lp00कोणत्याही रंगभूमीला मोठा इतिहास, परंपरा असते. रंगभूमीवर आता नवनवे प्रयोगही होताना दिसताहेत. या सगळ्याकडे केवळ रसिकप्रेक्षक म्हणून न बघता गंभीरपणे विचार केलात तर रंगभूमी करिअर करण्यासाठीची उत्तम संधी आहे, हे लक्षात येईल.

शाळेपासून सगळेच कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत उतरत असतात. कथाकथन, वक्तृत्व, नाटय़, नृत्य अशा विविध स्पर्धामध्ये सहभागी होत त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देत असतात. यामागे प्रोत्साहन देणारे असतात मुलांचे पालक आणि शिक्षक. पण, पूर्वीचं चित्र थोडं वेगळं होतं. अशा स्पर्धामध्ये उतरून मुलांनी स्टेजची भीती घालवावी, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा एवढाच हेतू त्या वेळी पालक आणि शिक्षक यांचा असायचा. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तेव्हा ‘इंडस्ट्री’ नव्हती. आता मात्र या क्षेत्राला ‘इंडस्ट्री’चं रूप प्राप्त झालंय. ही इंडस्ट्री मोठी होणार आहे म्हणजे नेमकं काय तर त्यात आर्थिक उलाढाल होणार आहे. पण, या उलाढालीत तुम्ही कुठे उभे रहाणार आहात, त्यात तुमचा सहभाग कसा असणार आहे, हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. आता स्पर्धा वाढली आहे. तुम्ही केलेल्या एका प्रोजेक्ट इंडस्ट्रीतलं तुमचं स्थान सिद्ध होत नाही, तर सातत्याने तुम्हाला चांगलं काम करुन ते सिद्ध करावं लागतं. त्यानंतर तुम्ही इथे प्रस्थापित होता. कोणत्याही कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम असू नये. हेच नेमकं होतंय ते नाटय़ क्षेत्राबाबत. मोकळ्या वेळेत नाटक करू असं म्हणत या कलेला गृहीत धरलं जातंय. वास्तविक फावल्या वेळेत होण्यासारखं नाटक साधं-सोपं नक्कीच नाही. आवडीच्या क्षेत्रातच करिअर करायचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. विचारमंथनातून या क्षेत्रात नेमक्या कोणत्या विभागाकडे अधिक रस आहे हे कळतं. तुम्हाला काय करायचं याबाबत स्पष्टता आली की मग तुम्ही त्याचं रीतसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करू शकतात. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला पोहता येतं, पण त्याला जर स्विमर करायचं असेल तर त्याला त्याचं प्रशिक्षण द्यावंच लागतं. तसंच नाटकाचंही आहे. आवड आहे म्हणून मोकळ्या वेळेत ते न करता आवडीनुसार प्रशिक्षण घेतलं की त्यात उत्तम करिअर घडू शकतं.
नाटक हे माध्यम केवळ पुस्तकातून शिकण्याचं नाही, तर ती करून बघण्याची गोष्ट आहे. नाटकाच्या अभ्यासाला जर नाटय़शास्त्र म्हटलं जातं तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही गंभीर असायला हवा. इतर शास्त्रांना जे-जे लागू होतं ते सगळं नाटय़शास्त्रालाही लागू व्हायला पाहिजे. नाटय़शास्त्रात इतिहासाचा एक पेपर असतो. जागतिक रंगभूमीचा इतिहास, भारतीय रंगभूमीचा इतिहास, संगीत रंगभूमीचा इतिहास, लोककलांचा इतिहास असे त्यातले विषय असतात. पूर्ण वेळ संशोधन करण्यासाठी घेतला तर शास्त्रज्ञांसारखंच काम आहे. शास्त्राची एक प्रक्रिया असते. त्याच्या अभ्यासपद्धतीनुसारच त्याचं आकलन व्हायला हवं. शाळा-कॉलेजमध्ये असताना विशिष्ट गटासोबत असता तेव्हा नाटकाविषयीच्या तुमच्या आवडीत प्रगती होत जाते. त्या गटात राहिल्यामुळे नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होत जातो. नाटकाची तालीम बघताना अनेक गोष्टी ज्ञात होत जातात. कलाकारांची संवादफेक, दिग्दर्शकाची दृष्टी, लेखकाचं कौशल्य, प्रकाशयोजना आणि संगीत संयोजकाची तत्परता अशा अनेक गोष्टी तालीम बघताना शिकता येतात. तालीम बघण्याचा काळ महत्त्वाचा असतो. याच दरम्यान तुमची आवड नेमकी कोणत्या विभागात आहे हे स्पष्ट कळते.
नाटक चांगलं सादर होणं महत्त्वाचं असतं. त्याच्या सादरीकरणामध्ये नाटकाच्या सेटचा सहभाग असतो. इंटिरिअर, आर्किटेक्चरचं प्रशिक्षण घेतलं असेल तर नेपथ्य या विभागाकडे वळण्याची संधी आहे. पण त्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर, वेगळ्या प्रकारचं कौशल्यही लागतं. पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेपर्यंतच्या सगळ्या प्रेक्षकांना नाटक दाखवायचंय हे भान ठेवून नेपथ्याची रचना करावी लागते. तालीम करताना नेपथ्यकार सेटची रचना कसं करतो याचं निरीक्षण करणं, नाटककाराने लिखित स्वरूपात नेपथ्याच्या काय सूचना दिल्यात हे बघणं, त्याचं मेकिंग बघणं हे नेपथ्य विभागात आवड असणाऱ्यांनी जरूर करावं. त्यात चित्रकलाही असते. त्याचा तो उपयोग कसा करतो याकडेही लक्ष असावं. प्रकाशयोजनाकारही महत्त्वाचा असतो. त्याचं वेळेचं अचूक भान नाटक खुलवण्यात मदत करतं. इथेही निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. कोणत्या वेळी कोणते लाइट्स वापरायचे, कधी स्पॉट लावायचा, कधी वेगवेगळ्या रंगांचे लाइट्स एकाच वेळी वापरू शकतो याचा आराखडा करताना तो करत असलेल्या अभ्यासकडे लक्ष असावं.
दिग्दर्शक म्हणजे नाटकाचं इंजिन म्हणू या. तो नाटक बसवण्याची प्रक्रिया बघण्यासारखी असते. त्याचं व्हिजन, विशिष्ट प्रसंग विशिष्ट पद्धतीने बसवण्यामागे त्याचा हेतू, रंगमंचावर कलाकारांची त्याने ठरवलेली जागा या सगळ्याची प्रक्रिया तालीम बघताना खूप काही शिकवून जाते. वेशभूषेसाठीही अभ्यास हा असतोच. केवळ व्यक्तिरेखा बघून वेशभूषाकार कपडे डिझाइन करत नाही तर नाटकाच्या विषयानुसार त्याचा विचार lp28केला जातो. त्यामागे रिसर्च असतो. ज्यांना तांत्रिक गोष्टींमध्ये अधिक रस असतो त्यांच्यासाठीही हे क्षेत्र करिअरसाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. संगीत संयोजन, प्रकाशयोजना अशा काही तांत्रिक विभागांमध्ये वाव आहे. सिनेमाटोग्राफी, संकलन, ध्वनिमुद्रण अशा अनेक तांत्रिक विभागांचं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही एफटीआयमध्ये गेलात तर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असल्याचं विचारलं जातं. सायन्स ग्रॅज्युएट असलेल्यांना गणित, भूमिती, सूत्र अशा मूळ संकल्पना माहीत असतात. त्याचा फायदा अशा विभागात काम करताना होतो. त्यामुळे विज्ञान शाखेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरसाठी एक नवं व्यासपीठ आहे. यात क्रिएटिव्हिटी असतेच पण, त्याला रिसर्च जोडही असावी लागते, हे विसरून चालणार नाही. एखाद्याला लेखनात रस असेल तर त्याला ग्रुपमध्ये राहून उपयोग नाही. जगभरातली नाटकं वाचणं, विविध बाजाच्या नाटकांच्या पटकथा वाचणं, इतरांची नाटकं बघणं, त्यांच्या लेखनपद्धतीचं निरीक्षण करणं, त्याची मांडणी कशी करताहेत हे बघणं हा अभ्यास त्याला करावा लागतो. विविध लेखकांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. आताच्या पिढीला मागचं बरंचसं साहित्य वाचावं लागेल. पूर्वीच्या काळातली नाटकं, त्यात झालेले बदल, नवीन लेखकांचा कालखंड इत्यादींचा या अभ्यासात समावेश असतो.
प्रत्येक विभागाचं एक शास्त्र असतं. ते शिकण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. ठिकठिकाणी नाटय़शिबिरं होताना दिसतात. ही शिबिरं पूर्वमाहितीसाठी उत्तम असतात. या क्षेत्रात पुढे काही करण्यासाठी तिथूनच प्रेरणा मिळू शकते. पण, त्यानंतर एखाद्या संस्थेसोबत सातत्याने रहाणं, एखादं प्रशिक्षण घेणं, ते गांभीर्याने करत स्वत:चा विकास करणं हे तुमच्या हातात असतं. पण, नाटय़क्षेत्राकडे ‘दुसरं करिअर’ म्हणून आजही बघितलं जातं. पस्तीसी-चाळिशीनंतर हातात असलेली नोकरी-व्यवसाय सोडून काही जण या क्षेत्राकडे वळतात. अशा पद्धतीने नाटकाकडे वळणं चुकीचं आहे. अशाप्रकारे वळणाऱ्याचं एखादं नाटक यशस्वी होईलही. पण, ही अपवादात्मक घटना असू शकेल. आपल्याकडे कला क्षेत्राला छंद आणि आवड म्हणूनच बघितलं जातं. हा दृष्टिकोन बदलायला हवा.
तुमच्या जडणघडणीच्या काळात तुमच्यावर कलेचे संस्कार झाले पाहिजेत. ते रीतसर प्रशिक्षणाच्या किंवा सरावाच्या स्वरूपात असतील. ते सातत्याने सुरू असायला हवेत. यामुळे तुमचं विचारचक्र, शरीरभाषा, आकलनशक्ती, रसग्रहणशक्ती वाढत जाते. त्यात गती यायला लागते. शाळा, गणेशोत्सव, कॉलेज, महाविद्यालयीन स्पर्धा, राज्यनाटय़ एकांकिका स्पर्धा अशा विविध स्पर्धामध्ये सहभाग घेत एकेक पायरी पुढे चढत जाता. तुमच्या सादरीकरणात हळूहळू प्रगती होत जाते. या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला तुमचा कलही कळतो. ‘मला अभिनय येत नाही पण बॅक स्टेज करण्यात मजा येते’ किंवा ‘प्रकाशयोजना करणं आव्हान वाटतं, ते आपल्याला जमेलही’ असं वाटू लागतं. हेच महत्त्वाचं असतं. तुमचा कल नेमका कुठे आहे हे स्पष्ट व्हायला रीतसर एक कालावधी द्यावा लागतो.
इंजिनीअर, डॉक्टर होण्यासाठी जशी अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट असते, तशी टेस्ट कला क्षेत्रात येण्यासाठीही असायला हवी. ठिकठिकाणी दिले जाणाऱ्या नाटय़ प्रशिक्षणाकडे तुम्ही पाठय़वृत्तीने आणि अभ्यासूवृत्तीने बघितलं पाहिजे. वकील, इंजिनीअर किंवा पदवी हवी असेल तर पाच र्वष शिक्षण मग दोनेक वर्षांची इंटर्नशिप करतात आणि नंतर काम करायला सुरुवात केली जाते. तसंच या क्षेत्रातही गांभीर्यानेच पावलं उचलायला हवीत. या क्षेत्रात केवळ निरीक्षणाने, विशिष्ट गटात राहिल्याने, स्वअभ्यास केल्याने अनेक गोष्टी साध्य होत असतात. या स्वअभ्यासानेच तुम्हाला नेमकं काय करायचंय हे स्पष्ट होतं. तुमच्यासमोरचं चित्र स्पष्ट झालं की, नाटय़क्षेत्रातली करिअरची एक नवी वाट दिसेल आणि ती तुमच्यासाठी करिअरची नांदी ठरेल.
(लेखक नाटय़-सिने क्षेत्रातील नामांकित निर्माता-दिग्दर्शक आहेत.)
चंद्रकांत कुलकर्णी

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

शब्दांकन : चैताली जोशी