तीन र्वष दादीच्या भूमिकेत वावरणारा अली असगर आता मालिकेत दिसतोय. दोनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा मालिकेकडे वळलाय. या मालिकेत त्याची टपोरी माणसाची भूमिका असून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास तो सज्ज आहे.

दादी म्हटलं की सध्या प्रेक्षकांना एकच आठवतं ते म्हणजे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमधली दादी. ही दादी घराघरात लोकप्रिय केली अली असगर या अभिनेत्याने. त्याच्या अभिनय कौशल्याने त्याने दादी ही व्यक्तिरेखा प्रस्थापित केली. आता या दादीतून बाहेर पडून अली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालाय. सब टीव्ही या वाहिनीच्या ‘वो तेरी भाभी है पगले’ या नव्या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दथ्थू या टपोरी तरुण माणसाची भूमिका तो साकारतोय. दादी या भूमिकेनंतर लगेचच टपोरी माणसाची भूमिका साकारताना उत्सुकतेसह थोडंसं दडपणही असल्याचं अली सांगतो.

एखाद्या मालिकेत एखादी व्यक्तिरेखा कलाकाराने प्रस्थापित केली की त्यानंतर ते साकारत असलेल्या सगळ्याच भूमिकांबाबत त्यांना थोडंसं दडपण येत असतं. आधीच्या भूमिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेम नव्या भूमिकेला मिळेल का, याबाबत शंका येणं स्वाभाविक आहे. तसंच अलीचंही आहे. तो सांगतो, ‘नवी भूमिका साकारतोय. उत्सुकता आहेच. शिवाय दडपणही आहे. सिनेमांसाठी जसा शुक्रवार असतो, तसा मालिकेत काम करणाऱ्यांसाठी सोमवार असतो. साधारणपणे नव्या मालिका त्याच दिवशी सुरू होतात. प्रेक्षकांनी जितकं दादी या भूमिकेला प्रेम दिलं तितकंच माझ्या नव्या भूमिकेलाही द्यावं.’ पुन्हा मालिकेकडे वळण्याचं कारणही अली स्पष्ट करतो. ‘कॉमेडी नाइट्स करूनही आता तीन र्वष झाली. दुसरं काही करायचंच नाही असं काही ठरवलं नव्हतं. चांगले विषय येत नव्हते. ‘वो तेरी..’च्या निमित्ताने चांगल्या, मनोरंजन करणाऱ्या मालिकेसाठी मला विचारलं. दादी साकारूनही तीन र्वष झाली होती. दुसरं काही करू पाहायचं होतं. त्यात या मालिकेची कथा आणि सब टीव्ही ही वाहिनी अशा दोन्ही गोष्टी जमून आल्यामुळे मी ही मालिका स्वीकारली. हातात काही काम नाही, रिकामा आहे म्हणून मी कधीच कोणतंही काम करत नाही. मला जे आवडतं, पटतं तेच मी करतो. मालिकेची संकल्पना आवडल्यामुळे मी मालिकेत काम करतोय’, असं अली स्पष्ट सांगतो.

दथ्थू असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. तो त्याच्या विभागाचा टपोरी, भाई आहे. टपोरी असला तरी मनाने चांगला आहे. प्रत्येक वेळी हाणामारीवर येत नाही. दथ्थू अतिशय प्रेमळ, भावुक, दयाळू आहे. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. त्याचं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो अनेक प्रयत्न करतो. त्याच्यासह आणखी एकाचं त्याच मुलीवर प्रेम आहे. हे दोघांनाही ठाऊक आहे. त्यामुळे तिचं प्रेम मिळवण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा सुरू असते. अशी या मालिकेची हलकीफुलकी, मनोरंजन करणारी कथा आहे. टपोरी दथ्थूच्या स्वभावामध्ये विविध पैलू असल्यामुळे वेगवेगळ्या छटा रंगवायला मिळत असल्यामुळे मजा येत असल्याचं अली सांगतो.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. विविध क्षेत्रातल्या बडय़ा सेलिब्रिटीजने या कार्यक्रमात उपस्थिती लावून कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत भर पडली. हे श्रेय केवळ कार्यक्रमाचा निर्माता-सूत्रधार कपिल शर्मा याचं नाही. तर ते त्यात काम करत मनोरंजन करणाऱ्या प्रत्येक कलाकारचंही आहे. यात अली असगरही आहे. सतत तीन र्वष एकच व्यक्तिरेखा साकारून त्यात सातत्य ठेवण्याची कला अवगत असावी लागते. या संपूर्ण प्रवासाचा अनुभव अली सांगतो, ‘आयुष्यात काही गोष्टी ठरवून होत नाहीत. अशा न ठरवलेल्या गोष्टी काही वेळा खूप काही देऊन जातात. आयुष्यात महत्त्वाचं स्थान पटकवतात. तसंच कॉमेडी नाइट्स या कार्यक्रमाचं झालं. या कार्यक्रमात काम करत असतानाचा तीन वर्षांचा प्रवास सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि अविस्मरणीय होता. सुरुवातीला मी दादी ही व्यक्तिरेखा साकारायला तयार नव्हतो. कॉमेडी नाइट्सच्या टीममधल्या अनेकांनी मला ही भूमिका करण्यासाठी तयार केलं. मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन, प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेन असा विश्वास त्यांनी दिला. सुरुवातीचे थोडेच भाग कर असंही अनेकांनी सुचवलं. शेवटी मी तयार झालो. पण, मग एकेक एपिसोड करत तीन र्वष काम केलं. या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.’ कॉमेडी नाइट्स या शोमध्ये कपिल शर्मानंतर अली असगर या अभिनेत्याने सलग अधिकाधिक एपिसोड्स शूट केले आहेत.

सुरुवातीला दादी ही व्यक्तिरेखा साकारायला अलीचा नकार असल्याचं तो सांगतो. पण, याचं कारण त्याच्या मुलांशी संबंधित आहे. त्याच्या मुलांना त्याने स्त्री व्यक्तिरेखा साकारायला नको होती. ‘मी स्त्री व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्या मुलांना अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे दादी या व्यक्तिरेखेसाठी मला विचारलं तेव्हा सुरुवातीला मी नकारच दिला होता. दादीसारख्याच इतर काही स्त्री व्यक्तिरेखा करणं मी टाळायचो. पण, कॉमेडी नाइट्सच्या वेळी मी काही एपिसोड्स केले आणि नंतर त्यांना ते पटू लागलं’, तो सांगतो. अनेकदा काही गोष्टी जमून येतात पण, एखाद्या गोष्टीमुळे काहीतरी गडबड होते. कॉमेडी नाइट्सच्या बाबतीत मात्र सगळ्याच गोष्टी जमून आल्याचं अली सांगतो.

अलीच्या दादी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मनोरंजक ठरलेली ही व्यक्तिरेखा प्रस्थापितही झाली. पण, त्याचबरोबर तिच्यावर टीकाही झाली. घरातली आजी दारू पिते का, आलेल्या पाहुण्यांशी विचित्र पद्धतीने वागते का, अश्लील विनोद करते का, कपडय़ांचं भान नसतं का; या आणि अशा कित्येक टीका कार्यक्रमावर झाल्या. काही महिला संघटनांनी महिलांबाबत होत असलेल्या विनोदांची दखल घेत कार्यक्रमावर कारवाई करण्याची मागणीही केली. जसं कौतुक कलाकारांपर्यंत पोहोचत होतं, तसं टीकाही त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असतील. अलीला याबाबत थेट विचारलं असता तो त्याच्या कार्यक्रमाचं, व्यक्तिरेखेचं समर्थन करत नाही. याउलट तो त्यामागची भूमिका स्पष्ट करतो. ‘टीव्ही या माध्यमात काम करताना सतत नावीन्यपूर्ण द्यावं लागतं. स्पर्धा वाढल्यामुळे इतरांपेक्षा वेगळं काही करू पाहण्याची स्पर्धा इथे स्वस्थ बसू देत नाही. अर्थात त्यामागे व्यावसायिक दृष्टिकोन असतो. कलाकार आणि इंडस्ट्रीत काम करणाऱ्या प्रत्येकालाच काहीतरी वेगळं, क्रिएटिव्ह देण्याचं दडपण असतं. पण, या काहीतरी वेगळं देण्याच्या नादात काही वेळा काही गोष्टी बरोबर होतात तर काहीवेळा चुकीच्या. पण, आम्ही जसं प्रेक्षकांचं कौतुक, प्रेम स्वीकारतो तसं टीकाही स्वीकारायलाच हव्यात. म्हणूनच दादी साकारताना माझ्यावर होत असलेली टीका मी सकारात्मकरीत्या स्वीकारत आलो. कलाकार म्हणून मी ते नेहमीच करतो. टीका होत राहिली तर आम्ही कुठे चुकतोय हे आम्हाला कळत राहील आणि ते एखाद्या कार्यक्रमासाठी फायद्याचंच असेल. पण, प्रेक्षकांना खटकणाऱ्या गोष्टींचा विचार नक्की केला जातो. कलाकारांना त्याच्या कामाचा भाग म्हणून काही गोष्टी कार्यक्रमात सादर कराव्या लागतात’, अली स्पष्टपणे त्याचं मत मांडतो.

मालिका-शोमध्ये रमलेल्या अलीने काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. कमी लांबीच्या भूमिका असल्या तरी त्याने त्याचं काम चोख केलं होतं. पण, तूर्तास कोणताही सिनेमा करत नसल्याचं तो सांगतो. एखादा चांगला विषय, कथा असलेल्या सिनेमाविषयी त्याला विचारलं तर तो त्याचा नक्की विचार करणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. भूमिकेची लांबी नाही तर भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. मराठी सिनेसृष्टीत त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. नुकताच त्याने ‘कटय़ार काळजात घुसली’ हा सिनेमा बघितला. या सिनेमाचं त्याने भरभरून कौतुकही केलं. कॉमेडी नाइट्समधली दादी साकारून अलीने त्याच्या अभिनयाची चमक दाखवली. आता ‘वो तेरी भाभी है पहले’ या शोमध्येही तो तशीच धमाल आणेल यात शंका नाही.
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11