नितीन मुजुमदार

पेलेने त्याच्याहून अधिक गोल नोंदविले आहेत आणि लिओनेल मेस्सीने त्याच्याहून कैक अधिक वैयक्तिक ट्रॉफीज उंचावल्या आहेत, आपल्या संघासाठी जिंकल्याही आहेत. इतरही असे अनेक फुटबॉलपटू जगाने पाहिले ज्यांनी नोंदविलेले विक्रम आकडय़ांमध्ये बघितले तर खूप श्रेष्ठ आहेत, पण तरीही जगाने हे मान्य केले आहे की फुटबॉलपटू म्हणून मॅराडोना केवळ अद्वितीय होता! अप्रतिम पदललित्य, चेंडूवरचा ताबा स्वत:कडे ठेवण्याबाबत त्याच्याकडे असलेले अविश्वसनीय कौशल्य, प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवा देणारी त्याची बेरकी नजर आणि जेमतेम साडेपाच फूट उंची लाभलेली असूनही प्रतिस्पर्धी गोलपोस्टकडे सतत धडका मारणारी त्याची जिगरी वृत्ती यामुळे फुटबॉल इतिहासात मॅराडोना सर्वकालीन महान खेळाडू म्हणून गणला गेला ही गोष्ट तशी अपेक्षितच.

खेळाडू म्हणून महान असलेला मॅराडोना व्यक्ती म्हणून कायम वादग्रस्त राहिला. ड्रग्ज सेवनावरून त्याचे नाव कायम चर्चेत राहिले आणि एका महान खेळाडूच्या आयुष्याची ही दुसरी बाजूही कायम माध्यमांमध्ये चर्चिली गेली. फुटबॉल मैदानांवर व मैदानांबाहेर वादंगांनी त्याला अनेक वेळा घेरले. १९८६ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध त्याने सुरुवातीला नोंदविलेला गोल ‘हॅण्ड ऑफ गॉड’ म्हणून कुप्रसिद्ध झाला खरा, पण त्यानंतर काही वेळातच त्याने अक्षरश: एकहाती अविस्मरणीय मैदानी गोल नोंदवीत इतिहास घडविला. आजही त्या गोलचा ‘गोल ऑफ दी सेंच्युरी’ म्हणून उल्लेख केला जातो. त्या सामन्यात त्याने एकाच दमात ६८ मीटर्स दौड मारीत इंग्लंडच्या गोलीला, पीटर शिल्टनला चकवत मारलेला गोल आजही असंख्य वेळा नेटवर बघितला जातो. तो गोल नोंदविताना मॅराडोनाने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना- पीटर ब्रेड्सले, पीटर रीड, टेरी बुचर (दोन वेळा), स्टीव्ह हॉग व टेरी फेनविक यांना चकवत, ड्रीबल करीत गोलपोस्ट गाठले होते! त्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या फाऊल्सपैकी जवळजवळ निम्मे मॅराडोनाशी संबंधित होते, एवढा दरारा मॅराडोनाचा प्रतिस्पर्धी संघावर होता. अर्थात प्रतिस्पर्धी संघाने मॅराडोनाला ‘मार्क’ करून खेळणे ही गोष्ट त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत सातत्याने घडली! इंग्लंडचा गॅरी लीनेकर जो त्या सामन्यात खेळला, तो म्हणतो, ‘आयुष्यात प्रथमच मला कोणी गोल नोंदविल्यावर लगेचच त्याचे कौतुक करावेसे वाटले (मात्र मी तसे केले नाही, कारण मी प्रतिस्पर्धी संघात होतो!), असे गोल होताना पाहणे ही बाब अविश्वसनीय होती एवढा सुंदर, मैदानी आणि तोही एकहाती गोल आमच्याविरुद्ध केला गेला होता!’ हा गोल २००२ च्या एका ‘फिफा’च्या ऑनलाइन पोलमध्ये ‘गोल ऑफ दी सेंच्युरी’ म्हणून निवडला गेला. त्या स्पर्धेत मॅराडोनाने ९० यशस्वी ड्रीबल्स केले, क्रमांक दोनवरील खेळाडूच्या तिप्पट! फुटबॉलवर अविश्वसनीय नियंत्रण हा मॅराडोनाच्या संपूर्ण कारकीर्दीतील मानाचा तुरा ठरावा. लीनेकरने त्याबाबत आणि एक अगदी अद्भुत आणि रंजक किस्सा सांगितला, ‘इंग्लंडमध्ये एका सामन्यात वेम्बले येथे एक मोठा प्रदर्शनीय सामना खेळला जाणार होता, मीही त्या सामन्यात होतो आणि मॅराडोनाही. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही बसलेलो असताना त्याने बसून तब्बल पाच मिनिटे आपल्या दोन्ही पायांवर बॉल खाली पडू न देता ड्रीबल केला. नंतर स्वारी ग्राऊंडवर सेंटर सर्कलवर आली. तिथे त्याने पायाने बॉल हवेत जितका शक्य होईल तितका उंच उडविला. तो खाली येईपर्यंत जास्तीत जास्त तीन पावले मागे-पुढे होत बॉल जमिनीवर पडायच्या आत पुन्हा पायाने हवेत शक्य तितका उंच उडविला. पुन्हा बॉल जमिनीवर पडायच्या आत.. असे त्याने सलग १३ वेळा केले, तेही जागेवरून किमान हालचाली करीत! दर्जाच्या बाबतीत त्याच्या जवळपास येणारा फुटबॉलपटू मी बघितलेला नाही. माझ्या पिढीचा तर तो सर्वोत्तम फुटबॉलर होता हे निश्चित!’ हेही गॅरी लीनेकरने या मुलाखतीत आग्रहपूर्वक नमूद केले होते.

मँचेस्टर सिटी कोच पेप गॉरडीओलाने मॅराडोनाच्या अकाली निधनानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. तो म्हणतो, ‘आज मला साधारण एक वर्षांपूर्वी मॅराडोनावर लिहिलेल्या एका बॅनरवरील वाक्य प्रकर्षांने आठवत आहे. त्या बॅनरवर लिहिले होते- ‘मॅराडोना, तू तुझ्या आयुष्यात काय केले हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून तू आमच्या आयुष्यात काय बदल केलेस हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे!’ तो पुढे म्हणतो, ‘मॅराडोनाने जागतिक स्तरावर फुटबॉल रसिकांना आनंद दिला, समाधान दिले आणि त्याचेच प्रतिबिंब या बॅनरमध्ये मला एक वर्षांपूर्वी अर्जेटिनामध्ये दिसले. मॅराडोना म्हणजे फुटबॉल रसिकांसाठी ‘मॅन ऑफ जॉय’ होता.’

‘फिफा’ने विसाव्या शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी  जाहीर केलेल्या पुरस्काराचा तो संयुक्त विजेता होता. दिएगो मॅराडोनाचे फुटबॉल मैदानावरील कौशल्य ‘दिएगो मॅराडोना टॉप ५० अमेझिंग स्किल मूव्हज एव्हर’ या यूटय़ूबवर उपलब्ध असलेल्या फिल्ममध्ये अतिशय सुंदर प्रकारे पाहायला मिळतात. सुमारे एक कोटी ८० लाख व्ह्य़ूज या छोटय़ा, फक्त ६ मिनिटांहून अधिक कालावधी असलेल्या या फिल्मला मिळाले आहेत.

मॅराडोनाचे बालपण अर्जेटिनातील ब्युनोस आयर्स शहराच्या दक्षिणेला असलेल्या विला फिओरितो या एका गरीब वस्तीत गेले. चितोरो व दलमा या दाम्पत्याला चार मुलींनंतर झालेले अपत्य म्हणजे फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना. त्याच्या आईचे पूर्वज इटालियन होते. १९५० च्या सुमारास ते ब्युनोस आयर्समध्ये आले. इतर अर्जेटाइन मुलांप्रमाणे दिएगोलादेखील अगदी लहान वयातच, म्हणजे तिसऱ्या वर्षीच, फुटबॉल ‘पायात’ मिळाला! वयाच्या आठव्या वर्षीच टॅलेंट स्काऊटने त्याच्यातील गुणवत्ता हेरून त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी हे चिरंजीव आपल्या भन्नाट पदलालित्याने अर्जेटिनातील फर्स्ट डिव्हिजन सामन्यांच्या मध्यंतरात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवू लागले. त्याच्यातील फुटबॉलपटू घडविणाऱ्या त्या वयात त्याचे आदर्श ब्राझीलचा मिडफिल्डर रेव्हेलिनो, जो १९७० च्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या फुटबॉल संघात होता आणि मँचेस्टर युनायटेडचा विंगर जॉर्ज बेस्ट हे फुटबॉलपटू होते.

अर्जेटिनाच्या १९८६ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजयात मॅराडोनाचा फार मोठा वाटा होता. या स्पर्धेत त्याने ‘हॅण्ड ऑफ गॉड’ शिक्का बसलेल्या गोलसह इतर चार गोल तर केलेच, पण तब्बल पाच गोलमध्ये त्याने मोलाचे ‘असिस्ट’ही दिले ज्यामुळे त्याच्या संघातील खेळाडूंना गोल करण्यासाठी खूप मदत झाली. या स्पर्धेत अर्जेटिनाने एकूण १४ गोल केले व त्यापैकी १० गोलमध्ये त्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान होते! १९९० साली इटलीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेटिनाने अंतिम फेरी गाठली. घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे मॅराडोनाची कामगिरी मागील स्पर्धेइतकी प्रभावी झाली नाही. अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीने अर्जेटिनाला  १-० असे हरविले. १९९४ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या कारकीर्दीची उतरण सुरू झाली. ड्रग टेस्टमध्ये अपयशी ठरल्यावर दोन सामन्यांनंतरच त्याला मायदेशी पाठवण्यात आले. या स्पर्धेतील ग्रीसविरुद्धचा सामना हा त्याचा अर्जेटिनासाठी गोल केलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना, तर त्यापुढील नायजेरियाविरुद्धचा सामना हा त्याचा अर्जेटिनासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना. मॅराडोनाने एकूण १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ९१ सामन्यांत ३४ गोल केले. त्याने त्याचा इटालियन क्लब नापोलीसाठी दोन वेळा सेरी ए अजिंक्यपदे मिळविली. या क्लबसाठी तो १९८४ ते १९९१ दरम्यान १८८ सामने खेळला व त्यात त्याने ८१ गोल केले. बार्सिलोना व नापोली या दोन क्लब्ससाठी त्याला मिळालेली ट्रान्स्फर फी अनुक्रमे ५० लाख डॉलर्स व ६९ लाख डॉलर्स ही तत्कालीन विक्रमी किंमत होती.

फिफाचा युवा विश्वचषक व फिफा विश्वचषक या दोन्ही स्पर्धात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविणारे दोनच खेळाडू आहेत. एक मॅराडोना व दुसरा लिओनेल मेस्सी, दोन्ही अर्जेटिनाचेच! मॅराडोनाने हा मान १९७९ व १९८६ साली मिळविला, तर मेस्सीने २००५ व २०१४ मध्ये त्याची पुनरावृत्ती केली. आक्रमक मिडफिल्डर असलेला मॅराडोना जगातील सर्वोत्तम ड्रीबलसमध्ये कायम गणला जाईल. ड्रीबलिंगचे हे कौशल्य मॅराडोना व मेस्सी या एकाच देशातील दोन खेळाडूंमध्ये अगदी स्पष्ट जाणवते. मेस्सीही त्याच्या अप्रतिम ड्रीबलिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या खेळात त्याच्या डाव्या पायाचे वर्चस्वदेखील जाणवत असे. अनेक वेळा परिस्थिती उजव्या पायाच्या वापरास अनुकूल असूनही त्याने डाव्या पायाचा वापर यशस्वीपणे केलेला आढळतो. अगदी ‘गोल ऑफ दी सेंच्युरी’ पाहा, त्याने पाच इंग्लिश खेळाडूंचा विरोध मोडून काढताना एकदाही उजवा पाय वापरलेला दिसत नाही.

त्याच्या कारकीर्दीत ड्रग्ज सेवनासह आलेले अनेक प्रसंग ही त्याच्या कारकीर्दीची काळी बाजू. फक्त खेळाडू म्हणून त्याची कामगिरी पाहिली तर दिसतो एक सर्वकालीन महान खेळाडू. त्याच्या दैनंदिन कार्यक्रमात सातत्य नसे. व्यसने मागे लागलेली. अशा पाश्र्वभूमीवर एक फुटबॉलपटू म्हणून आपली कामगिरी त्याने एवढी उंचावली असेल तर त्याच्यात एकूणच गुणवत्ता किती उच्च स्तराची होती याचा अंदाज येतो. अशा या सार्वकालिक महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली!