नववर्ष विशेष २०२०
विजय दिवाण – response.lokprabha@expressindia.com

दारोदारी उभारलेले ख्रिसमस ट्री, त्याभोवती भेटवस्तू, रोषणाईने सजलेल्या बाजारांमध्ये खरेदीसाठी उडणारी झुंबड, मध्यरात्रीची प्रार्थना, उपवास.. युरोपातील ख्रिसमसचा नूर खासच असतो.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Loksatta vasturang Exemption in stamp duty and fine
मुद्रांक शुल्क व दंडात सवलत

येशूला साक्षात् ईश्वराचा पुत्र मानणारे जगभरातले ख्रिश्चनधर्मीय २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करतात. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये हा सण निरनिराळ्या प्रकारे साजरा होतो. विशेषत: युरोप खंडातल्या बहुवांशिक आणि बहुभाषिक राष्ट्रांमध्ये आपापल्या परंपरांनुसार हा सण साजरा होतो. युरोपातल्या कुशल दर्यावर्दी खलाशांनी दोन हजार वर्षांपूर्वी जगभराच्या समुद्र-सफरी सुरू केल्या, त्यानंतरच भारतात ख्रिस्ती धर्माची सुरूवात झाली. इसवी सनाच्या पहिल्याच शतकातल्या ५२ साली धर्मातर करून काही भारतीयांनी इथे ख्रिस्ती धर्म स्वीकारला असे मानले जाते. आजच्या घडीला भारतात साधारणत: अडीच कोटी ख्रिश्चनधर्मीय आहेत. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर नागालँड, आणि मिझोरम, तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा आणि केरळ, आणि पूर्व किनाऱ्यावरील तमिळनाडू या राज्यांत ख्रिश्चनधर्मीयांचे प्रमाण जास्त आहे. ख्रिस्ती धर्माची ही सारी भारतीय कुटुंबे दर वर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमसचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. त्या दिवसाआधी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन कुटुंबीय चर्चमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थना करतात. या प्रार्थनेस इंग्रजीत ‘ख्रिसमस मास’ असे म्हणतात. ही प्रार्थना दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या ख्रिस्त-जन्म दिनाच्या स्वागतासाठी असते! त्या नंतर ख्रिसमसच्या दिवशी ख्रिश्चनधर्मीय आपापली घरे स्वच्छ करून चांगली सजवतात. घराच्या बठकीच्या खोलीत सुरूच्या झाडासारखा दिसणारा एक ‘ख्रिसमस ट्री’ उभा करून त्यास सुंदर पताकांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवतात. ख्रिस्ती पुराणांतल्या वेगवेगळ्या कथांवर आधारित असे काही देखावेही तिथे तयार करतात, आणि त्या देखाव्यांत ख्रिस्त-माता मेरी, सांताक्लॉज वगरेंच्या छोटय़ा मूर्ती ठेवतात. आपापल्या घरांदारांवर दिव्यांच्या माळा लावतात. तसेच त्या दिवशी नवे कपडे घालून आप्तस्नेह्य़ांना भेटणे, त्यांना शुभेच्छा देणे, एकमेकांना केक-पेस्ट्रीज्, किंवा मिठाया आणि भेटवस्तू देणे, आणि मित्रांना डिनरसाठी बोलावणे अशा प्रकारे ख्रिसमसचा सण भारतात साजरा केला जातो. या उत्सवासाठी २५ डिसेंबर या दिवशी देशात सार्वत्रिक सुट्टी दिली जाते. पूर्वीच्या काळी युरोपात सूर्याला देव मानून त्याचा उल्लेख ‘अजिंक्य सूर्य’ (नातालीज् सोलिस) असा केला जात असे. पुढे येशू ख्रिस्ताला लोक सूर्याचा अवतार मानू लागले. त्यामुळे ख्रिस्तजन्माच्या उत्सवाच्या काळाला ‘नाताळ’ म्हणण्याची प्रथा पडली.

मागच्या दहा वर्षांच्या काळात पश्चिम युरोप, मध्य युरोप आणि त्यांच्या पूर्वेकडील स्कॅन्डिनेव्हियातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांतील काही देशांत तर अगदी ऐन ख्रिसमसच्या काळातच गेलो होतो. पश्चिम युरोपातील इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स; किंवा मध्य युरोपातील हंगेरी, क्रोएशिया, स्लोव्हेनिया; आणि पूर्व युरोपातील नॉर्वे, स्वीडन या युरोपियन देशांमध्ये मात्र ख्रिसमसचा सण केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसतो. ख्रिसमसच्या आगमनापूर्वी तब्बल चार आठवडे आधीच या सणाचे विधी घरोघरी सुरू होतात. तिकडच्या लोकांशी बोलताना लक्षात आले, की २५ डिसेंबरला, म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी या जगात प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरागमनच होते अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे ख्रिसमसपूर्वीचा चार रविवारचा कालावधी हा येशूच्या आगमनाच्या ‘प्रतीक्षेचा काळ’ म्हणून युरोपमध्ये पाळला जातो. सुमारे २४-२५ दिवसांच्या या प्रतीक्षा काळाला इंग्रजीत ‘अ‍ॅडव्हेण्ट’ असे म्हणतात. येशूच्या पुनरागमनाच्या या ‘पवित्र’ मानलेल्या प्रतिक्षाकाळात सगळ्या चर्चमध्ये आणि युरोपियन ख्रिश्चनांच्या घरी प्रार्थना केली जाते. प्रतीक्षाकाळाचे हे चार आठवडे स्वत:च्या चुकांबद्दल आणि केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी असतात. ख्रिसमस दिनापूर्वीच्या या चार रविवारांच्या काळात भाविक आपापल्या चुकांबद्दल क्षमायाचना करतात. काही युरोपियन देशांमध्ये या चार रविवारी पापक्षालनासाठी लोक उपासही करतात!

या काळात घरोघरी झाडांच्या ताज्या हिरव्या पानांचे एक पर्णचक्र तयार केले जाते. त्या चक्रास युरोपियन मंडळी ‘अ‍ॅडव्हेण्ट रेथ’ म्हणतात. हे पर्णचक्र नवजीवनाचे प्रतीक असते. या पर्णचक्रावर चार-पाच मेणबत्त्या उभ्या ठेवल्या जातात. त्यांतल्या तीन मेणबत्त्या जांभळ्या रंगाच्या आणि एक मेणबत्ती गुलाबी रंगाची असते. जांभळ्या मेणबत्त्या पश्चात्तापाच्या निदर्शक असतात, आणि गुलाबी मेणबत्ती ही येशूच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ असते. ख्रिसमसपूर्वीच्या चार रविवारांपकी पहिल्या तीन रविवारी या पर्णचक्रांवर एकेक जांभळी मेणबत्ती पेटवून ती तेवत ठेवली जाते. आणि मग ख्रिसमस-दिनाआधीच्या शेवटच्या रविवारी आनंददर्शक अशी गुलाबी मेणबत्ती पेटवली जाते. मेणबत्त्या लावण्यासाठीच्या या पर्णचक्रासोबत घरांतील लहान मुलांसाठी मुद्दाम तयार केलेले एक मजेशीर ख्रिसमस-कॅलेंडर िभतीवर लावले जाते. १ डिसेंबर ते २४ डिसेंबर अशी एकूण २४ कागदी पाने या कॅलेंडरवर असतात. त्यातील प्रत्येक पानावर मुलांना सहज उघडता येईल अशी एकेक ‘खिडकी’ असते. घरातील एखाद्या लहान मुलाला किंवा मुलीला एक डिसेंबरपासून दररोज सकाळी कॅलेंडरच्या एका पानावरची खिडकी उघडण्यास सांगितले जाते. ती खिडकी उघडली की आतमध्ये येशूख्रिस्ताच्या जीवनातल्या एखाद्या प्रसंगाचे छापलेले रंगीत चित्र त्या बालकांना दिसते. मग पालक घरातल्या बालकांना त्या चित्रातील प्रसंग वर्णन करून सांगतात. अशा तऱ्हेने या २४ पानी कॅलेंडरचे एकेक पान दररोज उलटत जाऊन ख्रिसमसच्या दिवसापर्यंत घरच्या मुला-मुलींना ख्रिस्तजन्मापासून ते ख्रिस्ताला सुळावर चढवेपर्यंतच्या सर्व कहाण्या सांगितल्या जातात. कॅथॉलिक ख्रिश्चनांमध्ये ख्रिसमसच्या आधी चार आठवडय़ांच्या ‘अ‍ॅॅडव्हेंट’ या प्रतीक्षाकाळातच ६ डिसेंबर रोजी ‘सेंट निकोलस’ या संताच्या नावे घरोघरी प्रार्थना होऊन मेजवानी आयोजित केली जाते.

युरोपातील सगळ्याच देशांमध्ये ख्रिसमसच्या काळात ‘सांताक्लॉज’ला फार महत्त्व असते. शुभ्र पांढरे केस आणि पांढरी दाढी असणारा, पांढऱ्या झालरींचा लाल डगला घालणारा, आणि डोक्यावर लाल गोंडय़ाची टोपी असलेला हसऱ्या चेहऱ्याचा हा जख्ख म्हातारा सांताक्लॉज उत्तर ध्रुवावरून येतो असा समज होता. उत्तर ध्रुवावरच्या अतिबर्फाळ प्रदेशातून रेनडिअर जातीची हरणे जुंपलेल्या गाडीत बसून तो येतो अशी आख्यायिका होती. घराघरांतल्या चांगल्या, सद्गुणी बालकांना ‘सांताक्लॉज छान छान खेळणी घेऊन येतो आणि ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लहान मुले गाढ झोपी गेल्यानंतर ऐन मध्यरात्री तो घरातल्या ख्रिसमस वृक्षांजवळ मुलांसाठीची खेळणी ठेवून जातो’, अशी कहाणी ख्रिश्चन कुटुंबांमध्ये अनेक आई-वडील आपल्या मुलांना आजही सांगतात. ‘तूू हट्ट करू नकोस, उद्धट बोलू नकोस, चांगले वाग, तरच सांताक्लॉज ख्रिसमसमध्ये तुझ्यासाठी भेट म्हणून खेळणी आणेल’, असे ते सांगतात. आणि मग मुलांनी चांगले वागण्याची हमी दिली, की हे आई-वडील स्वत:च बाजारातून खेळणी विकत आणून गुपचूप त्या ख्रिसमस झाडाखाली ठेवून देतात! पूर्वीच्या काळी युरोपातील घरांमध्ये स्वयंपाकाच्या खोलीवर एक प्रचंड मोठे धुराडे असे. इंग्रजीत त्यास ‘चिमणी’ असे म्हणत. आणि ख्रिसमसमध्ये सांताक्लॉज हा त्या चिमणीतून खाली येतो, आणि मुलांसाठीची खेळणी ठेवून गुपचूप परत निघून जातो, असे घरातल्या छोटय़ा मुलांना मोठी माणसे सांगत असत.

ख्रिसमसच्या दिवशी कुंडीत लावलेला सुरूचा वृक्ष घरात आणून ठेवण्याची परंपरा युरोपमध्ये सुमारे एक हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. सुरूचा वृक्ष हा सदाहरित असतो. त्या वृक्षास कायम तारुण्याचे ईश्वरी वरदान असावे, अशी श्रद्धा पूर्वी उत्तर-युरोपातील लोक बाळगून होते. म्हणून आजही ख्रिसमसच्या पावन दिवशी सजवलेला सुरू वृक्ष ते घरात आणून ठेवतात. ज्यांना खराखुरा वृक्ष आणणे शक्य नसते, ते लोक सुरूसारखे दिसणारे कागदी पानांचे लाकडी झाड विकत आणून ठेवतात. त्या कृत्रिम झाडावर फुले, फळे, मेणबत्त्या आणि दिव्यांच्या माळा वगरे गोष्टी लावून ते सजवलेले असते. पश्चिम युरोपातील काही राष्ट्रांमध्ये लोक ख्रिसमसच्या आदल्या दिवशी मध्यरात्री चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनेला, आणि त्यानंतर आप्तस्वकीयांना दिल्या जाणाऱ्या रात्रीच्या जंगी मेजवानीला महत्त्व देतात. तर काही राष्ट्रांतील कुटुंबे खुद्द ख्रिसमसच्या दिवशी घरी प्रार्थना करणे, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, आणि नातेवाईक यांना भेटवस्तू देणे हे महत्त्वाचे मानतात. काही स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्रांत २५ डिसेंबरपासून पुढे बारा दिवस ख्रिसमसचा उत्सव साजरा केला जातो. ख्रिश्चन पुराणांमध्ये एक अशी कथा आहे, की पॅलेस्टाइननजीकच्या बेथलेहेम गावात येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर १२ दिवसांनी आसपासच्या प्रदेशांतील तीन राजे येशूला पाहण्यासाठी आले. त्या वेळी त्या पाहुण्यांना असा साक्षात्कार झाला की येशू हा खुद्द ईश्वराचाच अवतार आहे! त्यांच्या साक्षात्काराचा दिवस ६ जानेवारी हा होता. म्हणून युरोपातील काही राष्ट्रांमध्ये ख्रिसमसचा उत्सव २५ डिसेंबर ते ६ जानेवारी असा एकूण १२ दिवस साजरा केला जातो!

जर्मनीमध्ये ख्रिसमससाठी जे देखावे मांडतात, त्यात हाताने कोरलेल्या सुंदर लाकडी वस्तू, खेळणी, दिवे, कमानी आणि नक्षीदार लाकडी पिरॅमिड्स ठेवण्याची परंपरा आहे. नॉर्वे या देशात दिवसा सूर्यप्रकाश फारच कमी वेळ असतो. त्यामुळे तिथे दुपारपासूनच दिवे लावावे लागतात. ख्रिसमसच्या दिवसांत तर तिथे रस्त्यांवर, घरांवर आणि व्यापारी इमारतींवर २४ तास रोषणाई केलेली असते. फ्रान्समध्येही ख्रिसमसच्या आठवडय़ांत थोडीफार रोषणाई करतात, मात्र त्यांचा मुख्य भर हा उत्तमोत्तम खाद्यपदार्थावर असतो. तिथे घरी आणि बाजारी स्वादिष्ट खाद्यपदार्थाची रेलचेल असते. पॅरिसमध्ये मध्यरात्रीच्या प्रार्थनेनंतर अगदी पहाटेपर्यंत सारी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू असतात. तिथे स्वादिष्ट मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. रात्रभर ख्रिसमसचा जल्लोष अनुभवल्यानंतर अगदी पहाटे पहाटे तिथले नागरिक ‘ले रिव्हेलॉन द् नोएल’ नावाचा एक मोठा खाद्यसमारंभ साजरा करतात,

इंग्लंडमध्ये काळाच्या ओघात ख्रिसमस साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झालेले आहेत. अलीकडे तिथे पूर्व आणि पश्चिम युरोपातील काही प्रथांचे अनुकरण लोक करू लागले आहेत. पण तरीही अनेक शहरांत तिथल्या जुन्या व्हिक्टोरियन प्रथांचे पालन कसोशीने केले जाते. यात लहान मुलांच्या कौशल्यांना प्राधान्य दिले जाते. स्वत:च्या आवडीनुसार ख्रिसमस वृक्ष सजवणे, चर्चमधील सामूहिक प्रार्थना, ख्रिस्ती पुराणांवर आधारित नाटुकल्यांमध्ये भाग घेणे, सांताक्लॉजला पत्र पाठवणे, असे गमतशीर उद्योग इंग्लिश लहान मुलं करतात. त्यांशिवाय लहान मुलांसाठी अगदी निरुपद्रवी असे काही कागदी फटाकेही इंग्लंडमध्ये मिळतात. सुमारे दोन शतकांपूर्वी इसवी सन १८४७ मध्ये लंडनमध्ये टॉम स्मिथ हा एक चॉकलेटच्या गोळ्यांचा उत्पादक होता. एकदा त्याच्या ‘बॉन् बॉन’ चॉकलेट्सचा खप कमी झाला, तेंव्हा त्याने खप वाढवण्यासाठी एक युक्ती केली. कागदाच्या छोटय़ा पट्टय़ांवर एका बाजूला काही विशिष्ट रसायने लावून घडी घातलेल्या त्या पट्टय़ा ‘बॉन् बॉन’ चॉकलेट्ससोबत मुलांना मोफत देण्यास त्याने सुरुवात केली. रसायन लावलेल्या त्या कागदी पट्टय़ा जर एकावर एक घासल्या तर त्यांतील रसायनांची प्रक्रिया होऊन त्यांतून ‘फट्’ असा छोटय़ा फटाक्यासारखा आवाज निर्माण होत असे. त्यामुळे मुलांना इजा होत नसे. पण गंमत वाटत असे. त्या ‘फट्’ वाजणाऱ्या कागदासाठी मुले ती चॉकलेट्स विकत घेऊ लागली. आजही इंग्लंडमध्ये ख्रिसमसच्या दिवसांत लहान मुले हे ‘फट्’ वाजणारे कागदी फटाके उडवतात! डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच खास ‘ख्रिसमस बाजार’ उघडले जातात. आपल्याकडे दिवाळीत जशी नाना प्रकारच्या वस्तूंची तात्पुरती दुकाने सुरू केली जातात, तशीच तिकडे युरोपातही  ख्रिसमसमध्ये असतात. तिकडच्या अनेक शहरांत एरव्ही शुकशुकाट असणारे रस्ते खरेदीसाठी बाहेर पडलेल्या स्त्री-पुरुषांच्या आणि मुलाबाळांच्या गर्दीने फुलून जातात.