lp60शरद तावडे हे नाव घेतले की, जलरंगातील निसर्गदृश्य असेच काहीसे चित्र आपल्या नजरेसमोर येते. त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी परिचय बदलण्याचा प्रयत्न केला, जलरंगांमध्ये मुंबापुरी आली. केवळ छान दिसते तीच मुंबापुरी नाही तर चित्रकाराला वेगळी वाटणारी, भावणारी. पण तरीही जलरंगांचे नाते काय होते. निसर्गदृश्याकडून शहरीदृश्यांकडे मार्गक्रमण सुरू होते. पण आता मात्र एकदम एक वेगळाच विषय घेऊन ते समोर येत आहेत. त्यांचे हे नवे प्रदर्शन जहांगीरच्या वर असलेल्या हिरजी जहांगीर कलादालनात १० ते १६ ऑगस्ट दरम्यान पाहायला मिळणार आहे. त्यांची आजवरची चित्रे नियमित पाहणाऱ्यांसाठी हा काहीसा धक्का असेल पण सुखद धक्का, काही तरी नवीन शोध घेण्याचा त्यांच्यातील कलावंत जागा झाल्याचा प्रत्यय यामधून निश्चितच येईल.
द्वैताद्वैत असेच या प्रदर्शनाचे शीर्षक आहे. त्यात कपडे वाळत घालण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या चिमटय़ापासून ते झांज आणि चावी लावलेल्या कुलुपापर्यंत अनेक म्हटल्या तर निर्जीव वस्तू पाहायला मिळतात. पण त्या निर्जिवांमध्येही एक द्वैताद्वैत दडलेले आहे. एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नाही. चिमटय़ातील एक बाजू निखळली की, तो निकामी होतो, फेकून द्यावा लागतो. तसेच चावी हरवलेल्या कुलुपाला अर्थ उरत नाही. यांचे अद्वैत म्हणजे एकत्र येणे नसले तरीही एकामुळे दुसऱ्याच्या अस्तित्त्वाला अर्थ मिळणे निश्चितच आहे.
प्रदर्शनाची संकल्पना चांगली आहे. त्यावर अधिक थोडी मेहनत घेऊन चित्ररचनेत काही नावीन्यही आणता आले असते. पण ही नंतरची बाब आहे. तावडे हे मेहनत घेणारे चित्रकार असल्याने तसे ते करतीलच. पण मुळात त्यांनी निसर्गदृश्यांपासून फारकत घेत या विषयाला हात घालणे हेच तसे धाडसाचे होते. त्यात त्यांना यश आलेले दिसते. त्यांचा हाच द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा प्रवास अमूर्ताच्या दिशेने जाईल तेव्हा त्याचा अद्वैताचा खरा मेळा त्यांच्या चित्रांत पाहायला मिळेल! त्यांच्या या प्रयत्नांना दाद देण्यासाठी हे प्रदर्शनही पाहायला हवे!
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com