News Flash

करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : औषधनिर्माणाचे प्रगतिशील क्षेत्र

कोविड १९ संक्रमणाच्या लाटेने अवघ्या जगाला विळख्यात घेतले आणि वैद्यकशास्त्र तसेच त्यास साहाय्यभूत अशा इतर यंत्रणाचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

नवीन रोग आला की त्यासाठी नवी उपचार पद्धत, नवी औषधे आणि नव्या प्रतिबंधात्मक उपायांची गरज भासते. रोगाचे निदान आणि उपचार करणाऱ्या वैद्यकशास्त्राबरोबर अशा वेळी औषध निर्माण शास्त्र (फार्मास्युटिकल सायन्सेस) हे संशोधन आणि निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम करते.

डॉ. प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com

कोविड १९ संक्रमणाच्या लाटेने अवघ्या जगाला विळख्यात घेतले आणि वैद्यकशास्त्र तसेच त्यास साहाय्यभूत अशा इतर यंत्रणाचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सार्स, इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावामुळे सामान्य माणसांच्या जनजीवनाची घडी विस्कटून त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत हे आपण पाहिलेच आहे. अशा बिकट काळात जवळजवळ सगळेच उद्योगधंदे ठप्प झाले तेव्हा आरोग्य सुविधा व्यवस्था (हेल्थ केअर सिस्टीम) नुसती खंबीरपणे उभीच नव्हती तर तिला रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते.

नवीन रोग आला की त्यासाठी नवी उपचार पद्धत, नवी औषधे आणि नव्या प्रतिबंधात्मक उपायांची गरज भासते. रोगाचे निदान आणि उपचार करणाऱ्या वैद्यकशास्त्राबरोबर अशा वेळी औषध निर्माण शास्त्र (फार्मास्युटिकल सायन्सेस) हे संशोधन आणि निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम करते. अर्थात हे काम काही फक्त याच वेळी (कोविडमुळे) सुरू होते असे नाही. औषध संशोधन आणि निर्मिती ही जगभरात सातत्याने सुरू असते. अस्तित्वात असलेल्या आजारांवर अधिक प्रभावी औषधे, असाध्य मानल्या गेलेल्या रोगांसाठी औषधे, नियमित उपचारांसाठी गरजेची औषधे अशा अनेक स्तरांवर हा उद्योग-व्यवसाय अखंडपणे कार्यरत असतो.

भारतासारख्या प्रगतिशील देशात वैद्यकशास्त्र बऱ्यापैकी प्रगत असूनही फार्मासिस्टना अजूनही महत्त्व मिळताना दिसत नाही, मात्र तरीदेखील औषध निर्माण क्षेत्रात फार्मासिस्ट प्रभुत्व गाजवत आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील ८० टक्के देशांना स्वस्त आणि उत्तम दर्जाची औषधे भारतातून पुरवली जातात. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतात नवी औषधे विकसित होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र सध्या वापरात असलेल्या औषधांचे उत्पादन करून ती देशभर आणि जगभर पुरविण्याचे काम आपला औषध निर्माण व्यवसाय मोठय़ा प्रमाणात करतो. नवीन औषधाची निर्मिती, त्यासाठीचे संशोधन हे प्रचंड खर्चीक काम आहे. तुलनेने ते आपल्याकडे मर्यादित स्वरूपात का होईना, पण सुरू असते. एकूणच औषध निर्माण शास्त्रातील शिक्षण घेतलेल्या व्यक्तीसाठी करिअरच्या अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.

आपल्या देशात औषध निर्माण क्षेत्रात करिअर करण्यासाठी पदविका, बॅचलर्स, मास्टर्स आणि डॉक्टरेट अशी चार स्तरांवर शिक्षणाची सुविधा आहे. प्रत्येक टप्प्यानुसार वेगवेगळ्या करिअरच्या संधी खुल्या होतात. डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (पीसीआय) औषध विक्रीचा परवाना दिला जातो. तो मिळाल्यावर स्वत:चे औषधाचे दुकान सुरू करता येते किंवा परवानाधारक फार्मासिस्ट इतर खासगी अथवा रुग्णालयांतील औषध दुकानांमध्ये नोकरी करू शकतात.

बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून औषधनिर्मितीचा परवाना दिला जातो. तो मिळाल्यावर स्वत:चा औषधनिर्मिती कारखाना उघडता येते अथवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये विविध पदांवर नोकरी करता येते. मास्टर्स आणि डॉक्टरेट पूर्ण करून औषध संशोधन क्षेत्रात करिअर करता येते.

देशात बॅचलर्स ऑफ फार्मसी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी परदेशांतही जाता येते. त्यासाठी त्या त्या देशातील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन मास्टर्स अथवा मास्टर्स प्लस डॉक्टरेटला प्रवेश मिळतो. शिष्यवृत्ती मिळवून अथवा शैक्षणिक कर्ज काढून शैक्षणिक खर्च होऊ शकतो. पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनीमधील नामांकित विद्यापीठांमध्ये स्पेशलायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

औषधनिर्मिती क्षेत्रात औषध विक्री, औषधनिर्मिती, औषध संशोधन याचबरोबरच विमा, प्रकाशने, नियामक (रेग्युलेटरी), आयात-निर्यात अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी आहेत. त्याबद्दल थोडे विस्ताराने पाहूया.

आपल्या सर्वाना माहीत असलेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा सर्वसाधारणपणे कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे, ती उत्पादने स्थानिक बाजारात उपलब्ध करणे वगैरे स्वरूपाची कामे करतो. जोडीला मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले असेल तर प्रॉडक्ट मॅनेजर, विभागीय मॅनेजपर्यंत पदोन्नती होऊ शकते. याला कल्पक वृत्तीची जोड मिळाली तर जाहिरात क्षेत्रातदेखील वाव मिळू शकतो.

मास्टर्स किंवा डॉक्टरेट केल्यावर मेडिको मार्केटिंगमध्ये नोकरी मिळू शकते. यामध्ये उत्पादन विकसनाची जबाबदारी असते. उत्पादनाचे म्हणजेच औषधांचे आवरण, वेष्टन (पॅकेजिंग), त्यावर काय माहिती असावी या बाबींचा प्रामुख्याने समावेश असतो. त्याचबरोबर डॉक्टरांना उत्पादनांबद्दल कशा प्रकारे माहिती द्यावी, प्रमोशनसाठी स्वरूप, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे प्रशिक्षण अशा बाबी मेडिको मार्केटिंग विभाग सांभाळतो.

औषधनिर्मिती क्षेत्रातील इतर कामांमध्ये औषध उत्पादन प्रक्रिया, आवरण-वेष्टन (पॅकेजिंग), वितरण आणि साठा व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण (कंट्रोल), गुणवत्तेची खात्री (अश्युअरन्स) अशा विभागांतदेखील नोकरीच्या संधी बॅचलर्स, मास्टर्स शिक्षण घेतल्यावर मिळतात.

त्याचबरोबर विमा कंपन्याकडून आरोग्य विमा घेताना ग्राहकांची आरोग्य तपासणी आणि त्यानुसार संभाव्य धोक्याचा अंदाज बांधून हप्ता ठरवणे, विमा दाव्यामध्ये कागदपत्रांची शहानिशा करणे अशी कामेदेखील मिळू शकतात.

मास्टर्स करताना स्पेशलायझेशनसाठी आपल्या आवडीचा पर्याय निवडता येतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल अ‍ॅनालिसिस, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोग्नोसी इत्यादी विषय असतात. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याप्रमाणे विषय निवडावा.

फार्मास्युटिकल केमेस्ट्री : नवीन औषधांवर संशोधन करताना अनेक केमिकल रिअ‍ॅक्शन कराव्या लागतात, नवीन तंत्रज्ञान आणि अद्ययावत सॉफ्टवेअर (कॅड) वापरून हजारो मॉलिक्युलर्सपैकी कोणती औषधी योग्यतेची असतील याची शहानिशा करता येते.

फार्माकॉलॉजी : कोणतेही औषध मानवी शरीरात गेल्यावर आपले काम कसे करते, शरीरातील कोणत्या घटकांवर औषधाचा काय परिणाम होतो या बाबींचा अभ्यास या शाखेत केला जातो. नवीन औषधे किती गुणकारी आहेत हे आधी प्राण्यांवर प्रयोग करून तपासले जाते त्याला प्रीक्लिनिकल रिसर्च म्हणतात, तेही याच शाखेच्या अखत्यारीत येते.

फार्मास्युटिक्स : नवीन औषधाचा शोध लागला की ते कोणत्या स्वरूपात वापरल्याने जास्त गुणकारी ठरेल हे या शाखेचे लोक प्रयोग करून ठरवतात. औषध गोळी, कॅप्सूल, द्रव, इंजेक्शन कोणत्या स्वरूपात घेता येईल याचे संशोधन यामध्ये केले जाते. औषध किती काळ टिकेल, त्याची ‘स्टॅबिलिटी’, ‘पॅलॅटिबिलिटी’ वाढवण्यासाठी त्यात कोणते पूरक घटक किती प्रमाणात मिसळता येतील याचेदेखील या शाखेत संशोधन होते.

कॉस्मेटिकॉलॉजी : सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन ही फार्मास्युटिक्स शाखेची उपशाखा असून याही क्षेत्रात भरपूर वाव आहे.

फार्मास्युटिकल अ‍ॅनॅलिसिस : औषधनिर्मिती तसेच संशोधनाच्या अनेक टप्प्यांत औषधाच्या शुद्धतेची (प्युरिटीची) चाचणी करावी लागते. तसेच मानवी शरीरात औषध कोणत्या अवयवांपर्यंत पोहोचते, शरीरातून औषध कोणत्या प्रकारे बाहेर फेकले जाते याची चाचणी करण्याच्या पद्धती या शाखेत शोधल्या जातात.

रेग्युलेटरी अफेअर्स : औषध निर्माण क्षेत्र हे मनुष्याच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रावर शासनाचे कठोर र्निबध असतात. औषधनिर्मिती, संशोधन, आयात-निर्यात इत्यादी कामांतील प्रत्येक टप्प्यावर शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि इतर शासकीय प्रक्रिया ही शाखा पाहाते.

 क्लिनिकल रिसर्च आणि फार्माको व्हिजिलन्स : नवीन शोध लागलेली औषधे एकदा का प्राण्यांवरील प्रयोगात गुणकारी ठरली की त्याचे माणसांवर होणारे चांगले-वाईट परिणाम क्लिनिकल चाचण्या करून तपासले जातात. चार ते पाच टप्प्यांत औषधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. कठोर गुणवत्ता निकषांवर सरस ठरणाऱ्या औषधांना पुढे मार्केटिंगची परवानगी मिळते. अशी परवानगी मिळाल्यानंतरही या औषधांचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना याचा दीर्घकाळपर्यंत पडताळा घेतला जातो.

फार्माकोग्नोसी : या शाखेत वनस्पतींपासून मिळणाऱ्या औषधांवर संशोधन होते. त्यामुळे आयुर्वेदिक, हर्बल औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होतात.

मास्टर्स केल्यानंतर इतर काही आनुषंगिक क्षेत्रांत रोजगार संधी मिळू शकते.

न्यूट्रास्युटिक्स : न्यूट्रिएंट एनरिच फूड आताशा फार लोकप्रिय होत आहे. कॅल्शियम एनरिच बिस्कीट, आयर्न, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमिन एनरिच फूड सप्लिमेन्ट्स यामध्येदेखील औषध निर्माण क्षेत्रातील मास्टर्सना करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

आयपीआर (इंटलेक्टय़ुल प्रॉपर्टी राईट्स)/ पेटंट : नवीन औषधांचे पेटंट दाखल करणे, पेटंटना आव्हान देणे तत्सम कामे करणाऱ्या पेटंट कंपनीमध्ये औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते.

औषधांसंबंधी लिखाण (मेडिकल रायटिंग) : गेल्या काही वर्षांत औषध निर्माण क्षेत्रातील उलाढाली वाढल्या असल्याने मेडिकल रायटिंग या क्षेत्रात बराच वाव आहे. नवीन संशोधनाचे शोधनिबंध लिहिणे, नियंत्रकासाठी अहवाल लिहिणे, वैद्यकीय परिषदांमध्ये सादरीकरण करणे अशा कामांचा यामध्ये समावेश होतो.

सरकारी नोकरी : उद्योगधंद्यांतील कामाचा अनुभव आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) ही सरकारी नोकरी मिळवता येते. औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) हे आपल्या अखत्यारीतील सर्व औषध दुकानांच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. नवीन दुकानांना परवानगीसाठी तपासणी, औषधांचा काळाबाजार होऊ नये म्हणून दक्षता अशी कामेदखील औषध निरीक्षकांच्या कामाचा भाग असतो.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नियुक्तीसाठी औषध निर्माण क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवीचा उपयोग होतो. सरकारी रुग्णालयांत ‘हॉस्पिटल फार्मासिस्ट’ म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

याबरोबरच गेल्या काही वर्षांत आपल्याकडे खूप मोठय़ा प्रमाणात औषध निर्माण क्षेत्राचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झाली आहेत. अशा ठिकाणी अध्यापनाच्या संधीदेखील बऱ्याच आहेत. याशिवाय औषध निर्माण शिक्षणाबरोबरच विशेष प्रशिक्षण घेऊन जिनोमिक्स, प्रोटिओनॉमिक्स, एसएएस प्रोग्रामिंग फॉर क्लिनिकल रिसर्च, बायो-स्टॅटिस्टिक्स, बायो-इन्फॉर्मेटिक्स इत्यादी अनेक क्षेत्रांत फार्मासिस्ट उत्तम कामगिरी करू शकतात.

वाढते आयुर्मान, बदलत्या जीवनशैलीमुळे जडणारे रोग, प्रदूषणामुळे होणारे आजार, संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य विम्यामुळे सामान्यांच्याही आवाक्यात आलेल्या उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सेवासुविधा अशा अनेक कारणांमुळे औषध निर्माणशास्त्र हे दिवसागणिक अधिक प्रगती करत आहे. अशा प्रगतिशील क्षेत्रात येत्या काळात आणखीही नवनवीन रोजगार संधी उपलब्ध होतच राहतील.

शिक्षण कसे घ्याल?

  • भारतात फार्मसीमध्ये शिक्षणाचे चार टप्पे आहेत.
  • डी. फार्म (डिप्लोमा इन फार्मसी) विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षे. विज्ञान शाखेतून १०+२  (पीसीएम/ पीसीबी) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतात.
  • बी. फार्म (बॅचलर ऑफ फार्मसी) विज्ञान शाखेत बारावीनंतर चार वर्षे. बॅचलर ऑफ फार्मसीसाठी त्या-त्या राज्याची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. महाराष्ट्रात एमएच-सीईटी (महाराष्ट्रकॉमन एंट्रन्स टेस्ट) या परीक्षेत शून्याहून अधिक गुण मिळविणे आवश्यक असते. यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते. त्यामुळे शून्यापेक्षा दशांश गुण जास्त मिळाले तरी उमेदवार प्रवेशास पात्र ठरू शकतात.
  • एम. फार्म (मास्टर ऑफ फार्मसी) बी. फार्मनंतर दोन वर्षे.
  • पीएच. डी. (डॉक्टरेट इन फार्मसी) मास्टर इन फार्मसीनंतर तीन ते पाच वर्षे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:55 pm

Web Title: careers related to the pharmaceutical and medicine manufacturing industries career special issue career post covid dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ११ जून ते १७ जून २०२१
2 तीर्थ?
3 पर्यावरण विशेष : एवढंच करा, काहीही करू नका!
Just Now!
X