13 July 2020

News Flash

फॅशन : फॅशनच्या नव्या वाटा

लोकांची आपल्या दिसण्याबाबत जागरूकता वाढलेली असल्यामुळे फॅशन हे सध्याच्या काळातले करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. ते निवडायचे असेल तर काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात.

| May 8, 2015 01:06 am

lp00लोकांची आपल्या दिसण्याबाबत जागरूकता वाढलेली असल्यामुळे फॅशन हे सध्याच्या काळातले करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. ते निवडायचे असेल तर काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात.

आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कपडे. आपण जे कपडे घालतो, ते नेमके कसे तयार होतात, डिझायनर्स दर वेळी नवीन स्टाइल्सचे कपडे कसे तयार करू शकतात, याबद्दल जाणून घेण्यासाठी फॅशनचा अभ्यास करावा लागतो. फॅशन डिझायनिंग म्हटले की, ‘डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग’ आणि ‘डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी’ हे दोन कोर्स डोळ्यासमोर येतात. पण त्यापुढेही फॅशनचे क्षेत्र खूप विस्तारले आहे. कित्येकदा छान, छान कपडे बनवायचे, मॉडेल्ससोबत चालायचे, सेलेब्रिटीजना भेटायची संधी अशा वरवरच्या देखाव्यांना भुलून अनेक जण या क्षेत्राकडे वळतात. अर्थात हे सर्व या क्षेत्रात करता येतेच, पण ही केवळ या क्षेत्राची एक छोटी बाजू आहे. तुमच्या कामाचा १ टक्का भाग असे म्हटल्यास हरकत नाही. कित्येकदा अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी किंवा इंटर्नशिप करताना आपल्याला नीट स्केच करता येत नाही, कपडे शिवता येत नाहीत, ठरावीक मर्यादेपलीकडे कल्पनाशक्ती खुंटते किंवा कामामधील अनिश्चित वेळा यामुळे कित्येक जण या क्षेत्राकडे पाठ फिरवतात.
पण फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कागदावर सुंदर चित्रे काढण्यापलीकडेही खूप काही आहे. फॅशन डिझायनिंग करतानाच त्याला तुमच्यातील एखाद्या छंदाची जोड दिली, तर या क्षेत्रातील काही वेगळ्या वाटा नक्कीच हुंदडता येतील. फोटोग्राफी, लिखाण, सूत्रसंचालन, हेअर मेकअप स्टाइल्स, वेब डिझायनिंग यांसारख्या कला फॅशन डिझायनिंगला पूरक आहेत. त्यामुळे करिअर निवडताना यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
फॅशन डिझायनिंग नाही तर स्टायलिंग हे दोन पठडीचे मार्ग सर्वच फॅशन कॉलेजेसमध्ये इंटरशिपच्या वेळेस पुढे ठेवले जातात. स्टायलिंगसाठी तुम्हाला फक्त कपडय़ांचे नाही तर त्यासोबत कोणती ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी साजेशी दिसू शकते याची माहिती असणेही गरजेचे असते. पण त्यासोबतच मेकअप, हेअरस्टायलिंगबद्दल माहिती असणेही महत्त्वाचे असते. मॉडेलच्या कपडय़ांना आणि लुकला साजेसा मेकअप करणे, मेकअपमनला आपल्या मनातल्या कल्पना नेमक्या शब्दात पटवून देणे हेही गरजेचे असते. सुरुवातीच्या काळात कित्येकदा तुम्हाला शूटच्या वेळेस स्वत: मॉडेलचा मेकअप, हेअरस्टाइल करून द्यावी लागते. त्यामुळे मेकअप, हेअरस्टाइलची बेसिक माहिती तुम्हाला स्टायलिंगच्या वेळेस मदत करू शकते.
तुम्हाला समोरच्याशी उत्तम रीतीने संवाद साधता येत असेल, तर फॅशनचे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे. फॅशन कन्सल्टंटचे प्रस्थ आज वाढत आहे. बाजारात रोज नवे ब्रॅण्ड्स येत असतात. एखाद्या मॉलमध्ये lp30गेल्यास तिथे साधा कुर्ता जरी खरेदी करायचा असेल तर त्याचे पर्याय देणारी किमान पाच दुकाने आपल्याच दुकानाच्या शेजारी असतात. तेव्हा आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाला आपल्याकडील कलेक्शनच कसे सर्वात सुंदर आहे आणि ते त्यांच्यावर किती उठून दिसतेय हे सांगण्याची जबाबदारी दुकानातील कन्सल्टंटची असते. आतापर्यंत यांना सेल्समन म्हटले जायचे. त्यामुळे त्यांना तितकेसे महत्त्व दिले जात नसे. पण ब्रॅण्डेड शॉपिंगच्या काळात या कन्सल्टंटचे काम खूप महत्त्वाचे आहे. कित्येकदा दुकानात दुपट्टा, शर्ट, स्कर्ट घेऊन येतात आणि त्याला साजेसा ड्रेस किंवा टय़ुनिक मागतात किंवा कधीतरी एखाद्या ड्रेसची नवीन स्टाइल त्यांच्यावर सूट होईलच याची खात्री त्यांना नसते. मग अशा वेळी कन्सल्टंटची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्याला ग्राहकाला एखादा ड्रेस त्याच्यावर साजेसा दिसतोय की नाही किंवा त्याच्या शरीरयष्टीनुसार काय त्याला उत्तम दिसू शकेल, याचे योग्य मार्गदर्शन ग्राहकाला करून द्यावे लागते. यातून ग्राहकाची ब्रॅण्डमधील विश्वासार्हता वाढते. त्यामुळे हल्ली कित्येक डिझायनर्स आणि ब्रॅण्ड्स आपल्या दुकानात काम करणाऱ्या कन्सल्टंटना विशेष प्रशिक्षण देतात.
संवादकौशल्याचा आणि लिखाणाचा वापर तुमच्या फॅशन डिझायनिंगच्या अभ्यासासोबत करून घेता येणारे दुसरे माध्यम म्हणजे ऑनलाइन. सध्या बहुतेक सर्व ब्रॅण्ड्स ऑनलाइन कार्यरत आहेत. सोशल मीडिया, वेबसाइट्सवरील त्यांच्या कामाला वेग आला आहे. ब्लॉगवर लिखाण करणारे, युटय़ुब व्हिडीयो तयार करणाऱ्या मंडळींची त्यांना गरज आहे. त्यामुळे व्हिडीयोजमध्ये एखादे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी किंवा मुलाखत घेताना योग्य रीतीने समोरच्याशी संवाद साधू शकणाऱ्या तरुणांची गरज या वेबसाइट्सना आहे. ब्लॉग, सोशल मीडियावर नेमके पण मुद्देसूद लिखाण करणाऱ्यांची गरजही या क्षेत्रात आहे. त्यामुळे तुमच्या फॅशनच्या अभ्यासाचा इथे वापर करता येऊ शकतो.
डिझायनर्सना त्यांच्या ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी मार्केटिंग करणाऱ्याचीही गरज असते. मार्केटिंग करणाऱ्या माणसाला जर ब्रॅण्डच्या तत्त्वांची नेमकी माहिती असेल तर तो समोरच्याला ब्रॅण्डची विश्वासार्हता उत्तम रीतीने समजावून देऊ शकतो. त्यामुळे डिझायनर्स फॅशन डिझायनिंगची पाश्र्वभूमी असलेल्या तरुणांना मार्केटिंगमध्ये घेण्यास उत्सुक असतात. अर्थात यासाठीही संवाद आणि लिखाणाची आवड मदतीस येऊ शकते.
फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र दहावी किंवा बारावीच्या परीक्षा झाल्यावर ताबडतोब निवडले जाते. त्यामुळे कित्येकदा तरुण या क्षेत्राबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. पण कोर्स करण्यासाठी भरभक्कम फी भरली असल्याने कोर्स अर्धवट सोडणेही त्यांना शक्य नसते. अशा वेळी थोडा वेगळा विचार केल्यास तुमच्या शिक्षणाचा नक्कीच चांगला वापर करता येऊ शकतो. कोर्सला प्रवेश घेतानाच या अंगांबद्दल कॉलेज किती जागरूक आहे, याची माहिती करून घेणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे कॉलेज निवडतानाही पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे. सध्या कित्येक कॉलेजेसमध्ये फॅशन डिझायनिंग शिकविले जाते. सर्वच कोर्स खासगी असल्याने त्यांच्या डिग्रीला बाजारात किती महत्त्व आहे, याची पुरेशी माहिती काढणे कठीण असते. अशा वेळी काही छोटय़ा, पण महत्त्वाच्या बाबी पडताळल्या तर आपली फसवणूक होणे टळू शकते.
१) वेबसाइटवर कॉलेजचा कॅम्पस, सोयीसुविधा यांची माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रत्येक lp31वर्ग, साधनसामग्री पडताळणे कधीही उत्तम. कारण कित्येकदा वेबसाइटवर प्रातिनिधिक फोटोज असतात आणि मूळ कॉलेजचा परिसर वेगळा असतो.
२) पोर्टफोलिओ हा डिझायनरच्या कामाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो. तुमची पहिली नोकरी पोर्टफोलिओमधील तुमचे काम पाहूनच मिळते. त्यामुळे कॉलेजमध्ये पोर्टफोलिओ तयार करायला किती महत्त्व दिले जाते, हे तपासा. प्रवेशाच्या वेळी सध्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ पाहण्यासाठी तुम्ही मागू शकता. त्या कामावरून संपूर्ण कोर्सच्या कालावधीत कॉलेजमध्ये काय शिकविले जाते, याचा अंदाजही येतो.
३) प्लेसमेंट ही या क्षेत्राची महत्त्वाची बाजू आहे. शिक्षण झाल्यावर प्लेसमेंट कोणत्या कंपन्यांमध्ये दिली जाते, याची माहिती तुम्ही कॉलेजकडे मागू शकता. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळणे पहिल्या नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
४) कोर्सच्या शेवटी फॅशन शो होत असल्यास पोर्टफोलिओच्या दृष्टीने उत्तम असते. त्यामुळे त्याची चौकशी नक्कीच करा.

फॅशन फोटोग्राफी
फोटोग्राफीची आवड असलेल्यांना फॅशन फोटोग्राफीचे क्षेत्र खुले आहेच. मॉडेल किंवा डिझायनरचा पोर्टफोलिओ तयार करणे, कलेक्शनचे फोटोशूट, फॅशन शोच्या वेळीच फोटोग्राफी करण्यासाठी फोटोग्राफर्सची गरज नेहमीच असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 1:06 am

Web Title: career special 34
टॅग Coverstory
Next Stories
1 वाटा करिअरच्या : स्मार्ट मुलांसाठी कूल करिअर
2 ग्रीन करिअर : मैत्र जिवांचे…
3 भूकंपनाचे पूर्वानुमान शक्य?
Just Now!
X