नववर्ष विशेष २०२०
राधिका पार्थ – response.lokprabha@expressindia.com

नाताळचा सण जगभर सर्वत्र साजरा केला जात असला तरी जगभरातल्या काही ठिकाणच्या ख्रिसमसला विशेष महत्त्व आहे. ख्रिसमस साजरा करायला या ठिकाणी कधीतरी जावे अशी ख्रिश्चनधर्मीयांची इच्छा असते.

येशू ख्रिस्तांनी दिलेला शांतता, करुणा आणि प्रेमाचा संदेश जगभरात पोहोचविण्यासाठी नाताळ हा सण खूप महत्त्वाचा समजला जातो. त्यानिमित्त आत्पस्वकीय, मित्र, नातलग एकत्र येतात. त्यामध्ये एकमेकांना कोणी गिफ्ट्स देतं, कोणी ग्रीटिंज, कोणी ख्रिसमस ट्री उभारतं, कोणी आपली इमारत विद्युत रोषणाईने सजवतं, कोणी पारंपरिक खाद्य तयार करतं, कोणी पार्टीचं नियोजन करतं, अशा बऱ्याच गोष्टी ख्रिसमसमध्ये पाहायला मिळतात. असा उत्साहपूर्ण ख्रिसमस साजरा करणारी जगातील काही ठिकाणं विशेष प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणी ख्रिसमसच्या काळात आवर्जून जाता यावं, यासाठी ख्रिस्ती बांधवांची इच्छा असते.

बेथलहेम (इस्राइल)

ख्रिसमस साजरा करण्यासाठी ज्या ठिकाणाला पहिली पसंती दिली जाते ते म्हणजे बेथलहेम. डिसेंबर महिन्याच्या अखेरीला या ठिकाणाला भेट देणं एक पर्वणीच असते. कारण, आपल्या नव्या वर्षांची सुरुवात आणि आगामी आयुष्यात चैतन्य व उत्साह टिकून राहण्यासाठी नाताळानिमित्त बेथलहेम ठिकाणाला लाखोंची गर्दी होत असते. येशूच्या जन्मदिवसानिमित्त केलेली सजावट डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. म्हणून ख्रिस्ती बांधवांसोबत मुस्लीम बांधवदेखील मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात. बेथलहेमच्या संस्कृतीचे दर्शन येथे केलेल्या सजावटींमधून पाहायला मिळते. मध्यरात्री १२ वाजता घडय़ाळाचे ठोके पडतात आणि सेंट कॅथरिन चर्चमध्ये मोठय़ा प्रमाणात लोक जमतात. मँगर स्क्वेअर आणि ओल्डसिटी येथे तर फेअरी लायटिंग, ख्रिसमस ट्री आणि विद्युत रोषणाईने भोवताल प्रकाशात न्हाऊन निघतो. त्याचबरोबर या वेळी नागरिकांना प्रशासनाकडून दिली जाणारी सेवा लक्षात राहते. विशेष म्हणजे ख्रिसमसनिमित्त पारंपरिक खाद्यपदार्थ येथे मिळतात. यामध्ये पारंपरिक अरेबिक कॉफी प्रसिद्ध आहे. आयुष्यात कधीतरी ख्रिसमसनिमित्त या ठिकाणाला जरूर भेट द्यावी.

न्यूयॉर्क सिटी

न्यूयॉर्क सिटीमध्ये जगातील सर्वात मोठा ख्रिसमस साजरा केला जातो. या महिन्यात ऋतूंचा बदलता आविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. डिसेंबरच्या सुरुवातीलाच रॉक टेलर सेंटर रोषणाईने सजविला जातो. इथं साचलेल्या बर्फावर स्केटिंगचा आनंद घेण्यासाठी लोक मोठय़ा प्रमाणात जमा होतात. या शहरात जागोजागी जादूच्या प्रयोगांचे कार्यक्रम होत असतात. बगिच्यांमधून छोटय़ाछोटय़ा रेल्वे, पूल आणि निसर्गाचे देखावे उभे केले जातात. लहान मुलांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच संगीत, नृत्य आणि विनोदाचे कार्यक्रमदेखील सादर केले जातात. रेडिओ सिटी संगीत सभागृहात भरविला जाणारा रॉकस्टार कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. या वेळी फळे, शेतीमाल, फर्निचर, मूर्ती या वस्तूंच्या सजावटी लोकांच्या आकर्षणाचा विषय  असतात. या ठिकाणावरून न्यूयॉर्कच्या सर्वात मोठय़ा डिपार्टमेंटल स्टोअरचा देखावा पाहायला मिळतो. त्याचबरोबर जगप्रसिद्ध न्यूयॉर्क बॅलेट परफॉर्मन्स ‘द नट क्रॅकर’सुद्धा पाहायला मिळतो.

झ्युरीक (स्वित्र्झलड)

ख्रिसमसच्या दिवशी इथे सार्वजनिक वाहतूक बंद असते. याचे कारण, येथे प्रत्येक चौकाचौकांत ख्रिसमस ट्री उभारण्याची, सजावटींची तयारी सुरू असते. त्याचबरोबर सेल्फी स्पॉटदेखील उभारले जातात. झ्युरीकचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे मिळणारी चॉकलेट्स. ती जगभरात प्रसिद्ध आहेत. खरेतर झ्युरीकची बाजारपेठ विविध वस्तूंच्या विक्रीकरिता विख्यात आहे. ख्रिसमसच्या दिवशी ग्राहकांना खाद्यपदार्थावर भरपूर ऑफर्स दिलेल्या असतात. नाताळनिमित्त ओल्ड टाऊनमध्ये उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी झालेली असते. त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांमध्ये खरेदीदारांची झुंबड उडालेली असते. लहान मुलांच्या गाण्यांचा जोरदार कार्यक्रम आयोजित केलेला असतो. हिरवळीवर केलेली विद्युत रोषणाई वेगळाच अनुभव देऊन जाते. झ्युरीकमध्ये सजविलेले ख्रिसमस ट्री, विद्युत रोषणाईने नटलेल्या इमारती-रस्ते, चौकाचौकांत दिसणाऱ्या सजवलेल्या बसेस आणि विशेष म्हणजे हस्तकलेच्या वस्तू या सर्वामुळे इथला ख्रिसमस आठवणीत राहतो.

टोकियो (जपान)

टोकियोमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन नाताळ साजरा करतात. संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने प्रकाशमय झालेले असते. येथे ख्रिसमसचा दिवस लोक आनंदात साजरा करताना दिसतात. ख्रिसमसची संध्याकाळ तर त्याहूनही अवर्णनीय असते. रंगीबेरंगी प्रकाशमय वातावरणात, गाण्यांच्या ठेक्यावर मौज-मस्ती चाललेली दिसून येते. क्रीम केक, स्ट्रॉबेरीज आणि फ्राइड चिकन हे या दिवसाचे खास जेवण असते. टोकियोमधील शॉपिंग मॉलमध्ये, ख्रिसमस मार्केटमध्ये ख्रिसमस ट्री उभे केले  जातात. यातून जपानी परंपरांचे दर्शन होते. नाताळानिमित्त बाजाारपेठेत येणाऱ्या ‘ख्रिसमस केक’चे बच्चेकंपनीला मोठे आकर्षण असते. होक्काईडो नावाचे युरोपियन धाटणीचे शहर ख्रिसमससाठीचे मोठे मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात भेटवस्तूंची विक्री होत असते. ल्युमिनेशन नावाचा रस्ता ख्रिसमससाठीच प्रसिद्ध आहे. प्रेमी युगुलांना एकांत मिळावा या दृष्टीने हा रस्ता खास सजविलेला असतो. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी टोकियोच्या रस्त्यावर आयोजित होणाऱ्या डिस्ने कार्टून शोला मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. प्रकाशमय वातावरणात ख्रिसमस साजरा करण्यासाठी टोकियो हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे.

व्हॅटिकन सिटी (इटली)

मक्का-मदिना जशी मुस्लीमांची पवित्र स्थानं मानली जातात त्याचप्रमाणे ‘व्हॅटिकन सिटी’ हे ख्रिश्चन धर्मियांचे पवित्र स्थान मानले जाते. या शहरात असणारे कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे चर्च म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, १०० कोटींपेक्षाही जास्त लोक या चर्चचे सभासद आहेत. साहजिक इथे साजरा होणारा ख्रिमसम हे या शहराचे वैभव आहे. नाताळादिवशी चर्चमध्ये होणारे पोप यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला असतो. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा होताना लोकांमधील शांतता आणि एकता पाहण्यासारखी असते. सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या आवारात जवळजवळ १५ हजारांहून जास्त लोक एकत्र जमलेले असतात. ‘मिडनाइट मास’ या कार्यक्रमाला प्रवेश मोफत असला तरी त्याचं बुकिंग तीन महिने आधीपासून सुरू झालेले असते. मात्र, प्रत्यक्ष ज्यांना तिकीट मिळालेले नसते त्यांच्यासाठी लाइव्ह प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते. कॅथलिक चर्चच्या आवारात साजरा होणारा ख्रिसमस हे या शहराचे वैशिष्टय़ आहे.

या पाच स्थानांव्यतिरिक्त आणखी काही ठिकाणे जगात आहेत. त्यामध्ये सॅनजुआनसारख्या बेटावर ख्रिसमस साजरा करताना एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देऊन येशू ख्रिस्तांची गाणी गायली जातात. त्याचबरोबर  सहभोजन केले जाते. ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचही ख्रिसमस साजरा करण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. बर्फावरील स्केटिंग, डीजे आणि रॉक बँडच्या तालावर तरुणांचा जल्लोष ही या ठिकाणाची वैशिष्टय़े आहेत. डब्लिन आयलॅण्डवरील नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. तेथे चक्क १२ दिवस ख्रिसमस साजरा केला जातो. नाताळाच्या सणाला फोर्टी फुट्सी वॉटर पूलमध्ये मॉर्निग स्विमचा आनंद आवर्जून घेतला जातो. ख्रिसमसच्या काळात मिळणाऱ्या चेरीज हे इथले खास आकर्षण असते.