lp19दिसेल त्या जागेवर, शक्य तितक्या दाटीवाटीने सिमेंट काँक्रीटचं जंगल उभं करण्यात धन्यता मानण्याच्या आजच्या काळात वास्तुरचना, नगररचना, शिल्पकला यांना वेगळा आयाम देणाऱ्या चार्ल्स कोरियासारख्या व्यक्तीचं जाणं चटका लावणारं ठरतं.

आपली शैली विकसित करता करता वास्तुविशारद खूपदा एखाद्या विशिष्ट साच्यातच अडकतात किंवा त्यांना ठरावीक शैलीसाठीच ओळखलं जातं. मात्र अशा कुठल्याही साच्यात न अडकता प्रादेशिक वैशिष्टय़ं, स्थानिक गरजा आणि बांधकामशैली ओळखून आपली जागतिक ओळख बनवणारे चार्ल्स कोरिया म्हणूनच वेगळे ठरतात. मागील आठवडय़ातच त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले, पण त्यांनी भारतात आणि जगात केलेल्या शिल्पांच्या रूपात ते अस्तित्वात राहतीलच.
१ सप्टेंबर १९३० रोजी सिकंदराबादला जन्मलेल्या कोरिया यांनी सेंट झेविअर्सला महाविद्यालयीन तर जगप्रसिद्ध मिशिगन आणि एमआयटी विद्यापीठात उच्चशिक्षण घेतले. विसाव्या शतकातील अमेरिकन वास्तुविशारद फँ्रक लॉईड राईट आणि जिओडेसिक डोमचे जनक बकमिन्स्टर फुलर यांचा कोरियांवर प्रभाव होता. फुलरशी त्यांचा अमेरिकेतील विद्यार्थिदशेत असताना परिचयही होता. पांढरे केस, काळ्या फ्रेमचा चष्मा, अंगात थोडा ढगळ खादी सदरा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा साधेपणातही वेगळाच रुबाब असायचा. त्यांना भारतीय कलांची चांगली जाण होती. त्यांची वक्तृत्वशैली अतिशय उत्तम आणि अभ्यास दांडगा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय शिल्पकलेत नावीन्य आणण्यात आणि संवेदनेने नगररचना करण्यात कोरिया अग्रेसर होते. स्थानिक साहित्यसामग्री, तंत्रज्ञान आणि वातावरण यांचा मिलाफ करून मोहक रचना करण्यावर त्यांचा भर होता, त्यामुळे त्यांच्या रचना परिसराशी नाळ जोडून आहेत असं वाटतं. उत्तमोत्तम वास्तुरचना करताना किफायतशीर व जीवनशैली उंचावणाऱ्या घरांच्या मांडणीसाठी कोरिया प्रसिद्ध होते. म्हणूनच संस्कृती आणि समाज या सहज साच्यात ठेवता न येणाऱ्या गोष्टींना ते मूर्तरूप देऊ शकले.

कोणाही वास्तुविशारदाच्या काही ठळक शैली असतात, मात्र एकाच अंगाने जाणाऱ्या इमारती करण्याचा कोरिया यांचा पिंड नव्हताच. त्यांनी केलेल्या काही कामांमध्ये गुजरातेतील गांधी स्मारक, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़मूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ब्रेन सायन्स सेंटर, कॅनडातील टोरांटोचे इस्माइली सेंटर व न्यूयॉर्क येथे भारताच्या स्थायी दूतावासाचा समावेश होता. नवी मुंबई उपनगर, अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी इमारती, कमी उत्पन्न गटातील घरे, मध्य प्रदेशचे विधान भवन, भोपाळचे भारत भवन, दिल्लीचे क्राफ्ट्स म्युझियम आणि ब्रिटिश कौन्सिलची इमारत यांचा समावेश आहे. त्यांना मोकळे आकाश आवडायचे. ‘ओपन टू स्काय’ संकल्पना त्यांच्या रचनांचा गाभा होती.
लोकसंख्याशास्त्र, दळणवळण, वास्तू कुठल्या वापरासाठी आहे, ती कुठे आहे, तिथला प्रदेश आणि वातावरण कसं आहे या गोष्टींचा विचार करत ते आपल्या रचनांमध्ये वैविध्य आणत. नैसर्गिक वायुविजनाचा (ल्लं३४१ं’ ५ील्ल३्र’ं३्रल्ल) चा वापर करत केलेल्या टय़ूब हाऊस आणि (मुंबईतील पहिली उंच इमारत) कांचनजंगा, या रचना काळाच्याही पुढच्या समजल्या जात. दगड आणि कडप्पाचा वापर त्यांनी पुण्याला ‘आयुका’त केला, तर दादरच्या पोर्तुगीज चर्चची नवनिर्मिती करताना त्यात एम.एफ. हुसेनचं पेंटिंग लावून चर्चला नवीन स्फूर्ती दिली. पेडर रोडवरील मुंबईची कांचनजंगा इमारत बांधणाऱ्या कोरियांना श्रीमंतांसाठी मजलेदार बंगले उभारणारे मानावे, तर साबरमतीच्या गांधी आश्रमातील साधेसरळ चौकोनी प्रदर्शन दालन पाहून आपल्याला नक्की हे एकाच माणसाचं काम आहे का, असा प्रश्न पडावा! परदेशातून शिकून आल्यावर वयाच्या २८व्या वर्षी त्यांनी साबरमती येथे गांधी स्मारकाची (१९५८-६३) उभारणी करून त्यांच्या रचनांमधील भारतीयत्व जिवंत आहे याची जाणीव करून दिली. दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलची चौकोनांचा वापर करून केलेली लायब्ररी (१९८७-१९९२) गोऱ्या साहेबाचा दिमाख दाखवणारी, तर तिथलंच क्राफ्ट्स म्युझियम (१९९०) म्हणजे त्यांनी केलेला इथल्या मातीतल्या कुशल कारागीरांचा आगळावेगळा सन्मान! जणू त्यांना भारतातील विविधतेतील एकता त्यांच्या विविध वास्तूंतूनही जपायची होती. भोपाळचे विधान भवन मात्र गोलाईदार. सांची स्तुपासारख्या घुमटाखाली सत्तेची वर्तुळे न्याहाळणारे हे विधान भवन ज्या भोपाळात आहे, तेथील ‘भारत भवन’ अगदीच निराळे. त्यांच्या दोन रचना एकसारख्या दिसणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. गोव्याच्या ‘कला अकादमी’चे बांधकाम म्हणजे छोटय़ा संगीतशाळांपासून बंदिस्त नाटय़गृहापर्यंत उंची गाठणारी लाटच, तीही वरून साधी- आतून गोव्याच्या घाटदार कठडय़ांचं वैशिष्टय़ं दाखवणारी आणि रेकॉर्डिग आदी कामांसाठी अतिशय चोख. टोरांटोला (कॅनडा) त्यांनी केलेलं इस्माईली सेंटर हे त्यांचं शेवटचं काम. ती रचना म्हणजे इस्लामी वास्तुकला आणि समकालीन रचनेचा अस्फुट हुंकार आहे.
एकविसाव्या शतकातील शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईची निर्मितीही सिडकोचे प्रमुख वास्तुविशारद (१९७०-७४) म्हणून चार्ल्स यांनीच केली. पनवेलच्या प्रेक्षागारापासून बेलापूरच्या ‘कलाग्रामा’पर्यंत त्यातील वेगळेपण आपल्याला जाणवतं. पण मुंबईचे शांघाय करू आणि मॅनहॅटन स्कायलाइनसारखं काही बनवू अशा कल्पना त्यांना कधीच पटल्या नाहीत. कारण त्यांचे आणि आपले प्रश्न वेगळे आहेत, असे कोरिया यांचे स्पष्ट मत होते. कोरियांचे मुंबईवर विशेष प्रेम होते. शहरं म्हणजे आर्थिक पुनर्निर्माण करणारी ठिकाणं आहेत आणि तिथे समाजातील कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांनाही जोवर परवडणारी घरं, शाळा, बागा दिल्या जात नाहीत तोवर प्रगती होणार नाही. शहरीकरणात आशा, अर्थार्जन आणि कौशल्य या तीन गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं त्याचं म्हणणं होतं. नगररचनेत निम्न आर्थिक गटातील लोकांची जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी किफायतशीर गृहप्रकल्पांची मांडणी केली. कोरिया म्हणत, ‘मार्केट फोर्सेस डू नॉट मेक सिटीज, दे डिस्ट्रॉय देम’ (market forces do not make cities, they destroy them.) ते फक्त समकालीन वास्तुकलेचे समर्थकच नव्हे तर आधुनिक पण साचेबद्ध कलेचे टीकाकारदेखील होते. त्यांनी कांचनजंगा केल्यावर उंच इमारती बांधायच्या नाही असं ठरवलं. ‘मी फक्त काचेच्या इमारती मुळीच बांधणार नाही. काचेच्या इमारती आणि तंत्रज्ञान वास्तुविशारदाला वास्तुकलेपासून फॅशनकडे घेऊन जातंय. आज ज्या इमारती दिसतात त्याला वास्तुरचना म्हणता येणार नाही तर बांधकामे म्हणता येईल. आजच्या काळात वास्तू नियोजकाची जागा बिल्डर आणि राजकारणी यांनी घेतली आहे’, असे चार्ल्स कोरिया यांचे मत होते. मुंबईतील कापडगिरण्या बंदच पडल्या, तेव्हा त्या पाडून मोकळ्या होणाऱ्या त्यांच्या जागेपैकी एकतृतीयांश हिस्साच व्यावसायिकपणे वापरला जावा, उरलेला एकतृतीयांश सार्वजनिक वापरासाठीच असावा आणि बाकी एकतृतीयांश कामगारांसाठी वापरावा, असे त्यांच्या समितीने सुचवले. पण त्याचा सोयीप्रमाणे अर्थ लावला गेला- ‘गिरण्यांचे बांधकाम वगळता उरलेली मोकळी जागा’ असा अर्थ लावून सरकारने, गिरण्या पाडल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागेबद्दल काही शिफारसच नाही, असे भासवून तेथे वाट्टेल ते परवाने देण्याची मोकळीक घेतली. त्याने आज मुंबईत काय झाले, हे दिसते आहेच. ‘आम्ही आज अलिबागच्या शेतकऱ्याने, मासेमारी करणाऱ्यांनी तिथेच आनंदात राहावं असा सल्ला देतो. मग स्वत: या शहरात प्रदूषणात का राहतो? सत्ता? पैसे? की चैन हवी म्हणून? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे’ असं कोरिया त्यांच्या एका लेखात म्हणतात. ‘स्वत: शहरात राहून प्रचंड प्रमाणात नैसर्गिक संसाधनं खर्च करताना आफ्रिकेतील जंगलाची चिंता करणं म्हणजे मगरीचे अश्रू काढण्यासारखा प्रकार आहे. त्यापेक्षा आपण कमी संसाधनं वापरून कसे राहता येईल याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणत. भारतासारख्या तिसऱ्या जगातल्या देशामध्ये राहण्याचा एक फायदा आहे. इथले प्रश्न जटिल आहेत आणि कमीतकमी संसाधनं वापरून इथे काम करावं लागतं त्यामुळे शिकायला आणि नवीन काहीतरी करायला अधिक संधी असते’ असं ते म्हणत. १९८४ साली पर्यावरण आणि नागरी वसाहती यांचा एकत्रित विचार करून वास्तुरचना शिकवण्यासाठी त्यांनी मुंबईत ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ची स्थापना केली.
वास्तुशास्त्रावर आपल्या ‘अ प्लेस इन शेड’ या पुस्तकात मुंबईविषयी ते म्हणतात की ‘मुंबई जरी खूप वेगाने शहर म्हणून विकसित होत असली तरी इथलं वातावरण ज्या वेगाने आणि गरज नसताना खालावतंय ते पाहून हे शहर शेवटचा आचका देतंय असं वाटतं’. आजूबाजूचं औदासीन्य आणि आपली निराशा ते एका मुलाखतीत स्पष्टपणे मांडतात. ‘‘एव्हरीडे वुई फाइंड मुंबई गेटिंग टू बी मोअर अँड मोअर ऑफ अ ग्रेट सिटी.. अँड अ टेरिबल प्लेस’ (“Everyday we find Mumbai getting to be more and more of a great city.. and a terrible place”.) दोन वर्षांपूर्वी त्यांनी जड अंत:करणाने त्यांची सगळी रेखाचित्रे, मॉडेल्स असं मिळून सहा हजारांपेक्षा अधिक वस्तू रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सला दान केल्या. हे सारं भारतात राहावं अशी त्यांची खूप इच्छा होती मात्र या साऱ्याचं भारतात संग्रहण करणारी पर्यायी व्यवस्था त्यांना मिळू शकली नाही. त्यांची काही उभारली न गेलेली (unbuilt) मॉडेल्स पाहताना, त्याचं लिखाण वाचताना आपल्यासमोर त्यांच्या नजरेतली सुंदर आणि आधुनिक नवी मुंबई उभी राहते, पण आजची उदास आणि कंटाळवाणी मुंबई पाहून वाईट वाटतं.
भारतात व जगभरातही हार्वर्ड, केंब्रिज, लंडन अशा अनेक विश्वविद्यालयांत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी वास्तुरचनेचे धडे दिले. जपान तसेच इंग्लंडनेही त्यांचा पुरस्काराने सन्मान केला. रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सने (RIBA) त्यांना ‘भारतातील सर्वात मोठे वास्तुरचनाकार’ असे नावाजले. आर्किटेक्चरमधील प्रतिष्ठेचा आगाखान पुरस्कार, इंटरनॅशनल युनिअन ऑफ आर्किटेक्चरचे सुवर्णपदक, भारत सरकारचा १९७२ मध्ये पद्मश्री व २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार अशी त्यांना जगभर मान्यता मिळाली.
मुकेश भावसार – response.lokprabha@expressindia.com