News Flash

सजल्या बाजारपेठा

ख्रिसमस आणि पाठोपाठ येणारं नवं वर्ष या दोन्ही गोष्टी म्हणजे आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी पर्वणीच.

डिसेंबर महिना सुरू झाला की, बाजारपेठा ‘नाताळ’ सणाच्या साहित्याने सजायला लागतात.

नववर्ष विशेष २०२०
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

ख्रिसमस आणि पाठोपाठ येणारं नवं वर्ष या दोन्ही गोष्टी म्हणजे आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी पर्वणीच. त्यामुळे तुडुंब भरून वाहत असलेल्या बाजारपेठा आणि खरेदीदारांचा उत्साह या दोन्ही गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत.

डिसेंबर महिना सुरू झाला की, बाजारपेठा ‘नाताळ’ सणाच्या साहित्याने सजायला लागतात. दोन-तीन आठवडय़ांपासून लगबग सुरू झालेली असते. मग, अशा बाजारांमध्ये सांताक्लॉजचे पुतळे, मोजे, मुखवटे, टोप्या, खेळणी, बाहुली, पिशव्या, सांताक्लॉजचे आणि ख्रिसमस ट्रीचे चित्र असणारे आकर्षक कॉफी कप, उशी, टेडी, चश्मे, कॅण्डल स्टॅण्ड, चॉकलेट्सचं हँपर बास्केट, आकर्षक पद्धतीने तयार केलेली ग्रीटिंग्ज, स्टार्स, चेरी, रीथ, चिनी बनावटीच्या पानांफुलांच्या वेली, झाडे, फळे, ख्रिसमस केक आणि चकाकणाऱ्या विविध प्रकारच्या एलईडी लाइट्स, या सर्व वस्तूंनी बाजारपेठा अगदी तुडुंब भरून वाहत असतात.

सध्या बाजारात विविध प्रकारच्या वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. घरातील हॉल तसंच गॅलरी, सोसायटीचे पटांगण, चर्च सजविण्याकरीता सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नाताळ सणाची प्रतीके लक्षात घेतली की, बऱ्याच गोष्टी बाजारात दाखल का होतात, याचा उलगडा होतो. नाताळ सणातील असंच एक प्रतीक म्हणजे ‘ख्रिसमस ट्री’. त्याची कहाणी असं सांगते की, ख्रिस्ती धर्मामध्ये येशू हे ‘जीवनदायी झाड’ आहे आणि आपण त्याच्या फांद्या आहोत, अशी भावना त्या ख्रिसमस ट्रीमागे असते. आणि त्याचेच प्रतीक म्हणून ‘ख्रिसमस ट्री’ नाताळ सणामध्ये लोकप्रिय झाले. लोकांना ख्रिसमस ट्रीचे खूप आकर्षण असते. त्यामुळे बाजारात दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री आले आहेत. यासंदर्भात मुंबईतील व्यापारी हैदर खान सांगतात की, ‘‘दरवर्षीप्रमाणे या वर्षी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सजविलेले ख्रिसमस ट्री बाजारात आलेले आहेत. त्यामध्ये ‘तैवान ट्री’ला सर्वात जास्त मागणी आहे. चार फुटांपासून ३० फुटांपर्यंत ख्रिसमस ट्री बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये ८०० रुपयांपासून अगदी १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्रीच्या किमती आहेत.’’

ख्रिसमस ट्रीची शोभा वाढविण्यासाठी आणि परिसर सजविण्यासाठी चिनी बनावटीच्या एलईडी लाइट्सची गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये कागदी आणि मेटलचे चांदणीच्या आकाराचे आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तसेच चिनी बनावटीच्या एलईडी लाइट्स असणाऱ्या प्रकाशदिव्यांच्या माळादेखील विकत घेण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रकाशमाळांचे मुंबईतील विक्रेते नूर शेख सांगतात की, ‘‘नऊ फुटांपासून २० फुटांपर्यंत प्रकाशमाळा उपलब्ध आहेत. त्याच्या किमती ३०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत आहेत. त्याचबरोबर एलईडी स्टार्स व हँगिंग स्ट्रीप लॅम्प खरेदी करण्याचे प्रमाणही सर्वात जास्त असून त्याच्या किमती ३०० रुपयांपासून एक हजारापर्यंत आहेत. त्याचबरोबर स्टार लाइट फेअरी लेझर प्रोजेक्टरला ग्राहकांची पसंती आहे.’’

नाताळचं आणखी एक प्रतीक म्हणजे ‘नाताळ गोठा किंवा ख्रिसमस हाऊस’. याची कहाणी तर खूपच लक्षवेधक आहे. १२ व्या शतकामध्ये नाताळ सण साजरा करण्याचा मूळ हेतू लोक विसरून गेलेले होते. नाताळ म्हणजे फक्त मौजमजा आणि पार्टी करणे, असा मर्यादित हेतू लोकांनी घेतला होता. यासाठी मूळ धर्म आणि येशू माहात्म्य लोकांनी विसरू नये, यासाठी इटलीतील असिसी गावचा संत फ्रान्सिस यांनी ‘नाताळ गोठा’ ही प्रथा सुरू केली. त्याची लोकप्रियता वाढली अन् नाताळ गोठा ही संकल्पना प्रस्थापित झाली. त्याचेच छोटे प्रतीक म्हणून सध्या बाजारात मोठय़ा प्रमाणात तयार नाताळ गोठे उपलब्ध झालेले आहेत. या संदर्भात नूर शेख सांगतात की, ‘‘बांबू, मेटल, फायबर, प्लास्टिक, चिनी माती, अशांपासून तयार केलेले नाताळ गोठे पाहायला मिळत आहेत. तसेच गोठय़ातील हरीण, मेंढय़ा, चारा, गावकरी, प्रभू येशूंचे आई-वडील आणि खुद्द नुकतेच जन्माला आलेले बाल्यावस्थेतील प्रभू येशू यांच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. प्रत्येकी वेगवेगळ्या मूर्तीदेखील मिळतात आणि त्याचबरोबर तयार नाताळ गोठादेखील बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांच्या किमती २०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच एकत्रितपणे येशूंच्या जन्मसोहळ्याचा देखावाही चिनी मातींच्या स्वरूपात विक्रीसाठी बाजारात असून त्याच्या किमती दोन हजारांपासून आठ हजार रुपयांपर्यंत आहेत.’’

आता नाताळ सणाची सजावट म्हटली की, चिनी बनावटीच्या प्लॅस्टिकच्या पानाफुलांच्या वेली, कुंडीतील झाडे आणि चेरी, द्राक्षे आणि वेलींवर चढणारे लाल कपडय़ांतील सांताक्लॉज गिफ्ट या सगळ्या गोष्टी आल्याच. या वस्तू बाजारात ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा असल्याने त्यांची विक्रीदेखील खूप आहे. तसेच मेटलचे सोनेरी रंगाचे हरीण, उंट, ख्रिसमस ट्री, गोठे, स्टार्स, कापडी स्नोमॅन व त्याचे स्टिकर्स, ख्रिसमस स्टॉकिंग यांच्या भरपूर व्हरायटी बाजारात पाहायला आहेत. त्याचबरोबर ‘मेरी ख्रिसमस’ लिहिलेली कागदी आणि प्लॅस्टिकपासून तयार केलेली पाटी आणि गोल्डन-ग्रीन अक्षरमाळ यांच्या किमती १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहेत. सजावटींमधला आणखी एक खास प्रकार म्हणजे रीथ. याच्या किमती ३०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत.

ग्राहकांचे सर्वात जास्त लक्ष खेचणारे हलते-फिरते स्नो फॉल्स आणि स्नोमॅन्सचे डेकोरेशन मशीन यांच्या रचनेबद्दल व्यापारी शहनवाज काझी सांगतात की, ‘‘उलटय़ा आकाराची छत्री घेऊन त्यावर थर्माकॉलच्या कणांचा ढीग, थर्माकॉलचे तीन स्नोमॅन, छोटय़ा आकाराचा प्रकाशदिव्यांनी नटलेला ख्रिसमस ट्री, छत्रीच्या दांडीला अडकविलेले बेल्स, अशा स्वरूपाची ही स्नोफ्लॉल्स मशीन आहे. तिची मोटार सुरू केली की, छत्रीच्या तळाशी असणारे थर्माकॉलचे कण छत्रीच्या दांडीतून कारंज्यासारखे उडू लागतात. ते कण स्नोमॅन व ख्रिसमस ट्रीवर उडू लागतात. त्यातून बर्फाच्छादित ख्रिसमसचा देखावा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा डेकोरेशन सेटची किंमत २५०० रुपयांपासून १४ हजारांपर्यंत आहे. रेनडिअरच्या गाडीतून येणारा सांताक्लॉज टॉय बलून आणि स्नोमॅन टॉय बलूनलादेखील ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. त्याच्या किमती पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत आहेत.’’

लहान मुलांना आवडणाऱ्या, त्यांना गिफ्ट देऊन खूश करणाऱ्या ‘सांताक्लॉज’ची गोष्ट लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वानाच दानशूरतेचा संदेश देणारी आहे. त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की, सांताक्लॉजचे मूळ नाव संत निकोलस होते. तो खूप दानशूर माणूस होता. लोकांच्या अडीअडचणीला मदत करणारा आणि छोटय़ा-छोटय़ा मुलांना गिफ्ट देणारा हा सांताक्लॉज ख्रिसमस सणामध्ये लहान मुलांना खूपच प्रिय आहे. त्यामुळे सांताक्लॉजचे शुभ्र-लाल रंगाचे ड्रेस, त्याची टोपी, झोळी, चष्मा, बूट, मुखवटा अशा अनेक वस्तू बालगोपाळांना आकर्षित करतात. म्हणून बाजारात अशाच वस्तूंची रेलचेल पाहायला मिळते. अशा वस्तूंमध्ये एलईडी लाइट असणारी आणि तुरे असणारी सांताक्लॉजची टोपी ही ख्रिसमसची ओळख आहे. बाजारात लहान मुलांसाठी ख्रिसमस टोप्यांची तसेच रेनडिअर हेडबॅण्ड विकत घेण्यासाठी पालकांची गर्दी नोंद घेण्यासारखी आहे. त्याचबरोबर घरातील सजावटीसाठी प्लॅस्टिकचे सोनेरी हॅिगग बेल्स आणि बॉल्स, मेटलच्या पक्षांचा खोपा यांची विक्रीदेखील चांगली आहे. प्लॅस्टिकचे एलईडी लाइट्स बसविलेले कॅण्डल, तसेच प्लॅस्टिकच्या कमळ आणि सफरचंदाच्या आकाराच्या कॅण्डलला लोकांची पसंती आहे.

नाताळ सणादिवशी आप्तस्वकीयांच्या भेटी घेऊन त्यांचा पाहुणचार केला जातो. तसेच त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात. अशा भेटवस्तूंनी आणि भेटकार्डानी बाजारपेठीतील दुकाने सजलेली दिसत आहेत. खास करून तरुणांनी भेटवस्तू विकत घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. भेटकार्डामध्ये प्रभू येशूचे विविध संदेश आणि सांताक्लॉजचे चित्र ग्राहकांची गर्दी खेचत आहेत. भेटवस्तूंमध्ये लाल रंगाची उशी, कॉफी मग, रेनडिअर कॅण्डल स्टॅण्ड, स्नोमॅन, जिझस सिम्बॉल असणाऱ्या मूर्ती, छोटय़ा सायकलच्या कॅरियरवर असणारे पानाफुलांचे गुच्छ, प्लॅस्टिकच्या कुंडीतील झाडे, छोटय़ा आकाराचे स्नोमॅन, ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज डॉल आणि किचेनला महाविद्यालयीन तरुणांकडून पसंती मिळत आहे, असे व्यापारी सांगतात.

ख्रिसमसनिमित्त लहान मुलांचा खाऊ मोठय़ा प्रमाणात विकत घेतला जातो, त्यामुळे चॉकलेट्स, काजू-पिस्ता-बदाम यांचे बॉक्स आणि आकर्षक डिझाईन करून तयार केलेले केक ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सांताक्लॉजच्या चित्राने सजविलेले काजू-पिस्ता-बदाम यांचे डबे आणि बॉक्सेसवर वेगवेगळ्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांची लॉलीपॉप, मासमेलो, फ्रुटी आणि जेलीला विशेष पसंती आहे. ख्रिसमसचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘ख्रिसमस केक’. बाजारात सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या डिझाईन्स केलेल्या केकबरोबर सांताक्लॉजची टोपी किंवा स्नोमॅनच्या बाहुल्या मोफत दिल्या जात आहेत. तसेच बाजारात अंजीर केक, चॉकलेट केक, प्लम केक, मावा केक यांना ग्राहकांकडून मोठी पसंती आहे.

ख्रिसमसनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी आणि दुकानदारांनी वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहेत. ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:02 am

Web Title: christmas market shopping
Next Stories
1 तिळाची स्निग्धता
2 गुळाचा गोडवा
3 बाजरीतले उष्मांक
Just Now!
X