06 August 2020

News Flash

टीव्ही : छोटय़ा पडद्यावर मोठी संधी

छोटय़ा पडद्यावर करिअरची मोठी संधी आहे. पण, त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ग्लॅमरबरोबरच मेहनतीकडेही लक्ष द्यायला हवे. तरच या क्षेत्रात यश तुमच्यामागे येईल.

| May 8, 2015 01:09 am

lp00छोटय़ा पडद्यावर करिअरची मोठी संधी आहे. पण, त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ग्लॅमरबरोबरच मेहनतीकडेही लक्ष द्यायला हवे. तरच या क्षेत्रात यश तुमच्यामागे येईल.

टीव्ही हे प्रभावी माध्यम आहे. उत्तरोत्तर ते आणखी प्रभावी होणार आहे. गेल्या काही वर्षांत टीव्ही क्षेत्रात लक्षणीय बदल झालाय. या बदलामुळे या क्षेत्राकडे करिअर म्हणूनही बघितलं जाऊ लागलंय. टीव्ही क्षेत्रात काम करायचं म्हटलं की कलाकार होण्यावरच अनेकांचा भर असतो. पण, या क्षेत्रात करिअर करता येण्यासारखे अनेक विभाग आहेत. कोणतीही कलाकृती ही लेखनाशिवाय अपूर्णच. त्यातही मालिकांसाठी लेखन करणं म्हणजे आव्हान. पण, लेखनाची कला एखाद्या व्यक्तीत उपजतच असायला हवी. तुमच्यात ती कला आहे असं तुम्हाला वाटलं तर मग या विभागात मुरलेल्या लोकांसोबत तुम्ही साहाय्यक म्हणून काम करायला हवं. त्यांच्या लेखनाचं निरीक्षण करून तुम्हीही जमेल तसं लिहायला हवं. खरं तर लेखनासाठी कॉलेजपासून प्रयत्न केलात तर ठरावीक वयापर्यंत लेखनात प्रगल्भता येऊ शकते. त्यामुळे लेखनात खरंच रस असेल तर त्याचा सराव आधीपासून असायला हवा. लेखन करण्यासाठी वाचन भरपूर करायला हवं. तसंच विविध गोष्टींचा अनुभवही गाठीशी असायला हवा. आपल्याकडे लेखन कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यासाठी स्वअभ्यास महत्त्वाचा असतो. दिग्दर्शक टीव्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, यात दोन प्रकार आहेत. एक मालिकांचे दिग्दर्शन आणि दुसरे रिअ‍ॅलिटी शोचे दिग्दर्शन. दिग्दर्शन शिकवणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था आहेत. पण, एखाद्या दिग्दर्शकासोबत साहाय्यक म्हणून काम करणं केव्हाही उत्तम. मालिकेचे दिग्दर्शन करताना तांत्रिक बाबी समजून घेत लेखकाला काय सांगायचंय हे कलाकारांकडून करून घेण्याचं कौशल्य दिग्दर्शकात असणं गरजेचं असतं. तर रिअ‍ॅलिटी शोमध्ये तांत्रिक बाबी अधिक असतात. आठ-दहा कॅमेऱ्यांसह विविध लाइट्सचा वापर कसा करायचा, शो कसा सुरू होणार, कसा संपणार वगैरे गोष्टी शिकाव्या लागतात. रिअ‍ॅलिटी शोचा दिग्दर्शक होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ सेटवर घालवणं आवश्यक आहे. निरीक्षणाने अनेक गोष्टी शिकता येतात. तुम्ही किती आत्मसात केलंय यापेक्षा काय आत्मसात केलंय हे जास्त महत्त्वाचं असतं.
दिग्दर्शनाप्रमाणेच कॅमेऱ्याचेही दोन प्रकार असतात. मालिकांचा कॅमेरा आणि रिअ‍ॅलिटी शोचा कॅमेरा. स्टिल फोटोग्राफी शिकला असाल तर छायांकन करणं काहीसं सोपं जातं. कॅमेऱ्याच्या मूलभूत गोष्टींचं ज्ञान होतं. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये स्टिल फोटोग्राफीचा एक वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. कोर्स केल्यानंतर साहाय्यक म्हणून काम करावं. स्टिल फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतल्यामुळे डेप्थ, फोकस, लेन्स याचा अंदाज येतो तर साहाय्यक म्हणून काम केल्यावर प्रकाशयोजनेबाबत ज्ञान मिळतं. छायांकन विभागात काम करण्यासाठी एकापेक्षा जास्त लोकांकडे काम करावं. जेणेकरून वेगवेगळ्या स्टाइल शिकता येतात. रिअ‍ॅलिटी शोमध्ये सेट मोठा असतो. त्यासाठी लाइट्स काय वापरायचे, कॅमेरा कोणत्या दिशेला ठेवायचा, इफेक्ट्स कोणते द्यायचे, कोणत्या कॅमेऱ्याला कोणती लेन्स असेल या सगळ्याची योजना करावी लागते. यासाठी निरीक्षण उत्तम असणं महत्त्वाचं असतं. यात उपविभाग येतो तो कॅमेरा ऑपरेटिंगचा. कोणत्या कलाकारावर फोकस करायचा, एखादा सीन टू शॉट हवा की वाइड, कॅमेऱ्याचा कोणता अँगल घ्यायचा याबाबतच्या सूचना सतत या ऑपरेटरला ऐकाव्या लागतात. त्यामुळे अशा विभागात काम करण्यासाठी तुम्हाला तांत्रिक गोष्टींची माहिती असावी लागते आणि सतर्क राहावं लागतं.
सगळ्यात महत्त्वाचं आणि कौशल्य पणाला लागणारा विभाग म्हणजे संकलन (एडिटिंग). यासाठी कॉम्प्युटरचं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक असतं. संकलनाच्या सॉफ्टवेअर्सची माहिती नसताना फक्त साहाय्यक म्हणून काम करून चालत नाही. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स शिकणं महत्त्वाचं असतं. कॉम्प्युटरचं शिक्षणं, विशिष्ट संस्थेमधून संकलनाचं मूलभूत ज्ञान घेणं आणि साहाय्यक म्हणून काम करणं या संकलनात करिअर करण्याच्या तीन पायऱ्या समजल्या जातात. संकलनाचा एक उपविभाग म्हणजे प्रोमो एडिटिंग. संकलक विशिष्ट एपिसोडचं संकलन करतो. त्यातूनही महत्त्वाचे भाग उचलत वीस सेकंदात ठरावीक गोष्टी दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं काम प्रोमो एडिटर करत असतो. वीस सेकंदात एपिसोडचा यूएसपी मांडायचा असतो. ही कला शिकून होत नाही. त्यात कौशल्यपूर्ण वापर महत्त्वाचा असतो. मालिका, रिअ‍ॅलिटी शोची शीर्षक गीतं आता कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यामुळे संगीताची जाण असलेल्यांना त्यांची कला इथे आजमावून बघण्याची उत्तम संधी आहे. मालिकेतल्या गाण्यांचं संगीत देणं आणि पाश्र्वसंगीत असे दोन प्रकार असतात. पाश्र्वसंगीत करणाऱ्याला संकलनाचं सॉफ्टवेअर शिकावं लागतं. कारण संकलक एडिट करून एखादा भाग पाश्र्वसंगीतकाराकडे पाठवतो तेव्हा त्याला त्याच सॉफ्टवेअरवर काम करावं लागतं. ज्याप्रमाणे संगीत, पाश्र्वसंगीत या विभागात काम करणाऱ्यांचा कान तल्लख लागतो तसंच ध्वनिमुद्रकाचेही कान खूप तयार असावे लागतात. स्वराची जाण लागते, भाषेची संपूर्ण माहिती असावी लागते. कलाकार बोलत असलेली वाक्य बरोबर पीचमध्ये, उच्चारांमध्ये आहेत का हे ध्वनिमुद्रकाला हेडफोनमधून ऐकताना तपासावं लागतं.
मालिका आता भव्य स्वरूपात बघायला मिळतात. तसंच त्यात आता पौराणिक, ऐतिहासिक, संत व्यक्तींवरील मालिका अशांची भर पडत आहे. त्यामुळे टीव्ही क्षेत्रात अशा मालिकांसाठी कला दिग्दर्शकांची मागणीही वाढत आहे. नेपथ्य करण्यासाठी इंटीरिअर, आर्किटेक्चर, चित्रकला, रंगसंगती याची माहिती असायला हवी. या सगळ्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्या व्यक्तीला एखाद्या कला दिग्दर्शकाकडे साहाय्यक म्हणून काम करावंच लागतं. याच विभागात शिल्पकार, पीओपी करणारे, कावर्ि्हग करणाऱ्या लोकांनाही मागणी आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये कला दिग्दर्शन करण्यासाठी साहाय्यक म्हणून बरीच वर्षे काम करावं लागतं. रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा हे तिन्ही एकमेकांशी संलग्न विभाग आहेत. सध्या मालिकेचा ‘फर्स्ट लुक’ दाखवण्याची स्पर्धा सुरू असते. या फर्स्ट लुकमध्ये या तिन्ही विभागांची मेहनत असते. टीव्ही ‘दिसण्याचं’ माध्यम असल्यामुळे हे तिन्ही विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत. तसंच त्यात काम करणाऱ्यांनाही खूप मागणी आहे. मोठमोठय़ा परदेशी कंपन्या आता रंगभूषा शिकवण्यासाठी भारतात येऊ लागल्या आहेत. तसंच केशभूषा, वेशभूषा शिकण्याचेही अनेक अभ्यासक्रम आहेत. या सगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसताहेत. त्यामुळे तरुणांना त्यांची सृजनशीलता दाखवण्याचं हे व्यासपीठ मिळालंय. यात करिअर करण्यासाठी इच्छुकांनी अपडेट राहायला हवं. या विभागात नायक-नायिकांसाठी व्यक्तिगतरीत्या तसंच प्रोडक्शन हाऊसमध्येही काम करू शकतात.
मालिकांवर लक्ष ठेवायला असतात ते इपी म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर आणि क्रिएटिव्ह हेड. सुरुवातीला असोसिएट एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर त्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर आणि त्यानंतर क्रिएटिव्ह हेड अशी तीन पदे असतात. समन्वयकाचं काम उत्तमरीत्या करणाऱ्यांना इथे संधी आहे. तसंच या क्षेत्रात ६० ते ७० टक्के मुलं हे बीएमएम केलेले असतात. या विभागात काम करण्यासाठी इतर विभागातल्या कामांची किमान माहिती असणं आवश्यक असतं. यात प्रोडक्शन इपी आणि चॅनल इपी असे दोन्हीकडे काम करता येऊ शकते. टीव्हीमुळे सगळीकडे पोहोचतो ही गोष्ट तरुणांना नेहमी आकर्षित करते. म्हणूनच कलाकार होण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, कलाकार होऊ इच्छिणाऱ्यांनी आधी नाटकात काम करावं. टीव्ही क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी सगळ्या विभागांमध्ये थोडं का होईना काम करावं.
टीव्ही या क्षेत्रातलं मानधन हे त्या त्या विभागांनुसार ठरतं. तसंच प्रत्येकाच्या कामावरही ते ठरवलं जातं. एखाद्याने मोठय़ा अनुभवी व्यक्तीसोबत साहाय्यक म्हणून काम केलं असेल तरी तो करत असलेल्या कामानुसारच त्याचं मानधन ठरतं. मानधनाचा विचार करता हिंदी-मराठी टीव्ही इंडस्ट्री असा फरक मात्र लक्षात घेतला जातो. साहजिकच हिंदीमध्ये मराठीपेक्षा जास्त मानधन असतं. टीव्ही क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक बदल होताना दिसणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स येतील. अनेक नवीन विभाग सुरू होतील. अ‍ॅक्शन हा बाजही टीव्ही क्षेत्रात येऊ लागला आहे. सिनेमा आणि टीव्ही यातलं अंतर कमी होणार आहे. त्यामुळे सिनेमावाल्यांसाठी वेगळं काही करण्याचं आव्हान असेल. टीव्हीवर झळकायला मिळतं किंवा मोठय़ा लोकांशी ओळख होते या उद्देशाने या क्षेत्रात येता कामा नये. तर खरंच त्यात रस असेल तरच त्याचा करिअर म्हणून विचार करायला हवा आणि करिअर म्हणून विचार करत असाल तर त्यात गांभीर्य हवं. तरच टीव्ही क्षेत्रात असलेल्या संधींचा लाभ घेता येईल.
(लेखक टीव्ही क्षेत्रातील नामांकित निर्माता-दिग्दर्शक आहेत.)
शब्दांकन: चैताली जोशी
राकेश सारंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:09 am

Web Title: career special 31
टॅग Coverstory
Next Stories
1 सिनेमा : रोल.. कॅमेरा.. अ‍ॅण्ड करिअर
2 नाटक : करिअरची नांदी
3 फॅशन : फॅशनच्या नव्या वाटा
Just Now!
X