13 July 2020

News Flash

नियोजन : करिअर व्यवस्थापन कसं कराल?

करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. अशा चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच.

| May 8, 2015 01:14 am

lp00करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. अशा चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच.

करिअर व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक यक्षप्रश्न असतो. करिअर व्यवस्थापनाचे भूत अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मानगुटीवर कळत-नकळत बसविले जाते. आणि जर आपले पालक प्रथितयश असतील तर समाज हे भूत मानगुटीवर बसवायला खूप उतावीळ असतो.
वडील डॉक्टर असतील तर मुलानेदेखील त्याच क्षेत्रामध्ये करिअर करावे अशी भारतीय समाजाची मानसिकता असते व त्याचमुळे राजकीय पुढाऱ्याची मुले कोणतीही लायकी नसताना सहज पुढारी होऊ शकतात. कधी कधी समाजाच्या नाही तर पालकांच्याच अपूर्ण आकांक्षांचे दडपण मुलांवर असते. मला चांगला कलाकार होता आले नाही, निदान माझ्या मुलाने तरी माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करावे अशी ८० टक्के पालकांची इच्छा असते. मग भले आपल्या मुलात कलागुण असो की नसोत. तर कधी कधी आपण स्वत:च इतरांशी तुलना करीत किंवा स्पर्धा करीत चुकीच्या मार्गावर करिअरचे गाडे हाकतो. बालपणीचे मित्र विज्ञान शाखेला जाणार म्हणून मी पण तीच शाखा निवडणार असा निर्बुद्ध विचार करणारे काही कमी महाभाग नसतात. थोडक्यात काय, तर आपल्याकडे करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. अशा चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच. नेमके हेच होऊ नये म्हणून आज आपण पाहणार आहोत शास्त्रशुद्ध करिअर व्यवस्थापनाचे यशस्वी मार्ग.
काही मुलांच्या बाबतीत आपण अनुभवतो की, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. दैवी गुण असलेले काही जण बालवयातच एखाद्या क्षेत्रामध्ये असाधारण नैपुण्य दाखविण्यास सुरुवात करतात. अशा मुलांच्या बाबतीत पालकांना फार काही करावे लागत नाही. त्यांना शोधायचा असतो ते आपल्या पाल्यासाठी तितक्याच ताकदीचा गुरू किंवा आपल्या पाल्याला द्यायचे असते खूप सारे प्रोत्साहन. सचिन तेंडुलकरचे उदाहरण घ्या. आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस आहे हे पाहिल्यावर त्याच्या या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याला वांद्रे येथील शाळेत न घालता दादर येथील शारदाश्रम शाळेत घालण्याचा योग्य तो निर्णय घेतला गेला. जिथे त्याला आचरेकर सरांसारखा हिऱ्याला पैलू पाडणारा गुरू मिळाला. गुरूला शिष्याची पारख करता येणे खूप गरजेचे असते. सचिनला व्हायचे होते वेगवान गोलंदाज. तो डेनिस लिली यांच्या अकादमीमध्ये भरतीही झाला, पण लिली यांना मनापासून वाटले की सचिन चांगला फलंदाज होऊ शकतो, गोलंदाज नाही. तसे त्यांनी परखडपणे सचिनला सांगितलेदेखील. सचिनच्या करिअरला योग्य ते वळण लागले ते अशा गुरूंमुळे.
करिअर निवडताना आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्याला कशा प्रकारे काम करायला आवडते, स्वत:च्या मर्जीप्रमाणे की दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जोखा. तुम्हाला शून्यातून सुरुवात करायला आवडते की तुम्हाला सर्व ‘एसओपी’ज (Standard Operating Policies) हाताशी असल्यावरच श्रीगणेशा करायला आवडते, यावरून आपले करिअर क्षेत्र ठरू शकते. स्वत:च्या मर्जीप्रमाणे काम करायचे असेल, शून्यातून सुरुवात करायची हौस असेल तर कोणत्याही धंद्यामध्ये करिअर करा अन्यथा तुमचा पिंड दुसऱ्या प्रकारचा असेल तर एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी म्हणून जॉईन करा. कारण अशाच कंपनीमध्ये तुम्हाला मेंटर, एसोपी अशा सुविधा मिळू शकतात
प्रत्येकाला आयुष्यात करिअर मुख्यत्वे करून दोन गोष्टींसाठी करायचे असते. खूप सारा पैसा कमविण्यासाठी किंवा मानसिक समाधान मिळविण्यासाठी. पैसा किती लवकर मिळवायचा आहे यावरदेखील करिअर निवड अवलंबून आहे. जास्त जोखीम म्हणजे जास्त पैसा असे समीकरण असेल तर तशी धडाडी रक्तात असणे खूप गरजेचे असते.
जर तुम्हाला देशाची भावी पिढी घडवायचे मानसिक समाधान हवे असेल तर शिक्षकी पेशा स्वीकारा. तुम्हाला समाजातील वंचित लोकांसाठी काम करून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून द्यायचे समाधान प्राप्त करून घ्यायचे असेल तर एखाद्या समाजसेवी संस्थेशी निगडित व्हा किंवा एखाद्या कंपनीमधील कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (‘CSR’) विभागात नोकरी करा. पण जर बख्खळ पैसा हाच तुमचा हेतू असेल तर र्मचट नेव्ही, परदेशातील आयटी करिअर निवडा. जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तर शेअर मार्केटमध्ये करिअर करा.
स्वत:तील सुप्त शक्ती ओळखता येणे व त्यानुसार आपले करिअर घडवणे यात खूप मोठे आव्हान असते. तुम्हाला जर कल्पनाशक्तीचे नैसर्गिक वरदान असेल तर तुम्ही लेखक, चित्रकार, गीतकार होऊ शकता. जाहिरात क्षेत्रामध्ये करिअरचा विचार करू शकता, जाहिरातींसाठी जिंगल्स बनविणे, मीडियासाठी हटके जाहिराती बनविणे यात सृजनशीलता पण आहे व खूप पैसादेखील. तुम्हाला व्यायामाची खूप हौस आहे, तर तुम्ही शरीरसंपदा कमावून जिम इन्स्ट्रक्टर किंवा जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून काम करण्याचे करिअर निवडू शकता. आपण उजव्या मेंदूचा जास्त उपयोग करतो की डाव्या हे समजून घ्या. उजव्या मेंदूचा वापर जास्त करणारे कल्पनाशक्तीचा जास्त उपयोग करतात, त्यांच्या मनामध्ये मध्ये गेयता, सौंदर्यदृष्टी असल्याने ते चांगले सूर, ताल, रंग, प्रतिमा यांचा वापर करू शकतात. याउलट डाव्या मेंदूचा वापर अधिक करणारे गणित, आकडेमोड, तर्क लढविणे, विविध भाषा शिकणे यात पटाईत असतात. नवनवीन भाषा आत्मसात करण्यात आपण पटाईत असाल तर दुभाषी म्हणून किंवा अनुवादकार म्हणून आपण आपले करिअर निवडू शकता.
करिअर निवडताना तुम्हाला किती सोशल राहायला आवडते या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या. काही लोकांना कायम प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते, तर काही लोकांना गुपचूप पडद्यामागे राहून काम करायला आवडते. काही लोकांना सतत लोकांच्या सहवासात राहण्याची इच्छा असते, तर काही लोकांना एकांत खूप प्रिय असतो. काही लोकांना करिअर करताना लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याची खूप चिंता असते, तर काही जणांना लोकांची पर्वाच नसते. जर तुम्ही पहिल्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व असाल तर राजकारण, सोशल वर्किंग, सेल्स-मार्केटिंग, सिने-नाटय़ क्षेत्र तुमच्या करिअरसाठी एकदम फिट आहे. तुम्ही जर दुसऱ्या वर्गात मोडणारे असाल तर संशोधन, अकाऊंट अशी क्षेत्रे निवडा.
करिअर माझे, जॅक्सन व्होकेशनल इंटरेस्ट सव्‍‌र्हे, कॅम्पबेल इंटरेस्ट अ‍ॅण्ड स्कील सव्‍‌र्हे यासारख्या ऑनलाइन टेस्टदेखील करिअर निवडीसाठी उपयोगी पडू शकतात. तेव्हा अशा गोष्टींचा उपयोग एका मर्यादेपर्यंत करून घ्यायला शिका.
करिअर व्यवस्थापन करताना आपण आपले राग-लोभ बाजूला काढून ठेवायला शिकले पाहिजे. इगो म्हणजे अहंकार हा तर आपला मोठा शत्रूच. बऱ्याचदा आपण करिअरमध्ये जॉब सोडण्याचा निर्णय किंवा करिअर पाथ बदलण्याचा निर्णय भावनिक होऊन घेतो, हे टाळायला हवे. आपल्या वरिष्ठाने एखादी नोकरी सोडली म्हणून आपणही सोडणे व त्याच्यामागोमाग तो जिथे जाईल तिथेच जॉइन होणे असा वेडेपणा टाळा. कारण वरिष्ठाचे करिअर गोल वेगळे असू शकतात व आपले वेगळे. त्याचप्रमाणे करिअरमध्ये आपण अमक्या-तमक्या माणसाचे पिल्लू आहे असा छाप आपल्यावर कधीही लागू देऊ नका. दुसरे महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठ सोडून गेल्यामुळे आताच्या कंपनीमध्ये रिक्त झालेल्या जागेवर आपली वर्णी लागण्याची उत्तम संधी असू शकते.
खूप लोकांना पैसाही बख्खळ हवा असतो, पण नोकरी मात्र आरामाची हवी असते. करिअर करणाऱ्या प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की, कोणताही सुज्ञ एम्प्लॉयर फुकट पैसा वाटायला बसलेला नाही. जितके दाम मोजले आहेत त्याच्या दुपटीने तो काम वसूल करून घेणार असतो. त्यामुळे रास्त त्या अपेक्षा मनापाशी बाळगूनच करिअरमध्ये जॉब बदलावेत. करिअरमध्ये जास्त पैसा व मोठी पोझिशन हवी असेल तर आपल्याला त्या प्रमाणात सुखासीनता व कौटुंबिक आनंद यावर पाणी सोडावेच लागते. ते जर हवे असेल तर वर्क-लाइफ बॅलंस म्हणजे सुवर्णमध्य गाठावा.
एक प्रसिद्ध वचन आहे, ‘पीपल डोन्ट लीव्ह कंपनीज बट द बॉसेस’ याचाच अर्थ वरिष्ठांशी भावनिकदृष्टय़ा मतभेद झाल्यानेच कर्मचारी नोकरी सोडतो. तेव्हा करिअरमध्ये नोकरी बदलताना शंभर वेळा विचार करा. कारण बॉस ही जमात सगळीकडे जवळपास सारखीच असते व मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, लग्नाच्या वेळी माणसाला जितके टेन्शन असते तेवढेच किंबहुना थोडेसे जास्तच नोकरी बदलताना येते. तेव्हा करिअरमध्ये क्षुल्लकशा कारणामुळे वारंवार नोकरी सोडून ‘रोलिंग स्टोन’चा शिक्का स्वत:वर मारून घेऊ नये.
पण त्याचबरोबर करिअर पाथवर कधी यू टर्न घ्यायचा हेही शिकून घ्या. कधी कधी आपल्या हातातून चुकीचे करिअर निवडले जाऊ शकते. प्रामाणिक प्रयत्न करूनदेखील आपल्याला अपेक्षित यश मिळत नसते. तेव्हा करिअर पथावर डेड एंड येण्याआधीच यू टर्न घ्या. पण असा निर्णय आयुष्यात एकदाच व फक्त एकदाच घ्यावा, नाही तर तुम्ही करिअरचे मातेरे करून बसाल. सतत करिअर पाथ बदलणे म्हणजे रानातील चकव्याप्रमाणे स्थिती असते. आपण खूप काही करतो पण एकाच जागेवर अडकून असतो. हे टाळाच.
खूप वेळा असे होते की, ज्या क्षेत्रामध्ये आपल्या आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करणे शक्य होत नाही कारणे- कौटुंबिक जबाबदाऱ्या, पैशाची चणचण, योग्य त्या वेळी न मिळालेले मार्गदर्शन, काहीही असतील. पण आयुष्यात संधी मिळाल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात जरूर जाण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास अर्थाजनासाठी एक करिअर व आपली आवड जोपासण्यासाठी पार्ट टाइम करिअर करावे. अच्युत गोडबोले याचे उत्तम उदाहरण आहे. आयटीसारख्या रूक्ष क्षेत्रामध्ये असतानाही त्यांनी आपले गाण्याचे प्रेम व लिखाणाची आवड जोपासली. यात अनेक फायदे असतात. मेन करिअरमधील ताण-तणाव तुम्ही पार्ट टाइम करिअरच्या माध्यमातून पळवून लावू शकता. एकाच वेळी अर्थार्जन व मानसिक समाधान, ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात ते तुम्ही मिळवू शकता. कालांतराने तुम्ही मेन व पार्ट टाइम करिअरची अदलाबदल करू शकता.
कधी कधी ज्या क्षेत्रामध्ये कोणीही पाऊल टाकलेले नाही त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा धाडसी निर्णय आपण घेऊ शकता किंवा प्रवाहाच्या उलटय़ा दिशेने पोहण्याचे धाडस तुम्ही केल्यास आपले करिअर एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकते. लताच्या प्रस्थापित आवाजापुढे आपला आवाजदेखील रसिकांनी तेवढय़ाच ओढीने ऐकावा म्हणून आशा भोसले यांनी कॅबेरे नंबर्स गाण्याचा पर्याय निवडला. लताच्या आवाजाची नक्कल न करता आशाजींनी स्वत:ची अशी वेगळी गायनशैली स्वीकारली. करिअर व्यवस्थापनामध्ये असे हटके करण्याची जिद्द दाखवली तर तुम्ही अल्पावधीत यशस्वी होऊ शकता. शाहरूखनेदेखील चित्रपटसृष्टीमध्ये नकारात्मक नायकाची भूमिका (‘बाजीगर’, ‘डर’) वठविण्याचे धाडस दाखविले व कोणताही गॉडफादर नसताना नेत्रदीपक यश मिळविले.
करिअर व्यवस्थापन करताना काही स्लाइड्स नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहतील याची काळजी घ्यावी. पहिली स्लाइड ज्यात तीन रकाने असतील-
पहिला रकाना- गिफ्ट्स- देवाने मला उपजतच कोणत्या देणग्या दिल्या आहेत. उदाहरणार्थ चांगले व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, चांगली चित्रकारिता, लोकांना बोलते करायचे कौशल्य वगैरे वगैरे.
दुसरा रकाना – माझी आवड, छंद – असेही होऊ शकते की एखाद्याकडे उपजतच काही गुण आहेत, पण त्याचा कल मात्र दुसरीकडेच आहे. म्हणजे व्यक्तिमत्त्व चित्रपटातील नायकाला शोभेल असे आहे, पण आवड मात्र अभिनयाची नाही तर शरीरसौष्ठवाची आहे किंवा एखाद्याला गाण्यालायक कंठ नाही पण गाण्यांबद्दल आवड आहे
तिसरा रकाना – तुमची मूल्ये ज्यांच्याशी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाहीत- जसे की लाच न देणे, वक्तशीरपणा, गुणवत्तेशी तडजोड न करणे.
ज्या करिअरमध्ये तुमच्या नैसर्गिक गुणांचा तुम्हाला फायदा होणार आहे, ज्या करिअरमध्ये तुमची आवड जोपासायची संधी मिळणार आहे, ज्या करिअरमध्ये तुम्हाला अग्रेसर होताना तुमच्या मूल्यांचा त्याग करावा लागणार नाही असे करिअर तुमच्यासाठी सर्वोत्तम असते. जसे की तुम्हाला चांगली शरीरयष्टी लाभली आहे, तुम्हाला देशासाठी काही तरी भरीव योगदान द्यायची आवड आहे, सोबत साहसी कृत्ये करण्याची आवड आहे व तुमच्या मूल्यांमध्ये शिस्तप्रियता फार वरच्या क्रमांकावर असेल तर सैन्य दलात सहभागी व्हा, कमांडो व्हा.
दुसरी स्लाइड असावी करिअर गोलबद्दलचा रोड मॅप दाखविणारी; त्यामुळे आपल्याला कुठे जायचे आहे व किती वेळात याचे चित्र नेहमी डोळ्यांसमोर राहते.
करिअरला जर पंख लावायचे असतील तर नोकरी बदलताना ‘horizontal’ नाही तर ‘vertical’ जंप मिळेल याची खातरजमा करावी. म्हणजे आपण जर सुपरवायझर ग्रेडमध्ये असाल तर पुढचा जॉब एक्झिक्युटिव्ह ग्रेडमधील असावा, त्याच्या पुढील जॉब मॅनेजर श्रेणीतील असावा.
सर्वात शेवटी तुमचे करिअर ठरविण्यासाठी तुमचे शिक्षण, तुमचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेला संपर्क, व तुम्ही जेथे राहात आहात त्या स्थळाचा मोलाचा वाटा असतो. उदाहरणार्थ तुम्हाला अंतराळवीर व्हायचे असेल तर तुम्हाला भारतात राहून चालणार नाही, तुम्हाला अमेरिका किंवा रशिया गाठावे लागेल. जर तुम्हाला सिने-नाटय़ क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर थिएटर क्षेत्रातील लोकांशी लागेबांधे असणे गरजेचे होते त्याचप्रमाणे नुसत्या अनुभवाच्या जोरावर करिअरचे एव्हरेस्ट काबीज करता येत नाही त्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षणाची गरज असते. शिक्षण व अनुभव ही करिअररूपी रथाची दोन चाके आहेत त्यामुळे आपल्याला ज्या विषयात करिअर करायचे आहे त्या विषयातील नामांकित महाविद्यालयात शिकावे किंवा कंपनीमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग घ्यावे. म्हणजे आर्ट्स विषयामध्ये रुची असेल तर रुईयाला प्रवेश घ्यावा. मिसाइल, पाणबुडीसंबंधित तंत्रज्ञान शिकून करिअर करायचे असेल तर रीतसर शिक्षण घेतल्यावर तशी कंपनी जॉबसाठी निवडावी.
लेखाच्या सुरुवातीला मी म्हटले होते की, वडील ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच क्षेत्रामध्ये मुले कधी कधी लायकी नसताना करिअर करतात, पण त्याची दुसरी सकारात्मक बाजू पण आहे. जर आपले वाडवडील जे करत आहेत त्याच क्षेत्रामध्ये तुम्हालाही मनापासून करिअर करायचे असेल तर आपल्या वडिलांसोबत सतत त्यांची छाया बनून राहा. ते कसे निर्णय घेतात, वाटाघाटी करतात, सक्षम लोकांची पारख करून त्यांना घडवितात हे नीट समजून घ्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नेहरूंबरोबर सतत राहून परिपक्व झालेल्या इंदिराजी व धीरुभाई यांच्यासोबत काम करून त्यांच्याच मुशीत तयार झालेले मुकेश अंबानी.
सर्वात शेवटी पण महत्त्वाचे म्हणजे अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आपल्या करिअर ध्येयावर सतत केंद्रित राहा. मग करिअरच्या मार्गात येणारे अडथळे हे तुमच्या प्रगतीच्या कधीही आड येणार नाहीत.
प्रशांत दांडेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:14 am

Web Title: career special 26
टॅग Coverstory
Next Stories
1 सामाजिक : बना सोशल आंत्रप्रेन्युअर!
2 क्रीडा : खेळा तुमच्या करिअरशी…
3 नृत्य : डान्समध्ये करिअरचा चान्स…
Just Now!
X