. एमबीबीएसबरोबर आयुर्वेदिक, दंत व इतर शाखांमध्ये अनेक डॉक्टर तयार होत आहे. ते सर्व बहुतांशी शहरातच रुग्णसेवा करतात. काही वर्षांत शहरात गर्दी होईल. म्हणूनच काही वर्षांनी छोटय़ा शहरात किंवा गावात जाऊन सेवा करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
(डॉ. अविनाश सुपे केईएम हॉस्पिटलचे डीन आहेत.)
डॉ. अविनाश सुपे, डॉ. स्वाती सुपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:17 am

Web Title: career special 23
टॅग Coverstory
Next Stories
1 प्रशासकीय सेवा : आयएएस अर्थात सनदी सेवांमधील संधी…
2 तंत्रज्ञान : कौशल्य विकास : काल, आज आणि उद्या…
3 नियोजन : करिअर व्यवस्थापन कसं कराल?
Just Now!
X