lp00वेगळ्या वाटेवरून जाणाऱ्यांसाठी सोशल आंत्रप्रूनरशीपच्या कोर्सेसमधून स्वत:चा व्यवसाय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संस्थांमध्ये काम, तसंच बडय़ा कंपन्यांच्या सीएसआर विभागात नोकरी करण्यापर्यंतच्या करिअरच्या अनेक संधी असू शकतात.

सोशल आंत्रप्रेन्युअरशिप (Social Entrepreneurship) या शब्दाचे शब्दश: भाषांतर करणे तशी कठीण गोष्ट आहे, पण ‘सामाजिक उद्योजकता’ हा साधारणत: या शब्दाच्या जवळ जाणारा शब्द आहे. आणि सोशल प्रेन्युअर्स (Social Entrepreneurs) म्हणजे सामाजिक उद्योजक. कोणताही व्यवसाय, उद्योग करणाऱ्या व्यक्तीचा मूळ हेतू असतो तो नफा कमावण्याचा. पण सामाजिक उद्योजक नफ्यापेक्षा अधिक महत्त्व देतो ते सामाजिक बांधीलकीला. उदाहरणार्थ, बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी गरिबांना कर्ज मिळवून देण्यासाठी सुरू केलेली ग्रामीण बँक. जगभरात तिचे कौतुक झाले. अत्यंत गरीब असलेल्यांनाही कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, ते कर्ज फेडतात आणि त्यांना कर्ज म्हणून दिलेल्या लहानशा रकमेने त्यांच्या आयुष्यात मोठा फरक पडतो हे युनूस यांनी दाखवून दिले. आपल्या भारतात चालवल्या जाणाऱ्या अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांची कार्यपद्धती ग्रामीण बँकेवरून घेतलेली आहे. भारतातही असे अनेक सामाजिक उद्योजक आहेत. अगदी तरुण पिढीतली काही उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ, मुंबईतील मिरॅकल कुरियर ही ध्रुव लाक्रा नावाच्या मुलाची कुरियर कंपनी. त्याच्या कंपनीत तो फक्त कानाने ऐकू न येणाऱ्या मुलांना नोकरी देतो. ही कंपनी तो यशस्वीपणे चालवतो आहे. आज कित्येक अशा मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. महाबळेश्वरचे भावेश स्वत: अंध आहेत आणि त्यांनी मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या कंपनीत अंधांना प्राधान्याने नोकरी दिली जाते. थ्री टू वन एज्युकेशन ही संस्था मुंबईतल्या वस्तीत गरीब मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. विजया पास्टाला या ‘अंडर द मँगो ट्री’ या नावाची एक कंपनी चालवतात. ही कंपनी गरीब शेतकऱ्यांना मधमाश्या पाळण्याचे प्रशिक्षण देते आणि त्या मधउत्पादनाला बाजारपेठही मिळवून देते. बडोद्यातला केतन परमार गरीब शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्याचे प्रशिक्षण देतो आणि त्यांचा माल थेट बडोद्यातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. वाढलेली महागाई, होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक गोष्टी लक्षात घेतल्या तर सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून उभारलेल्या उद्योगांचे महत्त्व लगेच लक्षात येईल. सामाजिक बांधीलकी असलेल्या उद्योगांना आणि उद्योजकांना आजच्या काळाइतके महत्त्व कधीच नव्हते आणि म्हणूनच वेगळ्या वाटेवरून जाणाऱ्यांसाठी सोशल आंत्रप्रेन्युअरशिपच्या कोर्सेसमधून करिअरच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात.
परदेशात हार्वर्ड बिझनेस स्कूलपासून डय़ुक युनिव्हर्सिटीपर्यंत अनेक बडय़ा विद्यापीठांमध्ये सोशल आंत्रप्रेन्युअरशिपचे कोर्सेस आहेत. भारतात मात्र हे कोर्सेस तसे तुलनेने कमीच असले तरी आहेत. ज्यांना सामाजिक कामांची आवड आहे, ज्यांना सामाजिक बांधीलकी महत्त्वाची वाटते, वेगळे काही करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सोशल आंत्रप्रेन्युअरशिपमधले हे कोर्सेस हा उत्तम पर्याय ठरू शकतात. विशेषत: ज्यांना स्वत:चा काही व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी सोशल वर्कमध्ये पदवी अथवा पदविका घेतली आहे आणि त्याच क्षेत्रात त्यांना करिअर करायचे आहे, त्याचबरोबर ज्यांना कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागात काम करण्यात अधिक रस आहे अशा साऱ्यांसाठी सोशल आंत्रप्रेन्युअरशिपमधले कोर्सेस हे फायद्याचे ठरू शकतात.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मुंबईत नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये सोशल आंत्रप्रेन्युअरशिप या विषयाशी संबंधित डिप्लोमा इन सोशल आंत्रप्रेन्युअरशिप आणि एमबीए (सोशल आंत्रप्रेन्युअरशिप अ‍ॅण्ड सस्टेनॅबिलिटी मॅनेजमेंट) असे दोन कोर्सेस चालवले जातात. डिप्लोमा दहा महिन्यांचा आहे, तर एमबीएचा कोर्स दोन वर्षांचा आहे. हे कोर्सेस पार्ट टाइम (अर्धवेळ) असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे आठवडय़ातले तीन दिवस संध्याकाळी त्याचे वर्ग चालवले जातात. हे दोन्ही कोर्स करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एमबीएसाठी सामाजिक क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे ही प्रमुख अट आहे, तर डिप्लोमासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या कोर्सेसची प्रवेशक्षमता ३० असून प्रवेशपरीक्षा आणि व्यक्तिगत मुलाखत घेऊन कोर्सला प्रवेश दिला जातो. गरीब मुलांसाठी विशेष शिष्यवृत्तीची सोयही नरसी मोनजीच्या या कोर्समध्ये उपलब्ध आहे. २ जून ही रजिस्टर करण्याची शेवटची तारीख असून १७ जुलैला प्रवेशासंदर्भातील अंतिम निकाल कळवले जाणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी लिंक्स-
एमबीए (सोशल आंत्रप्रेन्युअरशिप अ‍ॅण्ड सस्टेनॅबिलिटी मॅनेजमेंट) – अर्धवेळ – दोन वर्षे http://nmimssbm.wizdes.com/academics/programs/mba-social-entrepreneurship/
डिप्लोमा इन सोशल आंत्रप्रेन्युअरशिप- अर्धवेळ- दहा महिने
त्याचबरोबर, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स (TISS) मध्येही एम.ए (सोशल आंत्रप्रेन्युअरशिप) हा कोर्स चालवला जातो. एकूण ७९ क्रेडिट्स असलेला हा कोर्स ‘टिस’च्या मुंबई कॅम्पसमध्ये चालवला जाणारा पूर्णवेळ कोर्स आहे. या कोर्ससाठीही फक्त ३० जणांची मर्यादा असून तुम्ही पदवीधारक असणे आवश्यक आहे. ‘टिस’तर्फे चालवण्यात येणाऱ्या कोर्समध्ये अनुभवाची आवश्यकता नाही. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. ४५ मिनिटे चालणाऱ्या या प्रवेशपरीक्षेत निबंध देऊन त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याबरोबर ‘टिस’च्या तुळजापूर कॅम्पसमध्ये स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत एम.ए इन सोशल इनोव्हेशन्स अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप असा कोर्स चालवला जातो. या संबंधातील अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल.
http://admissions.tiss.edu/m-a-admissions-2015/mumbai-campus-m-a-2015/school-of-management-and-labour-studies-2015/m-a-in-social-entrepreneurship-2015-17
संपर्क : ०२२-२५५२५२५२
तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी प्रोफेशनल्ससाठी एस. पी. जैन इन्स्टिटय़ूटच्या ‘सेंटर फॉर एज्युकेशन इन सोशल सेक्टर’तर्फे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (PGP-DM) हा कोर्स चालवला जातो. स्वयंसेवी संस्था तसेच सोशल एंटरप्रायझेसमधील मिडल लेव्हल मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा कोर्स चांगला पर्याय ठरू शकतो. दीड वर्षांच्या या कोर्सचा पॅटर्न इतर कोर्सेसपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे दर दोन महिन्यांनंतर एका आठवडय़ासाठी विद्यार्थी कॅम्पसमध्ये भेटतात आणि कॅम्पसमध्ये शिकलेल्या गोष्टी मार्गदर्शकाच्या मदतीने संस्थेत राबवण्याचा प्रयत्न करतात. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही पदवीधारक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल. http://www.spjimr.org/pgp-dm/index.asp
अलीकडेच सरकारने दोन टक्के सीएसआरचा कायदा संमत केला आहे. त्यानुसार ५०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक नेट वर्थ असलेल्या, किंवा एक हजार आणि/ किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची अधिक उलाढाल असलेल्या किंवा पाच कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या प्रत्येक कंपनीने नफ्याच्या दोन टक्के रक्कम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळेच आता या कोर्सेसमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. पूर्वी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सोशल वर्कमधली पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे दोनच पर्याय उपलब्ध होते.
अनेकांना समाजासाठी काहीतरी भरीव करायचे असते, त्यांना पैसे कमावण्याबरोबरच कामाचे मानसिक समाधान मिळणेही तितकेच महत्त्वाचे वाटते, अशांसाठी सामाजिक क्षेत्रातले वर उल्लेख केलेले हे कोर्स उपयुक्त ठरू शकतात. या कोर्सेसमधून व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या रिसर्च, गव्हर्नन्सपासून ते कम्युनिकेशन्स, डॉक्युमेंटेशन, बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून तो यशस्वीपणे राबवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्याशिवाय ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना तो सुरू करण्यासाठी रिसर्च करण्यापासून ते आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यापर्यंतचे मार्गदर्शनही उत्तम प्रकारे केले जाते. या सर्वच संस्था या क्षेत्रातील अनेक वर्षांचा मोठा अनुभव असलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यांच्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना तसेच वर्किंग प्रोफेशनल्सना नवनवीन कौशल्ये आत्मसात करणं, नवे प्रयोग करणं आदी गोष्टींसाठी होतो. म्हणूनच ज्यांना मळलेल्या वाटांपेक्षा थोडी वेगळी वाट चालायची आहे, ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे आणि सामाजिक कामांची आवड आणि सामाजिक काम मनापासून करण्याची तयारी आहे अशांसाठी सोशल आंत्रप्रेन्युअरशिपमधले व्यवस्थापनाशी संबंधित हे विविध कोर्सेस निराळे करिअर घडवण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
शब्दगंधा कुलकर्णी