lp00पर्यावरण क्षेत्रातील साधारण २५-३० वर्षांपूर्वीचा काळ हा चळवळींचा होता. चिपको आंदोलन, पश्चिम घाट बचाव आंदोलन अशा आंदोलनांनी देशात पर्यावरणाचा एक मोठा झंझावात निर्माण केला होता. आजही काही प्रमाणात अशा चळवळी होतच आहेत; पण त्यात एक महत्त्वाचा बदल झाला आहे तो म्हणजे त्या चळवळी आता पर्यावरणाच्या सूक्ष्मतम पातळीवर जाऊन थेट अभ्यासावर बेतल्या गेल्या आहेत. 

जागतिकरणाच्या रेटय़ानंतर येऊ घातलेल्या अनेक नवनव्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे सूर वारंवार उमटू लागले; पण काही मोजकी ठिकाणं सोडली तर एखाद्या विवक्षित ठिकाणी विवक्षित प्रमाणात असणाऱ्या जैववैविध्याच्या माहितीचा आपल्याकडे अभाव असायचा आणि आजही काही प्रमाणात आहे. त्यामुळे एखाद्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करायचा, तर अभ्यासाचा जो आधार हवा तो तोकडाच पडतो. मात्र याच टप्प्यावर एक नवी फळीदेखील घडत गेली. ती फळी आहे तरुण पर्यावरण अभ्यासकांची. मेडिकल, इंजिनीअरिंग अथवा आयटी क्षेत्राच्या वाटेला न जाता ही पिढी थेट जंगलात उतरली, तीदेखील या क्षेत्रातलं शिक्षण घेऊन. पर्यावरणाकडे बघण्याचा त्यांचा करिअरिस्टिक दृष्टिकोन या क्षेत्रासाठी फायद्याचाच ठरत आहे.
केवळ वाघ-सिंहासारख्या वलयांकित प्राण्यांपेक्षा त्यांचं क्षितिज विस्तारित आहे. त्यामुळेच अगदी १००-२०० मीटरच्या अधिवासात वावरणाऱ्या कीटकांच्या अस्तित्वालादेखील एखाद्या प्रकल्पामुळे कसा धक्का बसू शकतो हे सिद्ध करता येऊ लागलं. इतकंच नाही, तर त्यातून अनेक नवनवीन प्रजातीदेखील उजेडात येऊ लागल्या. मानव आणि पर्यावरण या सनातन तिढय़ाचा गुंतादेखील कमी होऊ लागला. त्यातून दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या. एक ठोस शास्त्रीय कसोटय़ावर आधारित असा माहितीसाठा तयार होत गेला आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनाचा आधार तयार झाला. दुसरं म्हणजे ‘ग्रीन करिअरिस्ट’ लोकांची एक फळीच तयार झाली.
यात तरुणाईचा समावेश मोठय़ा प्रमाणात असून तो दिसामाजी वाढतच चालला आहे. विकास अपरिहार्य आहेच, पण त्याच जोडीला जैववैविध्यता टिकवायची असेल तर अशा ग्रीन करिअरिस्ट लोकांची गरज मोठय़ा प्रमाणात असणार आहे. त्यातल्याच काही जणांची ओळख-

lp02ओवी थोरात..
कच्छच्या रणात..
पर्यावरण क्षेत्रातील धोरण ठरविताना केवळ पर्यावरणाच्याच शास्त्रीय नोंदीचा आधार घेऊन निर्णय घेता येत नाही. संबंधित परिसरातील जनजीवनाच्या अभ्यासाचीदेखील त्याला जोड द्यावी लागते, किंबहुना त्याला असणारे राजकारणाचे पदरदेखील अभ्यासावे लागतात. त्यातूनच मग पर्यावरणाशी निगडित निर्णय घेतानाच्या नेमक्या अडचणी कळू शकतात. मात्र त्यासाठी अशा प्रकारच्या आंतरशाखीय अभ्यासाची गरज असते. नेमकी हीच गरज पूर्ण करणारी ओवी थोरात ही मराठमोळी तरुणी सध्या कच्छच्या रणात अविरत भटकत आहे.
अशोका ट्रस्ट रिसर्च फॉर एन्व्हॉयरन्मेंट अ‍ॅण्ड इकॉलॉजीच्या माध्यमातून ती कच्छच्या रणात बन्नी ग्रासलॅण्ड येथे पॉलिटिकल इकॉलॉजी या विषयावर पीएचडीच्या अभ्यासासाठी गेली १६ महिने तळ ठोकून आहे. रानोमाळ दूरदूर पसरलेल्या लांबच लांब रस्त्यांवरून गावागावांमध्ये तिची भटकंती सुरू असते. गेल्या काही वर्षांमध्ये येथे झालेल्या दुग्धविकासामुळे डेअरी प्रकल्पांची वाढ झाली आहे. अर्थातच या विकासामुळे नेमका या ग्रासलॅण्डवर काय परिणाम झाला आहे? येथील माणूस आणि जमिनीचं नातं कसं आहे? त्यात काही बदल झाले आहेत का? येथील जनतेच्या पर्यावरणावरील अवलंबित्वात बदल झाले आहेत का? येथील भटक्या जमातींचं चलनवलन कसं आहे? अशा अनेक प्रश्नांचा वेध तिच्या अभ्यासात समाविष्ट आहे.
अमेरिका-आफ्रिकेतील जंगलात असे अनेक अभ्यास झाले आहेत. मात्र अशा प्रकारचे अभ्यास हे आपल्या देशात तुलनेनं कमीच आढळतात, किंबहुना म्हणूनच मुंबईत अनेक संस्थासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केल्यावर पीएचडीसाठी काहीशा वेगळ्या विषयाची निवड केली आहे. रणथंबोरच्या आसपासच्या जंगलांना जोडणाऱ्या परिसरातील विकासकामांमुळे वन्यजीवांच्या वावरावर आलेल्या बंधनांची चिकित्सा करण्यासाठी ओवीने काही काळ त्या परिसरातदेखील वास्तव्य केले होते. खाणकाम, रस्ते आणि इतर विकासकामांमुळे होणारे परिणाम तिने नोंदविले आहेत, तर कर्नाटकच्या जंगलातील कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये तिचा सहभाग होता. नुकतेच तिच्या आजवरच्या धडपडीवर शिक्कामोर्तब झाले आहे ते तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित करणाऱ्या कार्ल झेईस अ‍ॅवॉर्डमुळे.
आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने जंगलांचे संरक्षण- संवर्धन करत आहोत त्यावर अशा अभ्यासातील निष्कर्ष हे हमखास बदल करू शकतात, असे ती सांगते. कर्नाटक वन विभागाने असे अनेक बदल केले असल्याचे ती नमूद करते, किंबहुना रिसर्चमध्ये हेच समाधान दडलेले असते असे तिला वाटते.
भरपूर भटकंती आणि नवनव्या लोकांशी, संस्कृतीशी घडणाऱ्या संवादामुळे, कॉपरेरेट क्षेत्रातील बैठय़ा कामापेक्षा हे काम कधीही जास्त समाधान मिळवून देणारं आहे, असे ती सांगते. अर्थातच असं भटकायचं तर घरचा पाठिंबा हा गरजेचा असतो. त्यामुळेच तुला जे करायला आवडेल ते काम कर, हा घरच्यांचा सकारात्मक पाठिंबाच तिला हे सारं काही करण्याचं बळ देतो, असे ती आवर्जून सांगते.

lp03सौरभ सावंत..
जंगलवेडी पॅशन
बऱ्याच वेळा होतं असं की, आवड म्हणून एखाद्या कामात आपण गुंतत जातो. त्याच वेळी चरितार्थासाठीचं म्हणून वेगळं शिक्षणदेखील घेत असतो. पण अखेरीस आवड, केवळ आवड न उरता पॅशनमध्ये परावर्तित होते, लौकिक शिक्षण बाजूला राहते, आणि पॅशनच तुमचं करिअर होऊन जातं. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असतानाच जंगलं भटकणारा आणि त्यातूनच वन्यजीव अभ्यासक व वन्यछायाचित्रणात लौकिक मिळवणारा सौरभ सावंत हे याचंच अगदी समर्पक उदाहरण म्हणावे लागेल.
इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असतानाच समवयस्क मित्रांच्या प्राणिशास्त्र विषयामुळे आनंदाच्या पातळीवरील त्याची भटकंती अभ्यासू भटकंतीत बदलत गेली. जे आपण पाहत आहोत, टिपत आहोत ते शास्त्रीय पद्धतीनं कसं मांडावं हे सौरभ शिकत गेला.
मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे त्याचं दुसरं घर झालं. पक्ष्यांच्या राज्यात तर तो विसावला होताच, पण छोटय़ा मोठय़ा कीटकांनी त्याचं लक्ष्य वेधून घेतलं. लहानपणी केवळ मौजेपोटी चतुरांच्या शेपटाला दोरी लावून उडविणारा सौरभ याच चतुरांच्या दुनियेत हरवून गेला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चतुरांच्या दस्तऐवजीकरणाचा त्याने ध्यास घेतला आणि चतुरांच्या तब्बल ६१ प्रजातींची नोंद केली. त्याच्या या सविस्तर शास्त्रीय नोंदीमुळे आजवरच्या दस्तऐवजीकरणातील एक त्रुटी कमी झाली असेच म्हणावे लागेल.
आजवर सौरभने दहाहून अधिक संशोधन संवर्धन प्रकल्पांवर काम केलं आहे. आययुसीएनच्या वर्गवारीनुसार धोक्याच्या पातळीवर असणाऱ्या पक्ष्यांच्या यादीसाठी त्याने काम केलं. पेंच आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये शासनाच्या प्रकल्पात, नागालॅण्डमध्ये लाखोंच्या संख्येत येणाऱ्या अमुर फाल्कनना शिकारींपासून वाचविणाऱ्या संवर्धन प्रकल्पात योगदान दिलं आहे. आज तो महाराष्ट्र वन विभाग, मुंबई विद्यापीठाचे सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज् आणि अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर एक मार्गदर्शक कार्यकर्ता तज्ज्ञ म्हणून जोडला गेला आहे.
नुकतेच सिटिझन सायन्स या संकल्पनेअंतर्गत अनेक हौशी पक्षी निरिक्षकांच्या माध्यमातून आकारास आलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पक्षी गणनेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वसामान्यांना असलेल्या आवडीला शास्त्रीय मार्गदर्शन देऊन झालेल्या पक्ष्यांच्या नोंदीकरणाचं हे काम सौरभला मनापासून समाधान देणारं वाटते. अभ्यासक वेगवेगळ्या विषयांवर काम करत असतातच पण सर्वसामान्यांमध्ये असणाऱ्या पॅशनला विकसित केलं तर खूप मोठं काम उभे राहू शकते असे त्याचे मत आहे.
अर्थात केवळ अभ्यासू नोंदी इतकाच मर्यादित हेतू न ठेवता त्याच जोडीने जोपासलेल्या छायाचित्रणाच्या छंदातदेखील प्रावीण्य मिळवले आहे. त्यामुळेच सॅक्च्युरी अशियाने वन्यजीव छायाचित्रकार म्हणून त्याचा विशेष गौरव केला आहे. द लॉस्ट अ‍ॅम्फिबियान्स फोटोग्राफी स्पर्धेत त्याच्या कामाची विशेष नोंद घेण्यात आली आहे. नॅचरल हिस्ट्री म्युझिअम लंडनच्या २०११ च्या वन्यजीव छायाचित्रकार स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत मजल मारली आहे. २०१५ मध्ये देण्यात आलेल्या कार्ल झेईस वाइल्डलाइफ अ‍ॅवार्डने त्याच्या आजवरच्या कामाचा गौरवच झाला आहे. भविष्यात सौरभला वन्यजीवांवरील माहितीपट करायचे आहेत.

आमोद झांबरे..lp04
चिकित्सा बदलाची!
जंगलात भटकताना अनेक वेळा काही गोष्टी अगदी अलगद सापडतात. पण त्याकडे अभ्यासू दृष्टीने पाहता आले तर नवीनच काहीतरी हाती लागू शकते. आमोद झांबरेच्या बाबतीत असंच काहीसं झालं. उन्हाळी शिबिरातून त्याला जंगल भटकंतीची आवड निर्माण झाली. आणि मग पुढे अशाच उन्हाळी शिबिरांमध्ये तो स्वत:देखील एक स्वयंसेवक म्हणून जाऊ लागला. आणि अर्थातच त्याची इतर भटकंतीदेखील उन्हाळ्यातच वाढली. खरं तर तेव्हा हे सारं हे केवळ आवड छंदाच्या पातळीवर होतं. पर्यावरणाच्या क्षेत्रात करिअर करायचं असं काही तेव्हा डोक्यात नव्हतं. पण भरपूर भटकायचं, भरपूर फोटो काढायचे हे सुरूच होतं. उन्हाळ्यातल्या भटकंतीमुळे साप विंचू भरपूर दिसायचे. पण आपण नेमका कशाचा फोटो काढतो आहोत हे कळणं महत्त्वाचं होतं. आपसूकच त्याच्या भटकंतीला एक शिस्त लागली. वाढत्या नोंदीतूनच हाती आल्या त्या विंचवांच्या तीन नव्या प्रजाती.
अर्थातच एखाद्या तरुण अभ्यासकासाठी अशा प्रकारे नवीन प्रजाती सापडणे हे जॅकपॉटच म्हणावे लागेल. आमोदचं वैशिष्टय़ असं की त्याने नव्या प्रजातींचं शास्त्रीय दृष्टिकोनातून वर्गीकरण (टॅक्सोनॉमी) करून ही प्रजाती नवीन कशी आहे हे मांडण्याचं काम अगदी चोख केलं. हे तसं कठीण काम त्याने वयाच्या १९ व्या वर्षांपासूनच सुरु केलं होत. त्यातूनच मग पुढील कामाला दिशादेखील मिळाली.
पण त्याचा मूलत: भर आहे तो प्राण्यांच्या वर्तणुकीवर. त्यामुळेच एकाच प्राण्यात अडकून राहीला नाही. वातावरणातील बदलांमुळे समुद्राच्या पाण्यावर होणाऱ्या परिणामांचा कोरल रिफवर काय परिणाम होतो त्यावर त्याने एमएस्सीसाठी प्रोजेक्ट केला. आमोद सांगतो की कोरल रिफ हे समुद्री पर्यावरणात अ‍ॅमेझॉनच्या रेन फॉरेस्टसारखी भूमिका बजावत असते. या कोरल रिफला जर धक्का लागला तर सागरी जिवांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. आणि या कोरल रिफचं मुख्य खाद्य असणाऱ्या बटरफ्लाय माशांच्या वागणुकीवर काय परिणाम होतो हे त्याने या अभ्यासातून मांडले आहे. लक्षद्वीपच्या चार बेटांवर त्याने केलेल्या या कामामुळे आज लक्षद्वीपवर कोणताही प्रकल्प करायचा असेल तर त्याच्या या माहितीची दखल घ्यावी लागणार आहे. किंबहुना पर्यावरण संरक्षण संवर्धनाच्या कामात नेमकं कशावर लक्ष केंद्रित करायचं हे त्यातून उलगडणार आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस बंगलोरमधून एमएस्सी पूर्ण केल्यानंतर आज तो साताऱ्याच्या पठारी भागात सॅण्ड थ्रोटेड लिझार्ड्सवर काम करत आहे. वीणीच्या हंगामात मानेच्या खाली असणारा पंख्यासारखा अवयवाचा डिस्प्ले करणाऱ्या या प्राण्याची वर्तणूक सध्या तो टिपतो आहे. अर्थातच संपूर्ण परिसंस्थेचा अभ्यास करताना त्यातील बदल टिपताना प्राण्यांच्या वर्तणुकीत होणारे बदल नोंदवत राहणे हाच आता आमोदच्या पुढील कामाचा पाया राहणार आहे.

lp05झिशान मिर्झा – राजेश सानप..
आरेचे सृष्टीमित्र
पर्यावरण क्षेत्रातील कोणताही लढा द्यायचा असेल तर गरज असते ती मूलभूत नोंदींची. मुंबईच्या नुकत्याच रद्द झालेल्या विकास आराखडय़ामध्ये आरेच्या जमिनीवर मेट्रो प्रकल्प उभारताना याचे अगदी थेट प्रत्यंतर आले. आरेच्या जमिनीवर कसलीही जैवविविधता नाही असं रेटून सांगण्यात येत होतं, पण त्याच वेळी सरकार हे पूर्णपणे विसरून गेलं होतं की याच आरेच्या परिसरातील जैववैविध्य नोंदविणाऱ्या दोन तरुणांच्या अभ्यासाला आपणच सृष्टीमित्र पुरस्काराने गौरविलं आहे. आरेवरील मेट्रो प्रकल्पाविरुद्ध लढा देणाऱ्यांनी हाच डेटा त्यांच्या जनहित याचिकेत दिला होता. आरेची ही सारी जैवविविधता मांडणारे ते दोन सृष्टीमित्र आहेत झिशान मिर्झा आणि राजेश सानप.
झिशान भवन्समध्ये बीएस्सी करणारा. तर राजेश आर्ट्समध्ये शिकणारा. त्या महाविद्यालयीन काळातच त्यांना जंगलाने भुरळ घातली. त्यातच सरपटणाऱ्या प्राण्यांची जरा अधिकच. अर्थात, योग्य वेळी योग्य ठिकाणी मार्गदर्शन मिळाल्यामुळे या दोघांच्या आरे भटकंतीला अभ्यासाचे स्वरूप मिळाले. केवळ ढीगभर नोंदी आणि छायाचित्र असून उपयोग नाही, तर त्याचं योग्य ते वर्गीकरण कसं असायला हवं हे त्यांनी मेहनतीनं अंगी बाणवलं. परिणामी, आज आरेच्या जैववैविध्याचा एक ठोस असा भक्कम दस्तऐवज आपल्याकडे तयार झाला आहे.
झिशान आणि राजेशचं दुसरं महत्त्वांच वैशिष्टय़ म्हणजे या दोघांना असणारं सरपटणाऱ्या प्रजातींचं वेड. २००७ ते २०१० या काळात त्यांच्या आरे भटकंतीत त्यांनी अनेक साप, विंचवांच्या नोंदी केल्या आणि त्यांच्या हाती घबाडच लागलं. आजवर कधीच न नोंदल्या गेलेल्या तीन प्रजाती त्यांना आढळून आल्या. या प्रजातींवर त्यांनी लिहिलेला विस्तृत अहवाल रशियन जर्नल ऑफ हर्पेटॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या नोंदीवर शास्त्रीय शिक्कामोर्तब झालं. आपल्या नोंदीवर आधारित शोधनिबंध, प्रबंध प्रकाशित करण्याची शास्त्रीय पद्धत या दोघांनीही अंगी बाणवली असल्यामुळे आज एमएस्सी करणाऱ्या या दोघांचे २५ हून अधिक पेपर व अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.
आज हे दोघेही नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च बेंगलोर येथे एमएस्सी करत आहेत. झिशान शास्त्र शाखेचा आहे, पण राजेशने पर्यावरणातच करिअर करायचं ठरवून आर्ट्सनंतर दूरस्थ अभ्यासक्रमाद्वारे शास्त्र शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. राजेश सांगतो की, वाइल्डलाइफ करिअर म्हणजे नेमकं काय हे याची त्याच्या घरी कसलीच कल्पना नव्हती. त्यामुळे घरी हे पटवून देणंच काहीसं जड गेल्याचं तो सांगतो.
सध्या हे दोघेही त्रिपुरा राज्यातील जैववैविध्याचे दस्तऐवजीकरणाचे काम करत आहेत. उत्तर पूर्वेकडील राज्यांकडे आपल्या एकूणच व्यवस्थेत असणारे दुर्लक्षित्व त्रिपुराच्या बाबतीत जरा जास्तीच जाणवणारे आहे. त्यामुळेच त्यांच्या नोंदींना भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार हे निश्चित.

lp06चेतन राव..
कासवमित्र
किंग कोब्रा म्हटल्यावर ना वाघाचं सौंदर्य ना शान, पण मनात काहीशी भीतीच निर्माण होणार; पण चेतन राव याने हा किंग कोब्राच आपल्या अभ्यासाचा विषय केला. वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामधून एमएस्सी करताना आपल्या प्रोजेक्टसाठी त्याने ठरवून हा विषय निवडला. बीएस्सी करताना ज्या अगुम्बेत त्याने सहकारी म्हणून काही काळ अशा प्रोजेक्टवर काम केले त्या अगुम्बेतच तो त्यासाठी आठ महिने जाऊन राहिला. किंग कोब्राचा संमिश्र अधिवास आणि स्थानिक लोकांमध्ये त्याला देव मानण्याची प्रथा-परंपरा, घरात नाग आल्यानंतरदेखील त्याला हुसकावून न लावता तो जाईपर्यंत दुसऱ्यांच्या घरात जाऊन राहण्याची पद्धत, किंग कोब्राचे चलनवलन, त्याचे खाद्य, बदलते अधिवास अशा अनेक मुद्दय़ांचा सखोल अभ्यास असलेला त्याचा प्रबंध ‘हमर्याड’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. सरपटणाऱ्या प्राण्यांबाबत हे जर्नल दक्षिण आशियात मानाचे समजले जाते. चेतनच्या या थिसिसला त्यामुळे चांगली प्रसिद्धी तर मिळालीच, पण त्याच्या थिसिसचे पुस्तकदेखील निघाले. एमएस्सीच्या पातळीवरील अशा प्रबंधाच पुस्तक तयार होणे आणि ते संदर्भ म्हणून वापरले जाणे हे नोंद घेण्यासारखेच म्हणावे लागेल.
त्यानंतर चेतनने अंदमान आणि निकोबार बेटावर सात महिने वास्तव्य करून उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाच्या सर्वेक्षण प्रकल्पावर महत्त्वाचे काम केले. मुख्यत: ही बेटे हाच मूळ अधिवास असणाऱ्या प्राण्यांचा त्यात समावेश होता. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या चलनवलनाचा अभ्यास हाच त्याचा मूळ आवडीचा विषय आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चेतन ओरिसात ऋषीकुंज बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण संवर्धन प्रकल्पात व्यस्त आहे. ओरिसातल्या या बीचवर विणीच्या हंगामात अक्षरश: शेकडय़ांच्या संख्येने ऑलिव्ह रिडलेच्या मादी अंडी देण्यासाठी येतात. योग्य काळानंतर जेव्हा अंडय़ांतून कासवांची पिल्ले बाहेर पडतात तेव्हा या बीचवर जिकडे पाहावे तिकडे केवळ कासवांचेच साम्राज्य पसरलेले असते. ऑलिव्ह रिडलेंच्या प्रजननासाठी जगातील अगदी मोजक्या बीचमध्ये याची गणना होते. अर्थातच पर्यावरणदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील असाच हा भाग असल्यामुळे त्यासाठी दीर्घकालीन प्रकल्पाचीच गरज आहे.
ऑलिव्ह रिडलेची सर्वच अंडय़ांमधून पिल्ले जन्माला येत नाहीत. कधीकधी इतर प्राणी (कुत्रा व तत्सम) ही अंडी उकरतात, तर मानवी हस्तक्षेपदेखील मोठा असतो, तर कधी कधी मासेमारीच्या जाळ्यात अडकून कासवांच्या पिल्लांना त्रास होतो, तर जाळ्यांचेदेखील नुकसान होते. त्यामुळेच एकाच वेळी स्थानिकांमध्ये पर्यावरण जागृती आणि दुसरीकडे या कासवांचा अभ्यास असे दुहेरी काम सुरू असते. आजवरच्या अभ्यासातून काही कासवे अगदी तिसऱ्या-चौथ्यांदादेखील येथे आल्याचे नोंदविले आहे. स्थानिकांचे सहकार्य वाढले असून कासवांच्या आगमनाची बातमी तेच आपणहून देतात, असे चेतन सांगतो. अर्थातच अशा प्रकल्पांमुळे संवर्धनाच्या कामातील धोरणांना चांगलाच फायदा होत आहे.
सुहास जोशी