scorecardresearch

गोडी अपूर्णतेची..

अपूर्णत्व हेच माणूस म्हणून जगत राहण्याचं लक्षण आहे…

lp19‘तेजू, ऊठ-जा. डोळ्यांवर पाणी मारून ये पटकन..’ ही माझी शास्त्रीय संगीत शिकण्याची सुरुवात. ‘सा’ म्हणण्यासाठी ‘आ’ केला, की तो सुरापेक्षा जांभईनेच पुरून उरायचा आणि वरच्या वाक्याने मी जागी व्हायचे. इवल्याशा ओंजळीतल्या पाण्यात डोळ्यांतल्या आक्काबाईचं (झोपेचं) विसर्जन करायचे. अवघ्या सहा वर्षांची होते मी, जेव्हा आईने मला आणि माझ्या मोठय़ा बहिणीला गाण्याच्या क्लासला घातलं होतं. संध्याकाळी सोसायटीत सगळे खेळायला जमले असताना गाण्याच्या क्लासमध्ये जाऊन बसणं ही मला शिक्षाच वाटे सुरुवातीला; म्हणूनच जांभईला माझ्याकडून माफी असायची. थोडक्यात, ‘गाणं म्हणजे झोप येण्याचं तंत्र’ वाटायचं मला. या कलेशी माझी मैत्री व्हावी म्हणून आई ऑफिस सांभाळून झटत होती.

मीही अगदीच वाया घालवत नव्हते तिचे कष्ट. ‘प्रवेशिका प्रथम’ देण्याइतकी सुरांशी ओळख करून घेतली होती मी. पहिल्या परीक्षेत, पेटीवर वाजवलेला सूर ओळखणे हा  एक भाग होतं. मुळात ‘गाणं’ हा काही प्रगती पुस्तकातला विषय नसल्याने या परीक्षेचा सीरियसनेसच नव्हता मला. त्यामुळे एकंदरीतच, थोडी नाराज होऊन मी त्या परीक्षकांसमोर बसले होते. लहानपणची ‘देवा मला बुद्धी दे’ ही प्रार्थना ऐकून देवबाप्पाने आपल्याला बुद्धी दिलीच आहे यावर  लहान मुलांचा विश्वासच दांडगा असतो. त्यामुळेच पहिले दोन-तीन सूर क्षणाचाही अवधी न घेता मी पटकन ओळखले. परीक्षकालाही माझ्या या वयातल्या उत्स्फूर्तपणाचं कौतुक वाटलं आणि त्याने लगेचच आणखी एका सुरावर बोट ठेवलं. आता मी ‘तो’ सूर ओळखावा या आशेने ते माझ्याकडे बघत होते तोच, ‘तुम्ही सगळं मलाच का विचारता हो? तुम्हाला इतकं ही येत नाही का?’ असा आगाऊ प्रश्न मी त्यांना विचारला, काही क्षण शांतता पसरली. मग काही हसण्याचे आवाज आले. परीक्षकांनीही गोड हसून मला माफी सुनावली. पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले की, पण त्यानंतरचा शाबासकीच्या ऐवजी पाठीवर पडलेला धपाटा कायम लक्षात राहिला माझ्या.

मग, इयत्ता चौथीमध्ये वर्गशिक्षिकांनी कोण कोण गाणं शिकतं, असा प्रश्न विचारला आणि पटकन माझा हात वर गेला. त्या वर्षी शाळेतून समूहगान स्पर्धेसाठी माझी निवड झाली, तालमी होऊ लागल्या, सगळा वर्ग अभ्यास करत असताना आम्ही काही मोजके विद्यार्थी पेटी आणि तबल्यावर सूर शोधू लागलो. त्यातूनच पुढे वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये माझे गाणे सुरू झाले. मग हळूहळू माझे सूर शाळेला मानपत्र, प्रमाणपत्र, ट्रॉफीज् मिळवून द्यायला लागले आणि शाळेतल्या गानकोकिळांमध्ये माझ्याही नावाचा उल्लेख होऊ लागला. मला आठवतंय समूहगान स्पर्धेच्या निमित्ताने सावरकरांची ‘ ने मजसी ने’ ही अत्यंत सुंदर कविता मला तोंडपाठ होऊन गेली जिने तोंडी परीक्षेत मला तारलं होतं आणि जी आजही माझ्या मनात माझ्या मातृभूमीबद्दलची निष्ठा कायम राखून आहे.

माझ्याही नकळत ‘गाणं’ हा माझ्या वेळापत्रकाचा महत्त्वाचा भाग बनलं. जांभई देणारा ‘आ’ आता क्लासमध्ये मनापासून अलंकार, आरोह-अवरोह, चीज, तराणे गाऊ लागला. प्रवेशिका पूर्ण ही दुसरी परीक्षाही छान पार पडली. सगळं छान चालू असतानाच इयत्ता आठवीत माझ्या गाण्याच्या गुरू डोंबिवलीतून बदलापूरला शिफ्ट झाल्या, अभ्यासाचा आवाकाही वाढला. त्यामुळे शाळेच्या स्पर्धामधूनही बाद झाले मी. अकरावीत ट्रेन हा रुटीनचा भाग झाल्यावर मी पुन्हा काही काळ बदलापूरला ये-जा करू लागले गाण्यासाठी. पण तेही थोडय़ा काळातच बंद झालं.

मध्यंतरी एफएमवर लताबाईंची गाणी ऐकत बसले होते. त्यांच्या सुरात सूर मिसळण्यासाठी म्हणून गायला सुरुवात केली आणि धृवपदावरच थांबले. खरं तर आजूबाजूला कुणीच नव्हतं. पण तरीही शांतच राहिले. मनातून ‘नाही जमत आहे तुला’ असा आवाज आला आणि लहानपणची एका प्रसिद्ध परीक्षकाला आत्मविश्वासाने ‘तुम्हाला येत नाही का?’ विचारणारी मीच मला आठवले. आणि माझ्या लक्षात आलं की मी स्वत:चीच परीक्षक बनले होते. कामाचा आवाका वाढत जातो आणि बरेचदा बरेचसे सूर ओळखायचे राहून जातात. आपण मात्र आपल्या आयुष्यातले काही लाख मोलाचे क्षण मागे सारत कामात गुरफटून जातो.

पण हरकत काय आहे? स्वप्नातल्या काही कळ्या न उमललेल्याच बऱ्या. अपूर्णत्व हेच माणूस म्हणून जगत राहण्याचं लक्षण आहे ना, पूर्णत्वाने देवच होऊ की. प्रत्येक कलाकाराच्या घरात त्याच्या सन्मानचिन्हांसाठी, परितोषिकांसाठी एक कोपरा राखून ठेवलेला असतोच, जिथे पाहिल्यावर आम्हाला समाधान मिळतं. माझ्याही घरात आहे. आतापर्यंत मिळालेली सगळी परितोषिकं त्यावर विराजमान आहेत; त्यांचं सौंदर्य वाढवायला त्यावर प्रकाशझोतही आहे, पण याच कोपऱ्यामधली एक चौकट मी रिकामीच ठेवली आहे, उद्या कलाकार म्हणून कितीही मोठा सन्मान मी मिळवू शकले तरीही शेवटच्या श्वासापर्यंत ती चौकट रिकामीच राहील. मी कितीही दमून घरी आले असले तरीही काही क्षण त्या चौकटीच्या रितेपणात रेंगाळते आणि मग त्यावरचा प्रकाशझोत पुन्हा एकदा मला सांगतो,  ‘तेजू, जा! डोळ्यांवर पाणी मारून ये पटकन.’ पण लहानपणच्या ओंजळीतल्या पाण्याचे बाकी संदर्भ आज बदलून गेलेत. कारण आज या पाण्यात विसर्जन होत नाही तर आशेचा किरणच जन्माला येतो आणि मग मी माझ्या विश्वात ‘मला एक दिवस जमणार’ असं म्हणत आत्मविश्वासाने स्वत:साठीच गाते..

स्वप्नातल्या कळ्यांनो

उमलू नकाच केव्हा,

गोडी अपूर्णतेची

लावील वेड जीवा!
तेजश्री प्रधान –

मराठीतील सर्व सेलिब्रिटी लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2016 at 01:31 IST

संबंधित बातम्या