जगातील सर्वाधिक पावसाची नोंद असणाऱ्या चेरापुंजीचा पाऊस खरंच कमी झाला आहे का? यामागे नेमकी काय कारणं आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूतच्या ईशान्येकडील या शेवटच्या टप्प्यात करण्यात आला.

प्रत्येक वर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्यामुळे त्याच्या येण्याचे आणि न येण्याचे विविध परिणाम आपल्याला भारताच्या सर्व भागांमध्ये बघायला मिळतात. नक्की हे परिणाम काय आहेत? मान्सूनच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून त्याच्याकडे कसं बघितलं जातं? माणूस आणि पाऊस यांचा संबंध नक्की कसा आहे? या मान्सूनबद्दल आपलं पारंपरिक ज्ञान आपल्याला काय सांगतं? हे सर्व बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि मान्सूनच्या विविध पैलूंचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी २०११ मध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची सुरुवात झाली.
‘प्रोजेक्ट मेघदूत’ या वर्षी चवथ्या टप्प्यात आहे. या वर्षीच्या प्रवासामध्ये या गटाने ब्रह्मपुत्रेच्या काठाने आपला प्रवास केला. प्रवासाच्या दोन आठवडय़ांमध्ये त्यांनी आसाम आणि मेघालय ही दोन राज्ये पालथी घातली. मोहिसंराम, कदाचित चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस असलेल्या ठिकाणाला भेट देऊन ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने चेरापुंजीची वाट धरली.
साधारण २० जूनपासून मेघालयात पावसाळ्यातला रुटीन पाऊस सुरू झाला होता आणि तेव्हाच ‘प्रोजेक्ट मेघदूत’ आपल्या शेवटच्या टप्प्यासाठी चेरापुंजीच्या वाटेवर होता. चेरापुंजी हे एक शहर असल्याने इथला रस्ता आणि त्यामुळे एकूणच प्रवास मोहसिंरामपेक्षा खूपच चांगला होता. इथे १८५० पासून इंग्रजांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. चर्च आणि विविध कार्यालये इथे होती. १९४०च्या दशकामध्ये रामकृष्ण मिशन तिथे पोहोचलं होतं. पुढे आपल्या महाराष्ट्रात जशी इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणं म्हणून विकसित केलेलं महाबळेश्वर आणि माथेरान आहेत, तसेच ईशान्य भारतात शिलाँग आणि चेरापुंजी ही दोन ठिकाणं विकसित केली गेली. रस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या, प्रचंड धबधबे होते, पण रस्ता चांगला असल्याने वाहतूक सुरळीत सुरू होती. हा मोहसिंराम आणि चेरापुंजीमधला मुख्य फरक. चेरापुंजीमध्ये गट पोचला तेव्हा संपूर्ण शहर धुक्याने झाकलं गेलं होतं.
चेरापुंजीचं आय.एम.डी.
हे कार्यालय जुन्या ब्रिटिशकालीन इमारतींची आठवण करून देतं. तिथे उत्तर प्रदेशाच्या बिजोय कुमार यांची भेट घेतली. बिजोय कुमार यांनी कोलकात्याला मागच्याच वर्षी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांचं पहिलंच पोस्टिंग झालं ते चेरापुंजीला. त्यांनी चेरापुंजीचं हवामान आणि इतर माहिती गटाला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी ते ऑक्टोबर हा तेथील पावसाचा काळ. फेब्रुवारी ते एप्रिलच्यादरम्यान युरोपातून येणाऱ्या वेस्टरलीजमुळे इथे पाऊस पडतो. हे वारे पंजाब, काश्मीरलाही पाऊस देतात. मागच्या वर्षी महाराष्ट्रात झालेली गारपीटही याच वाऱ्यांमुळे झाली होती. पश्चिमेकडून येणारे हे वारे हिमालयाला धडकतात आणि खालच्या भागांमध्ये बराच पाऊस पडतो. एप्रिलनंतर येथे प्री-मान्सून थंडर शॉवर सुरू होतात. म्हणजे विजांच्या कडकडाटासह पाऊस. महाराष्ट्रात हा पाऊस एक-दोन दिवसच पडतो. इथे मात्र तो अनेक दिवस सुरू असतो. आपल्याकडे हा पाऊस दिवसाला ४० ते ५० मिलिमीटर पडतो. इथे तो जवळजवळ ३०० मिलिमीटपर्यंत जातो. त्यानंतर जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होते. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत इथे सर्वाधिक पाऊस पडतो. हा पाऊस शक्यतो रात्रीच्या वेळेत पडत असतो. त्यामुळे इथल्या लोकांना दिवसा कामे उरकता येतात.
इकडचा वार्षिक पाऊस ११,४०९ मिलिमीटर आहे; पण गेली काही वर्षे हे प्रमाण कमी होऊन १०,००० पेक्षाही खाली नोंद झाली आहे. या कार्यालयात १९७२ पासूनची आकडेवारी उपलब्ध आहे. इथे १९७२ पासून निरीक्षणे घ्यायला सुरुवात झाली. ही निरीक्षणे दर तीन तासांनी घेतली जात होती आणि ती त्याच प्रकारे आजही घेतली जात आहेत. इथे १९७४ मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद घेतली गेली. याआधी १८६० मध्ये नोंद घेतली गेली होती. त्या वेळी २४,००० पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला होता. १९७४ सालीसुद्धा चेरापुंजीने २४,००० मिलिमीटर्स वार्षिक पावसाचा टप्पा गाठला होता. पुण्याचा वार्षिक पाऊस हा ६०० ते ६५० मिलिमीटर्स इतका आहे, म्हणजेच पुण्याच्या ४० पट पाऊस चेरापुंजीत पडतो!
चेरापुंजीमध्ये पावसाची नोंद घेण्याची सुरुवात ही ब्रिटिश सरकारने केलेली नाही. ही सुरुवात केली ती या भागात काम करणाऱ्या मिशनरीजनी. त्या वेळेस एशियाटिक सोसायटीला या मिशनरीजनी पावसाच्या नोंदी पाठवल्या. तिकडच्या शास्त्रज्ञांनी त्यांना मग वर्षभराच्या नोंदी पाठवायला सांगितल्या. या नोंदी त्यांच्या जर्नलमध्ये छापूनही आल्या. त्या वेळेस लोकांना लक्षात आलं की इथला पाऊस जगातल्या सर्व ठिकाणांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी त्या वेळेस स्वत:ची खास मापन यंत्रणा बसवली आणि १८५० पासून तिथल्या नोंदी घेणं सुरू झालं. या नोंदी एका पोस्ट ऑफिसमध्ये घेतल्या जायच्या. आजही १८५० पासून नोंदी घेणारं ते पोस्ट ऑफिस आपण पाहू शकतो. आता या ठिकाणी एक रडार आहे आणि अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून भारताचं हवामान शास्त्र विभाग या सर्व खासी हिल्समधल्या हवामानाच्या नोंदी घेण्याचे काम करते.
२००५ पासून पडलेला पाऊस
वर्ष वार्षिक पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२००५ ९७५७
२००६ ८७३४
२००७ १२६४७
२००८ ११४१४
२००९ ९०७०
२०१० ९०७१
२०११ ८७३२
२०१२ १३३४९
२०१३ ७५६०
या आकडेवारीनुसार २०१३ साली गेल्या ९ वर्षांतला सर्वात कमी पाऊस झाला आहे. २०१३ हे ला-नीनाचं वर्ष आहे. या भागात एक-निनोच्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि इतर भारतात कमी पाऊस पडतो. ला-नीनाच्या वर्षी या भागात कमी आणि इतर भारतात उत्तम पाऊस पडतो. पण ७५६० मि.मी. पाऊस हा पश्चिम घाटातल्या पावसापेक्षाही कमी पाऊस आहे. त्यामुळे २०१३ साली चेरापुंजीपेक्षाही दक्षिण भारतामधलं आगुम्बे हे सर्वात जास्त पावसाचं ठिकाण झालं आहे का, असा प्रश्न पडतो. ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट या ठिकाणांची अधिकृत आकडेवारी जमा करतो आहे. जर ती मिळाली तर ती हवामानाच्या दृष्टीने ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या माध्यमातून लक्षात आलेली एक महत्त्वाची बाब असेल.
चेरापुंजीच्या गुहा सांगतात पावसाचा इतिहास
चेरापुंजीच्या जवळ काही खूप विलक्षण गुहा आहेत. त्यातलीच एक मौसामाई गुहा. या गुहांमध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने फेरफटका मारला होता. अनेक किलोमीटर लांब असलेली ही गुहा पर्यटकांसाठी थोडय़ा अंतरापर्यंत खुली ठेवली आहे. गुहेमध्ये विजेची सोय आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित या गुहांमधून फिरता येतं. या गुहांमध्ये मोठमोठ्ठाले लवणस्तंभ तयार झाले आहेत. या गुहांमधल्या वनस्पती, जीवजंतू, पूर्णपणे वेगळे आहेत. इथे एक वेगळीच जैविक आणि वातावरणाची रचना काम करताना दिसते. सूर्याच्या प्रकाशाशिवाय जगू शकणारे जीव, शैवाल, बुरशी (कवक किंवा फंगस) आणि इतर वनस्पती इथे बघायला मिळतात. काही वर्षांपूर्वी या लवणस्तंभांचा अभ्यास एका जर्मन शास्त्रज्ञाने केला आहे. या स्तंभांच्या अभ्यासावरून त्याने या भागात किती पाऊस पडला आहे याचा शास्त्रोक्त अंदाज बांधला आहे. गाळलेलं पाणी, त्यात जमा झालेले क्षार आणि त्याचे तयार झालेले हे लवण स्तंभ. हे स्तंभ गेल्या ११ हजार वर्षांचा पावसाचा इतिहास सांगतात. त्याच्या अभ्यासानुसार, गेल्या ११ हजार वर्षांत अनेक अशी शतकं येऊन गेली जेव्हा चेरापुंजीला आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने अधिक पाऊस पडत होता. काही शतके अशीही गेली जेव्हा चेरापुंजीने अतिशय कमी पाऊस अनुभवला. त्यामुळे इथल्या पावसात अनेक चढ-उतार आहेत हे लक्षात येतं.
ईशान्येकडील खाद्यजीवन
संपूर्ण ईशान्य भारतामध्ये शाकाहारापेक्षा मांसाहाराचंच प्रमाण अधिक. त्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांची तिकडच्या कानाकोपऱ्यात फिरताना पंचाईत होते. त्याउलट, मांसाहारी लोकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथल्या स्थानिक लोकांचं खाणं हे जास्त करून पोर्क हे आहे. काही ठिकाणी हॉटेल्समध्ये थांबल्यावर डक आणि पिजनचे विविध प्रकार उपलब्ध असतात. इकडच्या मुबलक पाण्यामुळे भात जास्त खाल्ला जातो. चेरापुंजीमध्ये मुक्काम करण्यासाठी एक उत्तम जागा आहे ती म्हणजे ‘चेरापुंजी रिसॉर्ट’. हे रिसॉर्ट एका डेनिस रे आन नावाच्या माणसाने बांधलं. रे आन यांनी स्वत: गेली २० वर्षे दररोज पावसाच्या नोंदी केल्या आहेत. हवामान खात्याकडून दर दिवशीच्या नोंदी घेऊन ते आपल्या स्वत:च्या संकेतस्थळावर सर्वाना उपलब्ध करून देतात. इथे आपल्याला चेरापुंजीची इत्थंभूत माहिती मिळू शकते. ईशान्य भारतात भटकताना नक्कीच भेट द्यावी अशी ही जागा. रे आन यांनी जो कोणी राहायला येईल त्यांच्याकडून त्यांच्या भागातले पदार्थही शिकून घेतले आहेत. त्यामुळे तिथला कुक तुम्हाला पोर्क, मासे आणि भात खाऊन कंटाळा आला असेल तर आमटी भात किंवा मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी खिलवू शकतो.
एवढय़ा विषम परिस्थितीत लोक का राहतात?
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या निमित्ताने हा गट भारतभर खूप फिरला. कच्छच्या रणापासून ते मेघाच्छादित मेघालयापर्यंत. सगळ्या ठिकाणांचा विचार करताना एक गोष्ट नक्की जाणवते ती म्हणजे, कितीही प्रतिकूल वातावरण असलं तरी माणूस तिथे टिकून आहे. राजस्थान, कच्छमध्ये प्यायला पाणी नाही, शेती नाही, उद्योगधंद्यांची साधने नाहीत तरी माणूस आहे; लडाखसारख्या थंड प्रदेशातही माणूस राहतो आहे. मेघालयात पावसामुळे तीन महिने बाहेर पडता येत नाही, तरीही माणूस टिकून आहे. स्थलांतर करणं सहज, सोप्पं असताना माणूस तो ज्या निसर्गात वाढला त्या निसर्गाला धरून राहताना दिसतो. निसर्गाशी सामना करतच वाढतो. अशा वातावरणात कदाचित माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती जागृत होत असतील. जसं जैसलमेरमधल्या काही जास्त पाणी लागणाऱ्या वनस्पतींनी स्वत:ला बदलून घेतलं, तसंच माणूस करत असेल. एक गोष्ट नक्की की या सर्व लोकांनी आपल्या गरजा अत्यंत कमी ठेवल्या आहेत. चेरापुंजीच्या काही लोकांशी याच विषयावर बोलत असताना लक्षात येतं की ही माणसं त्यांचा प्रदेश सोडून १५ किलोमीटर्सवरदेखील राहायला जाऊ शकत नाहीत. इतके ते या पावसाशी, इथल्या वातावरणाशी एकरूप झालेले आहेत. पावसाच्या काळात घरात स्वत:ला कोंडून घेणं, बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला. त्या तीन-चार महिन्यांची तयारी करून ठेवणं हे सोप्पं काम नाही. आज दळणवळणाची साधनं उपलब्ध आहेत, काही वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं, तरीही माणूस इथे टिकून होता. या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांचा अभ्यास करायचं या गटाच्या डोक्यात आहे.
चेरापुंजीचा पाऊस कमी का झाला?
गेली काही वर्षे हा पाऊस कमी होताना दिसतो आहे. तो कसा कमी होतो आहे, नक्की कारणं काय, याचं नक्की उत्तर कोणाला माहीत नाही. २००५ पासून ९ पैकी ६ वर्षांमध्ये चेरापुंजीच्या पावसाने १०,००० मिलिमीटरचा टप्पा ओलांडलेला नाही. या वर्षीही पाऊस उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे या वर्षीही किमान सरासरी तरी चेरापुंजी गाठणार का, असा प्रश्न स्थानिकांना पडलेला दिसतो. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात काही पिकत नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून खासी टेकडय़ांवर असलेली खनिजे म्हणजे चुनखडी याचा लोक अमर्याद उपसा करत आहेत. म्हणून संसाधनांचा ऱ्हास होतो आहे. याने भौगोलिक रचनाही बदलू लागलेल्या आहेत. इथल्या भौगोलिक वैशिष्टय़ालाच धक्का लागल्यामुळे पाऊस कमी होतो आहे. या भागात चुनखडी बऱ्याच मोठय़ा प्रमाणात आढळते. गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेशात ही चुनखडी निर्यात करण्याचा उद्योग सुरू आहे. इथे फारसं काही पिकत नाही, त्यामुळे या चुनखडीवर अनेकांचा व्यवसाय अवलंबून आहे.
काही दिवसांपूर्वीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधला व्यापार वाढावा यासाठी काही प्रयत्न केले गेले. त्याअंतर्गत काही दिवस मेघालयात बाजार खुला राहणार आहे. याचा या चुनखडीच्या व्यापारावर थेट परिणाम होणार आहे. या व्यापारामध्ये प्रक्रिया जवळजवळ नाहीच. डोंगर पोखरून काढायचा आणि चुनखडी द्यायची. या चुनखडीचा मोठा साठा या खासी टेकडय़ांमध्ये आढळतो. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे जंगल कमी होत आहे. जंगल कमी झाल्यामुळे दरडी कोसळत आहेत. यामुळे या खासी टेकडय़ांची उंची कमी होत चालली आहे. कदाचित यामुळेच बंगालच्या महासागरातून आलेले ढग इथे अडत नाहीत; आणि त्याचा परिणाम पावसाच्या प्रमाणावर होतो. आता हा केवळ अंदाज आहे. पण गेल्या ७ ते ८ वर्षांत पाऊस एकाएकी कमी झाल्याचे एक कारण चुनखडीचा व्यापार हे नक्कीच असू शकतं. त्यामुळे भारत सरकारने या भागात उद्योग वाढवण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. इथला पाऊस असाच दर वर्षी १००० ते १५०० मिलिमीटरने कमी झाला तर याचा परिणाम इथल्या जैवविविधतेवर होणार आहे.
पाण्याची साठवण नाही
चेरापुंजीच्या रस्त्यांवर अजून एका दृश्याने विचार करायला लावला. एक मोठ्ठी टाकी आणि त्या टाकीला अनेक पाइप्स जोडलेले. प्रत्येक पाइप एका घरासाठी. इथे प्रत्येक घराला टाकी का नाही, माहिती नाही. दर वर्षी एवढा पाऊस इथे पडतो की एकदोन दिवसांच्या पावसाने प्रत्येक टाकी भरून जाईल. पावसाळा संपला की हेच पाणी वापरता येईल, आणि पाणी मागवावं लागणार नाही. इथे पावसाचं पाणी जमिनीत मुरत नाही. पण सिमेंट किंवा तत्सम टाक्यांमध्येही असं पाणी साठवायची कोणतीही सोय इथे करण्यात आलेली नाही. आणि जगात सर्वाधिकपाऊस पडणाऱ्या ठिकाणीदेखील टँकरने काही महिने तरी पाणीपुरवठा होत असतो.
पुढचा टप्पा
प्रोजेक्ट मेघदूतचा ईशान्य भारतातील दौरा चेरापुंजीला भेट दिल्यावर संपला. या वर्षीचा दुसरा टप्पा गुजरात राज्यामधून ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे.